मान्सून डायरी
‘‘देश म्हणजे काय?’’
पहिल्या मीटिंगला मयूरेशने विचारलेला पहिला प्रश्न.
‘‘अं.. अं.. भौगोलिक किंवा राजकीय सीमांचा प्रदेश, ठरावीक संस्कृती, भाषा, ठरावीक हवामान वगरे वगरे..’’
‘‘बरं आता सांगा, भारत म्हणजे काय?’’
त्याचा दुसरा प्रश्न.
आम्ही त्याही प्रश्नाची दिलेली उत्तरेही अशीच. भारतीय उपखंड, राजकीय सीमा, संस्कृती आणि त्याचं भारताशी नातं. थोडक्यात शाळेत भूगोलाच्या तासाला पाठ केलेल्या सगळ्या गोष्टी. देश, भारत, समाज, भारतीय अर्थव्यवस्था असे वेगवेगळे प्रश्न आणि आम्हाला जमतील अशी आम्ही दिलेली ठोकताळ्यातील उत्तरे. बराच वेळ प्रश्नोत्तरांचा हा क्रम चालू होता, पण या प्रश्नोत्तरांचा संदर्भ काय हे मात्र कळत नव्हतं.
प्रोजेक्ट मेघदूतच्या तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू होती. पश्चिम घाटाचा पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात मध्य भारतातल्या काही भागांत मेघदूतच्या टीमने पावसाचा पाठलाग केला होता. मागच्या दोन वर्षांच्या अनुभवानंतर यंदा पुढच्या दोन भागांत पावसाचा पाठलाग करण्याचे निश्चित झाले होते. पहिल्या टप्प्यात आगुम्बे या दक्षिण भारतातल्या सर्वाधिक पावसाच्या ठिकाणापासून दुष्काळी माणदेशापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात पश्चिम वायव्य भारतातून प्राचीन सरस्वती मार्गाचा नव्याने शोध घेत आम्ही ‘टीम मेघदूत’ काम करणार होतो.
‘‘देश म्हणजे काय?’’ या प्रश्नाने सुरू झालेली चर्चा आता कालिदासाच्या ‘मेघदूत’वर येऊन पोहोचली होती. कालिदासाने रेखाटलेल्या मेघाच्या प्रवासाचे वर्णन हे मान्सूनच्या पावसाशी मिळतेजुळते आहे हे गेल्या दोन वर्षांच्या अनुभवावरून समोर आले होते.
सत्तर टक्क्यांहून अधिक मान्सूनवर अवलंबून असणारी शेती, भारतीय अर्थव्यवस्था आणि मान्सूनचे असणारे नातेही सगळ्यांना माहीत होते.
साहित्यातील संदर्भात विचार करत असतानाच हवामान खात्याने मान्सून म्हणजे ‘मौसमी वारे’ अशी सांगितलेली मान्सूनची व्याख्याही आठवत होती. समुद्र आणि जमिनीच्या तापमानातील फरक त्यामुळे अरबी समुद्रात, भारतीय
उपखंडात तयार होणारे कमी-जास्त दाबाचे पट्टे, उत्तरेकडे सरकत जाणारा मान्सून ट्रफ, एल निनो, ला-निना, महासेन यांसारखी चक्रीवादळे अशा वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पनाही डोक्यात येत होत्या. २००६ मध्ये मुंबईतल्या महापुराच्या रूपाने या पावसाचे रुद्र रूप पाहायला मिळाले होते, तर २०१२ च्या मराठवाडय़ावरील जीवघेण्या दुष्काळाने पावसाचे नाराज होणे म्हणजे काय हेही दाखवले होते. घाटातल्या काही भागांत पाऊस इतका पडतो की, ‘‘बास रे बाबा, थांब आता,’’ असे पावसाला सांगावे लागते, तर देशावरच्या काही भागांत गेली पाच वष्रे पावसाने पाठ फिरवली असल्याने एकदाही पेरण्या न झाल्याने पावसावरचाच काय पण देवावरचाही विश्वास उडायला हा पाऊसच कारणीभूत ठरतो. आलेप्पीसारख्या ठिकाणी छत्र्यांचा व्यवसाय करणारा व्यावसायिक मान्सूनच्या या चार महिन्यांत करोडपती होतो आणि दुसरीकडे याच काळात उसळलेल्या समुद्रामुळे किनाऱ्यावरचा मच्छीमार मात्र दोन वेळचे जेवणही न मिळाल्याने त्याच पावसाकडे, त्याच उसळलेल्या समुद्राकडे हताशपणे बघत बसतो. अशा वेगवेगळ्या अनुभवांवरून मान्सून म्हणजे भारताची ‘लाइफलाइन’ आहे हे मागच्या दोन वर्षांत प्रत्यक्ष बघायला मिळाले होते.
प्रोजेक्ट मेघदूतच्या या टप्प्यात आम्ही आगुम्बे या ‘दक्षिण चेरापुंजी’पासून गोव्यामाग्रे दुष्काळी माणदेशापर्यंत मान्सूनच्या तीन वेगळ्या रूपांचा अभ्यास करणार होतो. आगुम्बेला वरदान ठरलेली समुद्रसपाटीपासूनची उंची आणि सह्याद्रीची पर्वतरांग या भागाला भरपूर पाऊस देते, पण त्याच अतिउंचीमुळे वारे अडवणाऱ्या डोंगरांच्या अभावामुळे माण- म्हसवडसारखा प्रदेश मात्र वर्षांनुवर्षे दुष्काळात राहतो. भौगोलिक रचनांचा आणि पावसाचा असा प्रत्यक्ष संबंध आम्हाला पाहायला मिळणार होता.
प्रश्न-उत्तरांचे सत्र आता संपले होते. पहिल्या दोन वर्षांच्या मान्सूनच्या पाठलागातून मिळालेल्या अनुभवांच्या शिदोरीवर यंदाचा आमचा तिसऱ्या टप्प्याचा प्रवास आता सुरू होणार होता. टीममधल्या माझ्यासारख्या काही जणांसाठी हा अनुभव नवीन असणार होता. ही सहल जरा वेगळी ठरणार होती. तेव्हा माहीत नव्हते, पण हा मान्सून बरेच काही शिकवणार होता.
३ जूनला रात्री ९ च्या सुमारास आम्ही पुण्याहून आगुम्बेच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली. आमच्यातले काही जण पत्रकार, काही इंजिनीअरिंगचे तर काही नुकतेच दहावी, बारावी झालेले विद्यार्थी अशा पंधरा जणांच्या टीमने आमचा प्रवास सुरू झाला. या पूर्ण प्रवासात जैवविविधता, हवामान आणि सामाजिक-आíथक अशा तीन वेगवेगळ्या गटांत आम्ही काम करणार होतो. मान्सूनचे या तीन घटकांवर होणारे परिणाम आणि मान्सूनमध्ये या घटकात होणारे बदल आम्ही अभ्यासणार होतो.
बसमध्ये बसत असताना मान्सूनपूर्व पावसाची रिमझिम चालू होती. पावसामुळे हवेत गारवा जाणवत होता. त्यातच, हातातला गरमागरम वडापाव त्या पावसाळी वातावरणाची शान आणखीनच वाढवत होता. बासरी, ढोलकी, माऊथऑर्गन अशा इंडोवेस्टर्न वादन साहित्याबरोबर जुन्या िहदी गाण्यांपासून ते अगदी देशभक्तीपर गीतांपर्यंत मनसोक्त गाणी म्हणत आम्ही आता मान्सूनच्या पावसाची वाट बघत होतो.
आमच्या प्रवासातला आता दुसरा दिवस. कर्नाटक हायवेजवळ सकाळी चहा पिण्यासाठी थांबलो होतो. आकाशात थोडेफार काळे ढग दिसत होते. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनची वाटचाल आता केरळ, कर्नाटकच्या पुढे होणे अपेक्षित होते. तेव्हा मान्सून गोव्याच्या सीमेवर येऊन पोहोचला होता. पुण्यापासून आमचा प्रवास घाटाच्या पूर्वेकडून केल्यामुळे आगुम्बेला पोहोचेपर्यंत पावसाची भेट घडणार नव्हती. हायवेवरून जात असताना दिसणारी हिरवीगार शेतं या भागात मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याचे दाखवत होते. महाराष्ट्र आणि या भागातला पहिला फरक दिसला होता. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या काही भागांतून गायब झालेला मान्सूनपूर्व पाऊस या भागात मात्र दमदार हजेरी लावून गेला होता.
हवामानाचा अभ्यास करणारा गट ढगांचे प्रकार, वाऱ्याचा वेग, दिशा, तापमान अशा वेगवेगळ्या नोंदी घेऊन त्याचा मान्सूनमधील हवामानाशी संदर्भ लावत होते. त्याच सुमारास वाटेत ठिकठिकाणी धनगरांचे तांडे घाटाकडे निघाल्याचे दृश्य मान्सूनच्या आगमनाची वार्ता देत होते. गाडी थांबवून आम्ही त्या धनगरांशी गप्पा मारण्यासाठी निघालो. पहिली मुलाखत मिळाली ती ‘शिवामूर्ती’ नावाच्या एका पंचवीस वर्षीय धनगराची. मुलाखतीचे वैशिष्टय़ म्हणजे त्याची भाषा कानडी आणि आम्ही मराठी. तरी हातवाऱ्यांच्या भाषेने जवळजवळ दोन तास आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. मेंढपाळांना पसा मिळवून देणारा हा एक उत्तम काळ. या काळात त्यांची कमाई रोजी पाचशेपेक्षाही जास्त. या मेंढपाळांना मान्सूनच्या विज्ञानाचे ज्ञान नाही, पण ठरावीक दिशेने गार वारे आले, ठरावीक पक्षी दिसले की पाऊस येणार ही त्यांची पक्की खात्री. कमी शिक्षण तरीही निसर्गात राहिल्याने निसर्गाचं अचूक ज्ञान, भाषा कळत नसली तरी जाणवणारी आपुलकी आणि एकविसाव्या शतकाचं प्रतीक असणारा त्यांच्या गळ्यात लटकणारा मोबाइल अशी त्या धनगराची प्रतिमा डोळ्यांत साठवून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, भेट म्हणून त्यांनी दिलेल्या त्यांच्याच माळरानावरील केवडय़ाच्या फुलांसोबत ..
पुढच्या तीन-चार तासांनी आम्ही आगुम्बेला पोहोचलो. पूर्ण प्रवासात हुलकावणी दिलेला पाऊस इथे तरी अनुभवता येईल या आशेवर आम्ही गाडीतून उतरलो. दक्षिण चेरापुंजी ही आगुम्बेची एक ओळख, पण यासोबतच दूरदर्शनवर गाजलेल्या ‘मालगुडी डेज’ मालिकेतील मालगुडी ही आगुम्बेची दुसरी ओळख. चारही बाजूंनी जंगल, कौलारू घरं, घरांना जोडणारे छोटे रस्ते, घरांच्या मध्ये असणारी नारळाची, फणसाची झाडे यांनी आमचे आगुम्बेत स्वागत केले. केळीच्या पानावर रस्सम भात आणि कानडी पद्धतीच्या वेगवेगळ्या भाज्यांवर मनसोक्त ताव मारल्यावर आता वेळ होती आपापल्या गटांनुसार गावात फिरून मुलाखती घेण्याची, वेगवेगळी माहिती गोळा करण्याची.
गावातील सामाजिक स्तर आणि मान्सूनचा त्यांच्यावर होणारा चांगला-वाईट परिणाम समजून घेण्यासाठी तीन भिन्न गटांतल्या लोकांच्या मुलाखती घ्यायच्या अशा प्राथमिक ठोकताळ्यांनी मुलाखतीला सुरुवात केली. टोपल्या आणि मधविक्रीचे दुकान असणाऱ्या ‘नागराज’ यांच्या पहिल्या मुलाखतीतूनच गावाच्या परिस्थितीची थोडी कल्पना आली. येथील सगळे दुकानदार कमीअधिक प्रमाणात सारखेच. पावसाचा सीझन सोडला तर महिन्याला दोन हजार ते पाच हजार कमवणारे आणि पावसाच्या काळात पर्यटक नसल्याने त्यांचे मासिक उत्पन्न निम्म्याने कमी होणार हे ठरलेले. गावातल्या मुसळधार पावसाचा इथल्या आíथक जीवनावर होणारा हा पहिला थेट परिणाम.
मुसळधार पावसाचे चार महिने आíथक उलाढाल तर सोडाच, पण घराच्या जेवणासाठी भाजीपाल्याचीही भ्रांत. काही घरात ही भ्रांत आíथक चणचणीमुळे, तर इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे. येथील पावसाचा हा दुसरा थेट परिणाम. ‘मालगुडी डेज’च्या चित्रीकरणावेळी इथे शंभरेक कुटुंबे होती. मात्र आता ही संख्या सत्तरपेक्षाही कमी झाली आहे. गावाचे सरासरी वय साठच्या पुढे आहे. नव्वद टक्के घरातील तरुण पिढी शिक्षण किंवा नोकरीसाठी शहरांमध्ये स्थायिक झाली आहेत. जी थोडीफार लोक इथे आहेत ती फक्त गावाच्या प्रेमापोटी. पावसाचा इथल्या समाजावर झालेला हा आणखी एक परिणाम. थोडक्यात ओस पडत चाललेलं हे मालगुडी.
सामाजिक, आíथक गटाने बऱ्यापकी काम केल्यावर जैवविविधतेचे काम करणारा गट जंगलात जाऊन नवीन काही तरी शोधायला उत्सुक होता. ‘जंगलात जाऊन आम्हाला काही नोंदी घ्यायच्या आहेत,’ असे म्हणताच आगुम्बेच्या गावकऱ्यांनी आम्हाला रोखले. हा धोका पत्करू नका. पावसाळ्यामध्ये जंगलात नक्षलवादी हालचाली सुरू असतात. पोलिसांची गस्तही वाढली आहे. जंगलात फिरणाऱ्या नवीन माणसाला दोन्ही बाजूंनी धोका आहे. गावकऱ्यांच्या या सूचनेनुसार जंगलात जाण्याचा बेत रद्द करून आम्ही नक्षलविरोधी पथकाच्या जवानांना भेटलो. ‘‘पावसाळा सुरू झाला की, या भागात जंगले दाट होतात. या संधीचा फायदा घेऊन गेल्या आठ वर्षांत नक्षलवादी हालचाली वाढल्या आहेत. याच काळात बाहेरील राज्यातील नक्षलवादी जंगलात ट्रेिनग कॅम्प चालवतात. आगुम्बे परिसरात २००८ मध्ये नक्षलींनी कर्नाटक परिवहनाची बस जाळली होती. तेव्हापासून नक्षलविरोधी पथकाने ‘कोम्बिंग’ ऑपरेशन सुरू केले. आत्तापर्यंत तेरा नक्षलींना पोलिसांनी ठार केले आहे. आगुम्बेमध्ये पोलिसांची गस्त वाढली, चेकपोस्ट वाढले. आगुम्बेत इतरांसाठी त्रासदायक ठरणारा मान्सून नक्षली हालचालींसाठी मात्र अनुकूल ठरला.
आठ-साडेआठ वाजून गेले होते. शहरातल्या भरगच्च गर्दीच्या या वेळेत आगुम्बे मात्र खूप शांत होते. चारही बाजूंना अंधार पसरला होता, रातकिडय़ांचा आवाज सर्वत्र ऐकू येत होता. घरातले दिवे शांत झाले होते. फक्त दूरवरच दिसणारा रस्त्यावरच्या दिव्याचा मंद प्रकाश गावाची झोपायची वेळ झाली आहे हे सांगत होता. जेवण झाल्यावर, दिवसभराचे अनुभव एकमेकांना सांगण्यासाठी रात्री सगळे एकत्र बसलो होतो. जैवविविधतेच्या गटाला मान्सूनचे आगमन दर्शविणाऱ्या अनेक घटना दिसल्या होत्या. मुंग्या आणि मुंगळ्यांची अन्न साठवण्याची लगबग, नुकत्याच फुललेल्या आळंबी, विविध कीटकांचे मेटिंग, कोषातून बाहेर पडलेले सुरवंट कॅमेरात कैद झाले होते. बेडूक, रातकिडय़ांचे कमीजास्त होणारे आवाज पावसाचे स्वागत करत होते. या गटाला अनेक कोळी, जळवा, नव्याने उमललेल्या वनस्पती यांच्या नोंदी मिळाल्या.
आगुम्बेतला मुसळधार पाऊस मात्र आमची सारखी निराशा करत होता. तुरळक सरी सोडल्या तर दिवसभरात चार-पाच मिलिमीटर पावसाचीही नोंद झाली नव्हती. तारखेचा संदर्भ लावता या काळात आगुम्बेला मुसळधार पाऊस मिळणे अपेक्षित होते. म्हणून आयएमडीची वेबसाइट तपासली. अरबी समुद्रात तयार झालेली चक्रीय स्थिती पश्चिमेला ओमानच्या आखाताकडे सरकल्याने आगुम्बेत पावसाने रजा घेतली होती. तीन-चार दिवसांपूर्वी भरगच्च दिसणाऱ्या ढगांचे मान्सूनच्या लहरीपणाचे दर्शन आज पुन्हा घडले होते.
भारतीय मान्सूनवर डॉक्युमेंटरी करणारी ऑक्सर नामांकित कॅनेडीयन स्टुर्ला गुनार्सन यांची टीम दुसऱ्या दिवशी सकाळी आमची वाट पाहत होती. आम्ही निरीक्षणे कशी घेतो, लोकांशी गप्पा कशा मारतो, गाडीत दंगा कसा करतो यापासून वाफाळलेल्या गरम चहाच्या कपाबरोबर आमची पहाट कशी होते या सर्व गोष्टी स्टुर्ला आणि त्यांची टीम बारकाईने पाहत होत्या, त्यांच्या कॅमेरात नोंदवत होत्या. प्रोफेशनॅलिझम म्हणजे काय असते, कामात मन ओतून काम करणं म्हणजे काय हे त्या पाच जणांच्या टीमकडून आम्ही शिकलो.
सकाळी उठल्यानंतर कुंदादरी पर्वतातल्या जैन मंदिरातून सूर्योदय पाहण्यासाठी आम्ही निघालो. आकाशात ढगांची गर्दी जमली होती. वारा पश्चिमेकडूनच पण कमी वेगाने वाहत होता. मोराचे आणि मलाबार व्हिस्टिलग थ्रश या शब्दश: गाणाऱ्या पक्षाचे ‘कॉल’ वातावरणाला साजेसे संगीत देत होते. जवळच असणाऱ्या जंगलात प्रत्येक झाडावर भरपूर वाढलेले शेवाळे दिसत होते. मधमाशा, मुंग्यांचे वेगवेगळे प्रकार, सापसदृश्य प्राण्याची वारुळे दिसत होती. मान्सून म्हणजे फक्त पाऊस नाही, याचा अनुभव आम्ही निसर्गातल्या या घडामोडी पाहताना घेत होतो.
दुपारनंतर पुन्हा मुलाखतींच्या कामाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांत पाऊस कमी झाला आहे, तरुण पिढी शहरात स्थायिक झाली आहे, असे जुने मुद्दे पुन्हा समोर आले. शेती असूनही कमी रोजगारामुळे लोकांचा शेतीतील ओढा कमी झाला आहे. बऱ्यापकी स्थानिक लोक पावसासाठी नक्षत्र, पंचांग यांचाच अजूनही उपयोग करतात, तर शहरात गेलेली वीस टक्के पिढी इथल्या स्वच्छ आणि प्रदूषणविरहित वातावरणामुळे म्हातारपणी पुन्हा गावात परतते असे नवीन काही संदर्भही मिळाले. गावाचे सरासरी साठपेक्षा जास्त असणारे वय आणि अनेक घरांत शंभरी उलटून गेलेल्या तरीही खुटखुटीत असणाऱ्या आज्या त्यांच्या या माहितीची साक्ष देत होत्या.
पुढे गावातल्या तिसऱ्या स्तराचा शोध घेत असताना दलित वस्तीत शिरलो. छोटय़ाशा झोपडीवजा घरात राहणारी १०-१५ कुटुंबांची ही वस्ती. या १०-१५ घरांत मिळून पाण्याची फक्त एकच टाकी आणि तीही गेले कित्येक दिवस डबकं आणि किडय़ांनीच जास्त वापरलेली. रोज जंगलात जाऊन मध गोळा करणे, ५-६ शिकारी कुत्र्यांच्या साहाय्याने शिकार करणे आणि पावसाच्या काळात गावातल्या मोठय़ा घरावर कौलं बसवणे अशी या वर्गाची कामं. पिटू वायवर, हापट्टेसारखे साप; बेट्टा, पोळसारखी जनावरे; रामबंटा, हुळासारखे किडे; टुकुटुकु आवाज करणारा केंभुतका पक्षी या वर्गाला पावसाच्या आगमनाची वर्दी देतात. पाऊस कधी येणार, कधी जोरात पडणार या सगळ्यांसाठी त्यांना आयएमडीच्या मदतीची कधीच गरज लागत नाही, किंबहुना त्यांना या गोष्टी माहीतही नाहीत. निसर्गाशी असणारे त्यांचे नाते, निसर्गातले बदल हेच त्यांच्यासाठी पावसाचे सूचक असतात. इतर गावाला त्रास देणारा पाऊस या वर्गासाठी मात्र अनुकूल ठरतो.
त्या दिवसातली ही शेवटची मुलाखत होती. खरं तर इथे काही तरी वेगळे अपेक्षित होते. कनिष्ठ वर्गाला पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसत असेल असे वाटले होते, पण हा अनुभव मात्र उलट होता. गावातल्या काहींचे उत्पन्न निम्म्याने कमी करणारा पाऊस या वर्गाला मात्र हवाहवासा होता. फक्त एका किलोमीटरच्या परिसरात मान्सूनने प्रत्येक समाजासाठी असणारे त्याचे वेगळे नाते दाखवले होते. सामान्य माणसाच्या आयुष्यात असणारे मान्सूनचे स्थान पुन्हा एकदा सिद्ध झाले होते.
सहा तारखेला सकाळी आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. पावसाच्या रिमझिम सरी झेलत गाडी गोव्याच्या दिशेने निघाली होती. गाडीतली धमाल रेकॉर्ड करण्यासाठी स्टुर्लाची टीम आमच्या गाडीत आली होती आणि तेवढय़ात आयएमडीच्या अंदाजांना हुलकावणी देऊन मान्सूनच्या पावसाने बरसायला सुरुवात केली होती. रेडिओवर स्टुर्लाची आवडती धून वाजत होती. ‘‘रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाएँ मन..’’
मान्सूनचा पाठलाग करायला आता कुठे सुरुवात झाली होती, पण या दोन दिवसांतच डायरीची पाने वेगवेगळ्या बऱ्याच आठवणींनी भरली होती. पाऊस नको असे म्हणणारे तरीही गावाच्या ओढीने गावातच राहणारे मध्यमवर्गीय याच आगुम्बेने दाखविले होते आणि निसर्गाशी नाते जपणारे धनगर, हरिजनही इथेच पाहिले होते. वाढत चाललेला नक्षलवादही इथेच पहिल्यांदा अनुभवला होता आणि आजीच्या मायेने जवळ घेणाऱ्या कस्तुरीअक्काही याच आगुम्बेत भेटल्या होत्या. पावसाच्या या काही सरींनी जुने सगळे मळभ दूर केले होते. ‘‘देश म्हणजे काय?’’ या मयूरेशने विचारलेल्या पहिल्या मीटिंगमधल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर आता कुठे मिळायला लागले होते. माळरानावर मिळालेला तो केवडा आता कुठे फुलायला लागला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agumbe rainforest
First published on: 03-07-2013 at 05:47 IST