scorecardresearch

‘आखाती मराठी’ ची दुबईत गुढी

दखल पर्यटन आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये जाणाऱ्यांसाठी तिथली आवश्यक माहिती देणारी ‘आखाती मराठी’ ही वेबसाइट दुबईत दीर्घकाळ राहणाऱ्या तुषार कर्णिक

‘आखाती मराठी’ ची दुबईत गुढी

दखल
पर्यटन आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आखाती देशांमध्ये जाणाऱ्यांसाठी तिथली आवश्यक माहिती देणारी ‘आखाती मराठी’ ही वेबसाइट दुबईत दीर्घकाळ राहणाऱ्या तुषार कर्णिक या डोंबिवलीकर तरुणाने यंदाच्या गुढीपाडव्यापासून सुरू केली आहे. त्याबद्दल-
दुबई म्हणजे सोन्याची खाण. खनिज तेलातून निर्माण झालेल्या संपत्तीतून येथे सुबत्ता आली. मुस्लिम राजवट असली तरी उद्योगधंद्यांना संपूर्ण स्वातंत्र्य व प्रोत्साहन असल्याने हे शहर जागतिक व्यापाराचेही एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. आखाती किंवा मध्य पूर्वेकडील संयुक्त अरब अमिरात, ओमान, बहारीन आणि कतार या देशांबद्दल भारतीयांना बऱ्याच वर्षांपासून आकर्षण आहे. तेथे नोकरीधंद्यानिमित्त जाणाऱ्यांचे प्रमाण ७० ते ८० च्या दशकापासून मोठय़ा प्रमाणावर वाढले. त्यामध्ये केरळ व दाक्षिणात्यांचे तसेच सिंधी समाजाचे प्रमाण मोठे होते. तरी काही मराठी कुटुंबेही आपले नशीब अजमावण्यासाठी दुबईत गेली.
त्या काळात आखाती देश संक्रमणावस्थेतून जात होते. तेलाचे साठे नुकतेच हाती लागले होते आणि त्यांचा योग्य विनियोग करणे, हे त्यांच्यासाठी आव्हान होते. त्यामुळे उच्चशिक्षित मनुष्यबळ व तंत्रज्ञांची त्यांना गरज होती. त्या काळात मराठी भाषकांनी आखाती भूमीवर पाऊल टाकले आणि आपल्या तल्लख बुद्धीच्या व कार्यकुशलतेच्या जोरावर तेथे आपला ठसा उमटविण्यास सुरुवात केली. आजमितीला संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकूण भारतीयांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मराठी भाषकांची संख्या दुसऱ्या क्रमांकाची आहे.
आपल्या आर्थिक उन्नती व प्रगतीसाठी आणि नवी क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी दुबईसह आखाती देशांमध्ये मराठी माणूस आज जात आहे. त्यांना मायबोली मराठीतून आवश्यक माहिती पुरविण्यासाठी वेबसाइट सुरू करण्याची कल्पना तुषारच्या डोक्यात आली. तुषार हा डोंबिवलीकर तरुण. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेताना डोंबिवलीत वास्तव्यास असलेला तुषार दहा वर्षांपूर्वी दुबईला गेला. सध्या तो दुबईतील एका कंपनीत अर्थसल्लागार म्हणून काम करीत आहे. पण करिअर करताना ज्या अडचणी आपल्याला आल्या, त्या इतरांना येऊ नयेत, या उद्देशाने तुषारने  www.aakhatimarathi.com ही वेबसाइट सुरू केली आहे. पर्यटक आणि नोकरी-व्यवसायानित्तिाने येणाऱ्या सर्वाना आखाती देशांमधील व्यवस्था, व्हिसा व अन्य नियम आदींविषयी माहिती त्यावर देण्यात आली आहे. व्हिसासाठी कोणती कागदपत्रे लागतात, त्यासाठी किती शुल्क आहे, व्हिसा कोणकोणत्या प्रकारचा व किती काळासाठी असतो, ही माहिती उपयुक्त आहे.
दुबई हे पर्यटकांचे नंदनवन. काळाच्या बरोबरीने धावणाऱ्या या शहरात भारतीयांना कदाचित स्वप्नातच दिसतील, अशा गोष्टी पाहायला मिळतात. येथील प्रगतीचा वेग प्रचंड आहे. अत्याधुनिक साधने येथे उपलब्ध आहेत. स्थानिक लोकसंख्येपेक्षा जगभरातील शंभरेक देशांमधून वास्तव्यासाठी आलेल्या नागरिकांचे प्रमाण अधिक असतानाही दुबईने अरबी संस्कृती जपली आहे. या संस्कृतीचे संवर्धन कसे होईल, याकडे तेथील राज्यकर्त्यांचा कटाक्ष असतो. कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया व युनायटेड अरब अमिरात हे पर्शियन सागराच्या पश्चिम किनारपट्टीवरील आखाती देश. उन्हाळा अतिशय कडक म्हणजे उन्हात बाहेर पडल्यास अंग भाजूनच निघते. पण खनिज तेलाच्या जोरावर अत्याधुनिक साधनांच्या मदतीने वाळवंटात नंदनवन फुलविण्यात आले आहे. त्यामुळे गाडय़ांपासून रेल्वे स्थानकांपर्यंत आणि बहुतांश दुकानेही वातानुकूलित आहेत.
येथील कायदे व नियम अतिशय कडक असून ते मोडण्याची कोणाचीही िहमत नाही. अगदी रात्री बारा वाजताही वाहनचालक सीटबेल्ट न लावता किंवा सिग्नल तोडून गाडी चालवीत नाही. अनेक ठिकाणी छुपे कॅमेरे बसविण्यात आले आहेत आणि साध्या वेशातील पोलीस कुठेही प्रकट होतात, त्यामुळे त्यांचा धाक आहे. सिग्नल तोडण्यासारख्या किरकोळ गुन्ह्य़ालाही सहा हजार दिरामसारखा मोठा दंड आहे आणि तो भरल्याखेरीज पोलीस वाहन सोडत नाहीत. पण येथील नागरिकांची स्वयंशिस्तही वाखाखण्यासारखी आहे. जगभरातून आलेल्या लोकांनीही येथील शिस्त अंगात बाणवली आहे. अगदी भारतीय, पाकिस्तानी नागरिकही तेथे सुतासारखे सरळ वागतात.
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, अस्वच्छता करणे, हे प्रकार दृष्टीस पडत नसल्याने रस्ते, बागा, रेल्वे स्थानके अगदी लख्ख आहेत. भव्य खांबांच्या डोलाऱ्यावरून ऐटीत जाणारी मेट्रो रेल्वे हे दुबईचे आकर्षण आहे. मेट्रो रेल्वेची स्थानकेही अतिशय आलिशान बांधण्यात आली असून नोकरदार व पर्यटक मोठय़ा प्रमाणावर तिचा वापर करतात आणि तिचे तिकीट दर मात्र अतिशय स्वस्त आहेत. दुबईत मेट्रोबरोबरच जल वाहतूक, बस वाहतूक व टॅक्सी वाहतूक हे पर्यायदेखील उपलब्ध आहेत. सुंदर बोटीतून प्रवास करताना शहराचा फेरफटकाही होतो व बरेच काही डोळ्यांत साठवून घेता येते. आरामदायी बसगाडय़ांमधून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात, तरी कोठेही गोंधळ नाही. या सर्व वाहतूक सेवा कशा पद्धतीने चालतात, त्यांची स्थानके कुठे आहेत, त्यांचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक कोणते, तिकीट दर कशा पद्धतीने आहेत, याविषयीची माहिती साइटवर देण्यात आली असून ती पर्यटकांना उपयुक्त आहे. परदेशात फिरण्यासाठी गेल्यावर प्रवास विमा हा अतिशय महत्त्वाचा घटक. त्याचबरोबर वयस्कर मंडळींना किंवा अन्य कोणालाही अचानकपणे वैद्यकीय सेवेची गरज पडल्यास कोठे संपर्क साधावा, त्यांचे दूरध्वनी क्रमांक काय आहेत, हा सर्व तपशील पर्यटकांसाठी साइटवर उपलब्ध आहे.
जगातील अतिभव्य विमानतळांपैकी एक अशी दुबईच्या विमानतळाची ख्याती आहे. त्याला असंख्य दरवाजे आहेत आणि अनेक मजली इमारतीमध्ये फिरण्यासाठी सरकते जिने आणि बेल्ट आहेत. पायी फिरले तर काही किलोमीटरची रपेट सहज होते. जगभरातील सर्व प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ, मद्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू तेथील करमुक्त दुकानांमध्ये उपलब्ध होतात. अमिरातीच्या विमान कंपनीच्या ताफ्यातील विमानेही भव्य व आलिशान आहेत.
बुर्ज खलिफासारखी जगातील सर्वाधिक उत्तुंग इमारत दुबईत आहे. पाम आर्यलड हे मानवनिर्मित आलिशान बेट येथे वसविण्यात आले आहे. बुर्ज अल अरबसारखी आलिशान सप्ततारांकित हॉटेल पाहून डोळे दिपतात. गेल्या ४० वर्षांत अतिवेगाने केलेल्या प्रगतीमध्ये ‘जेबेल अली’ या बंदराची निर्मितीही झाली. बर जुमान सेंटर, डेरा सिटी सेंटर, वाफी शॉपिंग मॉल, मर्काटो मॉल, अल घुरेर सेंटर, दुबई मॉल यांसारख्या भव्य शॉपिंग मॉल, बिझिनेस सेंटरच्या सुबक इमारती पाहून हरखून जायला होते. डॉल्फिन पाहण्यासाठी मत्स्यालयाला आवर्जून भेट दिलीच पाहिजे. जुमेराह मास्क, म्युझियममध्ये गेल्यास पर्यटक खिळूनच राहतात. डेझर्ट सफारीचा अनुभव घेतल्याखेरीज दुबईची सफर सार्थ ठरणार नाही. हा अनुभव अतिशय सुंदर असतो. या सर्व ठिकाणांची माहिती या साइटवर छायाचित्रांसह देण्यात आली आहेत.
कोठेही परदेशात गेले की आपले खाद्यपदार्थ मिळणारी हॉटेल्स मिळाल्यास भारतीय पर्यटक हरखून जातात. उपमा, इडली सांबारपासून अनेक भारतीय खाद्यपदार्थ मिळणारी हॉटेल्स कुठे आहेत, भारतीय नागरिकांसाठी उपयुक्त वस्तू कोठे मिळतात, याची माहिती या साइटवर देण्यात आली आहे. एक विलक्षण व आनंददायी सफर घडविण्यासाठी कशा पद्धतीने आपले नियोजन असावे, हे ठरविण्यासाठी पर्यटकांना मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती तुषारने दिली. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींनी दरमहा आर्थिक नियोजन करून काही रक्कम शिल्लक टाकल्यास दुबईला एकदा तरी फिरून यावे. दुबईत किमान दोन आठवडे राहिल्यास अनेक नयनरम्य स्थळांना भेट देऊन आनंद लुटता येईल आणि ही सफर आयुष्यभर स्मरणात राहील, असे तुषारला वाटते.
नोकरी किंवा व्यवसायासाठी दुबईत स्थायिक होऊ इच्छिणाऱ्यांना पूरक व उपयुक्त माहितीही या वेबसाइटवर देण्यात आली आहे. बाहेरच्या देशांमधून आलेल्यांना दुबईत भाडय़ानेच घर घेऊन राहावे लागते. तुम्ही कुटुंबासह दुबईत वास्तव्याला येणार असलात, तर तुमच्या मुलांसाठी उपयुक्त माहितीही साइटवर आहे. येथील शाळांचे शैक्षणिक वर्ष कसे असते, प्रवेशासाठी कोणते नियम आहेत, प्रवेशासाठी कसा संपर्क साधावा, असे बारीकसारीक तपशील आवर्जून देण्यात आले आहेत.
दुबईत सोने स्वस्त व शुद्ध मिळते. त्यामुळे पर्यटकांना सोने व दागिन्यांच्या खरेदीचे मोठे आकर्षण असते. हे लक्षात घेऊन सोन्याच्या दराची माहिती दररोज अपडेट केली जाते. दिराम व रुपया विनिमय दरापासून अनेक उपयुक्त बाबींचा तपशील साइटवर आहे. मराठी वृत्तपत्रांमधील बातम्या त्यावर आवर्जून टाकल्या जातात. दुबईतील वास्तव्याच्या वेळी लागणारे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक साइटवर देण्यात आले आहेत. लहान मुलांच्या कलागुणांना उत्तेजन देण्यासाठी ‘किड्स कॉर्नर’ ही नवीन संकल्पना या साइटवर मांडण्यात आली आहे. साइटचा उपयोग अनेकांना होत असल्याचे पाहून काही देशांची माहिती त्यावर मराठीतून दिली जात आहे. त्यात नवनवीन भर टाकली जाईल, असे तुषारने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-07-2013 at 01:01 IST

संबंधित बातम्या