एखाद्या लोकप्रिय कलाकृतीचा दुसरा भाग आला, की त्याची चर्चा होतेच. ‘ऑल द बेस्ट टू’ हे नाटक मूळ संकल्पना तीच घेत नव्या विषयासह प्रेक्षकांसमोर आले आहे. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, तांत्रिक विभाग अशा सर्व बाजूंनी नाटक सरस ठरलेय.

ऑगस्ट १९९३ मध्ये आलेली देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल द बेस्ट’ ही एकांकिका जबरदस्त गाजली. विषय, सादरीकरण, कलाकार या सगळ्यामुळे पुढे त्याचे व्यावसायिक नाटक करायचे ठरले. ३१ डिसेंबर १९९३ या दिवशी ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश झाला. पहिल्या संचातील कलाकारांसाठीही हे नाटक महत्त्वाचे ठरले. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर या कलाकारांसाठीही हे नाटक टर्निग पॉइंट ठरले.
नाटकाची लोकप्रियता वाढत गेली तसे त्याच्या प्रयोगांची मागणीही वाढत होती. त्यामुळे सिनेमाचे शूट एकाच वेळी एकापेक्षा अधिक युनिटसह होत असते त्याचप्रमाणे या नाटकांच्या प्रयोगाचे होऊ लागले. एकाच वेळी वेगवेगळ्या कलाकारांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी नाटकाचे प्रयोग करू लागली. हे मराठीसह सिंधी, हिंदी, गुजराती अशा अन्य काही भाषांमध्येही होऊ लागले. सगळ्याच भाषांमध्ये ते लोकप्रिय असल्यामुळे कालांतराने तीनपेक्षा अधिक टीम प्रयोगासाठी तयार झाल्या. या नाटकाने महिन्याभरात अंदाजे १०८ प्रयोग केल्याची नोंद आहे. याच नाटकाच्या दुसऱ्या भागाने म्हणजे ‘ऑल द बेस्ट टू’ या नाटकाने नुकतेच २५ प्रयोग पूर्ण केले. कोणत्याही कलाकृतीचा सीक्वेल काढल्यानंतर त्याचा संदर्भ पहिल्या भागाशी लावणे स्वाभाविक आहे; पण ‘ऑल द बेस्ट टू’ हे नाटक ‘ऑल द बेस्ट’ या नाटकातल्या आंधळा, मुका, बहिरा असलेले नायक आणि नायिका या व्यक्तिरेखांचा अपवाद वगळता वेगळ्या विषयावर बेतलेले आहे.
नाटकाचा विषयच मुळात नाटक हा आहे. त्यामुळे नाटकातले नाटक ही गंमत बघायला मिळते. बहिरा दिग्दर्शक, मुका लेखक आणि आंधळा अभिनेता असे तिघे आणि अभिनय क्षेत्रात करिअर करू पाहणारी तरुणी या मुख्य व्यक्तिरेखांभोवती नाटक फिरते. एकांकिका स्पर्धेत त्यांच्या एकांकिकेचा प्रयोग असतो. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता असे तिघांचेही त्या नवोदित नायिकेवर प्रेम असते. स्पर्धेच्या बक्षीस समारंभानंतर तिघेही तिला प्रपोज करायचे ठरवतात; पण प्रयोगाआधी त्यांच्या एकांकिकेचा विषय दुसऱ्या कोणी तरी घेतल्याचे त्यांना सांगण्यात येते. आयत्या वेळी काय करायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे येतो; पण ‘शो मस्ट गो ऑन’नुसार तिथेच एकांकिकेची संपूर्ण टीम वेगळ्या विषयाची तयारी करायला लागते. स्पर्धा सुरू होण्याआधी काही मिनिटे आधी विषय बदलून प्रयोगाच्या वेळी उडालेली धमाल या नाटकात बघायला मिळते.
‘ऑल द बेस्ट टू’ करताना लेखक-दिग्दर्शकाला वेगळा विचार करावा लागणे स्वाभाविक होते; पण नाटकाचे लेखक-दिग्दर्शक देवेंद्र पेम सांगतात, ‘‘आधीच्या नाटकाचा आताच्या नाटकाशी काही अपवाद वगळता काही साधम्र्य नाही. नाटकातल्या मुका, आंधळा, बहिरा आणि एक तरुणी अशा व्यक्तिरेखांशिवाय अन्य काही साधम्र्य नाही. शिवाय त्या तिघांचे व्यवसायही या नाटकात वेगळे दाखवले आहेत. त्यामुळे मी एक नवीन नाटक लिहितोय अशाच भावनेने हे नाटक लिहायला लागलो. एखादे दुसरे नाटक लिहीत असतो तर मी आजचे संदर्भ लावले असते. तसेच हे नाटक लिहितानाही आजच्या संदर्भाचा विचार करावा लागला. पूर्वीच्या नाटकात असे केलेले, मग आता असे करू या असा विचार मला करावा लागला नाही.’’ नाटकातले नाटक असा साधा विषय घेऊन नाटकाची मांडणी उत्तम झाली आहे. मोजके नेपथ्य, वेशभूषा, संवाद, अभिनय या सगळ्यामुळे नाटक संपूर्ण वेळ प्रेक्षकाला गुंतवून ठेवते. स्पर्धेत आयत्या वेळी बदललेल्या विषयामुळे लेखक, दिग्दर्शकापासून कलाकार, बॅकस्टेजपर्यंत सगळ्यांची होणारी तारांबळ दिग्दर्शकाने अचूक टिपली आहे. विनोदी नाटकात पंचेस महत्त्वाचे असतात. त्यासह अचूक टायमिंग असणे हेही महत्त्वाचेच. लेखनामध्ये आजचे अनेक संदर्भ देत मजेशीर संवादांची फोडणी नाटकात जमून आली आहे. या खुसखुशीत संवादासोबत टायमिंगचा अचूक खेळ खेळत कलाकारांनी सगळे प्रसंग खुलवले आहेत.
विशेष उल्लेख करावा लागेल तो कलाकारांचा. त्यातही मुक्याची भूमिका केलेल्या अभिजित पवारचा. नाटक हे संवादाचे माध्यम; पण रंगभूमीवर एकही संवाद न म्हणता अभिनय करणे आव्हानात्मक. अभिजितने हे आव्हान उत्कृष्टरीत्या पेलले आहे. त्याच्या जोडीला मयूरेश पेम यानेही बाजी मारली आहे. मुका लेखक हावभावांनी सांगणारे प्रत्येक बरोबर-चुकीचे वाक्य अचूकतेने हेरत त्यातून विनोदनिर्मिती करणारा बहिरा दिग्दर्शक मयूरेशने उत्तम वठवलाय. नाटकातल्या एका गाण्यात त्याने त्याचे नृत्यकौशल्यही दाखवले आहे. आंधळा झालेला सनी मुणगेकरही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. खुशबू तावडे या नायिकेला प्रेक्षकांनी आतापर्यंत मालिकांमध्ये पाहिले. टीव्हीप्रमाणे रंगभूमीवरही ती सहजतेने वावरते. नाटकातील इतर कलाकारांचा अभिनयही चोख झाला आहे. कलाकारांची ही फळी तशी नवी आहे. लोकप्रिय चेहऱ्यांना घेऊन नाटक करायचे, जेणेकरून प्रेक्षकवर्ग नाटकाकडे खेचला जातो अशी सर्वसाधारण समजूत सध्या नाटय़वर्तुळात असल्याचे दिसते. म्हणूनच अनेक नाटकांमध्ये मालिका-सिनेमांमधले लोकप्रिय आणि ओळखीचे चेहरे वावरताना दिसताहेत. ‘ऑल द बेस्ट टू’ या नाटकाने मात्र हा समज खोटा ठरवलाय. देवेंद्र सांगतात, ‘‘ऑल द बेस्ट’मध्येही सुरुवातीला नवेच कलाकार घेतले होते; पण त्यात घेतले म्हणून यातही तसेच केले असे अजिबात नाही. नाटकात असलेल्या व्यक्तिरेखा जितक्या निरागसतेने अभिनय करतात तितके ते प्रेक्षकांना भावते असे मला वाटते. त्यासाठी मला रंगभूमीची पाश्र्वभूमी असलेल्या नवोदित कलाकारांची आवश्यकता होती. नाटकात असलेले कलाकार कोणत्या ना कोणत्या स्पर्धामधून सतत सहभागी होत असतात. त्यामुळे रंगभूमीशी त्यांचा सतत संबंध येत असतो. ही जमेची बाजू लक्षात घेत मी त्या कलाकारांची निवड केली. शिवाय नव्या कलाकारांना मी हवे तसे मोल्ड करू शकतो. दुसरे महत्त्वाचे नावाजलेल्या कलाकारांच्या तारखा आणि वेळ. पूर्वी आम्ही वरिष्ठ निर्मात्यांसोबत काम करायचो. त्या वेळी पहिल्या प्रयोगादरम्यान पुढच्या तीस-चाळीस प्रयोगांचे वेळापत्रक आमच्याकडे आलेले असायचे. त्यांच्या स्वत:च्या तारखा ठरलेल्या असायच्या; पण माझे तसे नाही. मला प्रत्येक तारीख उपलब्धतेनुसार घ्यावी लागते. मला हव्या असलेल्या तारखांना मोठे कलाकार उपलब्ध होतीलच असे नाही.’’
वेशभूषा, प्रकाशयोजना, संगीत, नेपथ्य अशा इतर विभागांमध्येही नाटक बाजी मारते. रंगमंच, विंग, मेकअप रूम असा नाटकाचा सेट लक्षात राहतो. मुक्या लेखकाचे म्हणणे फक्त बहिऱ्या दिग्दर्शकालाच कळते आणि तोच दिग्दर्शकाला उत्तमरीत्या प्रॉम्प्ट करू शकतो, हे दाखवून देणारे अनेक प्रसंग नाटकात टाळ्या घेतात. एका प्रसंगात दिग्दर्शक मदतीसाठी लेखकाला विंगेत शोधत असतो. त्या वेळी दोन्ही बाजूंच्या विंग दाखवण्यासाठी फिरवावा लागणारा सेट आणि कलाकारांचा अभिनय हा गोंधळ धमाल आणतो. पहिल्या एंट्रीपासून नाटक वेग घेते. मध्यंतरानंतर नाटकातल्या नाटकाची धमाल प्रेक्षकांना आणखी खिळवून ठेवते. संपूर्ण नाटक जलद वेगाने विशिष्ट प्रवाहात पुढे जाते. मात्र नाटकाच्या शेवटाला जितका वेळ द्यायला हवा तितका दिला गेला नसल्याचे जाणवते; पण याबाबत देवेंद्र सांगतात, ‘‘नाटकात सादर होत असलेले नाटक उत्स्फूर्तपणे सादर केले जात आहे. त्यामुळे विषय आधी ठरवूनही रंगमंचावर अचानक घडणाऱ्या गोष्टींचा तार्किक दृष्टिकोन शोधत ते पुढचे सीन्स करत जातात. नाटकातल्या नाटकाचा विषय सुरुवातीला करिअर ठरलेला असतो; पण काही गोष्टींमुळे तो बदलत जातो. त्यामुळे क्लायमॅक्सला व्हिलनसोबत एक सीन दाखवून वेगळा टच दिला तर तो शेवट होईल, असे ते ठरवतात आणि तिथे नाटकातले नाटक संपते. ते उत्स्फूर्तपणे करत असल्यामुळे त्याचा शेवट असाच पटकन होणे स्वाभाविक होते. ‘ऑल द बेस्ट टू’ या नाटकाचा शेवट मात्र व्यवस्थित वेळ घेऊन केला आहे. नाटकाच्या सुरुवातीच्या प्रत्येक गोष्टीचा संदर्भ शेवटी लागत जातो. त्यामुळे शेवटासाठी जेवढा वेळ देणे आवश्यक होते तेवढा दिला आहे.’’
‘ऑल द बेस्ट टू’ आणि ‘ऑल द बेस्ट’ या दोन्ही नाटकांची तुलना करणे कठीण आहे. पहिल्या नाटकाने वेगवेगळे विक्रम करत प्रेक्षकांच्या मनात कायमचे घर केले आहे. तसेच नव्या नाटकाने सुरुवातीच्याच काही प्रयोगांमध्ये प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. निखळ मनोरंजन करणाऱ्या ‘ऑल द बेस्ट टू’ या नाटकाची ट्रीट घ्यायला हरकत नाही.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
What is Microsoft warning to India about China regarding AI
‘एआय’च्या माध्यमातून निवडणुकांमध्ये गोंधळ उडवणे शक्य? चीनबाबत मायक्रोसॉफ्टचा भारताला कोणता इशारा?
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!
It is necessary to change the mentality with effort to make the work perfect
जिंकावे नि जगावेही : मी ‘परिपूर्ण’…?

lp49मागणी असल्यास टीम्स करेन – देवेंद्र पेम
त्या काळी चाळीस-पन्नास प्रयोगांनंतरही ‘ऑल द बेस्ट’ दोन तासांत हाऊसफुल असायचे. त्यामुळे एकाच वेळी त्याच्या वेगवेगळ्या टीम्स करून वेगवेगळ्या ठिकाणी प्रयोग व्हायला सुरुवात झाली. सगळ्या ठिकाणच्या प्रयोगांना तितकाच प्रतिसाद मिळत होता. गरज निर्माण झाली तर त्या संकल्पनेचा पुन्हा विचार करू.
दुसरी गोष्ट म्हणजे प्रेक्षकांचे केवळ मनोरंजन व्हावे म्हणून नाटकात गाणे घेतलेय असे अजिबातच नाही. नाटकातल्या नाटकामध्ये वेगवेगळे फॉम्र्स ते करत असतात. वास्तवदर्शी, देव-भुताचा प्रसंग, गाणे गाण्याचा प्रसंग, निवेदक होण्याचा प्रसंग असे विविध फॉम्र्स ते सादर करतात. त्यापैकीच एक नृत्यसादरीकरणाचा प्रसंग आहे. अर्धा तासाच्या एकांकिकेसाठी त्यांना सुचेल ते करत असतात. त्यामुळे गाणे दाखवण्यामागे नेमके कारण आहे. गाण्याच्या लांबीबाबतचा मुद्दा मी मान्य करेन. गाण्याची लांबी किती असावी हा विचार नक्कीच असावा.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com