21 February 2019

News Flash

परंपरा : खान्देशातील दिवाळी – आखाजी

नुकत्याच होऊन गेलेल्या अक्षयतृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात.

| May 9, 2014 01:27 am

नुकत्याच होऊन गेलेल्या अक्षयतृतीयेला खान्देशात दिवाळीइतकंच महत्त्व असतं. माहेरवाशिणी माहेरी येतात, गोडधोड होतं. सालदार, बलुतेदार या दिवसापासून नवी सुरुवात करतात. पुरुषमंडळींना या दिवशी चक्क जुगार खेळण्याची परवानगी असते.

जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्य़ांच्या भूप्रदेशाला ‘खान्देश’ म्हणून आेळखले जाते. स्त्री वर्गाला माहेरची आेढ लावणारे अनेक सण महाराष्ट्रात साजरे केले जातात. त्यात विदर्भातील आखाडी, तर मराठवाडय़ातील नागपंचमी आणि खान्देशातील आखाजी या सणांचा समावेश करता येईल. खान्देशाची बोली, सण, उत्सव, चालीरीती या बाबी आपले स्वतंत्र सांस्कृतिक वैशिष्टय़ जपून आहेत.
वैशाख शुद्ध तृतीयेला देशावर अक्षयतृतीया म्हटले जाते, त्यालाच खान्देशात आखाजी असे म्हणतात. याच दिवशी कृतयुगाचा प्रारंभ होतो, असे मानले जाते. या प्रारंभ दिवसाला पवित्र मानून धर्मकृत्ये पार पाडण्याची प्रथा आहे. या दिवशी केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, देवांच्या आणि पितरांच्या नावाने केलेले कोणतेही कर्म अक्षय किंवा अविनाशी होते, असे मानतात. याच दिवशी परशुरामाचा जन्म झाला म्हणून प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून अघ्र्य देतात. स्त्रिया चैत्रात बसविलेल्या चैत्रागौरीचे याच दिवशी विसर्जन करतात.
खान्देशात आखाजी हा सण दीपावलीइतकाच महत्त्वाचा गणला जातो. शाळा आणि महाविद्यालयांना असलेली उन्हाळ्याची सुटी ही ‘आखाजी’ची सुटी म्हणूनच आेळखली जाते. अर्थात या सुटय़ा कधीकधी या सणानंतर लागतात. खान्देशवासीयांचे हे दुर्दैवच की, या सणाला इतर सणांप्रमाणे सुटी जाहीर केलेली नाही.
आखाजी-स्वातंत्र्याचा दिवस
खान्देशातील आखाजी हा सण सर्वासाठी संपूर्ण बंधनमुक्तीचा दिवस असतो. या दिवशी स्त्री, पुरुष, शेतकरी, शेतमजूर, आबालवृद्ध या सर्वाना पूर्ण स्वातंत्र्य लाभते. प्रत्येक जण बंधनमुक्त असतो. काम करणाऱ्या मजुरांना या दिवशी सुटी असते. शेतकरी सर्व शेतीची कामे या दिवशी बंद ठेवतात. मुलांना, तरुणांना पैसे, पत्ते, जुगार खेळायला पूर्ण मुभा असते. प्रत्येक विवाहित स्त्री या दिवशी सणानिमित्ताने माहेरी आलेली असल्याने ती झोके खेळायला, गाणी गायला, झिम्मा-फुगडी खेळायला पूर्ण मुक्त असते. आबालवृद्धांना आमरस आणि पुरणाची पोळी यासह सांजरी आणि घुण्या अशा मिष्ठान्नांची सुस्ती येते. ‘आगारी’ या प्रथेतून या दिवशी पूर्वजांचीही सोय केलेली आढळते. अशा प्रकारे खान्देशातील प्रत्येक व्यक्ती या सणाला मुक्त असते. दूरवर नोकरी करणारा प्रत्येक जण या दिवशी सुटी घेऊन बायकोमुलांसह आपल्या गावी परतलेला असतो.
शेतकरी-शेतमजुरांची आखाजी
अक्षयतृतीयेच्या दिवशी शेतकरी शेतीची कामे बंद ठेवतो. शेतमजुरांना या दिवशी सुटी असते. वर्षांच्या कराराने काम करणाऱ्या सालदाराचा हिशेब या दिवशी पूर्ण करून त्यास शेतकरी बंधनमुक्त करतो. सालदाराचा हा दिवस जुन्या मालकाकडील वर्षांचा शेवटचा दिवस असतो. याच दिवशी वाढीव रकमेवर शेतमजूर त्याच शेतकऱ्याकडे किंवा दुसऱ्या श्ेातकऱ्याकडे सालदार म्हणून करारबद्ध होत असतो. शेतकरी व शेतमजूर प्रेमळ, विश्वासू अशा व्यक्तीची निवड करून प्रसंगी जास्तीची रक्कम देऊन करारबद्ध होतात. याच काळात मुलामुलीच्या लग्नासाठी शेतमजूर शेतकऱ्यांकडून आपल्या मजुरीची आगाऊ रक्कमही घेत असतो. या सालदाराची एका वर्षांची मजुरी गावागावांनुसार व शेतकऱ्याच्या कामाच्या व्यापानुसार भिन्न असून साधारणत: आठ ते पंधरा हजार रुपये आणि काही पोते धान्य अशी आढळते. या दिवशी जुन्या सालदाराला मालकातर्फे जेवण दिले जाते. त्यास नवे जोडे कपडे शिवून दिले जातात. जुगार खेळायला व दारू प्यायला अतिरिक्त पैसेही दिले जातात. जुना सालदार आपल्या ताब्यातील कृषी अवजारे मालकातर्फे नव्या सालदाराकडे सुपूर्द करतो. अशा प्रकारे शेतमजुरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आखाजी हा सण. त्याच दिवशी हवा तो मालक निवडण्याचे आणि जुन्या मालकापासून रजा घेण्याचे स्वातंत्र्य या शेतमजुरास लाभते.

जुगार खेळण्याचा दिवस
आखाजी हा सण जुगार खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे. या दिवशी सर्व मुले, माणसे पत्ते खेळतात. वर्षभर पत्त्यांना स्पर्श न करणारी मंडळी या दिवशी हमखास पत्ते खेळतात. त्या खेळात पैसे हरणे किंवा जिंकणे हे आलेच. जुगाराला बंदी असली तरी आखाजीच्या या काळात सर्वाना मुक्तपणे जुगार खेळता येतो. गल्लीत, आेसरीवर, गोठय़ात, झाडांखाली, देवळांच्या आेटय़ावर, पारावर अशा सर्वच ठिकाणी पुरुष मंडळी गटागटांनी पत्ते खेळताना आढळतात. कमी पैशांचे, जास्त पैशाचे असे ‘डाव असतात. जो तो आपल्या ऐपतीनुसार हव्या त्या डावात बसतो. आईवडील आपल्या मुलांना पत्ते खेळण्यासाठी पत्ते आणून देतात. खेळायला पैसेही देतात. असे पत्त्यांचे डाव आठ दिवस आधीच दिसायला लागतात. मात्र कायदे व पोलीस यांचा जबर धाक यामुळे हे प्रमाण शहरी भागात कमी होत चालले आहे. मात्र अक्षयतृतीयेला पोलीस खात्यालासुद्धा अशा जुगाराकडे कानाडोळा करावा लागतो. पूर्वी मुले या जुगारात कवडय़ाच खेळत असत. या दिवशी शेतमजुरांनासुद्धा जुगार खेळण्यासाठी मालकाकडून खुशाली म्हणून पैसे दिले जातात. जुगार खेळण्याच्या अतृप्त इच्छेला आखाजी या सणामुळे वाट करून दिली जाते. विशेष बाब ही की, मुलांना पैसे व पत्ते देणारे पालक अक्षयतृतीयेच्या दिवसाव्यतिरिक्त वर्षभर पत्ते, पैसे न खेळण्याचे आणि खेळू न देण्याचे नैतिक बंधन पाळतात.
आखाजी स्त्रीमुक्तीची :
जसजसे उन्हाळ्याचे तापमान तापू लागते तसतशी नवविवाहितेची हुरहुर वाढू लागते. अक्षयतृतीयेसाठी माहेराहून मूळ येण्याची ती वाट पाहते. आखाजीला माहेरी जाऊन झोक्यावर बसून सासरची सुखदु:खे गीतातून गायला ती आतुर झालेली असते. प्रत्येक विवाहित स्त्री आखाजी या सणासाठी माहेरी जाते. आखाजी हा स्त्रियांसाठी पूर्ण स्वातंत्र्याचा दिवस. हसणे, खिदळणे, झोके घेणे, गाणी गाणे, मारामारी करणे या सर्व अतृप्त इच्छांच्या पूर्तीचा हा दिवस. त्यासाठी सासरी राहून कसे चालेल? सासरी सासू-सासरे, दीर, नणंदा यांच्यासमोर स्वातंत्र्य मिळणे शक्यही नसते. आखाजीचे तीन दिवस स्त्री आपल्या माहेरी जाणं या स्वातंत्र्याचा मनसोक्त आनंद लुटत असते. द्वितीयेला गावभरच्या बायका, मुली एकत्र येतात. डफ वाजवीत बायकांची मिरवणूक शिवमूर्ती आणायला कुंभाराच्या घरी जाते. आधीच घराघरांत स्थापन केलेल्या गवराई ऊर्फ गौरीच्या प्रतिमेजवळ ती प्रतिमा ठेवतात. महाराष्ट्रभर साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवासारखे स्वरूप या ‘गौराई उत्सवाचे खान्देशात आढळते. सर्व मुली, स्त्रिया एकत्रित येतात. गौराईच्या पाणी आणण्याच्या निमित्ताने त्या गावाशेजारच्या आमराईत जमा होऊन झिम्मा, फुगडी, नृत्य करतात, गाणी गातात. गावातून जाताना त्या पुरुष वेशात सजविलेल्या मुलीला वाजतगाजत नेतात. त्यास मोगल असे म्हणतात. मोगल ही मुलगी पॅन्ट, शर्ट, हॅट, डोळ्यांवर गॉगल, हातात उघडे पुस्तक अशा पोशाखात जमावातून वाजतगाजत चालत राहते. तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असते. गावातून जात असताना बायका, मुली गाणी म्हणतात. गावाबाहेर आमराईत नाच, गाणे, झिम्मा-फुगडी झाल्यावर घराकडे परतात. या काळात पुरुष मंडळी जुगार खेळण्यात गर्क झालेली असतात. अक्षयतृतीयेला खान्देशभर प्रत्येक आेसरीवर किंवा झाडांवर झोका बांधलेला आढळतो. मुली-बायका रात्री बराच वेळपर्यंत झोका खेळतात, त्या वेळी गाणी, कथागीते गायिली जातात. या कथागीतांतून सासरचे सुखदु:ख, व्यवहारांतील अनुभव, उपदेश, चित्तथरारक कथा इ. विषय हाताळलेले असतात. झोक्यावर बसलेल्या मुलीच्या गाण्यांना झोक्यामुळे विशिष्ट सुरावट येते. तिच्यापाठोपाठ इतर मैत्रिणी त्या गाण्याला साथ देतात. या गाण्यांना आखाजीची गाणी म्हणून आेळखतात. गौराई आखाजीचा दुसरा दिवस हा स्त्रियांसाठी गौरी विसर्जनाचा असतो. घराघरांतील मुली, बायका पाटावर गौराईची प्रतिमा घेऊन बाहेर पडतात. ही मिरवणूक वाजतगाजत गावाबाहेर जाते. गावाबाहेर जात असताना सतत सामुदायिकरीत्या गौराईची गाणी गायली जातात. गावाच्या नदीकाठी मुली जमतात. तेथे झिम्मा, फुगडी खेळतात, नाचतात, गाणी म्हणतात.
नदीच्या दुसऱ्या काठावर पलीकडच्या गावच्या मुली हाच कार्यक्रम पार पाडीत असतात. गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडतो. त्यानंतर दोन काठांवरील, दोन गावांच्या स्त्रिया परस्परांना शिव्या देतात, परस्परांवर दगडफेक करतात, गोटे मारतात. स्त्रियांच्या दोन गटांतील हे युद्ध बराच काळ चालते. अंधार पडण्यापूर्वी त्या आपापल्या घराकडे परततात. अलीकडे दगडांनी परस्परांना मारणे ही प्रथा बऱ्याच गावांतून कमी झाली आहे. थोडक्यात आखाजी हा सण स्त्रियांच्या गाणी गाणे, नृत्य करणे, पुरुषी पोशाख घालणे, शिव्या देणे, मारामारी करणे, झोके घेणे इ. अतृप्त इच्छांना वाट मोकळी करून देणारा असून एक बंधनमुक्त जीवन जगण्याचा दिवस आहे.
आखाजी पितरांची
आखाजी स्त्री-पुरुष, आबालवृद्धांचा जसा मौजमजा करण्याचा दिवस आहे तसाच तो आपल्या पूर्वजांना, पितरांना श्राद्धविधी करून स्मरण्याचा दिवस आहे. श्राद्ध पूजन हे खान्देशात दोन प्रकारचे आढळते, ज्यांचे आई किंवा वडील वारले ते पहिल्या वर्षी जे श्राद्ध घालतात त्यास ‘डेरगं पूजन’ असे म्हणतात, तर ज्याच्या आप्ताच्या मृत्यूला एक वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे ते ‘घागर पूजन’ या नावाचे श्राद्धविधी पार पाडतात. डेरगं आणि घागर ही दोनही सारख्याच आकाराची भाजलेली मातीची भांडी. डेरगं या मडक्याला तेलरंग दिलेला असतो. अशी डेरगी, लोणचे घालण्यासाठी खान्देशात सर्रास वापरली जातात. या श्राद्ध पूजनात त्या मातीच्या मडक्यात पाणी भरू न त्यावर पाण्याने भरलेला मातीचा लोटा ठेवतात. या नव्या मडक्याच्या कडांवर सुताचे पाच पाच वेढे गुंडाळतात, त्यात पूर्वीच उगवून ठेवलेल्या गव्हाच्या हिरव्या-पिवळ्या रोपांचे पाच पाच जुडगे उभे ठेवतात व वरून दोरा गुंडाळतात. हे मडके मातीच्या चार ढेकळांवर ठेवतात. त्या मडक्यांवर सांजोरी व नैवेद्य ठेवून पूजा करतात. अग्नीत नैवेद्याचे हवन करतात. त्यास आगारी टाकणं असे म्हणतात. त्यानंतर पंगतीत जेवायला बसलेल्या मुद्दाम निमंत्रित केलेल्या जातीतल्या, पण दुसऱ्या कुळातल्या विवाहित असलेल्या पुरुषाची पूजा करतात. त्यास ‘पितर’ म्हणून संबोधतात. लहान मुले, वृद्ध यांनादेखील अशा पूजेपूर्वी अन्न उष्टे करू दिले जात नाही. अशा प्रकारे या सणानिमित्ताने प्रत्येकाच्या मनात पितरांची स्मृती जागृत होते.
आखाजी बलुतेदारांची
खान्देशातील आखाजी हा सण शेतकरी, शेतमजूर,पुरुष आणि स्त्रिया यांचा जसा आहे तसा तो शेतकऱ्यांसाठी राबणाऱ्या बलुतेदारांचाही आहे. या सर्व बलुतेदारांना ‘सांजऱ्या’, ‘घुण्या’ हे पदार्थ दिले जातात. वर्षभराच्या कामाची जी ठरलेली रक्कम किंवा धान्याचा हिस्सा असेल तो त्या बलुतेदाराला आखाजी या दिवशीच मिळत असते. बलुतेदाराच्या या हिश्शाला किंवा रकमेला ‘गव्हाई’ असे म्हणतात. बलुतं या शब्दाला खान्देशात पर्यायी शब्द गव्हाई असा रूढ आहे. बलुतेदार हे आपल्या सेवा श्ेातकऱ्याला वर्षभर प्रदान करतात. त्या मोबदल्यात त्याच्याकडून रोख रक्कम आणि धान्य अक्षयतृतीयेला घेतात. अशा प्रकारे आखाजी हा शेतमजुरांचा आणि बलुतेदारांचा नव्या वर्षांच्या आरंभीचा दिवस आहे.
तयारी आखाजीची
उन्हाळ्याच्या सुरुवातीला खान्देशात घरोघरच्या स्त्रिया वडे, पापड, कुरडय़ा, शेवया करतात. त्यानंतर त्यांना अक्षयतृतीयेचे वेध लागतात. अक्षयतृतीयेसाठी घर सारवून, झाडून स्वच्छ करतात. घरातील प्रत्येक चीजवस्तू साफ केली जाते. पत्र्याचे डबे, भांडी नदीवर नेऊन घासून आणतात. घरातील चादरी, गोधडय़ा, वाकळी स्वच्छ धुऊन काढतात. दीपावलीप्रमाणेच आखाजीसाठी घराची साफसफाई केली जाते. ही तयारी आखाजीपूर्वी पंधरा-वीस दिवस आधीच सुरू होते. घराघरांत ‘सांजोऱ्या’ आणि ‘घुण्या’ हे पदार्थ बनविले जातात. सांजोऱ्या या साखर किंवा गूळ घालून बनवितात. उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी अगर उन्हातून प्रवास करून आल्यावर शर्करायुक्त सांजोरी शरीराला ‘साखर’ देते. उन्हाची बाधा त्यामुळे टळते. आखाजीला आप्तेष्टांना, मित्रांना फराळाला बोलावतात. फराळ म्हणून सांजोऱ्या व घुण्याच असतात. खानदेशात दीपावलीला फराळाला बोलविण्याची पद्धती नाही, पण अक्षयतृतीयेला फराळाला बोलाविण्याची पद्धती आजही सुरू आहे.
जसजशी आखाजी जवळ येते, तसतसे शेतकरी योग्य असा सालदार हेरण्याचा प्रयत्न करतो. योग्य व्यक्तींना आमिष देतो. सालदारसुद्धा कंटाळलेल्या मालकाला सोडण्यासाठी इतर शेतमजूर मित्रांसह नवा मालक हेरण्याच्या प्रयत्नात असतो. मुलांची लग्ने जुळवून पैसे देणाऱ्या मालकाकडे सालदारकी पत्करतो, बलुतेदारसुद्धा महागाईनुसार त्या त्या घरातील कामाच्या व्यापानुसार आपल्या बलुतेदारीचे नवे दर जाहीर करतो. अशा प्रकारे प्रत्येक जण आखाजी या सणाची मोठय़ा आतुरतेने वाट पाहत असतो. खान्देशातील आखाजी हा सण आपली परंपरा आजही कायम टिकवून आहे. हा सण कामानिमित्ताने दूर दूर गेलेल्या खान्देशवासीयांना एकत्र आणणारा, स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करणारा, श्ेातकरी शेतमजूर आणि बलुतेदार यांचे ऋ ण फेडणारा, अनेक अतृप्त इच्छांना वाट करू न देणारा आहे. या सणातील बारीकसारीक विधींचा, गाण्यांचा, कथागीतांचा, नृत्य-परंपरा आदींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी, लोकसाहित्याच्या अभ्यासकांसाठी ही पर्वणीच असते.
आखाजीचे आजचे बदललेले स्वरूप:- आखाजी आमच्या पिढीत जशी होती तशी आज राहिलेली नाही. तिचे स्वरूप पार बदलून गेले आहे. यांत्रिक जीवन, नोकरीधंद्यामुळे गाव सोडावा लागणे, कुटुंबांचे विभाजन, बदललेले कायदे, बदललेली गावांची रचना, पर्यावरणाचा ऱ्हास इत्यादी कारणांमुळे आखाजीचे स्वरूप बदलून गेलेले दिसते.
आखाजी पूर्वीप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्याचा दिवस राहिलेली नाही. आखाजीच्या दिवशीही शेतीची कामे आज होऊ लागली आहेत. हल्ली सालदार पद्धतीत मजूर अडकून राहायला तयार नाहीत. पूर्वी वर्षभराचे काही पोते धान्य व पाच ते सात हजार रुपये द्यावे लागायचे. हल्ली मजूर शासकीय दराने रोजचा हिशेब करून तीनशे पासष्ट दिवसांच्या मजुरीचा विचार करू लागला आहे. अन्नधान्याची पोती तो आता नाकारतो. शेतकऱ्याकडून धान्य घेण्यापेक्षा त्याला स्वस्त धान्य दुकानावर, धान्य सुरक्षाअंतर्गत २ ते ४ रुपये किलो या दराने मिळत असल्याने तो आता धान्यासाठी काम करीतच नाही. त्यामुळे सालदारकी ही पद्धती बाद होत चालली आहे. जे सालदार असतील त्यांच्या सालदारकीच्या कामाचे स्वरूपही आता पार बदलून गेले आहे. पूर्वी तो रात्रंदिवस मालकाकडेच सतत कामासाठी हजर राहात असे. आता तो केवळ दिवसांचे काही तासच बांधीलकी बाळगतो. पूर्वी मुलामुलीच्या लग्नानिमित्ताने वा अडचणीच्या वेळी शेतकरी आगाऊ रक्कम उचल म्हणून देत असे, त्यामुळे सालदार हा बांधला जात होता. आता तो बचत गटांकडून किंवा बँकेकडून उचल घेऊ लागला आहे. शासनाच्या नवनव्या योजनाही त्याला आíथक मदतीचा हात देतात. त्यामुळे कृषिजीवनाशी बांधीलकी असणारे या शेतमजुराचे संबंध बदलून गेले आहेत. बलुतेदारांची बलुतेदारीही आता संपुष्टात आली. तेही आता कामाचे रोख पसे घेऊन मोकळे होतात. शिवाय बलुतेदारांची कामेही आता बदलली आहेत, त्यांच्या सेवेचे प्रकारही बदललेले आहेत. सुतार आता अवजारे यंत्राने दुरुस्त करतो, तर केशकर्तनकार दर्जेदार सलून चालवितो, तो कुणाच्याही दाराशी जाऊन कटिंग करीत नाही. हे सगळं चित्र पालटल्याने आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे.
तीच बाब आखाजीच्या झोक्यांची. गावाचे स्वरूप पार बदलून गेले आहे. गावात गटारी, रस्ते व नवनवे घरांचे बांधकाम यातून दारासमोर असलेली मोठमोठी निंबाची झाडे कापली, तोडली गेलीत. गावालगतीची आमराई ही आता अदृश्य झाली आहे. कुठे तरी चौकात एखादे झाड आढळते. त्याला सामुदायिक एखादा झोका बांधण्याशिवाय पर्याय नाही. दुसऱ्याच्या दाराशी मुली, बायका अल्लडपणे हसतखिदळत झोका खेळतीलही, मात्र हल्ली मोबाइलवर शूटिंग करणाऱ्या मुलांचेही वर्चस्व वाढत चालल्याने तेही स्वातंत्र्य बाद झालेले दिसते.
जुगार, पत्ते खेळणे हे कायद्याने जबर गुन्हा ठरत आहे. शिवाय दक्ष पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी जागृत राहून धाडीही घालताना आढळतात. त्यामुळे खुलेआम, झाडाखाली, ओटय़ावर पत्ते खेळणाऱ्यांची संख्या नाममात्र उरली आहे. मुले, मुली इतरत्र शहरांत शिक्षणानिमित्ताने दूर गेल्याने त्यांना आपल्या खेडय़ात येता येत नाही. खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रात कुठेही अक्षयतृतीयेला सुटी नाही, उलट त्या काळात मुलांच्या परीक्षाही असतात. त्यामुळे घराघरांतून मुलांची संख्याही रोडावत चालली आहे. घरात मुलंच नाहीत, कुटुंबात सदस्य संख्याच कमी झाली, सगळे विभक्त झालेत. शिवाय नव्या गृहिणींना पुरणाचे मांडे खापरावर भाजता येतीलच असे नाही. त्यामुळे मांडय़ांची जागा आता तव्यावरच्या लहान पुरणपोळ्य़ांनी घेतलेली आढळते. स्वयंपाकातील पदार्थाची संख्याही कमीकमी होत गेली. हल्ली तर आखाजीच्या निमित्ताने बनविल्या जाणाऱ्या घुण्या आणि सांजोऱ्या हा खाद्यपदार्थाचा प्रकार काही घरांतूनच पाहायला मिळतो. श्राद्धाच्या मडक्यावर ठेवण्यासाठी सांजोरी तरी बनविली जाते, मात्र घुण्या आता पाहायलाच मिळत नाहीत. त्यामुळे आखाजीची खाद्यसंस्कृतीही लोप पावत चालली आहे.
खेडय़ांतील नोकरीनिमित्ताने इतरत्र पांगलेले आता घराकडे येऊ शकत नाहीत. आहेत तेथेच डेरगं, मडकं घागर पुजतात. हल्ली मातीचे माठही महाग झाल्याने काही गृहिणी घरातील तांब्याच्या कळशीत पाणी भरून पुजताना दिसतात. शिवाय आगारी टाकायला शेणाच्या गोवऱ्याही दुर्मीळ झाल्याने गॅसवर तवा तापवून त्यावरच अन्न जळेपर्यंत तापवितानाही दिसतात.
आखाजीच्या तयारीची काळजी आता काहीशी कमीच झालेली दिसते. उन्हाळ्य़ात कराव्या लागणाऱ्या पापड, कुरडया, सांजोऱ्या आता बाजारातून रेडीमेड आणण्याकडे कल वाढत चालला आहे. घराघरांतून पत्र्यांचे डबे गायब झाल्याने त्यांची जागा स्टीलच्या, प्लॅस्टिकच्या डब्यांनी घेतल्याने आता आखाजीनिमित्ताने डबे घासण्याचा कार्यक्रमच बाद झालेला दिसता. गावागावांतून नद्याही गायब झाल्यात. नद्यांना पाणीच नाही. त्यामुळे सामुदायिकरीत्या नदीवर जाऊन भांडी घासणे, अंथरूण-पांघरूण स्वच्छ धुणे हेही बंद झाले. घराघरांत वॉिशग मशिनमुळे हा धुण्याचा कार्यक्रम रोजचाच बनला आहे. त्यासाठी आखाजीच्या मुहूर्ताची वाट कुणीही पाहात नाही. नदीवर गौराईचे विसर्जन, त्यातून गोटे मारणे, हेही बंद झालेले दिसते. शिक्षणामुळे आणि कायद्यांच्या बंधनामुळे मारामारी, शिव्या देणे हे तर मर्यादित झालेच, शिवाय गौराईऐवजी आता गणपती उत्सव, त्यातील विविध करमणूकप्रधान कार्यक्रम, शारदा उत्सव, टिपऱ्यांचा खेळ, गरबा नृत्य या बाबांचे प्रस्थ गावागावांतून वाढत चाललेले दिसते. झोके गेले, झोक्यावरची गाणी गेली, जाते गेले अन् जात्यावरची गाणी गेली. गौराई चालली, तिची गाणीही चालली. मोबाइल, टीव्ही हीच आता करमणुकीची साधने बनलीत. हल्ली गौराईची गाणी काहींनाच येतात.
शिक्षण, यांत्रिकीकरण, आधुनिकीकरण, संगणक, दूरदर्शन, मोबाइल यांनी जीवन पार बदलून टाकले आहे. काळाच्या ओघात या आखाजीचे स्वरूपही बदलून गेले आहे.

First Published on May 9, 2014 1:27 am

Web Title: akshaya tritiya celebration in khandesh
टॅग Khandesh,Parampara