सकाळचे नैमिक उरकून सुकुमार बाहेर पडला. सकाळची ९.२०ची स्थानिक वेळेची मेट्रो गाडी पकडायची होती. त्यामुळे फ्लॅटच्या बाहेर पडल्याबरोबर ६०व्या मजल्यावरून तो लिफ्टने १०व्या मजल्याच्या गच्चीवर आला, गच्चीच्या मुख्य एरियामधून चारी दिशेला जाणाऱ्या चौकामधून तो रेल्वे स्टेशनवर आला. दरवाजावरील इंडिकेटरला अंगठय़ाचा स्पर्श देऊन झटकन स्टेशनवर जाणाऱ्या यांत्रिक मार्गिकेवर आला व इतर प्रवाशांबरोबर उभा राहिला. यांत्रिक मार्गिका आपल्या पद्धतीने स्टेशनच्या मुख्य दरवाजाकडे सरकत होती असे म्हणण्यापेक्षा पळत चालली होती. काही सेकंदामध्ये तो स्टेशनच्या मुख्य दरवाजावर आला. प्रवेशाचा मुख्य यांत्रिक दरवाजावर आला, प्रवेशाच्या यांत्रिक दरवाजावर काही प्रवासी, ज्यांच्याकडे त्यांचा नियमित पास नव्हता, त्यांना बाजूला सारून पुढे जात होते. यांत्रिक दरवाजा त्यांना प्रवेश देत होता. सुकुमारने आपल्या उजव्या हाताचा अंगठा यांत्रिक पट्टीवर ठेवला. त्याबरोबर एका सेकंदामध्ये त्याला प्रवेशाचा हिरव्या रंगाचा सिग्नल मिळून तो आत शिरला. गाडी प्लॅटफॉर्मवर शिरतच होती, ती पाच सेकंद उशिराने धावत असल्याची सूचना एकाच वेळी स्थानिक देशी-आंतरराष्ट्रीय भाषेमध्ये प्रदर्शित होत होती, सुकुमारने उतरणाऱ्या यांत्रिक पट्टीवरून दोन-दोन पायऱ्या उतरत गाडीमध्ये प्रवेश करताच गाडीचा दरवाजा बंद झाला व गाडी सुरू झाली. काही सेकंदांनी गाडीने पूर्ण वेग पकडला, त्याच वेळी त्याला जाणीव झाली की तीन दिशांमधून त्याच्यावर कॅमेरा रोखला गेला आहे. एकदा ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन मुख्य देवांची खास बैठक, स्वर्गातील मुख्यालयातील एका खास सिक्रेट कक्षामध्ये चालली होती. बैठकीचा मुख्य विषय हा पृथ्वीतळावरील भारतनामक देशामध्ये २०७५व्या वर्षी होणाऱ्या हिवाळी पर्यटनाचा होता. काही झाले तरी स्वर्गलोकी प्रसन्न, थंड व प्रफुल्लित वातावरणात राहणारे देवलोकीचे हे लोक हिवाळी पर्यटनासाठी भारतात येण्यासाठी उत्सुक होते. कारण संपूर्ण भारतभूमीचे वातावरण या वेळी थंड आणि प्रफुल्लित असते असे त्यांना इंटरनेटवरून (त्यांच्या गुरूंच्या आंतरज्ञानाने) माहीत झाले होते. 

भारताचा नुकताच होऊन गेलेला पितृपक्ष हा स्वर्गलोकी राहणाऱ्या माणसांच्या आठवणीसाठी साजरा केला गेला होता. त्यामुळे ते सर्व जण हिवाळी पर्यटनासाठी त्यांचा नंबर यावा म्हणून प्रयत्न करीत होते, त्यामध्ये सुकुमारच्या पणजोबांचा म्हणजे माधव राव, तसेच त्यांचे मित्र गोविंद राव आणि महादेव राव यांचाही नंबर लागला. त्या तिघांना भारतात येण्याचा व्हिसा मिळाला. त्याच वेळी त्यांना पर्यटन संपताच परत येण्याच्या करार- पत्रावर प्रतिज्ञा घेऊन सही करावी लागली होती. त्यामुळे त्यांना गुप्तपणे व सूक्ष्मपणे नॅनो तंत्राचा वापर करून छोटा जीव धरून ९.२०च्या मेट्रोमध्ये सुकुमारच्या डब्यामध्ये प्रवेश करावा लागला. या कामासाठी त्यांना दोन सेकंद वेळ लागला व या दोन सेकंदांच्या कामासाठी अजून तीन सेकंद लागून एकूण पाच सेकंदांचा उशीर होऊन मेट्रो पाच सेकंद उशिरा धावत होती. त्या तिघांना सुकुमारची लिंक, वेव्ह लेंथ सकाळीच मिळाली होती, त्यामुळे त्यांना सुकुमारला घरीच गाठायचे होते व त्याचा दिवसभराचा कार्यक्रम पाहावयाचा होता, त्याप्रमाणे त्यांनी जड देह धारण करून त्याचे घर शोधण्याचा प्रयत्न केला, पण गेल्या जवळजवळ ५० ते १०० वर्षांत भारतात खास करून महाराष्ट्रात जे बदल / प्रगती झाली होती त्यामुळे त्यांना प्रचंड गोंधळायला झाले, त्या भागातील बंगलीवजा टुमदार घरे नष्ट झाली होती, त्याजागी १००/१०० मजल्यांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत, प्रवेशद्वारावर पहारेकरी नव्हता, परंतु यांत्रिक पहारेकरी त्यांना प्रवेश करू देईना, तेवढय़ात त्यांच्या हातातील मोबाइलसारख्या दिसणाऱ्या आरशात माधवरावांना सुकुमारचे जिन्स मॅच होताना दिसले, त्यावरून त्यांना सुकुमार त्यांचा नातू असल्याचे लक्षात आले व तो ५५व्या मजल्यावरून खाली येताना दिसला, लगेच त्या त्रयीने सूक्ष्म देह धारण करून १० व्या मजल्यावरील गच्चीवर गेले व सुकुमारच्या मागोमाग मेट्रोमध्ये प्रवेश करते झाले. त्या त्रयीला सुकुमारचा दैनंदिन कार्यक्रम पाहावयाचा होता. त्यासाठी त्यांनी त्यांचा हातातील टॅबसारखा मिनी कॉम्प्युटर सुरू केला. त्याबरोबर त्यांना सुकुमारचा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम, सकाळपासूनच्या घटना चित्रपटासारख्या दिसू लागल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की भारतात गुन्हे जवळजवळ बंद आहेत, कारण प्रत्येक नागरिकाला त्यांचा विशिष्ट कोड नंबर दिला गेला आहे. तो नंबर डिकोड केल्यावर, प्रत्येक नागरिकाचे पूर्ण दिवसाचे कार्यक्रम व त्यामधील महत्त्वाच्या घटना चित्रित होत होत्या. सुकुमारचा संपूर्ण फ्लॅट ए/सी होता, २४ तास स्वच्छ व गरम पाणी उपलब्ध होते, त्या घरात मिसेस सुकुमार व त्यांची दोन मुले, एवढय़ाच चार जणांना राहण्यासाठी परवानगी होती, सर्वाना स्वतंत्र, सर्व सोयींनी युक्त अशा आधुनिक रूम होत्या, शाळेत जावे लागत नव्हते, घरीच ऑनलाइन पद्धतीने सर्व शिक्षण, कॉम्प्युटरवर थ्रीडी पद्धतीने मिळत होते, त्यामुळे गणित, सायन्स असे विषय एकदम सोपे झाले होते, वयाच्या सर्वसाधारणपणे १८व्या वर्षी पदवीपर्यंतचे शिक्षण होत असे. त्यानंतर प्रत्येकाच्या आवडी व ज्ञानाप्रमाणे त्याला प्रोफेशनल कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता, ते शिक्षणसुद्धा घरबसल्या पद्धतीने ऑनलाइन होते, फक्त तांत्रिक अनुभवासाठी, प्रत्यक्ष कार्यशाळेमध्ये, कार्यस्थळी, काम करावे लागत होते. साधारणपणे १७व्या ते २०व्या शतकापर्यंत शिकविले जाणारे बीए, बीकॉम, सायन्स इत्यादी. पदवी अभ्यासक्रम कालबाह्य़ होऊन त्यांच्या जागी सर्वाना समान अशी ज्ञान देणारी पदवी सर्वानाच घ्यावी लागत होती. त्यामुळे डोनेशन देणे ही पद्धत नष्ट झाली. समाजाच्या गरजेप्रमाणे प्रोफेशनल माणसं उदा. डॉक्टर, इंजिनीयर तयार करण्यात येत होती. गल्लोगल्लीचे दवाखाने बंद होऊन विभागवार आधुनिक तंत्रसुख सोयींनी युक्त असे हॉस्पिटल तयार झाले होते, बीपी, शुगर असे रोजच्या आजारासाठी घरच्या घरी उपचार होत होते, त्याचप्रमाणे औषधांचा पुरवठा गरजेप्रमाणे कुरिअरतर्फे होत होता, त्याचप्रमाणे औषधाची निर्मिती गरजेप्रमाणे होत होती, त्यामुळे अतिरिक्त औषधे, नाशवंत, मुदत संपलेली औषधे असे प्रकार बंद झाले होते, त्याचप्रमाणे पैसे, इत्यादी रोख व्यवहार कॉम्प्युटरमार्फत होऊ लागले होते. त्यामुळे रोख पैसे बाळगणे, काळा पैसा, पांढरा पैसा या प्राचीन संकल्पना नष्ट झाल्या होत्या. घरातील टाकाऊ पदार्थ, ई-कचरा यांची साधारणपणे सुका व ओला असे मुख्य दोन भाग करून स्वतंत्र अशा दोन जूटच्या पिशवीमध्ये भरून प्रत्येकाकडे असलेला कचरा प्लास्टिकच्या डब्यामध्ये ठेवला जात होता. तो डब्बा आठवडय़ाच्या ठरावीक दिवशी नेला जात होता. महानगरपालिकेचे लोक येऊन त्या ठिकाणी दुसरे डबे ठेवून जात होते, त्या कचऱ्यातून ऊर्जा व शेतीसाठी खत तयार करण्याचे कारखाने सुरू झाले होते, त्यामुळे प्रदूषणावर आपोआप नियंत्रण आले होते. प्रत्येक विभागातील दुकानदार त्यांच्याकडे तयार होणारा कचरा नीटपणे, व्यवस्थित पॅक करून कचऱ्याच्या डब्यामध्ये ठेवत होते. त्यामुळे ७५-१०० वर्षांपूर्वी दिसणारी सार्वजनिक अस्वच्छता/ घाणेरडेपणा दिसत नव्हता. सार्वजनिक रस्त्यावर फक्त झाडांचा, झाडांची पाने, फुले पडून वेगळीच नक्षीदार रचना निर्माण होत होती मनाला आवडणारी आणि तोही कचरा झाल्यावर उचलला जात होता, कोठेही सांडपाणी, घाण पाणी वाहताना दिसत नव्हते, दर दोन-तीन वर्षांतून शहरातील सर्व घरांना / वस्तूंना नवीन रंग लावण्यात येत होता. त्यामुळे संपूर्ण शहर नेहमीच प्रसन्न, प्रफुल्लित दिसत होते. खासगी व सार्वजनिक वाहने, त्यांच्या ठरावीक पार्किंगमध्येच पार्क केल्या जात होत्या. रस्त्यावर गोंधळ दिसत नव्हता. फुटपाथ, रस्ते, चौक मोकळे असल्याने माणसांची व वाहनाची रहदारी सुनियंत्रित होती, सिग्नलवर दाखविल्याप्रमाणे वाहने रेषेच्या बरोबर वर उभी राहून सिग्नलप्रमाणे वाहतूक सुरू होती, जणू आपण ५०/१०० वर्षांपूर्वी परदेशात जे दृश्य पाहत होतो ते आता इकडे पाहत होतो.
डॉ. रवींद्रनाथ पडवळ