News Flash

रुचकर आणि शॉपिंग : ट्रेण्ड अ‍ॅक्सेसरीजचा

अ‍ॅक्सेसरीज हा रोजच्या फॅशनमधला महत्त्वाचा भाग.

कोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात, तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं.

तेजश्री गायकवाड – response.lokprabha@expressindia.com

अ‍ॅक्सेसरीज हा रोजच्या फॅशनमधला महत्त्वाचा भाग. कोणतीही फॅशन करताना फक्त कपडे महत्त्वाचे नसतात, तर त्याबरोबरच दागिने, पर्स, बेल्ट, घडय़ाळं, चपला हे सगळं महत्त्वाचं असतं. त्या सगळ्यांनी मिळून तुमचा लुक पूर्ण होतो. दिवाळी आणि लग्न समारंभामध्ये मिरवायला सगळ्यांनाच आवडतं. मिरवणं म्हणजे काही तरी नवीन, हटके आणि ट्रेण्डमध्ये असलेले कपडे आणि दागिने घालणं. तरुणांना नेहमीच काही तरी हटके, नवीन हवं असतं. म्हणून दरवर्षी बाजारात अनेक नवीन प्रकारच्या अ‍ॅक्सेसरीज दाखल होतात. यंदा कोणत्या अ‍ॅक्सेसरीजचा बोलबाला आहे ते बघूया.

मुलींसाठी

पॅडेड हेडबॅण्ड्स

हे पॅडेड हेडबॅण्डस खरं तर नवीन नाहीत. फॅशनचं चक्र पुन्हा फिरून जुन्या काळातील हे  हेडबॅण्डस पुन्हा ट्रेण्डमध्ये आले आहेत. जुनी फॅशन पुन्हा येताना ती पूर्णपणे तशीच येते किंवा मग काही बदल करून येते. हेडबॅण्डसमध्ये आजच्या तरुणींना आवडतील असे बदल झालेले आहेत. हे हेडबॅण्डस आकाराने मोठे आहेत. निव्वळ कापडाचे किंवा कापड आणि प्लास्टिकचा बेल्ट अशा दोन रूपांत हे हेडबॅण्डस बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्हाला हवे ते रंग उपलब्ध आहेत. अगदी इंडोवेस्टर्न कपडय़ांवर घालण्यासाठी भरतकाम, स्टोन, मोती वर्क केलेले हेडबॅण्डससुद्धा उपलब्ध आहेत. ड्रेस, वनपीस ते अगदी रोजच्या वापरातील जीन्स, टी-शर्टवरही तुम्ही हे हेडबॅण्डस पेअर करू शकता.

हुप्स कानातले

आणखी एका ट्रेण्डचं  पुनरागमन म्हणजे हे हुप्स कानातले. मागच्या वर्षी गाजलेल्या झुमक्यांना खोडून काढत हे हुप्स जास्त ट्रेण्डमध्ये आले आहेत. हे कानातले तुम्ही अगदी सध्या कपडय़ावर घालून एक हटके लुक तयार करू शकता आणि म्हणूनच हे अनेकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्लेन बेसिक सिल्व्हर आणि गोल्ड हुप्ससह आता यातही विविध व्हरायटी आता उपलब्ध आहेत. यात खडे, मोती, मोठे आणि छोटे रंगीबेरंगी मणी, शेल्स, कवडय़ा असलेले हुप्स खूप ट्रेण्डिंग आहेत. केसांचा उंच पोनीटेल किंवा बन आणि हे हुप्स कानातले असा लुक करायला तरुणींची पसंती आहे.

बकेट बॅग

नावाप्रमाणेच एखाद्या बादलीप्रमाणेच ही हॅण्डबॅग असते. आपल्या हॅण्डबॅगमध्ये सगळं गरजेचं सामान बसावं असं मुलींना नेहमीच वाटत असतं. यात अनेक रंग उपलब्ध आहेत. नेहमीच्या काळा, राखाडी किंवा पांढऱ्या रंगापेक्षा निळा, गुलाबी, न्यूड शेड असलेले रंग नक्की वापरून बघा. या हॅण्डबॅग्ज पारंपरिक कपडय़ांवर घेता येतील अशासुद्धा डिझाईनमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भरतकाम केलेल्या सिल्व्हर आणि गोल्डन हँडबॅग्ज तुम्ही सहज कोणत्याही पारंपरिक कपडय़ांवर घेऊ शकता. याखेरीज हलकं भरतकाम, स्टोन वर्क, चमकी वर्क, टिकली वर्क केलेल्या हॅण्डबॅग्जचीही निवड तुम्ही करू शकता. वेस्टर्न कपडय़ांवर पार्टीसाठी तुम्ही शिमर कापडापासून तयार केलेली हॅण्डबॅग नक्कीच वापरू शकता.

बेल्ट्स

साडीवर आपण नाजूक कंबरपट्टा घालतो, परंतु साडीवर लेदर, फर, कापडाचे असे वेगवेगळे बेल्टही घालू शकतो. कंबरपट्टय़ासारखे असे वेगवेगळे बेल्ट साडीवर घालून बघायला काहीच हरकत नाही. मुलींच्या बेल्टचा आकार हा जास्तीत जास्त लहानच असतो, पण आता मोठय़ा आकाराचे बेल्ट्स ट्रेण्डिंग आहेत. बेल्ट्सचा वापर स्कर्ट आणि टॉप, साडी, कुर्ती, गाऊन आणि वनपीस अशा वेस्टर्न कपडय़ांवरही नक्कीच करून बघा.

चंकी आणि सिल्व्हर ज्वेलरी

रोजच्या जीवनात बेसिक ज्वेलरी वापरून आपल्याला फॅशनेबल आणि हटके लुक हवा असतो आणि म्हणूनच अनेक ब्रॅण्ड्सनी चंकी तसंच आणि सिल्व्हर ज्वेलरी बाजारात आणली आहे. वेगवेगळ्या  ब्रॅण्डअंतर्गत तुम्हाला नोजिरग, खुडी, नेकपीस, कानातले, अंगठी, कंबरपट्टा असं सगळंच बघायला मिळेल. त्याशिवाय जुने ट्रॅडिशनल मोटिफ, डिझाईन नवीन लुकमध्ये मिळतात. यामुळे इंडोवेस्टर्न अशी ही ज्वेलरी तुम्ही ट्रॅडिशनल, वेस्टर्न अगदी जीन्स, वनपीस अशा सगळ्याच आऊटफिटवर घालू शकता. याखेरीज लोकल ते ग्लोबल अशा बाजारपेठेमध्ये चंकी ज्वेलरीचा ट्रेण्ड काही महिन्यांपासून खूप आहे. ही चंकी ज्वेलरी लवकर खराब होत नाही. ती सगळ्या प्रकारातही  उपलब्ध आहे आणि तिच्या किमतीही तरुणांना पॉकेटफ्रेंडली आहेत. त्यामुळे तरुण वर्ग रोज या ज्वेलरीचा वापर करतो.

मुलांसाठी

ब्रेसलेट

सूटबूट असो वा टी-शर्ट जीन्स कोणत्याही आऊटफिटवर ब्रेसलेट  सहज घालता येतं. छोटंसं ब्रेसलेटही संपूर्ण लुकमध्ये हायलाइट ठरतं. मुलांनी हातात घातलेल्या ब्रेसलेटवरून त्यांच्या  शैलीचा प्रभाव दिसून येतो. ब्रेसलेटमध्ये अनेक व्हरायटी उपलब्ध आहेत. एक साखळी, दोन साखळी ब्रेसलेट, काळे, निळे आणि सिल्व्हर मणी असलेले ब्रेसलेट, लेदर पट्टा, लटकन असलेले ब्रेसलेट उपलब्ध आहे.

अंगठी

लग्नाची अंगठी वगळता पुरुष सहसा अंगठी घालत नाहीत. पण आता वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठय़ाचा ट्रेण्ड सेट होतोय. ब्रेसलेट आणि अंगठी एकमेकांना साजेशी दिसेल अशीही स्टायलिंग केली जातेय. वेगवेगळ्या रंगाचे खडे, प्लेन गोल्ड किंवा सिल्व्हर, बारीक कलाकुसर केलेली, प्लॅटिनिअम, मॅट फिनिश असलेले प्लेन रंगाच्या अंगठय़ा ट्रेण्डमध्ये आहेत.

आय वेअर

आय वेअरचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध झाले आहेत.  चष्म्यामध्ये टॉरटॉइज शेलची फ्रेम असणारा चष्मा, क्लीअर व्हाइट फ्रेम, ब्लॅक रीम्ड फ्रेम, गोल्ड मेटल वेअरफ्रेम ग्लास अशा चष्म्याच्या फ्रेम ट्रेण्डिंग आहेत. चष्म्याच्या शेपमध्ये चौकोनी, गोल, अ‍ॅव्हिएटर शेप, ओवर साइज हे ट्रेण्डिंग आहेत. सनग्लासेसमध्ये गोल, चौकोनी, कॅट आय आकाराचे रेट्रो सनग्लासेस, ट्रान्स्परंट सनग्लासेस, लाल, नारंगी, पिवळ्या रंगाची शेड असणाऱ्या सनग्लासेस ट्रेण्डिंग आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 7:41 am

Web Title: accessories trends ruchkar ani shopping dd70
Next Stories
1 श्रद्धांजली : पर्यावरणाचा खरा शिलेदार
2 राशिभविष्य : दि. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२०
3 लॉकडाऊन इन्हे ना रोके…
Just Now!
X