lp01‘आर यू रेडी.’ असं म्हणत डीजेचा ऱ्हिदम थिरकायला लावतो. कॉलेज फेस्टिव्हल असो किंवा पार्टी डीजेला नो ऑप्शन. पण, या डीजेला आता ऑप्शन आलाय. तो म्हणजे ‘बॅण्ड’. संगीत क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करू पाहणारा बॅण्ड. ‘बॅण्ड’ संस्कृती पाश्चात्य देशांकडची. आपल्याकडे ती आता रुजू होतेय. ही संकल्पना आपल्या देशात रुजवण्याचं काम करतेय ती आपली तरुणाई. वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या काही तरुणाईच्या बॅण्डविषयी..

बॅण्ड म्हटलं की कॉलेजचा कॅम्पस, थिरकणारी पावलं, बेफाम होऊन नाचणं हे आठवल्याशिवाय राहत नाही. पण, हे बॅण्ड मी नेहमी लांबूनच पाहिले. आपल्या थिरकायला लावणाऱ्यांबद्दल मला खूप प्रश्न पडायचे. हे फक्त इंग्रजीच गाणी गातात का? असे लांब केस वाढवण्यामागे काय कारण असावं? किंवा यांना असा बॅण्ड का करावासा वाटला असेल? वगैरे वगैरे.. पण या सगळ्या प्रश्नांचं निरसन झालं ते पहिला मराठी रॉक बॅण्ड ‘मोक्ष’च्या बॅज गिटारिस्ट सागर जोशी याला भेटल्यानंतर. गप्पांना बहर आला जेव्हा त्याने त्यांचा प्रवास सांगायला सुरुवात केली.
मोक्ष या बॅण्डमधले सगळेच सदस्य सोशल नेटवर्किंग साइटवर एकमेकांच्या संपर्कात आले. ऑनलाइन गप्पा मारत असताना त्यांना एकमेकांच्या संगीताविषयीच्या आवडीनिवडी कळल्या. त्याच आवडीतून शास्त्रीय संगीतातील बंदिशींचे रॉक म्युझिकमध्ये रूपांतर करण्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली. या संकल्पनेतूनच ते एकत्र आले. शास्त्रीय संगीतातील बंदिशीमध्ये गर्भितार्थ दडलेला असतो आणि तो लोकांपर्यंत पोहोचताना रॉक हा फॉर्म मदतच करेल हा विचार करून त्यांनी पाच जणांच्या टीमसोबत कार्यक्रम करायला सुरुवात केली. त्यांच्या संगीताच्या आवडीने, लोकांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे ‘मोक्ष’ हा एक बॅण्ड तयार झाला.
‘मोक्ष’ हे नाव का द्यावंसं वाटलं हे विचारल्यावर सागर म्हणाला, ‘‘तत्त्वज्ञानानुसार मोक्ष म्हणजे सर्वोच्च समाधान. मग हेच समाधान रसिकांना आमचा बॅण्ड ऐकताना मिळावं आणि आम्हीही कुठलंही गाणं रचनाबद्ध केल्यानंतर आम्हालाही असंच समाधान अनुभवता यावं याकरिता आम्हाला या बॅण्डला ‘मोक्ष’ हे नाव द्यावसं वाटलं.’’ १९९५ पासून त्यांना बॅण्ड म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करायची होती. म्हणून त्यांनी शास्त्रीय बंदिशींसोबत काही मराठी गाणी लिहिली आणि ती रॉक म्युझिकच्या फॉर्ममध्ये रचनाबद्धही केली. ही रचना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याची सुवर्णसंधी त्यांना २००९ मध्ये चालून आली. एक प्रसिद्ध आरजे मराठी बॅण्डच्या शोधात होता आणि १ मे २००९ रोजी त्याच्या कार्यक्रमामध्ये त्याने मोक्ष बॅण्ड हा पहिला मराठी बॅण्ड असल्याचं घोषित केलं. त्याच दिवशी बॉम्बे चेम्बर ऑफ कॉमर्सने त्यांच्यासाठी एक रंगमंच उपलब्ध करून दिला. आज सोशल नेटवर्किंग साइट्सवर ‘पहिला मराठी बॅण्ड’ अशी ‘मोक्ष’ची ओळख आहे. मोक्ष बॅण्डच्या खऱ्या प्रवासाला इथून सुरुवात झाली, असं सागर सांगतो. ‘पहिला मराठी बॅण्ड’ ही ओळख मिळाली त्या क्षणापासून रसिकांना सतत चांगलं आणि नवीन काही तरी देण्याची जबाबदारीही वाढली असं ‘मोक्ष’ंवाल्यांना वाटतं.
lp50मजल-दरमजल करत घरच्यांचा कधी पाठिंबा, कधी ओरडा खात त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांच्या गाण्यांचे विषय नेमके काय असतात किंवा गाणी सुचायला कुठला अनुभव कारणीभूत ठरतो का, यावर सागरने एक छान अनुभव सांगितला, ‘आम्ही रचनाबद्ध केलेली गाणी ही नेहमी त्या वेळी असलेल्या सामाजिक स्थितीवर अवलंबून असतात आणि ती प्रबोधनपर कशी असतील हा आमचा नेहमी प्रयत्न असतो. पण, एकदा आम्हालाच असा एक अनुभव आला ज्यातून आपणहूनच आम्हाला एक रचना सुचली. त्याचं झालं असं की, एकदा आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलनात आम्हाला सादरीकरणासाठी बोलावलं होतं. आम्ही स्टेजवर आमच्या परफॉर्मन्सची तयारी केल्यानंतर एक आंतरराष्ट्रीय कलाकार तिथे परफॉर्म करायला आला. खरं तर तो त्याच्या नियोजित वेळेच्या आधीच आला होता. तो आल्यानंतर आम्हाला स्टेजवरून सामानासकट खाली उतरवण्यात आलं. एका कलाकारानेच कलाकाराला मान दिला पाहिजे या भावनेने आम्ही खाली उतरलो आणि घरी परत आलो. पण याचा खूप राग होता, असं म्हणता येणार नाही. पण, या घटनेची सल मात्र आमच्या मनात कायम राहिली. कुठे तरी मराठी बॅण्ड म्हणून आमच्याबाबत असं काही घडलं का, हे विचार मनात चालू होते. हा मुद्दा प्रसारमाध्यमांनी उचलून धरला, त्यांचा माफी मागायला फोन आला. ते सगळे सोपस्कार झालेच. पण, यातून जी चांगली गोष्ट झाली ती म्हणजे अशी की आम्हाला ‘घे भरारी’ ही रचना सुचली आणि ती रचना आमची एक नवी ओळख निर्माण व्हायला कारणीभूत ठरली. आता तो प्रसंग आठवतो तेव्हा जे होतं त्यातून काही तरी चांगलंच घडणार असतं याची प्रचीती आली.’
या गाण्यानंतर त्यांचा संबंध थेट तरुणांशी आला. सागर सांगतो, ‘तरुणांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना ही रचना स्वत:शी पडताळून पाहता आली आणि त्यांना ती जवळची वाटली. तेव्हा कळलं की आजचा तरुण खूप त्रस्त आहे. ऑफिसमध्ये बॉस, स्पर्धा, राजकारण आणि त्यामुळे होणारा अन्याय या सगळ्याला तो कंटाळलेला आहे आणि म्हणून तो सतत काही तरी नवीन शोधतोय. त्यामुळे हे गाणं त्यांना स्फूर्ती देणारं ठरलं. मग आम्ही तरुणांना काय हवं याचा शोध घ्यायला सुरुवात केली. आम्हाला आमचा बॅण्ड हा फक्त मनोरंजनापुरता मर्यादित ठेवायचा नव्हता तर त्यातून प्रबोधनही करायचं होतं. त्यासाठी आम्ही आमच्या बॅण्डचं थोडं स्वरूपही बदललं. बॅण्डमध्ये फक्त मराठी गाणी न ठेवता हिंदी गाण्यांचाही समावेश केला. भाषेला प्राधान्य न देता आम्ही संगीताला जास्त प्राधान्य दिलं. याचा एक अनुभव सांगायचा म्हणजे, आम्ही एकदा विद्याविहारच्या सोमय्या महाविद्यालयात परफॉर्म करण्यासाठी गेलो होतो. तिथे अमराठी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. परफॉर्म करण्याआधी आम्हाला भीती वाटत होती की कसा प्रतिसाद मिळेल. पण, आश्चर्याची गोष्ट अशी, की थोडय़ाच वेळात ते आमच्यात समरस होऊन गेले. मराठी गाण्यांसाठीसुद्धा त्यांनी स्वत:हून कोरस दिला आणि बॅण्ड एन्जॉय केला. यातून आम्हाला इतकंच सांगायचंय, की आपल्याकडे असलेल्या ताकदीचा किंवा कलेचा आपल्याला योग्य तो वापर करता आला पाहिजे. नकारात्मक गोष्टी बाजूला सारून सगळ्या गोष्टींकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. हेच आम्ही आमच्या संगीतातून आजच्या तरुण पिढीला देऊ इच्छितो.’
सागरच्या या बोलण्याचा अर्थ असा की, भाषा कोणतीही असो, संगीत हे माध्यम असं आहे की जे समवयस्कांना, समविचारी लोकांना एकत्र आणतं, त्यांच्यामधला दुवा ठरतं. सागर सांगतो, ‘आमच्या बॅण्डने भाषेला कधीच प्राधान्य दिलं नाही तर संगीताला दिलं. आम्ही आमच्या मातृभाषेला काही तरी देणं लागतो या भावनेने आम्ही आमच्या प्रवासाची सुरुवात मराठी गाण्यांनी केली आणि ओळखही पहिला मराठी रॉक बॅण्ड म्हणूनच स्वीकारली; पण जसे आम्ही मराठी भाषेचं देणं लागतो तसंच आम्ही देशाचंही काही तरी देणं लागतोच. त्यामुळे आम्ही मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी गाण्यांचाही समावेश केला.’ देशातल्या बहुभाषिकतेचा आदर राखायची, सन्मान करण्याची त्यामागे भावना होती आणि आहे. सागर सांगतो, ‘आम्हाला हवा असलेला प्रेक्षक हा कुठल्या भाषेवर अवलंबून नाही आहे. आमचा प्रेक्षक हा ‘माणूस’ आहे. त्यामुळे आम्हाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचं आहे’, पण, हे स्पष्ट करतानाच ‘आम्हाला अजून हवा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. आम्हाला खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आहे’, असंही तो सांगून जातो.
मराठी बॅण्ड ही संकल्पना मराठी लोकांमध्ये म्हणावी तितकी रुजलेली नाही. त्यामुळे अशा हट के गोष्टींना सहज स्वीकारणं सुरुवातीला कठीण असतं. तसंच काहीसं सागरचं म्हणणं आहे. तो म्हणतो, ‘अजून लोकांना मराठी बॅण्ड ही संकल्पना पटत नाहीये. म्हणजे मोक्ष हा पहिला मराठी रॉक बॅण्ड आहे. पण, अजून दुसरा मराठी रॉक बॅण्ड आलेला नाही. लोकांना याचं महत्त्व पटेल तेव्हा खऱ्या अर्थाने आमच्या मेहनतीचं चीज झालं असं वाटेल. आम्हाला फक्त तरुण वर्ग आमचा प्रेक्षक नकोय. आम्हाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायचं आहे. तरुण वर्ग सोडल्यास बाकीच्यांच्या बॅण्डबद्दलच्या काही संकल्पनांमुळे गैरसमज आहेत. बॅण्ड म्हणजे नुसतं केस वाढवणं, आदळआपट कारणं, वाईट सवयी लागणं अशा काही गैरसमजांमुळेही आम्हाला हवा तितका प्रेक्षक मिळत नाहीये.’ तरुणांशिवाय इतर वर्गातल्या लोकांचाही प्रतिसाद मिळवण्यासाठी ‘मोक्ष’च्या टीमने वेगवेगळी गाणी रचली आहेत. शृंगार, शांत, स्थिर अशी गाणीही रचली. त्याला प्रतिसादही खूप छान मिळाल्याचं सागर सांगतो. ‘मला आठवतंय आम्ही दिवाळी पहाटचा एकदा डोंबिवलीमध्ये कार्यक्रम केला होता. तिथे जवळपास एक लाखापेक्षा जास्त प्रेक्षक होते. त्यात सगळ्या वयोगटांतले लोक होते. त्यात आजी-आजोबाही त्यांच्या नातवंडांसोबत होते. अशाच प्रकारे सगळ्या वयोगटातल्या रसिकांनी प्रतिसाद द्यायला हवा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत’, असं तो सांगतो.
मुंबईबाहेरही हा बॅण्ड त्यांचे शो करत असतो. इतके शो केल्यावर अनेक किस्से, वेगवेगळे अनुभव त्यांच्याकडे असणारच. सागर सांगतो, ‘आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम केले. कोल्हापूर, नाशिक, जालना, बारामती वगैरे. जेव्हा आम्ही बारामतीमध्ये बॅण्ड घेऊन गेलो तेव्हा आम्हाला तिथल्या प्रेक्षकांबद्दल काहीच अंदाज नव्हता. ते कसे वाढलेत, ते गाणी ऐकतात का, कुठल्या प्रकारची गाणी त्यांना आवडतात, गाण्याचं हे बदलेलं स्वरूप त्यांना आवडेल का वगैरे प्रश्न आम्हाला सतावत होते. पण, आम्ही ते आव्हान म्हणून स्वीकारलं आणि जेव्हा आम्ही पहिल्यांदा परफॉर्म केलं तेव्हा त्यांना खूप मजा आली आणि जेव्हा दुसऱ्यांदा गेलो तेव्हा प्रेक्षक काही हजारांत होते आणि त्यांना आमची गाणी पाठ होती आणि ते आमच्यासोबत ती गाणी म्हणत होते. ज्याची आम्हाला गंमत वाटली.’
या बॅण्डमध्ये बॅज गिटारिस्ट सागर जोशीसह वोकल्स असतो ऋग्वेद करंबेळकरचा. तर रिदम गिटार वाजवतो जिमी अलेक्झांडर, कीबोर्डवर असतो पुष्कर कुलकर्णी आणि श्रेयस जोशी ड्रम्स वाजवतो. ‘संगीत हे सगळ्यांच्याच जवळचं असतं. त्यात वेगवेगळे प्रयोग करत रसिक श्रोत्यांना आनंद देणं आणि आमच्या बॅण्डकडून अधिकाधिक चांगलं काम होणं हा आमचा प्रयत्न असतो,’ असं इतर सदस्य सांगतात.
मराठी भाषा जपत, परंपरेचं भान ठेवत ‘मोक्ष’ने विविध प्रयोग केले. त्यांपैकीच एक प्रयोग म्हणजे शास्त्रीय संगीत, अभंगांचे रॉक. अशा प्रयोगांना रसिक त्वरित प्रतिसाद देत नाही. किंबहुना त्यावर टीकाच होते. पण, या बॅण्डच्या बाबतीत काहीसं वेगळंच घडलं. सागर याबाबत सांगतो की, ‘आम्हाला काहीच वाईट प्रतिक्रिया आल्या नाहीत. कारण अभंगांचे रॉक करण्याची रिस्क आम्ही प्रेक्षकांची मन जिंकल्यानंतर बऱ्याच काळानंतर घेतली. प्रेक्षकांचाही आमच्यावर विश्वास होता की, आम्ही जे करू ते चांगलंच करू. त्यामुळे आम्हाला सगळीकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला.’
मोक्ष बॅण्डचे सदस्य या बॅण्डला एक कुटुंब मानतात. बॅण्डमधले सगळेच मध्यमवर्गीय, नोकरी करणारे आहेत. ते सगळेच एकमेकांना धरून आहेत. रोजच्या धकाधकीच्या वेळापत्रकातून सुटका होऊन वेगळी एनर्जी मिळण्यासाठी ते हे कार्यक्रम करतात आणि दुसऱ्यांनाही तीच एनर्जी देण्याच्या नेहमी प्रयत्न असतात.
शिक्षण, उच्चशिक्षण झालं की ठरावीक नोकरी आणि स्थैर्य अशी मध्यमवर्गीय कुटुंबातली मानसिकता. साहजिकच ‘मोक्ष’च्या सदस्यांनाही ती चुकलेली नाही. तेव्हा त्यांना हे क्षेत्र करिअर म्हणून किती सुरक्षित वाटतं यावर सागर सांगतो, ‘हा करिअरचा एक पर्याय नक्कीच होऊ शकतो. पण त्यासाठी मेहनत करण्याची तयारी हवी. इथे लोकप्रियता, नावलौकिक मिळायला वेळ लागतो. त्यासाठी न कंटाळता धडपड करावी लागते. आम्हीही आता आमचं करिअर म्हणून याकडे बघत आहोत. पण, त्या आधी बॅण्डने विशिष्ट उंची गाठल्यानंतर आम्हाला आमचं करिअर म्हणून त्याकडे बघता येईल. सध्या, आमच्या डोक्यात मराठी लोककलेला रॉकचं स्वरूप कसं देता येईल, याचा विचार चालू आहे. आमचे स्वराज्य आणि शैतान हे वेगळ्या धाटणीचे अल्बम्स येत्या दोन महिन्यांत प्रदर्शित होतील. मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाणी करत राज्य, देश आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं आमचं ध्येय आहे.’
‘मोक्ष’ बॅण्ड सतत नव्याच्या शोधात असतो. रसिकांना आनंद कसा देता येईल याचा सतत अभ्यास करत असतो. यातूनच त्यांनी शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचा मेळ घालत बॅण्ड या एका नव्या संस्कृतीचा पायंडा घातला आहे यात शंका नाही.

मराठी लोककलेला रॉकचं स्वरूप कसं देता येईल, असा ‘मोक्ष’ या बॅण्डचा विचार चालू आहे.
ऋतुजा फडके