News Flash

टिप्पणी -गडय़ा आपलाच देश बरा..

परदेशात सगळं कसं चकाचक, नीटनेटकं, गडबड गोंधळ नाही. आरडाओरड-भांडण, शिवीगाळ नाही. सगळे वाहतुकीचे नियम पाळताहेत. कुणीही कायदा धाब्यावर बसवत नाही

| January 2, 2015 01:44 am

परदेशात सगळं कसं चकाचक, नीटनेटकं, गडबड गोंधळ नाही. आरडाओरड-भांडण, शिवीगाळ नाही. सगळे वाहतुकीचे नियम पाळताहेत. कुणीही कायदा धाब्यावर बसवत नाही हे बघून वाटायला लागतं, आपल्या देशाबाहेरचं जग फारच नीरस आहे..

स्पेनमध्ये बार्सिलोनाला जाण्यासाठी, इस्तंबूलला दुसऱ्या विमानाची वाट पाहात थांबलो होतो. लँड होताना विमानातून जे इस्तंबूल पाहिलं होतं त्यावरून त्या शहरातल्या शासनकर्त्यांचं कौतुक वाटलं. बऱ्याच टोलेजंग इमारती एकसारख्या म्हणजेच नियोजनबद्ध दिसल्या. एकावर एक असा एक मोठ्ठा उड्डाण पूल दिसला. त्या उड्डाण पुलावर कोठेही धोकादायक वळण नव्हतं. एका वेळी पाच मार्गिकेतून शिस्तीत गाडय़ा जाणारे रस्ते बघितले. हे छोटंसं शहर एवढं पुढारलेलं असू शकतं, तर मग आपण का नाही शहर असं बनवू शकत?
बार्सिलोनाला उतरलो. विमानतळ चकाचक, सगळे ओळीने इमिग्रेशनच्या रांगेत उभे. कुठेही ढकलाढकली नाही, पुढे जाण्याची घाई नाही. सामान घेण्यासाठी १४ सरकत्या पट्टय़ा. कुठेही, कसलाही गोंधळ नाही. विमानतळातून फक्त पाच ते दहा पावलं चाललो तर गाडय़ांचे चक्क पाच मजली तळ. गाडय़ांचे असे पाच मजली पाच तळ आहेत.
३० किमी अंतरावरच्या एका हॉटेलमध्ये माझी राहण्याची व्यवस्था केली होती. मला घ्यायला एक गृहस्थ आले होते. त्यांची गाडी चौथ्या मजल्यावर होती. गाडीने हॉटेलपर्यंतचा प्रवास सुरू झाला आणि मला एकदम बेचैन व्हायला झालं. परदेश प्रवासाची सगळी झिंग उतरली. अख्ख्या रस्त्यात एकही खड्डा नाही, म्हणजे किती निकृष्ट दर्जाचे रस्ते आहेत इथले. दुसरा धक्का, सगळ्या गाडय़ांवर नंबर एका प्रकारच्या फॉण्टमध्येच होते. कोणाच्याही नंबर प्लेटवर राजकीय पक्षाचा झेंडा नव्हता.
कोणत्याही कारच्या मागच्या काचेवर ना कोणत्या हिरोचा फोटो, न हिरोइनचा फोटो, ना पुढाऱ्याचा फोटो, ना कोणत्या साधू बाबाचा फोटो.  म्हणजे इथले नागरिक सगळे नास्तिक व आपमतलबी की काय?
एकाही नंबर प्लेटवर ‘बार्सिलोना’ (BARCELONA), जसं आपल्याकडे (महाराष्ट्र – ०४- अब – ) असतं तसं नव्हतं. किंवा कोणत्याही गाडीवर स्पॅनिश भाषेत नंबर लिहिला नव्हता. याचा अर्थ सरळ आहे की इथल्या लोकांचे त्यांच्या मातृभाषेवर प्रेम नाही. एकाही गाडीवर आकडे मोठय़ा अक्षरात लिहिलेले नव्हते किंवा ते  दादा, मामा, असे वाटतील असे लिहिले नव्हते. याचा अर्थ सरळ आहे की त्यांना त्यांचे दादा, मामा आवडत नाहीत. मला या त्यांच्या नीरसपणाचा खूप राग आला.
कोणीही हॉर्न वाजवत नव्हतं. मला राहावलं नाही म्हणून मी चालकाला हॉर्न वाजवायला सांगितला. त्याने माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं पण हॉर्न वाजविला, याचा अर्थ त्यांच्यापण गाडय़ांना हॉर्न  असतो, पण हे वेडे लोक हॉर्नसारखा वाजवायच्या मजेला मुकतात बिचारे.
कोणत्याही ट्रकच्या मागे ‘Father ‘s blessingl, kMother’s blessingl , kO.K. TATAl, kHEY U BAD , kLET UR FACE B BLACK’वगैरे काहीच लिहिलं नव्हतं. याचा अर्थ त्यांना आई, वडील यांची पुण्याई किंवा आशीर्वाद नसतो वाटतं. शिवाय त्यांच्याकडे ट्रकच्या मागे वेगवेगळे लिहिण्याची क्रिएटिव्हिटी नसते हेही यातून सिद्ध होतं.
सगळीकडे रस्त्यांवर गावाचं नाव, बाकीच्या खुणा वगैरे व्यवस्थित लिहिलेले फलक लावलेले होते. याचा अर्थ त्यांना रस्ता चुकण्यात काय गंमत असते हे माहीत नाही. कोणालाही रस्ता विचारावा लागत नाही. सगळं कसं अगदीच नीरस.
एके ठिकाणी त्याने गाडीचा वेग कमी केला, मी विचारल्यावर म्हणाला की, तेथे वेगाची मर्यादा तासाला ८० किमी आहे. ती नाही पाळली तर घरी पावती येते व १०० युरो (म्हणजे अंदाजे आठ ते साडेआठ हजार रुपये) एवढा दंड भरावा लागतो.
तिथे आपल्यासारखं चहा-पाणी, तडजोड, मंत्र्याचा, आमदाराचा, नगरसेवकाचा फोन वगैरे चालत नाही. बघा म्हणजे, गुन्हा करून वर सहीसलामत सुटण्यात जी मर्दुमकी आहे ती यांना कोण सांगणार?
काही अंतरानंतर त्याने वेग वाढवला, कारण तो भाग गावापासून दूर होता म्हणून तेथे तो १२० च्या वेगाने जाऊ शकत होतो. त्याने सांगितलं कीगावात वेगमर्यादा ३०/५० किमीएवढी कमी असते.
 त्यांना काय माहीत, गावात गर्दीच्या ठिकाणीसुद्धा वेगात गाडी चालवायला काय धाडस लागतं व जे फक्त भारतीयांमध्येच आहे. इथले सगळे लोक डरपोक, बुळे.
तेथे अजून एक वेडेपणा पाहिला, तो म्हणजे मागून एखादी रुग्णवाहिका सायरन वाजवत येत असेल तर पुढच्या सगळ्या गाडय़ा तिला वाट करून देतात. हे म्हणजे अतीच झालं. मला त्यांना ओरडून सांगावंसं वाटलं की आमच्याकडे येऊन बघा सगळ्यांना एवढी घाई असते की, त्यांना रुग्णवाहिकेला प्रथम जाऊ देणं हे महत्त्वाचं वाटत नाही. फक्त एका रुग्णासाठी अनेकांचा खोळंबा? आपल्याकडे तो रुग्ण गेला तरी चालेल, पण आम्हाला उशीर होता कामा नये. तेथे सगळंच उलट. गाडय़ांना उशीर झाला तरी चालेल, पण रुग्ण वाचला पाहिजे. यांना कोण शिकवणार भारतीयांचा हा प्रॅक्टिकल अ‍ॅप्रोच?
सगळ्या सिग्नलला, सगळ्या गाडय़ा थांबत होत्या. गावात महामार्ग ओलांडायला पादचाऱ्यांसाठी पादचारी पूल होते. बऱ्याच ठिकाणी छोटे-मोठे उड्डाण पूल गाडय़ांसाठी होते.
सगळं अगदीच सुरळीत, मला हे सगळं खूपच अस्वस्थ करत होतं. तिथले शासनकर्ते खरोखरच वेडे आहेत, अडाणी आहेत. नागरिकांच्या, पादचाऱ्यांच्या सोयीसाठी अनेक पादचारी पूल, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेक उड्डाण पूल. त्यांना सांगावंसं वाटलं की आमच्याकडे येऊन पहा, उड्डाण पूल उभा राहायला कसे तप जावे लागतात. पादचारी पूल कसे फक्त कागदावर असतात.
एके ठिकाणी रहदारी हळू झाली होती. संध्याकाळ होती व कार्यालये सुटल्यामुळे, एकदम गाडय़ा वाढल्या होत्या. पण कोणीही हॉर्न वाजवत नव्हते, कोणीही आपली मार्गिका सोडून गाडी दुसऱ्या मार्गिकेत घुसवत नव्हते. कोणत्याही सिग्नलला अथवा ट्रॅफिक जॅमला शिव्या-शाप,  अशी भांडणं दिसली नाहीत.
टोल नाक्यावर सगळे फलकावर लिहिल्याप्रमाणे जात होते, म्हणजे ट्रक अवजड वाहनांच्या रांगेतून जात होते, कार त्यांच्या रांगेतून जात होते. कोणीही मागून येऊन मध्येच घुसत नव्हते. कोणीही टोल न देता जात नव्हते. त्यामुळे अशांना पकडणारी  माणसे, वादावादी, भांडणे, गुंडगिरी  वगैरे काहीच दिसत नव्हते.
त्या प्रवासात भरपूर दुचाकी स्वार बघितले, पण एकही हेल्मेटशिवाय चालवताना नाही बघितला. गम्मत म्हणजे हे सगळं पोलीस नावाचा प्राणी हजर नसताना. कोणीही हेल्मेट मोटरसायकलच्या हँडलला लावून गाडी चालवताना नाही पाहिलं. मला तर त्यांची कीव करावीशी वाटली. त्यांना सांगावासं वाटलं की अहो, आमच्याकडे तर पोलीसही हेल्मेट घालत नाहीत तर मग आम्ही नागरिकांनी का घालायचे? आमच्याकडे नियम हे फक्त मोडण्यासाठीच असतात. या लोकांना हे कोण शिकवणार?
या प्रवासात मी कोठेही ‘आदरणीय दादा/भाई/नाना असे कोणतेच  मोठ्ठे  होर्डिग्ज नाही बघितले. थोडक्यात काय, कोणत्याही नेत्याच्या वाढदिवसाचे, त्याच्या बायकोच्या, मुलाच्या, मुलीच्या, नातवाच्या, नातीच्या, कुत्र्याच्या, मांजराच्या, पोपटाच्या, कोणा कोणाच्याही वाढदिवसाचे फलक नाही दिसले. त्यांचं त्यांच्या नेत्यांवर प्रेम नाही,  नेत्याच्या कुटुंबावर प्रेम नाही,  कुत्र्यांवर प्रेम नाही..?  सगळं कसं  निरस, रटाळ.
मला इथल्या लोकांची कीव करावीशी वाटली. शहर ‘सुशोभित’   करत नाही म्हणजे काय? मी या विरुद्ध आंदोलन केलं असतं. शहर बंद केलं असतं. बस फोडल्या असत्या. रेल्वे बंद पाडल्या असत्या.  दुकाने दादागिरी करून बंद पाडली असती. काही टाळकी फोडली असती. शाळा, महाविद्यलये बंद केली असती.
हे लोक खरंच भोळे वाटले. यांना सार्वजनिक मालमत्ता ही स्वत:ची, देशाची वाटते. त्यांना ओरडून सांगावंसं वाटलं की, तुम्ही भारतात येऊन बघा, आम्हीही सार्वजनिक मालमत्ता स्वत:चीच समजतो, पण आम्ही तिचं नुकसान करतो. नवीन रस्त्यावर मंडप उभे करायला दर वर्षी कसे खड्डे करतो. सणांना कसे मंडप उभे करून रस्ता अडवितो, मंडपात जवळच्या खांबावरून वीज चोरी करून कशी रोषणाई करतो. किती सांगू तुम्हाला इथल्या लोकांचे हे अडाणीपण?
माझं हॉटेल ज्या भागात होतं, तो भाग दिसू लागला, मी आतुरतेने जशी ठाण्यात वेग वेगळ्या प्रभागात जनतेच्या कराच्या पैशातून उभी केलेली कमान असते तशी शोधत  होतो. त्या कमानीवर  मला तेथल्या लोकप्रतिनिधीचे नाव बघायचे होते. पण कसलं काय? तेथे असा करदात्यांचा पैसा ते वायफळ खर्च करत नाहीत. म्हणजे सरळ आहे, त्यांचे लोकप्रतिनिधी अगदीच बुळे आहेत. त्यांना फुकटात स्वत:चं नाव करायची काहीच युक्ती माहीत नाही.
इथल्या भाजी मंडईत गेलो होतो, आपल्याप्रमाणेच भरपूर गर्दी होती. पण कोठेही आरडाओरड नाही. सगळं शांतपणे चालू होतं. प्रत्येक ग्राहक दुसऱ्याचं विकत घेऊन होईपर्यंत थांबत होता. त्यांच्याकडे छतावरून टांगलेला इलेक्ट्रॉनिक वजन काटा होता. त्यात भारतासारखं वजन मारण्याचं भाग्य विक्रेत्याला नव्हतं. जेवढं वजन, तेवढं बिल प्रिंट होऊन यायचं. घासाघीस नाही. एकच भाव. सगळं  एकदम मुळमुळीत. अजून एक बघितलं, तेथे कोणीही, भैय्या और दो डालो, कडीपत्ता फ्री दे दो वगैरे काहीच म्हणत नाही. फुकट घेणं, मागणे हा आपला मूलभूत हक्क आहे, आणि यांना हा हक्क माहीत नाही? बिचारे! हे कसले प्रगत?
एवढय़ा मोठय़ा मंडईत कोणालाही, स्कूटरवर, आत एवढय़ा माणसांच्या गर्दीत खरेदी करायला आलेलं बघितलं नाही. आपल्या मानाने इथले ग्राहक अगदीच वेडे, अडाणी, मागासलेले, बुळे वाटले.
रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी किंवा एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी आहे. त्या भुयारी मार्गातून गेलो तर तेथेही मला धक्का बसला. सगळा भुयारी मार्ग स्वच्छ होता. कोणीही थुंकलेलं नव्हतं. कोणत्याही भिंतीवर सेक्सच्या कमजोरीसाठी एखाद्या डॉक्टरची जाहिरात नव्हती. हे म्हणजे अगदीच मागासलेले लोक..
येथे अजून एक वेडेपणा मी पाहिला. वाहन चालक, पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडेपर्यंत स्वत:हून थांबतात. हे मला फारच धक्कादायक वाटलं. कारण भारतात पादचाऱ्यांना भटक्या कुत्र्यांपेक्षाही वाईट वागणूक मिळते. मी येथे भटके कुत्रे पहिलेच नाहीत. मी घराजवळच्या भटक्या कुत्र्यांच्या ताफ्यातून निसटून आंतरराष्ट्रीय विमान कसं पकडलं ही एक फार मोठी साहसी कहाणी आहे. या असल्या साहसाला, हे लोक अगदीच मुकतात.
एका समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलो. फारच कंटाळा आला. कोठेही घाण नाही, कचरा नाही, मूत्रविसर्जनाचा वास नाही, थुंकलेलं रंगीबेरंगी काम नाही. तुम्हालाही हे सगळा वाचायला कंटाळा आला ना, मग विचार करा, माझी किती वाईट अवस्था तेथे झाली असेल..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:44 am

Web Title: a tour in spain
टॅग : Lokprabha,Tourism
Next Stories
1 क्रीडा – बहर विश्वचषक आणि लीगचा!
2 औषधाविना उपचार -निसर्गोपचाराची कास
3 ट्रेकर ब्लॉगर -आमची डोंगरयात्रा..
Just Now!
X