सणासुदीचे दिवस संपले आहेत, आर्थिक वर्षअखेर जवळ आला आहे, बजेट संपत आलंय आणि महत्त्वाचं म्हणजे पुढच्या महिन्यात क्रिकेटचा वर्ल्डकप आहे त्यासाठी नव्यानं काहीतरी करावं लागणारच आहे, त्यामुळे जाहिरातींमध्ये नव्या वर्षांत अजून तरी नाव घेण्यासारखं नवं काही नाही. सदराच्या सुरुवातीसच अशी नकारघंटा वाजवणे बरं नाही; पण थांबा, गेल्या आठवडय़ात मात्र दोन नव्या जाहिरातींनी सामाजिक भान दाखवत जाहिरातीतून उत्पादनाचा सुप्त संदेश देण्याचा कसा प्रयत्न केला आहे हे पाहण्यासारखं आहे. एक जाहिरात आहे ती एरियलची आणि दुसरी डाबर वाटिकाची. एक थेट जाहिरात म्हणूनच केलेली आणि दुसरी सीएसआरच्या (कॉपरेरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) माध्यमातून आलेली. 

उत्पादनाची जाहिरात तर करायची आहेच, पण थोडीशी हटके, सामाजिक जाणिवांचा संदेशदेखील जायला हवा असा काहीसा दुहेरी फंडा येथे दिसून येतो. ‘इज लॉण्ड्री ओन्ली अ वुमन्स जॉब?’ अशी पंच लाइन असणारी एरियलची जाहिरात सध्या ‘लोड द शेअर’ या टॅगलाइनवर गाजते आहे. टीव्ही चॅनल्सवर अजून फारसा गाजावाजा झाला नसला तरी सोशल माध्यमातून बऱ्यापैकी गाजावाजा सुरू आहे.
उतारवयाच्या दोन स्त्रिया सकाळच्या चहासोबत शिळोप्याच्या गप्पा मारत आहेत, त्यापैकी एकीच्या सुनेची ऑफिसला निघायची धावपळ सुरू आहे. गप्पांचा ओघ आपोआप जुन्या काळच्या पगारावर येतो. आजच्यासारखा पगार महिलांना मिळेल असे कधी त्यांना वाटलेलंच नसतं. त्यांची सून तर मुलापेक्षा जास्त कमावते. किंबहुना स्त्री म्हणून जगण्यात आजच्या जमान्यातच खरी मौज आहे. दोघींच्या या संवादाला तडा जातो तो जेव्हा त्यांचा मुलगा घाईगडबडीत येतो आणि माझा अमुक अमुक शर्ट का धुतला नाही म्हणून बायकोवर डाफरतो. तिघींच्या नजरा तेथेच फ्रीज होतात. ‘इज लॉण्ड्री ओन्ली अ वुमन जॉब’ या पंच लाइनवर मशीन आणि एरियलच्या पॅकसोबत लोड द शेअर या टॅग लाइनवर अॅड संपते.
वर्षांनुवर्षे महिलांबाबतच्या अलिखित दृष्टिकोनावर झगझगीत प्रकाश टाकण्याचा एक स्तुत्य प्रयत्न. पण हे करताना आपल्या उत्पादनाच्या जाहिरातीचा रोख तसाच राहतो. दर्शकाला हे जाणवतं की उत्पादकाला महिलांचा मुद्दा मांडायचा आहे, अगदी आजही उच्चभ्रूंच्या घरातदेखील (जाहिरातीतील घर आणि एकंदरीत प्रॉपर्टी हे सूचित करणारी आहे.) घरातील सर्वाच्या कपडे धुण्याला स्त्रीच जबाबदार आहे. पण अचानक हे स्टेटमेंट कसं का केलं असावं? तर त्यामागे कंपनीने केलेलं सर्वेक्षण आहे. पाच महानगरांतील कमावत्या महिलांच्या सर्वेक्षणातून दिसलं ते असं की आजही ८५ टक्के महिलांना वाटते की, आपण ऑफिस आणि घर अशा दोन नोक ऱ्या करत आहोत. तर ७६ टक्के महिलांना वाटते की कपडे धुण्याचं काम हे महिलांचंच आहे. एसी नेल्सनच्या माध्यमातून केलेले हे सर्वेक्षण मर्यादित संख्येपुरतं असलं तरी त्यातून आजवर उघडं असणारं सत्य आणखीनच नागडं केलं आहे हे मात्र निश्चित. मात्र केवळ जाहिरात पाहताना हे कळतच नाही. सर्वेक्षणाबाबत काही प्रमाणात बातम्यांमधून कळतं इतकंच. सर्वेक्षण नसलं तरी हे सत्य अनेक ठिकाणी आजही ढळढळीतपणे आढळतंच. विरोधाभास असा की, हे सारं सांगताना हे काम महिलांना चुकलेलं नाही हेदेखील जाणीवपूर्वकपणे दिसून येतं. लोड आहेच, फक्त तो आमचं उत्पादन वापरून कमी करा इतकंच. म्हणजेच एकीकडे सामाजिक भान आणि दुसरीकडे उत्पादनाचं मार्केटिंग. तीस सेकंदांत दोन दगडांवर पाय.
केशसंवर्धन तेल म्हणजे भरघोस केशसंभार असे समीकरण असताना वाटिकाने एकही केस नसलेली महिला दाखवून काहीसा धक्काच दिला आहे. कर्करोगाने ग्रस्त महिलेच्या डोक्यावरील सारे केस उपचारदरम्यान निघून जातात आणि आता केस नसलेल्या डोक्याने समाजात कसं वावरायचं या विवंचनेत अडकेलेल्या महिलेला तिचे आप्तस्वकीय, मित्र, सहकारी कसे चीअरअप करतात. त्यानंतर ती केस नसलेल्या डोक्यानेच पण पूर्ण आत्मविश्वासाने वावरू लागते. ‘सम पीपल डोंट नीड हेअर टू लुक ब्यूटीफूल’ या पंच लाइनवर कॅन्सरग्रस्त महिलांना वाहिलेली ही एक चार मिनिटांची छोटी फिल्मच आहे, पण त्याचं एक मिनिटाचं एडिट व्हर्जन लवकरच येत आहे. सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर हिचा गाजावाजा आहे. सीएसआरसाठी जाहिरात करताना एकदम १८० अंशांचं वळण जरी उत्पादनानं घेतलं असलं तरी महिलांच्या सौंदर्यात केसाचं महत्त्व आहेच आहे हेदेखील ठामपणे बिंबवलं जातंय. आणि केसाचं सौंदर्य जपायचं तर आमचं उत्पादन वापरावं लागणार हेच त्यातून सूचित होतं. अर्थात सीएसआर उपक्रम असल्यामुळे थेट उत्पादनाचा पॅक शॉट दिसत नाही इतकंच.
थोडक्यात काय तर काही जाहिरातींतून नवीन काही सांगायचं नसलं तरी केवळ उत्पादन कसं वेगळ्या प्रकारे लक्षात राहू शकेल याचा अगदी व्यवस्थित प्रयत्न दिसून येतो, त्याचं हे अगदी ढळढळीत प्रत्यंतर.