lp70काíतकेय या देवतेबद्दल आपल्याकडे महाराष्ट्रात काहीशी नकारात्मक भावनाच दिसते. अर्थात त्याला कारणेही तशीच आहेत म्हणा. एक तर आपल्याकडे प्रचलित असलेल्या दंतकथा आणि काíतकेय या देवतेविषयी फारशी माहिती नसणे, अशी ती दोन कारणे दिसतात. स्त्रियांनी काíतकेयाचे दर्शन घेतले तर त्यांना वैधव्य येते ही भावना तर एवढी खोलवर रुजली आहे की, काíतकेय या नावाचा उच्चारसुद्धा टाळला जातो. त्याचबरोबर काíतकेयाला पार्वतीने दिलेला शाप आणि त्याबद्दलची अजून एक दंतकथासुद्धा जनमानसात रुजलेली दिसते. त्यामुळे फक्त काíतकी पौर्णिमा सोडली तर स्त्रिया काíतकेयाचे दर्शन अजिबात घेत नाहीत आणि एकूणच या देवतेविषयी उदासीनताच सर्वत्र जाणवते. 

परंतु वस्तुस्थिती तशी नाही. काíतकेयाचे महत्त्व भारतभर जोपासलं गेलं आहे. त्याबद्दल अनेक महत्त्वाच्या कथा पुराणांमध्येही सापडतात. तो देवांचा सेनापती होता, योद्धा होता त्यामुळे विविध ग्रंथांमधून त्याच्याबद्दल आदरयुक्त उल्लेखही पुष्कळ मिळतात. मूर्तीशास्त्राच्या दृष्टीनेसुद्धा काíतकेयाच्या मूर्ती खूपच प्राचीन काळापासून आढळून येतात आणि त्यात वैविध्यसुद्धा आढळते. काíतकेय या देवतेचा उल्लेख अथवा आढळ हा अगदी कुषाण काळापासून म्हणजेच इ.स.च्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून सापडतो. कुषाण राजवटीमधल्या हुविष्क राजाच्या नाण्यांवर स्कंद, कुमार, विशाख असे वेगवेगळे देव आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यानंतर येणाऱ्या यौधेयांच्या नाण्यांवरसुद्धा हातात कोंबडा घेतलेल्या ब्रह्मण्यदेवाचे अर्थात काíतकस्वामीचे दर्शन घडते. काíतकेय आणि अग्नी यांचा संबंध पाहून काहींनी थेट ऋग्वेदाशी त्याचा दुवा जोडण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. उत्तर वैदिक काळात त्याचे स्कंद हे नाव पुढे आले आणि त्यानंतर सनत, विशाख, जयंत, वैजयंत, गुह, महासेन, धूर्त, लोहितगात्र अशी एक नाम शृंखलाच पाहायला मिळते. स्कंद हा धूर्त आणि चोर लोकांचाही देव समजला जातो. त्याचा एक संदर्भ मृच्छकटिक या नाटकात सापडतो. चारुदत्ताच्या घरी चोरी करणारा शर्वलिक हा प्रत्येक वेळी काíतकेयाचे स्मरण करून कामाला सुरुवात करतो असे उल्लेख आहेत.
काíतकेयाच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच त्याच्या जन्मासंबंधीसुद्धा अनेक कथा निगडित आहेत. तो शिव आणि पार्वतीचा पुत्र आहे असे मानले असले तरी तो पार्वतीचा अंगज पुत्र नसून, विभावसू अग्नीचा पुत्र होता. काíतकेय हा उमा, गंगा व कृत्तिकेचा पुत्रदेखील मानला गेला आहे. जन्मानंतर त्याच्यावर संस्कार करण्यास कोणी येईना म्हणून विश्वामित्राने त्यावर योग्य ते संस्कार केले होते अशा असंख्य कथा आहेत. एक गोष्ट मात्र खरी की काíतकेय ही शक्तीची देवता आहे. कदाचित काही टोळ्यांचे नेतृत्व त्याकडे होते. स्थानिक लोकदेवतांमधून या देवतेचा उगम झालेला दिसतो. भारतभर सर्वत्र सेनापती म्हणूनच ही देवता लोकप्रिय आहे. विविध राजसत्तांच्या नाण्यांवर असलेले काíतकेयाचे अंकन तसेच गांधार कलेतील त्याच्या उपलब्ध असलेल्या प्रतिमा हे त्या देवतेच्या लोकप्रियतेचेच गमक होय. कोंबडा हे चिन्ह काíतकेयाच्या बरोबर कायमच दिसते.
उत्तर भारतात लोकप्रिय असलेला काíतकेय नंतर नंतर दक्षिण भारताकडे गेलेला दिसतो. आणि तिथे तो षण्मुगम, सुब्रह्मण्यम, आणि मुरुग्गन या नावांनी प्रचंड प्रसिद्ध पावला आहे. खरं तर आता उत्तरेकडे काíतकेयाची पूजा जवळपास बंद झालेली असताना दक्षिणेत मात्र त्याची लोकप्रियता अबाधित आहे. गावोगावी काíतकेयाची मंदिरे आहेत आणि उपासकही आहेत. इथले खास वैशिष्टय़ म्हणजे दक्षिणेत त्याला दोन पत्नी दिसतात. देवसेना आणि महावल्ली ही त्यांची नावे. खरं तर देवसेना ही त्याची पत्नी नसून त्याची शक्ती आहे. तारकासुर वधाच्या वेळी तो देवांच्या सेनेचा प्रमुख झाला होता, त्यामुळे देवसेना ही त्याची शक्ती होते तर महावल्ली ही त्याची पत्नी होय.
या संपूर्ण उत्तरेकडून दक्षिणेकडील काíतकेयाच्या प्रवासात महाराष्ट्रात मात्र त्याचे अस्तित्व अगदी नगण्य जाणवते. वेरुळच्या लेणींमध्ये काíतकेयाची अत्यंत सुंदर मूर्ती आहे, पण इथे तो शिवपरिवारातील देवता म्हणून दिसतो. तसेच औंढय़ा नागनाथ मंदिरावर पण सुबक अशी काíतकेयाची प्रतिमा दिसते. पण उपास्यदेवता म्हणून वेगळे मंदिर अगदी अपवादानेच आढळते. (पुण्याला पर्वतीवरील मंदिर)
कदाचित स्त्रियांना दर्शन निषिद्ध या दृढ झालेल्या कल्पनेमुळेसुद्धा असेल, पण काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात फारशी आढळत नाही.
या सर्व पाश्र्वभूमीवर सातारा जिल्ह्यतील वडुज तालुक्यातले अंभेरी गावचे काíतकेय मंदिर आणि तेथील प्रतिमा ही विशेषच म्हणायला हवी. रहिमतपूर-वडुज रस्त्यावर अंभेरी या गावी काíतकेय देवस्थान आहे. वडुजकडे जाताना एक छोटासा घाट लागतो. त्याचे नावसुद्धा काíतकेय घाट असेच आहे. घाटाखाली दरी आहे. त्या दरीत देवाचे वास्तव्य म्हणून त्या दरीला देवदरी असे सुंदर नाव आहे. वेशीतून आत गेले की अंदाजे एक कि.मी. वर रस्ता संपतो आणि समोरच जीर्णोद्धारित मंदिर दिसते. मंदिराच्या अलीकडे देवदरीवर एक लोखंडी पूल बांधला आहे. त्या पुलावरून पलीकडे वटवृक्षांच्या जवळच पाण्याचे कुंड आहे. जवळच काही समाधी दिसतात. तिथे हातपाय धुऊन मंदिराकडे जाता येते. पावसाळ्यात याच पुलावरून समोर कोसळणारा धबधबा फारच प्रेक्षणीय दिसतो. मंदिरात समोरासमोर दोन गर्भगृहे आहेत. जुन्या गर्भगृहाच्या पायऱ्या उतरून खाली गेले की आत एक शिविपडी दिसते आणि त्याच्या मागे मीटरभर उंचीची (अंदाजे चार फूट) काळ्या पाषाणातील काíतकेयाची अप्रतिम मूर्ती आहे. काíतकेयाला इथे एकच मुख असून त्रिभंग अवस्थेतील या मूर्तीला अंदाजे बारा हात आहेत. अंदाजे अशासाठी की वर्षांनुवष्रे तेल वाहिल्यामुळे त्या हातांवर एकप्रकारचे किटण तयार झालेले दिसते. आणि त्या थरात ते हात झाकून गेले आहेत. उजवा हात अभय मुद्रेत तर डावा हात कमरेवर ठेवलेला स्पष्ट दिसतो. देवाच्या उजव्या बाजूला खाली मोर असून त्याचा लांबसडक पिसारा डाव्या पायाच्याही पुढेपर्यंत आला आहे. दोन्ही हातांच्या खाली त्रिकोणी बोकडाच्या चेहेऱ्यासारखे अंकन आढळते. मूíततज्ज्ञ डॉ. देगलूरकर सरांच्या मते ते छगवक्त्र आणि नगमेष आहेत. काíतकेयाचा अग्नीशी असलेला संबंध इथे नगमेषाच्या रूपात दाखवला आहे. अग्नीनेच आपल्या मुलाला म्हणजेच काíतकेयाला खेळवण्यासाठी मेषाचे रूप घेतले होते अशी कथा पुराणात येते, त्याचाच हा पुरावा म्हणा किंवा त्यानुसार केलेले हे अंकन इथे दिसते. या सर्व बारकाव्यांवरून ही मूर्ती अंदाजे बारा-तेराव्या शतकातील असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या काíतकेय प्रतिमेच्या गळ्यात एक घट्टसर दागिना व त्याखाली त्रिकोणी असणारा ग्रैवेयक हा दागिना दिसतो. पायापासून ते त्याच्या उजव्या खांद्यापर्यंत असलेला भाला (शक्ती) इथे फारच सुबकतेने अंकित केलेला आहे. डोक्यावर जटामुकुट असलेली ही डौलदार अशी प्रतिमा आवर्जून पाहण्यासारखी आहे. इतकी सुंदर प्रतिमा इथे कशी आली याबाबत मात्र काहीच माहिती मिळत नाही. स्थानिकांच्या मते वर्षांनुर्वष ही मूर्ती इथेच असल्याचे सांगितले जाते. याच मूर्तीशेजारी एक सहा तोंडांची अंदाजे पाऊण मीटर उंचीची अजून एक काíतकेयाची छोटी मूर्ती ठेवली आहे. ती मात्र बरीच अलीकडच्या काळातली वाटते. बारा हात असलेल्या या मूर्तीच्या हातात विविध आयुधं दिसतात; पकी उजव्या खालच्या हातातली गदा आणि डाव्या हातात धरलेले धनुष्य ही आयुधं प्रकर्षांने ठसठशीत आहेत. कमरेला धोतर नेसलेली ही प्रतिमा आहे. याच देवळातील दुसऱ्या गर्भगृहात अगदी नवीन संगमरवराची एकाच तोंडाची काíतकेयाची मूर्ती आहे. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी आणि काíतकी पौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते. हा सबंध परिसर वटवृक्षांनी आणि झाडीने वेढलेला आहे. अर्थात महाराष्ट्रातील ठाम समजुतीनुसार इथे सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. जिथपर्यंत गाडी जाते तिथून पुढे हा प्रवेशबंदीचा नियम आहे. परिसरात काही वीरगळसुद्धा ठेवलेले आढळतात.
इतक्या निर्मनुष्य ठिकाणाचे हे नितांतसुंदर देवस्थान मुद्दाम जाऊन पाहिले पाहिजे. सुप्रसिद्ध औंध संस्थानापासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण आहे. काíतकेयाची उपासना महाराष्ट्रात जरी आढळत नसली तरी शक्तीचे प्रतीक असलेले हे दैवत भारतभर प्रसिद्ध होते आणि दक्षिणेकडे तर हे दैवत प्रचंड लोकप्रिय आहे. तारकासुराच्या वधासाठी देवांनी कुमार वयातच काíतकेयाला सेनापतीपद बहाल केलं आणि त्याने मग दैत्याचे निर्दालन केलं, असं सांगितलं जातं. सर्व सेनानीमध्ये तो अग्रणी आहे. गीतेमध्ये विभूती योगात भगवान म्हणतात की,
पुरोधसांच मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम
सेनानीनामहं स्कंद: सरसामस्मि सागर:
म्हणजेच पुरोहितांमध्ये मी बृहस्पती, सेनापतींमध्ये स्कंद तर जलाशयांमध्ये मी समुद्र आहे. शक्ती, सेना, सामथ्र्य या सर्वाचं प्रतीक असलेला हा स्कंद, काíतकेय महाराष्ट्रात एका अनगड जागी वसला आहे. ते ठिकाण नितांत रमणीय आहे आणि त्याहीपेक्षा त्या काíतकेयाची मूर्ती फारच देखणी आहे. या ठिकाणी मुद्दाम भेट देण्यायोग्य हे स्थान अल्पपरिचित असले तरी तिथे जाऊन त्याचा परिचय करून घेतला पाहिजे, तसेच तिथल्या शांततेचा अनुभव आवर्जून घेतला पाहिजे.
आशुतोष बापट