एकेकाळच्या कामगार रंगभूमीवरील तेजस्वी तारका शालिनी सावंत यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सुहृताने त्यांना वाहिलेली भावांजली-

कामगार रंगभूमीवरील तेजस्वी तारका शालिनी सावंत गेली. आजच्या पिढीला ती ठाऊक नसण्याचीच शक्यता अधिक. त्या काळात राष्ट्रीय उत्सवात लहान मुलांचे विविध विषयांवरील ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक ‘मेळे’ होत. आठ-नऊ वर्षांपासूनच मेळ्यात भाग घ्यायला तिने सुरुवात केली. ‘भक्त दामाजी’, ‘सलामी’, ‘क्रांती कमळ’ हे तिचे गाजलेले मेळे.
तिचे पूर्वायुष्य कामगार विभागात गेले. माहेरचे नाव शालिनी मुरुडकर. वडील रोहिदास समाजातील. पन्नास वर्षांपूर्वीचा कामगार रंगभूमीचा सुवर्णकाळ. वसंत जाधव, मुरारी शिवलकर, ला. कृ. आयरे, वसंत दुदवडकर यांच्यासारख्या अनेक लेखकांनी कामगार रंगभूमी समृद्ध केली. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेमुळे सुरू झालेल्या गणेशोत्सवामुळे कामगार विभागात व खेडय़ापाडय़ांत नाटक मंडळे स्थापन झाली. ही नाटके शब्दबंबाळ नसत. सोपी भाषा व कौटुंबिक संवादांनी ओथंबलेली असत. त्याच काळात शालिनी मुरुडकर-सावंत, जयश्री शेजवाडकर, ललिता देसाई इ. अनेक तारका उदयाला आल्या. त्यांना नाटकात काम केल्याचे दिवसाचे अवघे २५-३०रू. मिळत. त्यात रिहर्सलही मोफत करीत. त्यात मोजकीच स्त्री-पात्रे असत. स्त्री-पात्रविरहित नाटकांना मागणी जास्त असे. आम्हीही चिंचपोकळीच्या विद्यार्थी उत्कर्ष मंडळातर्फे स्नेहसंमेलनासाठी ‘आजोबा’ हे नाटक बसविले होते व नटी निर्मला शिंदे हिला १० रु. मानधन दिले होते. लालबाग हे कामगार रंगभूमीचे ‘माहेरघर’ होते. आमच्या सातरस्त्यावरील ‘कलाकार’ ही संस्था मातबर समजली जायची. पांडुरंग मेजारी, जनार्दन सोहनी, भाई सावंत ही रंगभूमीची दादा मंडळी.
याच विभागात नाटक करताना शालिनी मुरुडकरची भाई सावंत या मराठा तरुणाशी ओळख होऊन प्रेमात रूपांतर झाले व लग्न झाले. त्या लग्नपत्रिकेचे डिझाइन मीच केले होते.
एकदा रोहिदास ज्ञाती पंचायतीच्या मदतीसाठी मुरारी शिवलकर लिखित ‘पैशाचा खेळ’ हे नाटक बसविले होते. त्यातील मध्यवर्ती नायिकेची भूमिका शालिनी सावंतने केली होती. मीही एक विनोदी भूमिका केली होती. ग्लिसरीनशिवाय डोळ्यांतून पाणी काढणे यात तिचा हातखंडा होता. प्रेक्षकांच्या डोळ्यांतून पाणी येई, असा सहजसुंदर अभिनय ती करी. आमच्या आग्रहाखातर भाई सावंत यांनीही एक पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केली.
सी. पी. टँकमधील एका प्रकाशकाकडे कामगार रंगभूमीवरील नाटके सहज उपलब्ध होत. त्यातल्या अनेक पुस्तकांच्या कव्हरवर शालिनी सावंतचे फोटो असत. त्यांचे यजमान भाई सावंतांना प्रकृतीची देणगी नव्हती; परंतु आवाज व मुद्राभिनय यांच्या जोरावर ‘बेबंदशाही’तील संभाजी ते इतक्या ताकदीने करीत की जाणकारांना नानासाहेब फाटकांची आठवण होई. दिग्दर्शन ही त्यांची खासियत होती. ते फार अभ्यासपूर्ण दिग्दर्शन करीत. त्यांना लिहिण्याचीही जाण होती. एक-दोन नाटकेही त्यांनी लिहिली होती. ५० वर्षांपूर्वी मी त्यांना प्रश्न विचारला होता, ‘तुमचा आवडता नाटककार कोण?’ त्यांनी मला उत्तर दिले होते, ‘विजय तेंडुलकर!’ मी आज त्यावर विचार करतो तेव्हा मला फारच आश्चर्य वाटतं. त्यांच्या दूरदृष्टीचे कारण त्या वेळेस तेंडुलकरांच्या खात्यावर फक्त ‘श्रीमंत’ हे एकुलते एक नाटक होते. तेंडुलकरांची खरी ताकद ‘गिधाड’, ‘घाशीराम..’ भाई सावंतांना पाहायलाच मिळाली नव्हती. कारण ते अकालीच देवाघरी गेले होते. शालिनी सावंत आधीपासूनच कसदार अभिनय करी, पण तिला पैलू पाडण्याचे काम भाईंनीच केले.
साहित्य संघावर अजून छप्पर आलं नव्हतं, तेव्हा भाई सावंतांनी श्याम अडारकर यांचे नेपथ्य साहाय्य घेऊन संघाच्या खुल्या मंचावर कुसुमाग्रजांचं ‘वैजयंती’ हे अवघड नाटक लेव्हलच्या साहाय्याने स्पर्धेसाठी केलं होतं. दुर्गा खोटे व नटवर्य पेंढारकर यांनी हे नाटक ज्या ताकदीने उभं केलं होतं तितक्याच समर्थपणे या उभयतांनी सादर केलं होतं. सुदैवाने हे नाटक मला शालिनीकृपेने पहिल्या रांगेत बसून पाहायला मिळाले. या नाटकाला सुयश तर मिळालं, दोघांनाही अभिनयाची पारितोषिकं मिळाली. भाई सावंतांना दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला.
कामगार रंगभूमीवरील या दोन हिऱ्यांनी आपली योग्यता सिद्ध केली, पण भाईंच्या जाण्याने शालिनी फार खचली. मुलगा वैभव व अभिनयच्या नसानसांत अभिनय होता. अभिनयने ‘श्यामची आई’ व ‘गरुडझेप’मध्ये काम केलं. वैभवने गणेशोत्सवाच्या डेकोरेशनमध्ये नावलौकिक मिळविला, पण व्यवहारी जीवनाला प्राधान्य देऊन उपजत गुणांना रामराम केला. शालिनी सावंतने वृद्ध आईची शेवटपर्यंत शुश्रूषा केली. त्यामुळे तिच्या करिअरवर बंधनं आली.
व्यावसायिक रंगभूमीवर तिची सुरुवात अत्रे थिएटरपासून झाली. पहिलं ‘तो मी नव्हेच’ नंतर ‘डॉ. लागू’, ‘बुवा तेथे बाया’, ‘कळी एकदा फुलली’ या सर्व नाटकांत विविध प्रकारच्या भूमिका तिने साकार केल्या. प्रभाकर पणशीकरांच्या ‘नाटय़संपदा’मध्ये ‘म्हैस येता माझ्या घरा’, कलावैभवच्या ‘मला उत्तर हवंय’, नाटय़ वैभवच्या ‘पदरी पडलं पवित्र झालं’ व ‘दिवा जळू दे सारी रात’, अभिजातचं ‘सुरूंग’, चंद्रलेखामध्ये ‘प्रेमाच्या गावा जावे’ व ‘गगनभेदी’. मुंबई मराठी साहित्य संघात ‘करीन ती पूर्व’, बेबंदशाही आरती थिएटर्स ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ व मोठय़ा संचात होणाऱ्या ग्लॅमरस नाटकांत तिने भूमिका केल्या. चित्रपटांतही तिने भूमिका केल्या. योग्यता असूनही तिच्या वाटेला नगण्य भूमिका आल्या.
तिला लाभलेले दिग्दर्शक
तिला ज्यांच्यासोबत भूमिका करायला मिळाल्या, त्यांची नुसती यादी डोळ्यासमोर आली तरी कुणालाही तिचा हेवा वाटेल. दिग्दर्शक विजया मेहता, मा. दत्ताराम, दत्ता भट, नंदकुमार रावते, पुरुषोत्तम दारव्हेकर, सई परांजपे, राम मुंगी, आत्माराम भेंडे, रमेश चौधरी, भाई सावंत, वसंत भोवर, मुरारी शिवलकर, रामचंद्र वर्दे आणि सहकलाकार म्हणून यशवंत दत्त, डॉ. काशीनाथ घाणेकर, चित्तरंजन कोल्हटकर, बबन प्रभू, शरद तळवलकर, सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत गोखले, कुमार दिघे, भावना, दाजी भाटवडेकर, अरुण जोगळेकर, कमलाकर सारंग, गणेश सोलंकी, दत्ता भट, मा. दत्ताराम इ. मोठय़ा मंडळींचा शालिनीला सहवास लाभला. एकाच जन्मात हे भाग्य तिला लाभलं. ही पुण्याईच म्हणायला हवी.
‘सलामी’, ‘पैशाचा खेळ’, ‘वैजयंती’, ‘मी जिंकलो मी हरलो’ इ. नाटकांत तिला अभिनयाचा पुरस्कार व ‘ज्वाला’ यात महाराष्ट्र राज्य स्पर्धेत रौप्य पदक, अ.भा.म. नाटय़ परिषदेचा गुणवंत कलावंत पुरस्कार. म. कामगार क. मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षांनिमित्त नाटय़ क्षेत्रातील कामगिरीबद्दल विशेष सत्कार व रंगभूमी दिनानिमित्तही तिचा सत्कार केला गेला.
एकांकिका स्पर्धा, बालनाटय़ स्पर्धा, महिला नाटय़ स्पर्धा, कुमार कला केंद्र, पालिका आंतरकेंद्रीय स्पर्धा. कोणतीही स्पर्धा असो, परीक्षक म्हणून अनेक लहान-मोठय़ा संस्थांना तिचा फार आधार वाटे. महाराष्ट्र राज्य नाटय़ स्पर्धेसाठी जालना, औरंगाबाद, सांगली अशा दूर ठिकाणी ती परीक्षक म्हणून उत्साहाने जाई. २००४ पर्यंत ती कार्यरत होती. अलीकडे १० वर्षे आईच्या आजारामुळे ती थांबली.
तीन-चार महिन्या्रपूर्वी मी तिला शेवटचा भेटलो. माझे ‘देवचार’ हे आत्मकथन तिला फार आवडलं, म्हणून मी तिला दोन-तीन वेळा भेटून तू तुझे ‘आत्मचरित्र’ लिही म्हणून आग्रह करीत होतो. पण तिने नम्र नकार दिला. मी रागानेच तिच्याकडे जायचा बंद झालो. स्मिताताई गेल्या त्याच काळात रस्त्यावरून जात असताना एका बाइकस्वाराने तिला धक्का दिला. तिला हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे उपचार दिले गेले, पण काही उपयोग झाला नाही. कुटुंबीयांनी तिची ‘देहदाना’ची इच्छा पूर्ण केली.

तिचे आत्मचरित्र राहून गेले..
स्मिता तळवलकर गेल्या त्याच्या आधी काही दिवस आधी शालिनीला एका बाइकने उडविले. ड्रायव्हर निघून गेला. लोकांनी घरी आणलं व नंतर हॉस्पिटलमध्ये नेलं, पण पुढे काही अडचण निर्माण होईल म्हणून तिने पाय घसरून पडले, असे सांगितले. त्यामुळे तिला चुकीचे औषधोपचार झाले व शेवटी तेथेच तिचे प्राण गेले. मातृभक्त शालिनी गेली १५-२० वर्षे आईची अंथरुणातच सेवा करीत होती. त्यामुळे तिच्या बाहेर जाण्यावर फारच बंधने आली होती. मोठा मुलगा विरारला राहायचा. तर धाकटा कल्याणला.
स्थानिक नगरसेवक आणि समाजसेवकांनी तिच्या कलेली कदर राखण्यासाठी केंद्र सरकारला शिफारस करून तिला काही मानधन मिळवून दिले होते. ते नियमित सुरू झाले होते. त्याचे तिला समाधान वाटायचे. मृत्यूपूर्वी तिने ‘देहदान’ करा असे सांगितले होते.
मला सारखी चुटपुट याच गोष्टीसाठी वाटते की, माझ्या इच्छेनुसार तिने जर आत्मकथन लिहिले असते तर कामगार रंगभूमीच्या इतिहासातील कितीतरी गोष्टीचा कलारसिकांना उलगडा झाला असता. पती भाई सावंतांच्या रंगभूमीचा अभ्यास, दिग्दर्शन कौशल्याचा परिचयही झाला असता. जे झालं नाही त्याबद्दल पश्चात्ताप करण्यात अर्थ नाही.