lp63चारही दिशांनी पहाडांनी वेढलेल्या, बशीसारख्या खोलगट भागात असलेल्या नितांतसुंदर अलास्काची सफर-

त्याने मला विचारले ‘आलीस का? तुझे स्वागत असो’ मी आनंदाने त्याला म्हणाले, ‘अरे, किती वर्षे मी तुला पाहण्याचे स्वप्न रंगवीत होते. तुझ्यासंबंधी खूप काही वाचले होते. पण मला वाटलं नव्हतं की मी तुला पाहू शकेन. परमेश्वराने माझ्या मुलाच्या रूपाने तुझी भेट घडवून आणली.’ माझे आलीस का म्हणून स्वागत करून विचारणारा तोच तो अतीव सुंदर, अतुलनीय निसर्ग सौंदर्याने नटलेला ‘अलास्का टुंड्रा प्रदेश!’ माझा मुलगा कॅलिफोर्नियात राहतो. अतिशय खर्चीक असूनसुद्धा हा प्रवास त्याने माझ्याकरिता घडविला. तो स्वत:ही आम्हा उभयतांबरोबर आल्याने प्रवास सोपा झाला. मुलाचा सहवासही आठवडाभर सतत मिळाल्याने आनंद द्विगुणित झाला.
सॅनफ्रान्सिस्को-सिअ‍ॅटल-अँकरेज (अलास्कामधील शहर) असा विमान प्रवास करीत या अनोख्या प्रदेशात अलास्कात प्रवेश केला आणि दिवसरात्रीचे गणितच बदलले. समर सीझन असल्याने व आर्टिक्ट सर्कलवर (उत्तर ध्रुवावर सर्वात वरच्या भागात) हा प्रदेश असल्याने २४ तास दिवस-रात्र सूर्यप्रकाश. मुलगा म्हणाला, आई-बाबा तुम्हाला अजून एक सरप्राइज आहे. आता काय बरं! असा विचार करीत असतानाच कार एका सुंदर फुलांचा परिसर असणाऱ्या देखण्या घरापाशी थांबली. घडय़ाळ जरी रात्रीचे दहा दाखवीत असले तरी लख्ख उजेडात मालकीणबाई म्हणजे एक ताई अगोदरच फोन केला असल्याने स्वागताला आली आणि तिच्या घराच्या शेजारी उभ्या असलेल्या एका पांढऱ्या बसचे- जिला इकडे आरव्ही असे म्हणतात. त्याचे लॅच उघडून आम्हाला बॅगांसकट आत घेऊन गेली. वा! आतमध्ये किचन त्यात इकडे सगळीकडे असणारी इलेक्ट्रिक हॉट प्लेट नसून चक्क गॅसची शेगडी होती. शेजारी फ्रिज, मोठा पलंग असलेली पलीकडे बेडरूममध्ये टॉयलेटकम बाथरूम-किचन म्हणजे मोठा हॉलच ज्यात डायनिंग टेबल, बेड, महाराजा स्टाइलच्या खुच्र्या व सर्वात पुढे ड्रायव्हिंग आरामशीर सीट वगैरे. म्हणजे कुठे ट्रिपला किंवा जंगलात कँपिंगला जायचे असेल तर बरोबर खाण्यापिण्याचे साहित्य घेऊन बिनधास्त निघा. कंटाळा आला की एखाद्या पार्कमध्ये किंवा हॉटेलजवळ सोयीच्या ठिकाणी गाडी उभी करावी मग आत खाऊनपिऊन झोप घ्यावी. जॉगिंग करावं, पायी फिरून यावं, रात्री आतून गाडी लॉक करून गाढ झोपी जावं. तर अशाच आरव्हीमध्ये आम्हाला राहायचा योग आला. या ताईला ट्रिपला जायचे नसेल तेव्हा ती ही गाडी लॉजिंग म्हणून राहायला देते.

Death of mother and son due to contact with electric wire installed in the field in Boisar
बोईसर: शेतामध्ये लावलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन आई- मुलाचा मृत्यू
kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
police arrest suspected killer in double murder case
चिखलात लपून बसलेल्या संशयित खुनीला पकडले
pimpri, hookah parlours, Hinjawadi police, take action, wakad, crime news,
पिंपरी : वाकडमध्ये दोन हुक्का पार्लरवर कारवाई

व्हीटीयर क्रुझ व समुद्रातील आश्चर्य
अलास्का हा चारी दिशांनी पहाडांनी वेढलेला व बशीसारखा खोलगट भागात भूप्रदेश असलेला प्रदेश आहे. अँकरेजपासून जवळ असलेल्या समुद्रकिनारी नसलेल्या व्हीटीयर या गावी आम्ही समुद्रात क्रुझमधून फेरी घेतली. अर्थात यासाठी पहाड अक्षरश: कोरून पलीकडे नेणाऱ्या बोगद्यातून आम्ही या गावी गेलो. मार्गात सुंदर सुंदर वळणदार नागमोडी रस्ते. भारताच्या ६० टक्के क्षेत्रफळ असलेले हे अलास्का म्हणजे उत्तर अमेरिकेचे एक राज्य. इथे सर्व ठिकाणी दोनच ऋतू- एक म्हणजे हिवाळा आणि दुसरा उन्हाळा. म्हणजेच सातत्याने नवीन रस्ते तयार करणे आणि विंटरमध्ये बर्फामुळे भेगा पडलेले रस्ते दुरुस्त करणे तर व्हीटीयरच्या या बोगद्यातून सुमारे चार कि.मी. लांबी असलेला यातून एकदा ट्रेन जाते व उरलेल्या वेळात गाडय़ा जातात. रेल्वे ट्रॅकवरून कारमधून जाताना रेल्वेत बसल्यासारखाच भास होतो. माझ्या मुलाने निखिलने अगोदरच बुकिंग केल्याने क्रुझमध्ये छान विंडोसिट्स मिळाल्या. त्याच टेबलावर समोर बसलेल्या अमेरिकन जोडप्याशी माझी छान मैत्री झाली. ते वृद्ध जोडपं शेकडो कि.मी. गाडी चालवत व विविध ठिकाणे पाहात शिकागोपासून अलास्कापर्यंत आले होते. ही क्रुझ पॅसिफिक महासागरात पहाडांवरील वेगवेगळी आश्चर्ये दाखवत चार तासांची फेरी घेते. जे पहाड हिवाळय़ात गोठलेले असतात त्यांच्यावरील बर्फ म्हणजे अक्षरश: एकेक बर्फाचा डोंगरच समरमध्ये वितळू लागतात आणि अशा वेळी पहाडापासून सुटून ‘धडामधुडूम’ असा प्रचंड आवाज करीत मधूनच समुद्राच्या पाण्यात कोसळतात. या ग्लेशियरचे पाण्यात कोसळणे प्रत्यक्ष पाहायला मिळणे हे दुर्लभ दृश्य आहे. त्याच्या आवाजाने मग ‘सीगल्स’ म्हणजे समुद्रपक्षी इतस्तत: सैरावैरा झुंडीने आकाशात झेप घेतात व घिरटय़ा घालत समुद्राच्या पाण्यावर उडत राहतात. बर्फ पाण्यात कोसळल्यावर त्याचे तुकडे होऊन त्या लाटा पांढरीशुभ्र रांगोळी काढल्याप्रमाणे पाण्यावर सर्वत्र तरंगू लागतात. सुसाट थंड वारे वाहत असताना डेकवर जाऊन हे आश्चर्य पाहणे आणि ही नवलाई डोळय़ांत साठवणे एवढेच आपले काम. पहाडांवरून सर्वत्र पाण्याचे धबधबे मोत्याचे सर खाली घरंगळावेत तसे समुद्राच्या पाण्यात मिसळत असतात. फेरी बोट आपल्याला ही विविध दृश्ये कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यासाठी खास थांबत असते. एकीकडे गरम कॉफीचा मग आणि हा नजारा आपल्यासारखे भाग्यवान आपणच! एका पहाडावर एक मोठा धबधबा कोसळत होता. त्याच्या शेजारच्या उरलेल्या मोठय़ा जागेत दुरून खूप पांढरे ठिपके दिसत होते. बोट जवळ आल्यावर लक्षात आले की लाखो सीगल्स तिथे बसलेले होते. मधेच उडत होते. घिरटय़ा घालून परत तिथे येऊन बसत होते. जणू त्या पक्ष्यांचा तो एअरपोर्टच होता. हे पक्षी हिवाळय़ात दूरवर उबदार प्रदेशात निघून जातात व समरमध्ये इथे येतात. निसर्गाची अजब लीला दुसरे काय? क्रुझवर कोक, कॉफी व त्याबरोबर सीफूड खाणे म्हणजे तर आनंदाची परमावधी! गरमागरम चवदार मासे, सॅलड, सॉस व्वा! मजाच मजा. इथे समुद्राच्या पाण्यात आपले नशीब जोरावर असेल तर महाकाय ‘हम्पबॅक वेल’ नावाचे मासे मोठी उसळी घेऊन पंख दाखवीत दर्शन देतात. पाण्याखालील धूड केवढे असेल याचा अंदाज येतच नाही. आमचे नशीब जोरावर असल्याने आम्हाला त्याचे दर्शन झाले.
व्हीटीयर हे गाव म्हणजे एक छोटीशी वस्तीच. त्यातले ८०% लोक एकाच अठरा मजली बिल्डिंगमध्ये राहतात. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीविरुद्ध समुद्रमार्गे लढा देताना अमेरिकन नेव्हीने आपल्या सैनिकांना राहायला म्हणून एकच मोठी बिल्डिंग बांधली. युद्ध संपल्यावर येथील सरकारने ते फ्लॅट्स इथल्या लोकांना विकले. तिथेच खालच्या मजल्यावर ऑफिसेस, सुपरमार्केट इ. आवश्यक सोयी आहेत. त्यामुळे जवळजवळ अख्खे गाव म्हणजे ५०० ते ६०० लोक एकाच ठिकाणी. तेसुद्धा समुद्रकिनाऱ्यावर- अमेरिका, युरोपमध्ये सर्वत्र छोटय़ा गावातूनसुद्धा परिपूर्ण सोई असतात. त्यामुळे त्याला गर्दीपासून दूर राहायचे आहे त्याला निवांत राहता येते. अगदी ‘चार्ली चॅप्लिन’सारखा जगप्रसिद्ध अभिनेतासुद्धा चित्रपटसृष्टी सोडल्यावर शांतपणे, आनंदात एका निसर्गरम्य गावात युरोपमध्ये आपल्या कुटुंबासह राहिला. एक आश्चर्य म्हणजे या व्हीटीयर गावात युद्धकाळात बॉम्बवर्षांव झाल्यास संरक्षण म्हणून सैनिकांसाठी लांबलचक भुयार खोदले होते. ते आजही सुस्थितीत ठेवल्याने हिवाळय़ाच्या सहा महिन्यांच्या काळात बारा बारा फूट एखाद्या भिंतीएवढे बर्फ रस्त्यावर साठल्यावर व त्या सहा महिन्यांच्या अंधाऱ्या दिवसात मुले या बोगद्यातून शाळेत सुरक्षितपणे जातात. माझा मुलगा लहानपणीचे आपले दिवस आठवून म्हणाला, एखादा मुलगा शाळा सुटल्यावर लवकर घरी परतला नाही आणि घरातली आजी काळजी करू लागली तर बाई म्हणत असेल ‘‘अगं, तो असेल त्या बोगद्यात गोटय़ा खेळत नाही तर पकडापकडी खेळत.’’

देनाली नॅशनल पार्क
प्रसिद्ध ‘देनाली नॅशनल पार्क’ची टूर घेण्यासाठी आम्ही अलास्काच्या अधिक आतल्या भागात असलेल्या ‘हिली’ या गावात लॉज बुक केले होते. अँकरेज ते देनाली जवळ-जवळ नऊ तासांचा मोठा प्रवास रमतगमत करीत रात्री १० वा. म्हणजेच उजेडातच पोहोचलो. इकडे चांगलाच पाऊस पडत होता त्यामुळे जंगल भागात जवळ आल्याची जाणीव झाली. दुसऱ्या दिवशी ढगाळ पावसाळी हवा असल्याने जंगलातले प्राणी बाहेर येत नाहीत व पावसात बसच्या बाहेर पडणे मुश्कील म्हणून नॅशनल पार्कच्या आत १५ कि.मी.पर्यंत कारनेच फिरलो. रस्त्याच्या दुतर्फा असलेली पांढऱ्या, जांभळय़ा रंगाची तेरडय़ासारखी दिसणारी फुले मनाला प्रसन्न करीत होती. सभोवारची वृक्षराजी, बर्फाळ शिखरे दूरवरची हे सर्व म्हणजे कुठल्या तरी स्वप्ननगरीत वावरण्यासारखे होते. वास्तवाचा जणू विसरच पडला होता. हिली गावातल्या ज्या लॉजमध्ये राहिली ते एका अमेरिकन जोडप्याचे स्वत:चे खूप मोठे घर होते. तिची कहाणी मोठी विलक्षण होती. तिचे वडील पूर्वी सैन्यात होते त्यामुळे धाडस स्वभावातच असलेली ही बाई या ठिकाणी राहायला येण्यापूर्वी एका बेटावर ती, तिचा नवरा आणि दोन मुली असेच चौघेच तेथे राहात होते. बेटावर दुसरे कोणी नाही. फक्त झाडेमाडे, वन्यप्राणी यांची सोबत. तिचा नवरा सोन्याच्या खाणीशी संबंधित बिझनेस करतो. त्यांना ट्रकद्वारे काही माल पुरवतो. तो तेथे येऊन जाऊन असायचा. हिवाळय़ात प्रचंड बर्फ वर्षांवात स्वत:च शिकार (हरिणे वगैरे प्राणी) करून पोटाची व्यवस्था करायची. उन्हाळय़ात शेजारच्या शहरातून लागतील त्या वस्तूंचा साठा करून ठेवायचा. एम.एस.ची मोठी पदवी धारण केलेली ही बाई तिने स्वत:च्या मुलींना घरीच शिकविले.
ती म्हणते मला अशाच जगण्याची ओढ आहे. आता तिच्या मुली वेगवेगळ्या शहरांतून जॉब करतात. आपल्या दृष्टीने शिस्तबद्ध व शांत, सुंदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सॅन्फ्रान्सिस्को शहराला ती गर्दीचे शहर म्हणून तिथे जायला नको म्हणते. मग निरोप घेताना आमच्या इकडे ‘मुंबईला ये’ असं मी आपलं तिला उगीचच म्हटलं. कारण ती यदाकदाचित आली तर एअरपोर्टवरूनच पळून जाईल. आज ती हे घर विकून परत त्या बेटावर राहायला जाणार आहे. बाप रे, इथे रात्रीचे एक दिवस कुणी घरात नसेल तर मी घाबरते मग असली बेटावरची गोष्ट? आय कान्ट इमॅजिन.
या प्रदेशात काय जादू पाहा, काल पाऊस तर आज स्वच्छ सूर्यप्रकाश. आम्ही तिकीट घेऊन सकाळी ११ वा. बसने नॅशनल पार्क बघण्यासाठी निघालो. वेळेअगोदर आम्ही गेल्या कारणाने बसची वेळ होईपर्यंत नॅशनल पार्कसंबंधीची डॉक्युमेंटरी पाहिली. त्यावरून माहिती मिळाली की निसर्गाची जबरदस्त ओढ असलेला ‘चार्ल्स शेल्डन’ १८९५ मध्ये या प्रदेशात मोठय़ा कष्टाने पोहोचला. या निसर्गवेडय़ा माणसाला तिथल्या लहरी हवामानाशी अनेक गैरसोयींचा मुकाबला करावा लागला. आपल्याला भूगोलात परिचित असलेला हाच तो टंड्रा प्रदेश. या चार्ल्सने हळूहळू आपल्याबरोबर पर्यटक आणायला सुरुवात केली. त्याने व इतरांनी हा नॅशनल पार्क बनविण्यासाठी प्रयत्न केले, पाठपुरावा केला. यथावकाश रस्ते तयार होऊ लागले. वृक्षतोड करून प्रचंड पहाडातून हे काम करणे अत्यंत बिकट होते. कारण त्या काळात क्रेन्स, अवजड सामान वाहून नेणारी यंत्रणा अस्तित्वात नव्हती. परंतु दुर्दम्य इच्छेच्या जोरावर हे काम समरमध्ये चालू राही. आता मात्र अलास्का शासनाने सर्वदूर आधुनिक यंत्रसामग्रीच्या जोरावर दृष्ट लागण्यासारखे रेखीव, वळणदार, सुरक्षित रस्ते बांधले आहेत. दरवर्षी नवीन रस्ते आणि मागच्यांची दुरुस्ती हे सातत्याने काम चालूच असते. येणारे पर्यटक खूश असतात. राज्याला पर्यटनाचे उत्पन्न मिळते. खरे तर हा सोन्याच्या खाणींचा आणि खनिज तेल विपुल असलेला प्रदेश आहे. आपल्या दृष्टीने हे सर्वच अचाट कल्पनेपलीकडचे आहे. देव देतो त्याला इतकं प्रचंड मग आमच्या भारतासारख्या देशांवर त्याची अवकृपा का तेच समजत नाही. विचाराने मन विषण्ण होतं. आमची बस मार्गस्थ झाली आणि सर्वजण आपापल्या दुर्बिणी आणि कॅमेरे रोखून दुतर्फा पाहू लागले. बसची तरुण सुंदर ड्रायव्हर मुलगी खूप बडबडी होती. आम्हाला ती अवघड चढावर वा वळणावरसुद्धा न थांबता त्या त्या भागाची, पार्कच्या इतिहासाची माहिती देत होती. सभोवार उंचच उंच बर्फयुक्त हिमशिखरे, हिरवीगार पाइनची वृक्षराजी, सगळा भूप्रदेश डोंगर हिरवाईने नटलेला. चारी दिशांनी हिरव्या रंगाच्या विविध छटांची जादूभरी दुनिया मध्येच कुणी अस्पष्ट आवाजात ओरडून सांगे, त्या पहाडावर पहा, शीप (मेंढय़ांचे कळप). कधी तरी अस्वल त्याच्या पिल्लांसह. मग बस थांबवून फोटो क्लिक करणं. रस्त्याच्या खालच्या भागात कडेने हिरवा चारा खात फिरणारे कॅरिब्यू. यांची शिंगे अगदी झाडांच्या फांद्यांसारखी असतात, पण टोकदार व विलक्षण ताकदीची असतात. निसर्गाने त्यांना शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी दिलेले हे वरदान आहे.
सतत झाडांवरून फिरणाऱ्या खारी म्हणजे एक अजब प्रकार आहे. इथल्या या जंगली थोराड खारी पण गुबगुबीत असतात. तर या खारी सतत या झाडावरून त्या झाडावर वस्त्यांच्या या बाजूपासून दुसऱ्या बाजूला वाहने चुकवीत फिरत असतात. या खारी उन्हाळ्याच्या दिवसांत त्यांच्यायोग्य वनस्पती, किडे, अळ्या भरपूर प्रमाणात खाऊन घेतात आणि मग हिवाळ्यात सहा महिने बिळात दडून बसतात. या काळात त्या जवळजवळ अर्धमेल्या अवस्थेत असतात. उन्हाळ्यात मग त्या यथावकाश बाहेर येण्याइतपत सशक्त होतात. पण मेंदूवर परिणाम झाल्याकारणाने सुरुवातीच्या काळात सैरभैर होऊन इकडेतिकडे रस्त्यावरसुद्धा पळत सुटतात. मग कधी तरी बिचाऱ्या गाडीखाली अनवधानाने चिरडल्यासुद्धा जातात. दोन हातात खाण्याची वस्तू वा पाने घेऊन दोन पायांवर हाताने नमस्कार केल्यासारख्या उभ्या राहतात. अशी ही गोड खारूली पाहताना लहान बाळांसारखीच हातात उचलून घ्यावीशी वाटतात. आम्ही पार्कमध्ये सलग आठ तास बसमधून फिरलो. मध्ये मध्ये बसचे नदीकिनारी छोटे स्टॉप असतात. तिथे टॉयलेटची सोय असते. बाकी खाण्याच्या वस्तू आपण येतानाच बरोबर आणायच्या.

जादूभरा हेचर पास
रात्री एक वाजता परतीची फ्लाइट असल्याने आम्ही सकाळी दहा वाजता देनाही सोडले. रात्री माझ्या मुलाला त्याच्या मित्राने मेसेज पाठविला होता की, तू परतीच्या प्रवासात थोडी वाट वाकडी करून ‘हेचर पास’कडून गाडी घे. तेव्हा हिली गाव सोडताना सबवेमध्ये (खाण्या-पिण्याचे छोटे हॉटेल) भेटलेल्या माटुंग्याच्या एक डॉक्टर व त्यांच्या पत्नीशी, मुलीशी मराठीतून बोलायला मिळाल्याचा आनंद घेऊन पुढे निघालो. हे डॉक्टर फार पूर्वी पनवेलमध्ये काही महिने राहून गेलेले असल्यामुळे त्यांनी आमच्या पनवेलमधल्या अनेक जुन्या डॉक्टरांच्या आठवणी सांगितल्या. दोन मराठी कुटुंबं एकत्र भेटल्यावर गप्पांना काय तोटा. पाय निघत नव्हता पण इलाज नव्हता. कार मेनरोडला लागली व नकाशावर पाहून मित्राने सांगितलेल्या आडवाटेला आम्ही लागलो. १० ते १२ कि.मी. प्रवास केला तरी वाटेत छोटय़ा-मोठय़ा तुरळक घरांशिवाय काहीच दिसेना. तरीपण तसेच पुढे जात राहण्याचा निर्णय घेतला. क्वचित एखादी कार ये-जा करीत होती. हळूहळू वाट पुढे सरकू लागली आणि दाट वृक्षांच्या छायेतून कार जाऊ लागली. बाजूने खळाळत्या नदीचा स्वच्छ प्रवाह दिसू लागला. तेवढय़ात मागून एक कॅरोव्हॅन (आरव्ही) आली. तिच्यातल्या आजोबांना विचारल्यावर त्यांनी उत्साहाने सांगितले की, अजून २५ मैल (अमेरिकेत कि.मी. नाही मैल) आत जात राहा. पहाडातून रस्ता जातो. फार सुंदर प्रवास आहे. आणि मग यथावकाश हायवे लागला. चला, आता नि:शंकपणे पुढे निघालो आणि काय सांगावं? थोडय़ाच वेळात प्रचंड मोठी शिखरे जी आम्ही दूरवर आतापर्यंत पाहात होतो त्या बर्फाच्या शिखरातून, पहाडातून रस्ता जात होता. म्हणजे चक्क पहाडांवर कारने जायचे होते. माझा मुलगा ड्रायव्हिंगमध्ये निष्णात असल्याने काळजी नव्हती. गंमत म्हणजे आमच्याकडे असलेल्या नकाशात या हेचर पासविषयी कुठेच माहिती नव्हती. रस्ते चांगले होते परंतु टाररोड नव्हते. पुढच्या रस्त्यांविषयी, निसर्गाविषयी अधूनमधून येणाऱ्या-जाणाऱ्या कारमधील निसर्गप्रेमी एकमेकाला माहिती विचारत होते. कारण अशा मोहक परंतु भव्यदिव्य, एकाकी रस्त्याचे, निसर्गाचे ते रूप प्रत्येकालाच थोडे दडपण आणत होते. उंच पहाडांवर जशी कार चढू लागली तसे बर्फाचे जवळजवळ येणारे कडे, बर्फाचे रस्त्यालगत पडलेले तुकडे हातात घ्यावेसे वाटत होते. निसर्गाचे ते अवाढव्य, विस्तीर्ण रूप पाहता पाहता डोळे थकून जात होते. मध्येच एखादा ट्रेकर पाठीवर सॅक घेऊन एकटाच चालताना दिसे. चोवीस तासांचा दिवस तेव्हा केव्हाही कुठेही फिरावे. अंधार पडण्याचे भय नाही. एके ठिकाणी एक उंच डोंगर पार करून गाडी वर आली आणि पाहतो तर समोर खोलगट भागात मनाला भुरळ घालणारा स्वच्छ पाण्याचा तलाव. सर्वत्र हरखून जाऊन सृष्टीचे चमत्कार पाहणे एवढेच जणू आमच्या हातात होते. खरोखर अलास्काच्या अखेरच्या प्रवासात जसा आमच्या हाती जादूचा दिवाच आला होता. कल्पनातीत अशी दृश्ये पाहा, तृप्त व्हा. अगदी सगळीकडे आनंदोत्सव! तलाव पाहात असतानाच १०-१२ मैत्रिणींचा सळसळता (उत्साहाने) ग्रुप हसत-खिदळत आमच्या जवळ आला. गाडय़ा तलावापाशी पार्क करून या मैत्रिणी वेगवेगळ्या दिशांनी जॉगिंग करायला गेल्या होत्या. आम्ही एकमेकांना हाय, हॅलो करून प्रतिसाद दिला. आता मात्र रमतगमत परतीच्या प्रवासाला हायवे गाठायला निघालो. आयुष्यभर पुरेल असा निसर्गाचा निखळ ठेवा मनात रुंजी घालीत होता. अलास्कामधील अँकरेज शहरातून सुद्धा हिवाळय़ात डिसेंबरमध्ये ‘नॉर्दन लाइटस्’ म्हणजे आकाशात दिसणाऱ्या हिरव्या, जांभळ्या, निळ्या रंगांचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी नक्की येण्याचे वचन देऊन आम्ही अँकरेज एअरपोर्टवरून अलास्काला बाय म्हटले.