‘आपण लहान माणसं, आपण काय करणार?’, ‘आपले कोण ऐकणार?’ अशी चर्चा तर आपण सर्वत्र नेहमीच ऐकत असतो. पण काही जण असतात ते समर्थ रामदासस्वामींनी सांगितलेल्या ‘केल्याने होत आहे रे’ या पंथामधले आणि त्यांचा विश्वास असतो, स्वत:च्या कृतीवर आणि श्रद्धा असते ती ‘आधी केलेचि पाहिजे’ या संतवचनावर. यंदा वर्धापन दिनानिमित्त तुमच्या -आमच्यामध्येच असलेल्या सामान्यांतील असामान्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून देण्याचा निर्णय ‘लोकप्रभा’ने घेतला. ‘केल्याने होत आहे रे’ हा यंदाच्या वर्धापन दिनाचा विशेष विभाग आहे. गुढीपाडव्याला सुरू होत असलेल्या नववर्षांमध्ये आपणा सर्वाना या ‘केल्याने होत आहे रे’ पंथामध्ये सहभागी होण्याची प्रेरणा मिळावी आणि त्यातून समाजाचे भले व्हावे, हाच उद्देश यामागे आहे.
या विभागातील प्रत्येकाचे काम आपापल्या परीने मोठे आहे. कुणाचीही एकमेकांशी तुलना करणे योग्य होणार नाही. डॉ. किरीट मनकोडी यांनी भारतातील प्राचीन शिल्पकृतींची अब्जावधींची तस्करी एकहाती रोखली, तर डॉ. यशवंत ओक यांच्यामुळे आज भारतात ध्वनिप्रदूषणविरोधी कायदा झालेला दिसतो. त्यामागे गेल्या २५ वर्षांचा लढा आहे. कुणी ग्राहकांना थेट दीड कोटींचा परतावा मिळवून दिलाय तर कुणा न्यायवैद्यकाने बलात्कारित स्त्रीला न्याय मिळावा, यासाठी लढा दिला. या सर्वाच्या कामामध्ये काही साम्यस्थळे आहेत. सर्वात पहिले म्हणजे यापैकी कुणाच्याही कामामध्ये धर्म, राजकारण आड आलेले नाही. हे काम धर्मनिरपेक्ष आहे, मानवतेसाठी आहे. तुमचे-आमचे जीवन सुकर करण्यासाठी आहे. यातील अनेकांनी अवाढव्य आणि ढिम्म मानल्या गेलेल्या शासकीय यंत्रणेला खडबडून जागे करण्याचे काम केवळ एकहाती केले आहे. काहींचे काम पाहून आता समाजाचीही साथ मिळू लागली आहे. यापैकी कुणाच्याही कामात कोणताही आविर्भाव किंवा अभिनिवेशाचा लवलेशही नाही. प्रसिद्धीशिवाय मूकपणे हे काम सुरू आहे. आणि सर्वाचा विशेष म्हणजे त्यांचा विश्वास समर्थवचनावर आहे.. आधी केलेचि पाहिजे!
गेल्या वर्षी वर्धापन दिन विशेषांकामध्ये आम्ही ‘देण्यातला आनंद’हा विशेष विभाग केला. त्यानंतर अनेक वाचकांनी दूरध्वनीवरून, पत्र पाठवून अशाच प्रकारे समाजात कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या माहितीचा ओघ ‘लोकप्रभा’कडे आला. म्हणून या सकारात्मक कामांच्या प्रसारासाठी यंदाही या विभागात समाजातील आणखी काही सामान्यांतील असमान्यांचा परिचय ‘लोकप्रभा’ने करून दिला आहे. हे करत असतानाच लक्षात आले की, काही मंडळी अशी आहेत की, जी अनेक व्यक्तींना जोडून समाजासाठी दान देणाऱ्यांचे एक नेटवर्कच उभे करतात; म्हणून यंदा त्यांच्यासाठी ‘देणाऱ्यांचे नेटवर्क’ या एका वेगळ्या विभागाची योजना केली आहे.
आजूबाजूला कितीही काहीही होत असले तरीही नेहमीच सकारात्मक असते ती तरुणाई, हीच या देशाची भावी
नागरिक असणार आहेत. त्यांची सकारात्मकता, प्रयोगशीलता दिसते ती त्यांच्या अभिव्यक्तीमधून. बॅण्ड हा तरुणाईतील लोकप्रिय प्रकार. यात सध्या खूप वेगळे प्रयोग होत आहेत आणि ते सर्वच वयोगटांतील सर्वाच्या पसंतीस उतरले आहेत. प्रसंगी घरचा विरोध पत्करून त्यांनीही वेगळा मार्ग स्वीकारला आणि आपल्या कर्तृत्वाने तो सिद्ध करत, घरच्यांची मान्यताही मिळवली. यंदाच्या विशेषांकातील, सर्वच विभागांतील सर्वाचा विश्वास आहे ‘आधी केलेचि पाहिजे’ यावर. नववर्षांची सुरुवात अशी सकारात्मकतेने करण्याची ऊर्जा आपणा सर्वाना मिळो, हीच सदिच्छा!
या वर्षांचा मंत्र.. आधी केलेचि पाहिजे!
‘लोकप्रभा’चे वाचक, लेखक, हितचिंतक, जाहिरातदार सर्वाना नववर्षांच्या शुभेच्छा!
01vinayak-signature
विनायक परब