09 August 2020

News Flash

घसरगुंडी पाथराची

डोंगर भटकंतीत डोंगर चढाई ही कष्टदायक असतेच. पण कधी कधी एखाद्या घाटवाटेची उतराईदेखील तुमची परीक्षा पाहते. अशाच एका घाटवाटेच्या उतराईचा हा अनुभव...

| August 7, 2015 01:04 am

lp03डोंगर भटकंतीत डोंगर चढाई ही कष्टदायक असतेच. पण कधी कधी एखाद्या घाटवाटेची उतराईदेखील तुमची परीक्षा पाहते. अशाच एका घाटवाटेच्या उतराईचा हा अनुभव…

मार्च-एप्रिलमध्ये सूर्य आग ओकू लागला की आम्हा ऑफबीट परिवाराच्या सह्य़भ्रमंतीला खरी सुरुवात होते. ग्रीष्माच्या या हंगामात अतिउष्म्यामुळे बहुतेकजण ट्रेकला रामराम ठोकून घरीच राहणे पसंत करतात. त्यामुळे संस्थेच्या कार्यक्रमांना सुट्टी देऊन आमचा चमू आडवाटांवर हुंदडायला मोकाट सुटतो. नुकताच हिवाळ्यात खुटेदरा घाटमार्ग करून झाला होता. आता पाथरा घाट करा असा एका डोंगरमित्राने सल्ला दिला आणि आम्ही तो शिरोधार्य मानला.
शहापूरजवळच्या डेहणेगावाच्या मागे असणाऱ्या आजोबा गडाच्या (आज्या पर्वत) वरच्या अंगास घाटमाथ्यावर कुमशेत गाव वसले आहे. एकदम सुदूर असे. जवळचं शहर म्हणजे राजूर. दळणवळणाचे साधन म्हणजे दिवसातून एकदा येणारी एसटी आणि एक जीप. कुमशेतवरून खाली कोकणात अनेक प्राचीन घाटवाटा. काही गावकऱ्यांच्या सोयीसाठी खालील बाजारांसाठी वाटा उतरतात. काही कालौघात वापरात नसलेल्या. तर काही निव्वळ आमच्यासारख्या डोंगरभटक्यांचा वावर असणाऱ्या.
कुमशेतवरून गुहीरेचं दार ही वाट आज्या पर्वताच्या बाजूने डेहणे गावात उतरणारी. मोठाल्या प्रस्तरांनी भरलेली. तर दुसरी वाट म्हणजे पाथरा घाट. माळशेज घाटाच्या सुरुवातीस मुख्य रस्त्यापासून आतल्या बाजूस असणाऱ्या कुंडाची वाडी येथे उतरणारी. अतिशय चिंचोळी आणि अति घसाऱ्याची वाट. डोंगर नाकावरून थेट खाली कोकणात उतरते. एवढीच काय ती पाथरा घाटाची माहिती मिळाली होती. ‘एक चूक आणि कपाळमोक्ष असा गेम आहे बरं का!’ एवढी तगडी प्रस्तावना मिळालेली वाट केव्हाची डोक्याला भुंगा लावून होती. त्यामुळे या वर्षीच्या ग्रीष्म भटकंतीचा श्रीगणेशा पाथरा घाटानेच करायचं ठरलं.
आम्हा चाकर मंडळींना एकुलता एक रविवार सुट्टीचा दिवस मिळत असल्यामुळे वाट चढून जाण्यापेक्षा उतरून येणं जास्त सोयीचं होईल असं सर्वाचंच मत पडलं. पहाटे लवकर सुरुवात करता यावी यासाठी रात्रीच कुमशेत गाठायचे ठरलं. लगोलग पांडुरंग मामांना कसाऱ्याला घ्यायला येण्याचं सांगूनदेखील टाकलं.
जीपने घोटी सोडलं तसं हवेतील गारव्याने एक एक विकेट पडू लागली. राजूरनंतर तर पांडुरंग मामा एकटेच जागे होते. कुमशेत गाठायला पहाटेचे चार वाजले. उजाडेस्तोवर जरा आराम करावा म्हणून एका अंगणात पाठ टेकली आणि थेट उन्हं डोळ्यावर आल्यावर आठ वाजताच जाग आली. पटापट वळकटय़ा गुंडाळून आवरून घेतलं. गावातून एक वाटाडय़ा संगती घेतला. आणि पाथराकडे पांथस्थ झालो तेव्हा पावणेनऊ झाले होते.
गावातून बाहेर पडलो की समोरच विस्तीर्ण पठार ओलांडून अर्धा-पाऊण तासात पाथरा घाटाच्या तोंडाशी पोहोचता येतं. आम्ही जसं जसं पठारावर पुढे पुढे सरकत होतो तसा समोर दिसणारा आजा पर्वत हळू हळू पिछाडीला सरकू लागला. दक्षिणेला म्हणजेच आमच्या डावीकडे कलाडगड, नाफ्ता असे त्या भागातील ठळक डोंगरांची आमच्या चालीप्रमाणे दिशा बदलत होती. कुमशेतचा कोंबडा आमची पाठराखण करत होता. संपूर्ण पठारावर अंजनी, करवंद, जांभूळ अशा झाडांची दाट जाळी पसरली होती. कच्ची करवंदं आणि गोड आंबीळ असा रानमेव्याचा आस्वाद घेत अंमळ उशिराच म्हणजे तासाभरात कडय़ापाशी पोहोचलो. कडय़ावरून दिसणारा कोकणातला नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा होता. डावीकडे कुमशेतचा कोंबडा आणि नाफ्त्याच्या मागून हरिश्चंद्रगड डोकावत होता तर पाठीमागे आजोबाचा शेंडा झाडांमागून उठावलेला दिसत होता.
समोर क्षितिजाशी भैरवगड, नाणेघाट, जीवधन, ढाकोबा, दुर्ग, अहुपेघाट असे माळशेज घाट पर्वत शृंखलेतील डोंगर विशिष्ट रचनेमुळे सहज ओळख देत होते. आमचे वाटाडे बाळू दादा एका झाडाखाली विसावले. चहुबाजूला दिसणाऱ्या रांगडय़ा सह्य़ाद्रीचे लोभस रूपडं कोणी डोळ्यात सामावून घेण्यात दंगून गेलं होतं, तर कोणी कॅमेराबंद करण्याचे प्रयत्न करत होता. पाथरा घाटाची सुरुवात येथूनच होणार होती म्हणून जुजबी पोटपूजा करून पाणी पिऊन सर्वानी बुटाच्या लेस आवळल्या आणि सॅकचे स्ट्रॅप्स टाइट केल्या.
वाटेचा अंदाज घेण्यासाठी सारा कंपू कडय़ापाशी सरसावला. मुख्य डोंगरापासून विलग झालेली एक सोंड काटकोनात आडवी पसरलेली दिसत होती. वाटेचा अंदाज घेण्यासाठी खाली नजर टाकली तर जेमतेम दहा-बारा इंचाची इवलीशी पुसटशी पायवाट आम्ही उभ्या असलेल्या जागेपासून दहा-पंधरा फूट खोल डोंगरात डावीकडे वळताना दिसली. मामांनी खुणेनेच याच वाटेने जायचे आहे याची जाणीव करून दिली. आणि सर्वाच्याच काळजाचा ठोका चुकला. जवळजवळ दोन हजार फूट खोल दरी जेमतेम एक पाऊल मावेल एवढी अरुंद वाट. आणि संपूर्ण उताराला अगदी तळापर्यंत नावालाही एकदेखील झाड दिसत नव्हते. नुसता घसारा आणि घसारा. वाट चिंचोळी असल्यामुळे साहजिकच एकामागून एक अशी रेल्वेगाडी करत जाणे भाग होते. मामांच्या मागून झीनत, यज्ञेश आणि पवन पुढे निघाले. त्यांच्या मागे मी, राजस आणि सर्वात मागे विशाल, आदित्य आणि सागर. एका ओळीत वाटचाल सुरू केली. वाटेच्या सुरुवातीलाच एका पाच फुटी कातळाने स्वागत केले. तो उतरून मुख्य वाटेला लागलो आणि साधारण दहा मिनिटं आडव्या वाटेवर चालल्यावर मध्ये एक तिरकस सहा फुटी खडक आडवा आला. हा ओलांडून पुन्हा वाटेला लागण्यासाठी त्या तिरकस दगडावरती शरीराचा तोल सांभाळत पुढे जाणे भाग होते. झाडाचा आधार तर नव्हताच आणि बारीक ढिसूळ मुरुमामुळे पायावरच तोल सांभाळत खडक पार करावा लागणार होता. तोल गेला तर खोल दरीत कपाळमोक्ष निश्चित.
घसरडी वाट आणि खोल दरी यांचं मिश्रण म्हणजे मला भोवळ आलीच म्हणायची. वाटेत आणखी असं काही असेल तर मी येथूनच निरोप घेण्याची घोषणा केली. तू येत नसशील तर पुढेच जाणार नाही असं म्हणत झीनत आणि पवनने सॅकमधला रोप ओढून काढला. रोप फिक्स करायला काहीच आधार नसल्यामुळे एका बाजूला झीनत, पवन आणि विशाल आणि दुसऱ्या बाजूला यज्ञेश, आदी आणि सागर यांनी रोप आवळून घेतला. दोराचा आधार घेत मी कातळ टप्पा पार केला. खरं तर हे तसं रिस्कीच होतं. एकाचा जरी तोल गेला तर फॉल निश्चित होता आणि सर्वाचाच कपाळमोक्ष झाला असता. पण रोपचा वापर केवळ मानसिक आधारापुरताच होता. आणि तसेही रोप वापरला नसता तर दोन-दोन रोपचं ओझं घेऊनदेखील रोप वापरला नाही म्हणून यज्ञेशचे बोल ऐकावे लागले असते ते वेगळंच.
lp02उजवीकडे डोंगर आणि डावीकडे खोल दरी अशा वाटेवर दहा मिनिटे चालून अखेर आम्ही डोंगरसोंडेपाशी पोहोचलो. आता येथून पुढचा प्रवास म्हणजे फक्त उभा उतारच होता. पावलागणिक धडधड वाढत होती. पाथरा घाट म्हणजे एका निमुळत्या अतिउताराच्या डोंगरसोंडेवरची सरळसोट उतराई. तिन्ही दिशांना खोलच खोल दरी, पायाखाली निसटती माती, झाडी झाडोऱ्याचा मागमूस नाही. तोल सांभाळणे म्हणजे जणू तारेवरची कसरत. उतार अतिशय तीव्र असल्यामुळे एकूणच उतराईचा वेग फारच मंदावला होता. पंधरा-वीस मिनिटे अशीच कसरत करत एका छोटय़ा कातळटप्प्यापाशी पोहोचलो. येथे सोंड डावीकडे ठेवत सोंडेच्या उजव्या अंगावरून एक झेड आकाराचा दगडी टप्पा उतरावा लागतो. टप्पा फारच निमुळता असल्यामुळे सॅक पास कराव्या लागल्या. एकमेकांना आधार देत पण दोराचा वापर न करता हा टप्पा सर्वानी सहज पार केला. पुन्हा वळणावळणाच्या घसाऱ्याला सुरुवात झाली. उतार अधिक अधिक तीव्र होत होता. पावलागणिक दोन-तीन फूट खाली उतरत होता. जणू काही आम्ही एकमेकांच्या डोक्यावरच होतो.
आणखी थोडं उतरल्यावर एका कातळटप्प्यापाशी गाडी अडली. दहा-बारा फुटांचा कातळ आडवा आला. येथे मामा, पवन आणि विशालने रोपच्या साहाय्याने सर्वाच्या सॅक खाली उतरून घेतल्या. मग एकेकजण हा कातळटप्पा पार करून गेलो. पुढची वाट समोर काटकोनात पसरलेल्या डोंगरसोंडेच्या पोटात गडप होत होती. त्या आडव्या वाटेकडे आम्हाला जायचे नसून त्या सोंडेला डावीकडे ठेवत उजवीकडून वळसा घालत पुन्हा पलीकडच्या सोंडेवरून खाली उतरायचे होते. सोंड उतरून एकदाचे आम्ही आडव्या भिंतीच्या पोटाशी येऊन पोहोचलो. येथे बसण्याजोगी आठ-दहा फूट सपाट जागा मिळाल्याने सर्वानीच पाठी टेकल्या. थोडी पोटपूजा उरकली.
जवळच कातळात एक टाकेवजा खड्डा कोरलेला आढळला. पण तो कोरडाठाक होता. त्यालाच लागून असलेल्या दगडाच्या उंचवटय़ावर अनेक छोटय़ा-मोठय़ा मडक्यांचा आणि मातीच्या धुपाटण्याचा खच पडला होता. घाटणदेवी नावाची एक पाटीही तेथे होती. मामांच्या मते कोकणातील लोक देवीला मडक्यांचे आंदण वाहतात. त्याचसोबत काचेच्या बांगडय़ा व इतर सौभाग्य अलंकारही वाहिलेले दिसत होते. विशेष म्हणजे या सगळ्या मडक्यांवर एक विशिष्ट नक्षी कोरलेली होती. मध्ये दोन गोल आणि दोन्ही बाजूंना चार चार रेषा. अशीच नक्षी कोरलेल्या लाकडी पट्टय़ाही तेथे आढळल्या. या घाटातील प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवीला वाहिलेल्या या वस्तू असाव्यात असा आम्ही अंदाज बांधला.
आता डोंगराला वळसा घातला की मग काय फक्त सोंड उतरून जायचे असा आमचा समज झाल्याने आम्ही येथे जरा जास्तच रेंगाळलो. मामांना येथूनच परत फिरण्याचा आग्रह केला, पण तो त्यांनी पार नाकारला.
पुढील टप्पे संपले आणि तुम्ही सुखरूप वाटेला लागलात की मग मी मागे फिरायला मोकळा असे मामांनी जाहीर केले. पुढे आणखीन टप्पे आहेत हे कळताच सगळ्यांनी पुन्हा सॅका खांद्याला लावल्या. डोंगराला वळसा देताच, आम्ही फक्त निम्माच घाट उतरल्याचे आमच्या ध्यानी आले. एव्हाना मध्यान्ह झाली होती, उन्हं चांगलीच तापली होती. दगड तापल्यामुळे कातळ पार करताना हातापायाला चटके बसत होते. एक भला मोठा कातळ पार करून आम्ही अखेर मुरमाड मातीच्या पायवाटेला लागलो. येथून मामांनी निरोप घेतला.
उकाडा अंगाची लाही लाही करत होता. खाली सपाटीला कोकणात दिसणारी झाडांची गर्द सावली खुणावत होती. मनाने जरी सावलीशी धाव घेतली तरी शरीर साथ देत नव्हते. कातळटप्पे परवडले, पण निसरडय़ा मुरूम मातीवर पाय ठरत नव्हते. थोडय़ा थोडय़ा अंतरावर कोलमडायला होत होते. झिजून गोटा झालेल्या बुटांच्या तळव्यांमुळे यज्ञेशला तर संपूर्ण उतार बसून घसरपट्टी करतच करावा लागला.
lp01तासाभराच्या घसरपट्टीनंतर थोडीशी सावली मिळाली. तोल सांभाळण्याच्या अतिकठीण कसरतीमुळे सर्वाच्याच पायाचा जणू काही कीस निघाला होता. थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढच्या वाटेला लागलो. येथून पुढे वाट मोहाच्या गर्द छायेतून जात असल्यामुळे सुखावह वाटत होती. मोह ऐन बहरात असल्यामुळे संपूर्ण आसमंतात मोहाच्या फुलांचा मादक सुगंध पसरला होता. अतिउष्णतेमुळे चांगलीच दमछाक झाली होती. अखेर पठारावर एक मेंढपाळ दादा दिसले. त्यांच्याकडून पाण्याच्या ठिकाणचा रस्ता समजला. गावकऱ्यांनी नदीपात्रात वाळू खोदून खड्डय़ात जमणारे पाणी जमा करून पिण्यासाठी नारळाची करवंटी ठेवली होती. बाजूलाच पाण्याचं एक छोटा डोह होता. त्यातील पाणी गुरांसाठी राखून ठेवले होते. उष्म्याने कावलेल्या जिवांना करवंटीचे पाणी कसे पुरणार? सॅका डोहाच्यापाशी फेकून सगळे डोहावर आडवे पडून पाणी ढोसू लागले. आमच्या मागून आलेल्या शेळ्याही आमच्यासोबत पाण्याला भिडल्या. पाणी थोडे गढूळ होते, पण आम्हाला अशा वेळी फक्त पाणी हवे असते, मग ते कसे का असेना. ग्रीष्मातल्या एका खडतर पायपिटीनंतर तो एक मोठा दिलासा असतो. दहा-पंधरा मिनिटांची विश्रांती घेऊन आम्ही भराभर गावाकडे चालू लागलो.
झळाळत्या उन्हातून गावापर्यंत करायची तंगडतोड अगदीच नकोशी झाली होती. सर्वागातून घामाच्या धारा वाहत होत्या. त्यावर शेतातून उडणारी लाल माती चिकटल्यामुळे आमची लाल माकडंच झाली होती. पण या साऱ्या माकडांच्या चेहऱ्यावर पाथराची घसरगुंडी यशस्वीपणे पार केल्याचा आनंद विलसत होता.
प्रीती पटेल – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2015 1:04 am

Web Title: ajobagad trek
टॅग Trekker Blogger
Next Stories
1 दुर्लक्षित सुतोंडा
2 खडा सह्य़ाद्री
3 लेणी, राऊळ-मंदिरांची रानभूल
Just Now!
X