हवाई छायाचित्रकार म्हणून गोपाळ बोधे नाव जितकं मोठं होतं, तितकेच माणूस म्हणूनही ते मोठे होते. त्यांच्यामधील विविध पैलूंचा वेध घेणारे दोन लेख-

आकाश म्हणजे वर दिसणारे ढगांचे पुंजके नव्हेत तर त्याही पलीकडे बरेच काही असते. त्या आकाशाला असलेल्या खोलीमुळेच तर अवकाश असा शब्दप्रयोग कलाक्षेत्रामध्ये रूढ झाला.. या अवकाशामध्ये बरेच काही असते. काही सांगण्यासारखे तर काही कलात्मक. हे अवकाशच आपल्याला अनेक गोष्टींची जाणीवही करून देते आणि महत्त्वही पटवून देते. शिवाय मानवी वर्तनाच्या संदर्भातील तज्ज्ञ अनेकदा असेही सांगतात की, एखाद्या समस्येमध्ये कोंडी झाली असेल किंवा ती सुटत नसेल तर तुमचा व्ह्य़ू पॉइंट अर्थात दृष्टिकोन बदला, आकाशातून गोष्टी पाहायला शिका. कारण आकाशातून एखाद्या गोष्टीकडे आपण पाहिले की, एकच एक एकात्मिक तरीही वेगळा असा दृष्टिकोन येतो आणि मग जमिनीवरून ज्या गोष्टी दिसत नाहीत आणि जाणवत नाहीत त्याच गोष्टी त्या आकाशातून वेगळ्या भासतात, जाणवतातही! फोटोग्राफी अर्थात छायाचित्रण कलेच्या बाबतीत अशा प्रकारे गोष्टी आकाशातून वेगळ्या पद्धतीने दाखविण्याचे काम केले ते विख्यात छायाचित्रकार गोपाळ बोधे यांनी! गेल्या शनिवारी सकाळीच नैनिताल येथे त्यांचे निधन झाले आणि रविवारी त्यांचे पार्थिव पंचत्वात विलीन झाले तेव्हा दिवसभर वातावरण ढगाळ होते.. जणू काही पोरके झाल्याची भावनाच आकाशाच्याही मनात दाटून आल्याप्रमाणे..!
१९९५ साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये कलादालनाची समन्वयक असलेल्या उज्ज्वला आडिवरेकरने गोपाळ बोधेंची पहिली ओळख करून दिली. त्याविषयीची माहिती ‘सांज लोकसत्ता’मध्ये प्रकाशित झाल्यानंतर कलादालनात रसिकांची रांग लागली.. तेव्हापासून बोधेंशी चांगलीच गट्टी जमली. फोटोग्राफी हा समान दुवा होता, दोघांमधला! दस्तावेजीकरणाच्या संदर्भात असलेले छायाचित्रणाचे महत्त्व यावर लिहिले तेव्हा बोधे खूश झाले. म्हणाले, कुणाला तरी माझी कळकळ कळली याचा खूप आनंद झाला!
बोधेंनी त्यावेळी धरलेली दस्तावेजीकरणाची कास नंतर कधीच सोडली नाही. रसिकांच्या दृष्टिकोनातून बोलायचे तर बोधेंमुळे अनेकांना वेगळ्या कोनांतून गोष्टी पाहायला मिळाल्या. गेट वेच्या तीन घुमटांचे उदाहरण तर सर्व जण देतात. पण लातूरची केंद्रीभूत प्रकारची रचना बोधेंच्याच छायाचित्रामुळे नेमकी कळली. वेंगुर्ला रॉक्सचे अप्रतिम दर्शनही बोधेंमुळेच झाले. इतकेच काय तर त्यांचे आणखीही एक छायाचित्र खूप मोठय़ा प्रमाणावर वापरले गेले ते कुलाब्याच्या दांडीपासून दूर दक्षिणेहून आकाशातून टिपलेले छायाचित्र आहे. त्यात अध्र्याहून अधिक मुंबई स्पष्टपणे दिसते कुलाब्याच्या दांडीसह आणि तिच्यावर असलेले ढगांचे मोहक पुंजकेही दिसतात. स्वच्छ सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी टिपलेल्या या छायाचित्राने बोधेंना तुफान लोकप्रियता दिली. मुंबईकर असल्याचा अभिमान वाटणाऱ्या प्रत्येकाला हे छायाचित्र आपल्याकडे असावे असे वाटतेच वाटते! कुलाब्याच्या दांडीचे त्यांनी केलेले एरिअल चित्रणही तेवढेच गाजले. एरवी ही कुलाब्याची दांडी ‘िडग डांग दांडी, कुलाब्याची दांडी’ म्हणून फक्त गाण्यातच भेटते.. पण ती बोधेंनी मुंबईकरांना प्रत्यक्ष दाखवली. तिच्यापर्यंत जाणारा तो निमुळता, चिंचोळा खडकाळ रस्ता आणि दूर तिचे असलेले ते वास्तव्य हा अतिशय चित्रमय प्रकार होता! ‘लोकप्रभा’वर तर त्यांचे विशेष प्रेम होते. गेल्या दोन वर्षांत अनेक छायाचित्रे बोधेंनी मुखपृष्ठासाठी सहज हसत हसत उपलब्ध करून दिली! महत्त्वाचे म्हणजे त्या बदल्यात कोणतीही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, केवळ प्रेमापोटी!
बोधेंच्या त्या एरिअल फोटोग्राफीमागे ढोर मेहनत असायची. ती मात्र फारशी कधीच कुणाला लक्षात आली नाही. हेलिकॉप्टरचा दरवाजा उघडा ठेवून खालच्या बाजूला झुकून पहुडलेल्या अवस्थेत फोटोग्राफी करणे हे अतिशय अवघड काम असते. बोधेंच्या नंतरही हेलिकॉप्टर परवडणाऱ्या काहींनी असा प्रयत्न करून पाहिला पण मेहनत न जमल्याने प्रयत्नच सोडून द्यावा लागला, अशीही काही उदाहरणे आहेत. त्या अवस्थेत फोटोग्राफी करताना जिवावर बेतण्याची शक्यता अधिक असते. जोखीम तर एवढी असते की, एखादी किरकोळ वाटणारी बाब उडाली आणि हेलिकॉप्टरच्या पंख्यात अडकली तर हेलिकॉप्टरच कोसळण्याचा संभव असतो. शिवाय हेलिकॉप्टरचे स्वत:चे हादरे असतात, त्या कंपनांमुळे कॅमेरा सतत हलत असतो. अशा अवस्थेत चित्रण करणे हे जोखमीचे तर असतेच पण सारी गणिते चुकण्याचीच शक्यताच त्यात अधिक असते.

एरवी तुम्ही जमिनीवर असता त्यावेळेस थोडे खाली-वर किंवा मागे-पुढे होण्याची शक्यता असते. तसे करताही येते. हेलिकॉप्टर एकाच जागी स्थिर आहे, असे वाटत असले तरी ते अस्थिर असते. शिवाय त्यात आपल्याला हवा तो अँगल नेमका मिळावा लागतो. त्यासाठी फोटोग्राफर आणि वैमानिक यांत उत्तम संवाद असावा लागतो. कारण आकाशातील त्या फोटोग्राफरचे अधिकतर यश हे वैमानिकावर अवलंबून असते. आणि निसर्गाची साथही मिळावी लागते. निसर्ग त्यालाच साथ देतो जो प्रयत्नांची पराकाष्ठा करतो, याचा अनुभव तर बोधेंना अनेकदा आला. खास करून लडाखसारख्या परिसराचे चित्रण करताना, जिथे क्षणाक्षणाला निसर्ग आपले रूप वेगात पालटवत असतो. किंबहुना म्हणूनच बोधेंनी टिपलेले लडाख खूप वेगळे भासते. आकाशातून केलेल्या या एरिअल फोटोग्राफीमध्ये महत्त्वाचा भाग असतो तो अभ्यासाचा. सूर्याचे किरण कोणत्या ऋतूत कसे येतात. त्यांची कमी-अधिक तीव्रता कशी असते आणि सावल्या कोणत्या दिशेने पडतात आणि त्या कशा बदलत जातात याचे नेमके ज्ञान असावे लागते. कारण तुम्ही एकदा हेलिकॉप्टरमध्ये बसलात विशिष्ट ठिकाणी गेलात आणि नंतर उन्हाचे गणित चुकल्याने हात हलवत परत आलात तर ते खिशाला परवडणारे नसते. शिवाय छायाचित्रे चांगली येत नाहीत ती बाब वेगळीच. बोधेंनी हे सारे नेमके साधले अभ्यासाने, हे महत्त्वाचे.
बोधेंच्या बाबतीतील आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे. त्यांच्याकडे कलात्मकतेच्या अंगाने जाणारी एक नजर होती. त्यामुळे त्यांनी नोकरीच्या निमित्ताने भारतीय नौदलात मिळालेल्या संधीचे सोने केले. अन्यथा त्यांच्या आधी एरिअल फोटोग्राफर झालेच नाहीत, असे नाही. पण त्यांनी जे कमावले ते इतरांना जमले नाही. त्यांनी एरिअल फोटोग्राफी लोकप्रिय करण्याचे काम केले. त्यांच्यामुळेच या प्रकाराची लोकप्रियता वाढली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही विहंगावलोकनात्मक छायाचित्रण केले.
बोधेंनी केवळ एकच एक विषय घेऊन न थांबता भारताची किनारपट्टी, खाडय़ा, किल्ले, दीपगृह, लक्षद्वीप एवढेच नव्हे तर गोवा, मुंबई असे अनेक एरिअल प्रकल्प केले. ते सारे पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून ते जपले जाईल हेही पाहिले. त्यांचे आणखी एक महत्त्वाचे काम म्हणजे शेगावचे गजानन महाराज, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि अगदी अलीकडे सिद्धिविनायकाचे प्रकाशित केलेले पुस्तक यात केवळ छान छायाचित्रे देऊन ते थांबले नाहीत. तर त्यांनी त्यांचा इतिहास, पूजाविधी असे सारे काही दिले आणि ते सुबक पद्धतीने प्रसिद्धही केले. म्हणून तर त्यांच्या या पुस्तकांना चांगले यशही लाभले. आता त्यांनी अंदमानवर पुस्तक करण्यास घेतले होते. अखेरचा फोन आला तेव्हा म्हणाले, ‘आता थकलोय थोडा! अंदमानची डमी तयार आहे. गेल्या खेपेस सिद्धिविनायकाची डमी पाहिलीस तशी हीदेखील पाहून जा. कॉर्बेटवरून परत आलो की, भेटूच!’ ..पण बहुधा ते घडायचे नव्हते. तत्पूर्वीच कॉर्बेटमध्येच अस्वस्थता वाढल्याने त्यांना नैनितालला आणण्यात आले आणि तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली! बोधे गेले पण महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासाचे एक वेगळे दस्तावेजीकरण मागे ठेवून गेले. त्यांची छायाचित्रे ही केवळ ठेवा नाहीत तर आता भावी काळासाठीचा इतिहास असणार आहेत! तो इतिहासच ते तुमच्या माझ्यासाठी मागे ठेवून गेलेत!