आदरांजली
विनायक परब – response.lokprabha@expressindia.com

डॉ. स्पिंक यांनी गेली ६५ वष्रे अजिंठय़ावर अमूल्य योगदान देणारे संशोधन केले. अजिंठा हा त्यांचा श्वास होता. त्यांच्या निधनामुळे अजिंठय़ाने त्याचा यक्षच गमावला आहे.

uddhav thackeray slams narendra modi during in an interview with the indian express
मोफत धान्य देण्यापेक्षा रोजगार का देत नाही? ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांचा मोदींना सवाल
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?
Neelam Gorhe criticize Uddhav Thackeray said he has lost his base politically
“उद्धव ठाकरे यांचा राजकीयदृष्ट्या जनाधार संपला,” निलम गोऱ्हे यांची टीका; म्हणाल्या…

‘आणि मग ३१ डिसेंबर १९७७च्या मध्यरात्री बरोबर १२ वाजता..’ हे ऐकताच आपले  कान सहज टवकारले जातात आणि आपण कान देऊन ऐकू लागतो. शैलीच अशी असते की, काहीतरी गुपित उलगडते आहे, त्यामध्ये नाटय़ काठोकाठ भरलेले असते.. ‘शत्रू असलेल्या अश्मकांचीच वाकाटकांच्या राजवाडय़ामध्ये घुसलेली मंडळी त्या मध्यरात्री तत्कालीन सम्राट असलेल्या राजा हरिषेण याची हत्या करतात..’ इथे खऱ्या अर्थाने सुरुवात होते.. विख्यात पुरातत्त्वज्ञ आणि कलेतिहासतज्ज्ञ डॉ. वॉल्टर स्पिंक आपल्यासमोर अजिंठा, तिथला इतिहास आणि त्यासोबत तत्कालीन राजकारण उलगडत जातात. इतिहास रंजक करून सांगायला हवा, फक्त त्यात कालखंड आणि ऐतिहासिक सत्यांची मोडतोड नको, असे त्यांचे म्हणणे असायचे. डॉ. वॉल्टर िस्पक म्हटले की, अजिंठय़ावरील त्यांच्या ६५ वर्षांच्या संशोधनासोबत ही नाटय़मयताही सहजच आठवते. गेल्याच आठवडय़ात त्यांचे अमेरिकेत ९१व्या वर्षी निधन झाले.

डॉ. िस्पक यांनी गेली ६५ वष्रे अजिंठय़ावर अमूल्य योगदान देणारे संशोधन केले. मात्र त्यांच्या संशोधनाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. म्हणूनच २०१४ साली त्यांच्या संशोधनाला ६० वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठातील बहिशाल शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पुरातत्त्व केंद्राने त्यांच्या सन्मानार्थ एका परिसंवादाचे आयोजन केले होते. त्यावेळेस त्यांच्या संशोधनावर प्रकाश टाकणारी सविस्तर मुलाखत ‘लोकप्रभा’ने प्रकाशित केली.

भारतीय इतिहासात गुप्त साम्राज्याचा कालखंड हा सुवर्णयुग मानला जातो. पण त्यानंतर आलेल्या आणि महाराष्ट्रातून राज्य करणाऱ्या वाकाटक साम्राज्याचा कालखंड हे भारताचे खरे सुवर्णयुग होते हे डॉ. वॉल्टर िस्पक यांनी सप्रमाण सिद्ध केले. पुरातत्त्वीय संशोधनाचे अनेक आयाम बदलण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉ. िस्पक यांनी त्यांच्या संशोधनातून केले. त्यांनी वाकाटक साम्राज्याच्या संदर्भात केलेल्या संशोधनाने भारतीय इतिहासाची कालखंड गणनाच बदलण्याचे काम काही अंशी केले. कालखंड गणनेतील बदल ही इतिहासातील मोठीच उलथापालथ असते. त्यासाठी सक्षम आणि ठाम पुरावे द्यावे लागतात. ते त्यांनी दिले. त्यांनी सादर केलेल्या वाकाटक साम्राज्याच्या संक्षिप्त कालखंड गणनेबद्दल पुरातत्त्व क्षेत्रामध्ये काही प्रश्नही उपस्थित करण्यात आले. मात्र त्यांचे संशोधन खोडून काढण्यात आजवर कुणालाच यश आलेले नाही. या संशोधनाला आव्हान देऊन कुणी ते खोडून काढले तर, असा प्रश्न त्यांना अखेरच्या भेटीत विचारला होता. त्यावर हसत हसत ते म्हणाले होते, ‘..तर अजिंठामध्येच निवांतपणे अखेरचा श्वास घेईन, कारण माझे कार्यकारण तेव्हा संपलेले असेल.’ गेल्या वर्षी भेटीच्या वेळेस एक तरुण संशोधिका त्यांना अजिंठय़ाबद्दल प्रश्न विचारती झाली. तिच्या एका प्रश्नावर चमकून डॉ. िस्पक म्हणाले, ‘अरेच्चा! आजवर काम करताना हा मुद्दा तसा लक्षात नाही आला.’ तिला जवळ बोलावून पित्याच्या मायेने तिचे कौतुक करत ते म्हणाले, ‘अगं, यावर आजवर कुणीच काम नाही केलेले. तू कर नक्की. केवळ एकाच अंगाने आजवर संशोधक अजिंठय़ाकडे संशोधक पाहात आले आहेत.’’ आपलेही काही राहून गेले आहे, असे सांगताना या संशोधकाच्या चेहऱ्यावर खंत नव्हती तर तरुण संशोधिकेला काही नवे गवसले याबाबतचे कौतुक होते. त्यानंतर त्यांनी त्या नव्या विषयाचे काही कोन सहज तिला बहालही केले. त्या दिवशी वॉल्टर िस्पक माणूस म्हणून खूप मोठे ठरले. अन्यथा अनेक संशोधक हातचे राखून ठेवतात. आलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा करताना त्यांचे मुद्देच चक्क ढापतात आणि नंतर त्यावर स्वत:चे संशोधन प्रकाशित करतात. विद्यार्थी हतबुद्ध झालेले असतात. या पाश्र्वभूमीवर वॉल्टर यांचे वागणे आश्चर्यकारक आणि खूपच मोकळे होते. पुढच्या पिढीवरचा त्यांचा विश्वास खूप मोलाचा होता. एवढा मोठा संशोधक आपल्यावर विश्वास टाकून, केवळ कौतुक करून थांबत नाही तर हातही मोकळा सोडतोय हेही त्या तरुण संशोधिकेसाठी तसे वेगळे होते.

डॉ. िस्पक यांचे वेगळेपण काय असा विचार करता दोन गोष्टी प्रामुख्याने जाणवतात. सर्वच क्षेत्रांमध्ये मोठय़ा दिसणाऱ्या गोष्टींकडे लोकांचेच नव्हे तर संशोधकांचेही लक्ष पटकन जाते. आणि तुलनेने खूप लहान असणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्षच होते. अजिंठय़ाच्या संदर्भात भारतीय इतिहासातील कालखंडनिश्चिती करताना डॉ. िस्पक यांनी लेणीमधील दरवाजाची रचना या अतिशय क्षुल्लक मानल्या गेलेल्या बाबीचे महत्त्व ध्यानात घेऊन त्याचा वापर केला. माणसाच्या वापराच्या गोष्टींचे उद्दिष्ट बदलले की, रचना बदलते हे तर्कशास्त्र त्या मागे होते. तंत्रज्ञानामध्ये बदल झाला की, दरवाजासारख्या क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचीही रचना बदलते हेही त्यांनी ध्यानात घेतले. एरवी कधी कुणी दरवाजाच्या रचनेवरून इतिहासातील कालनिश्चिती करता येऊ शकते, असे सांगितले असते तर असे विधान करणाऱ्यालाच वेडय़ात काढले गेले असते. मात्र त्या विधानाला डॉ. वॉल्टर यांनी ऐतिहासिक सत्यतेचे प्रमाण मिळवून दिले आणि इतिहासालाही कलाटणी मिळाली.

एरवी अमेरिकन संशोधकांना भारतीय शब्द उच्चारण्यासाठी तसे कठीण वाटतात. पण अजिंठय़ामध्ये तब्बल ६५ वष्रे काढणारे वॉल्टर मराठी सहज बोलायचे. त्यांना मराठी कळत नसावे असे समजून सोबत आलेल्या एका पत्रकाराने ‘अमूक एक प्रश्न विचारला तर चालेल का,’ अशी माझ्याकडे विचारणा केली, त्यावेळेस वॉल्टर त्याच्याकडे वळून म्हणाले, ‘सगळे विचार, चालेल मला.’ त्याच्यासाठी हा धक्काच होता. थोडय़ा वेळाने त्यांनी त्याला दुसरा धक्का दिला आणि म्हणाले की, ‘तू पण याच्याच सारखा बातमीच्या मागे असतोस का? ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सच्या गाजलेल्या ‘शांताराम’मधील एका पात्राला मी ओळखतो, त्याची चांगली बातमी करता येईल.’ ही विचारणा केल्यानंतर तर त्या स्थानिक पत्रकाराला भोवळच यायची बाकी होती.

गेली अनेक वष्रे अजिंठा फिरलेल्या वॉल्टर यांना गेल्या काही वर्षांत मात्र पायामुळे चढण चढणे जमत नव्हते. अशा वेळेस स्थानिक पालखी वाहणारे त्यांच्या मदतीला धावून यायचे. तर त्यांच्याशी त्यांचे हे वॉल्टरबाबा मराठीत संवाद साधायचे. ‘मुलेबाळे कशी आहेत’, असे विचारायचे तेही तोडक्यामोडक्या नव्हे तर अस्खलित मराठीत. एकदा तर व्यवस्थित मराठी उच्चारणाला काय म्हणता अशी विचारणा केली असता त्यांना ‘अस्खलित’ हा शब्द सांगितल्यावर तो त्यांनी काही मिनिटांत तसाच्या तसा म्हणून दाखवला.

वॉल्टर यांच्याशी गप्पा मारताना ते मधूनच अजिंठय़ामधून सटकायचे आणि कधी घारापुरीत तर कधी जोगेश्वरी गुंफेत दाखल व्हायचे. घारापुरी आणि जोगेश्वरी गुंफा हे त्यांचे दुसरे प्रेम असावे. घारापुरीबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यातील चमक विशेष जाणवायची. घारापुरीबद्दल कुणी बोलू लागले तर त्या संदर्भातील चार प्रश्नांचा एक संचच ते समोर ठेवायचे आणि पुरातत्त्वाशी संबंध असेल तर काम करा, असे म्हणायचे. प्रश्नांचे असे हे मोहोळ त्यांच्या डोक्यात सतत असायचे. मग जोगेश्वरी आणि मंडपेश्वर गुंफांच्या त्यांच्या डोक्यातील सिद्धांताबद्दल बोलायचे. पण प्रश्नांचे मोहोळ घेऊन फिरणारे वॉल्टर हृदयात मात्र कविता घेऊन िहडायचे हे फारच कमी जणांना माहीत आहे. कविता त्यांना खूप आवडायची. कवितेचे पुस्तक नेहमीच सोबत असायचे. त्यांच्या अनेक अनुभवांच्या कविता झाल्या. त्यांना ना. धों. महानोरांच्या ‘अजिंठा’बद्दल आणि ‘वही’ या काव्यप्रकाराबद्दल सांगितले तेव्हा त्यांच्या भेटीची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.. ती आता अधुरीच राहील. अजिंठाच्या चित्रांमधील कविता त्यांना त्यांच्या शब्दांत महानोरांना ऐकवायची होती.

‘अजिंठा हे काव्यच आहे’, वॉल्टर नेहमी म्हणायचे. अखेरच्या भेटीच्या वेळेस त्यांना विचारले होते. ‘काय राहिलेय आणखी?’ तर ते म्हणाले.. ‘अजिंठावरचे आठ खंड झाले. आता चित्रांपर्यंत पोहोचलोय. कलेतिहासतज्ज्ञ आहे तर चित्रांवरही लिहायला हवेच ना. पण मनात नवा खंड आकारास येतोय तो अजिंठाच्या काव्याचा आहे. लोकांना ते किती आणि कसे कळेल माहीत नाही. पण कळायलाच पाहिजे असेही नाही.’ दक्षिण मुंबईतील एका हॉटेलात झालेल्या त्या संवादाच्या वेळेस त्यांनी जवळच असलेला टिश्यू पेपर घेतला आणि थरथरत्या हातांनी त्यावर चार ओळी लिहिल्या. म्हणाले हे आहे डोक्यात. तो काव्यखंड आता अधुराच राहील. पण ज्याच्या श्वास आणि उच्छवासात अजिंठाच होते, अशा या अजिंठय़ाच्या यक्षाने अमूल्य संशोधनाने आपल्याला समृद्ध करत या जगाचा निरोप घेतला..

गेल्या पाच वर्षांत त्यांच्याशी भरपूर गाठीभेटी आणि गप्पा झाल्या. त्या अनमोल क्षणांसाठी त्यांच्या ऋणातच राहावे, तीच समृद्धी. अजिंठय़ाच्या या यक्षाला ‘लोकप्रभा’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!