News Flash

आदरांजली -एका युगाची समाप्ती

‘एक दुजे के लिये’सारख्या सिनेमामुळे तत्कालीन तरुण पिढीला वेड लावणारे प्रयोगशील लेखक-दिग्दर्शक के. बालचंद्र यांचे नुकतेच निधन झाले.

| January 2, 2015 01:45 am

‘एक दुजे के लिये’सारख्या सिनेमामुळे तत्कालीन तरुण पिढीला वेड लावणारे प्रयोगशील लेखक-दिग्दर्शक के. बालचंद्र यांचे नुकतेच निधन झाले. चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना वाहिलेली आदरांजली..

30तमिळी चत्रपटसृष्टीतील ‘भीष्माचार्य’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक के. बालचंद्र यांचे नुकतेच निधन झाले. प्रवाहाच्या विरोधात लढणारा एक प्रयोगशील लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. सामाजिक जागृती करण्याच्या हेतूने त्यांनी वेगळ्या प्रवाहाचे अनेक चित्रपट निर्माण केले. ‘एक दुजे के लिये’सारख्या त्यांच्या चित्रपटांनी तर ‘इतिहास’ निर्माण केला. धर्म आणि भाषा यांचे असलेले वर्चस्व झुगारून सामाजिक एकात्मतेच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेला हा चित्रपट एक आदर्श प्रेमपट होता. म्हणूनच एकेकाळी केवळ तरुणाई नव्हे तर देशातील तमाम ‘पब्लिक’ या चित्रपटावर फिदा झाली होती. कथा, अभिनय, दिग्दर्शन आणि संगीत यांना समान न्याय देऊन अनेक लोकप्रिय चित्रपट निर्माण करणारे के. बालचंद्र यांचे चित्रपटसृष्टीतील योगदान अपूर्व होते. म्हणूनच  दादासाहेब फाळके या सर्वोच्च पुरस्काराने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीचा गौरव करण्यात आला होता.
चित्रपटापेक्षा नाटकांवर अतिशय मनापासून प्रेम करणारे के. के. बालचंद्र तमिळ चित्रपटसृष्टीत आले त्यावेळी ‘नायक-केंद्रित’ चित्रपटांची तमिळ चित्रपटसृष्टीत चलती होती. मात्र के. बालचंद्र यांनी अशा नायकप्रधान चित्रपटांची सद्दी मोडीत काढण्यासाठी वास्तवतेला प्राधान्य देऊन चित्रपटाची ‘कथा’ हीच ‘सर्वोच्च नायक’ असते हे सिद्ध केले आणि तमिळ चित्रपटसृष्टीला पूर्णपणे वेगळे वळण दिले. ज्याचे रसिक प्रेक्षकांनी भरभरून स्वागत तर केलेच, शिवाय त्यांच्या चित्रपटांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरही कौतुक झाले. म्हणूनच के. बालचंद्र यांच्या निधनाने एका युगाची समाप्ती झाली असे म्हणावे लागेल.   
32‘के. बी.’ या टोपण नावाने ओळखले जाणारे के. बालचंद्र  ‘इयाकुनार सिगाराम’ या नावानेही सर्वपरिचित होते. पटकथा लेखक म्हणून त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला असला तरी त्यांना अभिनयाची आणि दिग्दर्शनाचीही आवड होती. चित्रपटापेक्षाही नाटकांवर त्यांचे खरे प्रेम होते. प्रारंभी नाटय़सृष्टीत काही काळ काम केल्यानंतरच ते चित्रपटसृष्टीत आले. १९६३ साली त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘मेजर चंद्रकांत’ हे नाटक अतिशय गाजले. याच नाटकावर त्यांनी पुढे त्याच नावाने चित्रपटही काढला. जो नाटकाइतकाच तुफान लोकप्रिय झाला होता. त्याच्याही आधी ‘सर्वर सुंदरम’ या चित्रपटाद्वारे त्यांनी पटकथालेखक म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. या चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्णन पंचू यांनी केले होते आणि नागेश हा त्या काळचा ‘एव्हीएम’ कंपनीचा गाजलेला ‘हिरो’ या चित्रपटाचा नायक होता. त्यांचा हा चित्रपट आगळ्या कथानकामुळे खूप गाजला होता. ‘निरकुमिझी’ या मूळ नाटकावर आधारित त्याच नावाने काढण्यात आलेल्या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. आणि दिग्दर्शक म्हणून त्यांच्या या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तेव्हापासून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
आपल्या ४५ वर्षांच्या कारकिर्दीत के. बालचंद्र यांनी विविध भाषांमधील शंभरहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. विशेष म्हणजे नवीन कलाकारांना काम करण्याची संधी देणे ही त्यांची खासियत होती. सध्याचे आघाडीचे ‘सुपरस्टार’ अभिनेते रजनीकांत आणि कमल हसन यांना के. बालचंद्र यांनीच चित्रपटात काम करण्याची संधी दिली. सुपरस्टार रजनीकांत याला ‘अपूर्वा रगनगल’ तर कमल हासन याला ‘अरंगेत्रम’ या चित्रपटाद्वारे के. बालचंद्र यांनी चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. तसेच या दोघांनाही त्यांनी ‘मुन्द्रू मुडिचू’, ‘आवरगल’ आणि ‘निनायथले इनिक्कुम’ या चित्रपटामधून एकत्र आणले. ‘निनायथले इनिक्कुम’ या चित्रपटाची गाणी तर एवढी लोकप्रिय झाली होती की या गाण्यांसाठी या चित्रपटावर रसिक प्रेक्षकांच्या उडय़ा पडत असत. या तिन्ही चित्रपटांनी तामिळी चित्रपटसृष्टीचा चेहरामोहराच बदलण्यात यश मिळविले. रजनीकांत यांचीच प्रमुख भूमिका असलेले ‘थिल्लु-मल्लू’ आणि ‘भामा विजयम’ हे त्यांचे चित्रपटही सुपरहिट झाले.  
सुप्रसिद्ध कवी सुब्रम्हण्यम भारती यांचे चाहते असलेले के. बालचंद्र  यांनी चित्रपटातील नायिकेलादेखील ‘प्रतिष्ठा’ मिळवून दिली. त्यामुळे एरवी परंपरेच्या जोखडात वावरणारी मध्यमवर्गीय नायिका त्यांच्या अनेक चित्रपटांतून स्वावलंबी, कर्तृत्ववान आणि अन्यायाचा मुकाबला करणारी अशी दिसून आली. ‘अवल ओरु थोडरकथायी’ चित्रपटामधील कविता, ‘मंथिल उरुथी वेन्डूम’मधील नंदिनी आणि ‘अरंगेत्रम’मधील ललिता ही त्याची काही वानगीदाखल उदाहरणे. ‘अरंगेत्रम’मधील ललिता तर ब्राह्मणासारख्या उच्च कुळात जन्म घेऊनही आपले मोठे कुटुंब सांभाळण्यासाठी वेश्या व्यवसायाचा आधार घेते. हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा सारी तमिळी चित्रपटसृष्टी हादरून गेली होती. याच चित्रपटात कमल हासनने ललिताच्या भावाच्या भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अशा तमिळी चित्रपटाप्रमाणेच के. बालचंद्र यांनी इतर भाषांमधूनही अनेक चित्रपट निर्माण केले. कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांची प्रमुख भूमिका असलेल्या त्यांच्या ‘एक दुजे के लिये’ या हिंदूी चित्रपटाने तर इतिहासच निर्माण केला होता. या प्रणयप्रधान चित्रपटाने त्याकाळी तरुणाईला अक्षरश: वेड लावले होते. ‘मनो चरित्रम’ हा त्यांचा तेलगु चित्रपट असाच सुपरहिट झाला होता.
के. बालचंद्र यांच्यासारखा दूरदृष्टी असलेला आणि प्रवाहाच्या विरोधात लढणारा लेखक-दिग्दर्शक ‘या सम हाच होता’ असेच त्यांच्या अनेक चित्रपटांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाने केवळ तमिळी चित्रपटसृष्टीचे नव्हे तर भारतीय चित्रपटसृष्टीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 1:45 am

Web Title: a tribute to veteran writer director k balachander
टॅग : Bollywood
Next Stories
1 टिप्पणी -गडय़ा आपलाच देश बरा..
2 क्रीडा – बहर विश्वचषक आणि लीगचा!
3 औषधाविना उपचार -निसर्गोपचाराची कास
Just Now!
X