भारतीय क्रिकेटरसिक हे नेमके काय रसायन आहे यावर खरे तर कोणाला तरी पीएचडीच करावी लागेल. भारतीयांसाठी हा केवळ खेळ नाही. तो त्याच्या जीवनशैलीचाच भाग आहे. जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तो क्रिकेट जगत असतो. क्रिकेटने त्याच्या भावविश्वाचा मोठा भाग व्यापलेला आहे. त्याचे अगदी ठसठशीत प्रत्यंतर सध्या सुरू असलेल्या विश्वचषकात दिसून येईल. भारत-पाक सामना म्हणजे त्याचा जीव की प्राण. एक वेळ विश्वचषक हरला तरी चालेल, पण हा सामना जिंकला पाहिजे. अर्थातच खेळापेक्षा त्यामागची त्याची भावनिकताच अधिक परिणामकारक ठरते; किंबहुना याच कारणामुळे धमाकेदार अशा भारत-पाक सामन्याचा आनंद तब्बल २८ कोटी प्रेक्षकांनी घेतला आहे.
आजवर कोणत्याही टीव्ही शोला इतक्या रेकॉर्ड ब्रेक संख्येने प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभला नव्हता. २०११ नंतर क्रिकेटला इतका प्रचंड प्रतिसाद प्रथमच मिळाला आहे. अर्थातच अशा रेकॉर्ड ब्रेक व्ह्य़ूअरशिप असणाऱ्या या एकाच सामन्यातून प्रक्षेपक वाहिनीला तब्बल ४० कोटी रुपयांचा जाहिरात महसूल मिळाल्याचे समजते. स्टारस्पोर्टस्कडे विश्वचषकाच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळाल्यानंतर झाडून साऱ्या ब्रॅण्डस्नी जाहिरातीसाठी धाव घेतली होती. परिणामी या विश्वचषकादरम्यान एकाच सामन्यासाठी तब्बल ७० ब्रॅण्डस्नी आपल्या जाहिराती प्रक्षेपित केल्या आहेत. हे प्रमाण नेहमीच्या लोकप्रिय कार्यक्रमांपेक्षा जवळपास तीन ते चार पट इतके आहे. सुपरस्टारच्या चित्रपटाला साधारण २०-२५ ब्रॅण्डसच्या जाहिराती असतात, तर आयपीएलमध्ये हेच प्रमाण २५-३० च्या आसपास असते. पण विश्वचषकाने थेट सत्तरचा आकडा ओलांडला आहे. साधारण एका दिवसाच्या प्रक्षेपणातून दिवसाला १५ कोटी रुपयांचा महसूल एखाद्या वाहिनीला मिळतो. पण भारत-पाक सामन्याच्या दिवशी हाच आकडा ४० कोटींच्या पलीकडे गेल्याचे समजते. स्टारस्पोर्टस् सहा स्थानिक भाषांमधून विश्वचषकाचे प्रक्षेपण करत असल्यामुळे एकूण प्रेक्षक वर्गात इंग्रजी वाहिनीच्या प्रेक्षकांची संख्या २०-२५ टक्क्य़ांच्याच आसपास असल्याचे दिसून येते हे विशेष नोंद घेण्यासारखे आहे.
असो, तर थोडक्यात काय, तर या विश्वचषकाच्या निमित्ताने लाखो करोडो प्रेक्षकांवर जाहिरातींचा मारा करण्यासाठी सारेच जाहिरातदार सरसावले आहेत. आणि हे गणित भारत जोवर खेळत असेल तोवर हमखास टिकून राहणारे आहे. भारतीय क्रिकेट रसिकाची भावनिक जवळीक एनकॅश करून घेण्याची प्रत्येकाची धडपड सध्या सुरू आहे. त्यामुळे दिवसागणिक एक नवी जाहिरात पाहायला मिळाली तरी फारसे नवल वाटणार नाही. पण त्यामधून त्यांच्या उत्पादनाचं थेट प्रदर्शन असते, अर्थात त्यात गैर काहीच नाही. कारण तो त्यांचा व्यवसायच आहे.
पण भारतीय क्रिकेटरसिकाच्या मानसिकतेच्या कोडय़ाचं उत्तर देण्याचा काहीसा प्रयत्न एका व्हिडीओमधून दिसून येतो. हा व्हिडीओ वाहिन्यांवर दिसत नाही, पण सध्या सोशल मीडियावर तो भलताच फेमस आहे. यूटय़ूबवर चार मिनिटांच्या व्हिडीओला एक लाखाहून अधिक हिटस् आहेत, तर दोन मिनिटांच्या एडिटेड व्हर्जनला तब्बल २७ लाखाहून अधिक हिटस् मिळाल्या आहेत. जिलेटने भारतीयांच्या क्रिकेटवेडाला या व्हिडीओद्वारे सलाम केला आहे.
वयाची साठी ओलांडलेल्या एका मराठी वृद्धावर आठवणींना उजाळा देत व्हिडीओ सुरू होतो. लहानपणी गल्लीत क्रिकेट खेळताना त्याची दृष्टी नाहीशी होते, पण क्रिकेटवरच प्रेम कमी होत नाही. तेव्हापासून आजपर्यंत तो सारे सामने त्याच्या मुलाच्या माध्यमातूनच पाहतो. परदेशी सामने पाहण्यासाठी पहाटे उठतो, रात्री जागवतो, कपिलच्या विश्वचषक उंचावण्याचा जल्लोष करतो, सचिनच्या पदार्पणाने मोहरून जातो, भारतीय क्रिकेटमधले बदल त्याच्या नसलेल्या दृष्टीने अनुभवतो. तब्बल १२७२ सामने पाहतो, अर्थातच मुलांच्या नजरेतून. जणू काही तो प्रत्येक सामन्याला मनाने त्या मैदानावरच पोहचलेला असतो. क्रिकेटमुळे दृष्टी गेली तरी तो क्रिकेटला सोडत नाही. कारण क्रिकेट त्याच्या जीवनशैलीचा भाग बनलेले असते, त्यापासून तो वेगळा होऊच शकत नाही. पण मुलगा दूर गेल्यावर तो एकटा पडतो, आता निवृत्त होऊ असा विचार करतो आणि टीव्ही बंद करतो, पण त्याच्या रसिकत्वाला दाद देत राहुल द्रविड त्याच्याशेजारी येतो आणि ही टुर्नामेंट त्यांच्यासोबत पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. जणू काही त्याच्यासारखा रसिक राहुलने आजवर पाहिलेलाच नसतो.
थेट भावनेलाच हात घालणारा हा व्हिडीओ म्हटलं तर उत्पादनाची जाहिरात आहे, पण त्याहीपेक्षा त्यातील दृष्टिहीन असूनदेखील क्रिकेट अनुभवणारा क्रिकेटवेडाच आपल्याला अधिक साद घालतो. आणि हीच नेमकी प्रत्येक भारतीय क्रिकेटरसिकाची मानसिकता आहे. पण याच मानसिकतेवर जाहिरात तयार करणाऱ्यांचे, उत्पादकांचे आणि त्या जाहिरात दाखविणाऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. भारतीयांचे हे अनोखं क्रिकेटवेड जाहिरातदारांसाठी महत्त्वाचं ठरत आलं आहे आणि भविष्यातदेखील ठरणार आहे. २०१५ मधील एकूण जाहिरातींमधून मिळणाऱ्या सुमारे ४० हजार कोटींच्या महसुलापैकी एक हजार कोटींचा महसूल हा केवळ क्रिकेट विश्वचषकाच्या माध्यमातून होणार आहे. ही आकडेवारीच आपल्या क्रिकेटवेडाच्या मानसिकतेची प्रचीती देण्यास पुरेशी आहे.
सुहास जोशी