lp01काहींचं प्रेम वाचनावर असतं, तर काहींना नृत्य करायला आवडतं. काहींना लेखनात रस असतो तर काहींना शिकवण्यात. काही उत्तम चित्र काढू शकतात तर काही चांगलं मूर्तिकाम करतात. पण, एक प्रेम असं आहे जे सगळ्यांच्याच मनात असतं. ते प्रेम म्हणजे संगीत. ठाण्याच्या राहुल भावसार याचंही असंच होतं. राहुल खरं तर एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरी करायचा. पण, संगीतावरचं प्रेम त्याला स्वस्थ बसू देईना. एक दिवस त्याच्या एका मित्रामुळे तो अजिंक्य जाधव याला भेटला. अजिंक्यचंही प्रेम तेच. संगीत. मग दोघांनी मिळून एक-दीड र्वष एकत्र प्रॅक्टिस केली. मग हळूहळू यांना साथ मिळाली ती निखिल पाचपांडे, सोहम पाठक, वीरेंद्र कैत या तिघांची. यातूनच श्रीगणेशा झाला ‘स्पर्श’ या बॅण्डचा. गणेशोत्सवात अनेक मंडळांमध्ये परफॉर्म करण्यापासून कॉलेज, म्युझिक फेस्टिव्हल, काळा घोडा फेस्टिव्हल, हार्ड रॉक कॅफे, आयआयटी गुवाहाटी, अहमदाबाद, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी या बॅण्डने आपली चमक दाखवली. बॅण्डचं ‘स्पर्श’ हे नाव राहुलने ठेवलंय. कोणतंही संगीत मनाला स्पर्श करून जातं, असं त्याचं म्हणणं. म्हणूनच त्यांच्या बॅण्डमधून स्पर्शून जाणारं संगीत ऐकायला मिळतं. 

या बॅण्डमधल्या काहींना घरातून सुरुवातीला फारसा पाठिंबा नव्हता. पण, त्यांनी त्यांच्या कुटुबीयांना समजवल्यानंतर या क्षेत्राविषयीचे त्यांचे गैरसमज दूर झाले. ‘सुरुवातीला आमच्यापैकी काहींना या क्षेत्राविषयी काही गैरसमज होते. पण, आम्ही जे काम करतोय त्यात आम्ही शंभर टक्के देतोय आणि ते खूप गांभीर्याने करतोय हे आमच्या घरच्यांना जाणवलं आणि म्हणूनच त्यांना आमचं म्हणणं पटलं. मन लावून काम करून आम्ही त्यांचा विश्वास जिंकला’, असं अजिंक्य सांगतो. अजिंक्यने मॅनेजमेंटमध्ये एम्.कॉम. केलं आहे. तो बेस गिटारिस्ट आहे. तर राहुल गिटारिस्ट आहे, इंजिनीअर असलेला निखिल की-बोर्ड वाजवतो. काही मराठी सिनेमांना संगीत दिलेला सोहम पाठक या बॅण्डमध्ये गातो. तर पूर्वी कन्टेन्ट रायटिंग करणारा वीरेंद्र ड्रम्स वाजवून बॅण्डमध्ये धमाल करतो. सगळेच जण पूर्वी काही ना काही नोकरी, काम करत होते पण, केवळ संगीत क्षेत्राच्या प्रेमापोटी एकत्र आले आणि बॅण्ड सुरू केला. आणि आता संगीत क्षेत्रालाच त्यांनी त्याचं करिअर बनवलं. ‘स्पर्श’ या बॅण्डने फरहान अख्तर, सूरज जगन, केके, इंडिअन ओशन, क्लिंटन सेरेजो अशांच्या शोजचं दणक्यात ओपनिंग केलं आहे. या वर्षांत या बॅण्डचा एक अल्बमही येणार आहे. तसंच त्यातली काही गाणी व्हिडीओ शूट करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे हे वर्ष त्यांच्यासाठी खास ठरणार आहे यात शंका नाही.
lp52एखाद्या कार्यक्रमाचे प्रयोग लोकप्रिय झाले की, लगेच त्याला परदेशांतूनही मागणी येते. तसंच झालं ‘स्पर्श’चं. दुबईहून त्यांना शोची मागणी आली. दुसरा एखादा बॅण्ड असता तर सहज ‘हो’ म्हणून परदेश दौरा करून आले असते. पण, या बॅण्डने तसं केलं नाही. त्यांनी तिथल्या शोला थेट नकार दिला. याचं कारण अजिंक्य सांगतो, ‘जिथे प्रयोग करू तिथे बेस्ट देण्याचा आमचा प्रयत्न असतो. तसंच प्रत्येक शोला काही तरी नवीन देण्याचाही आमचा विचार असतो. दुबईतल्या प्रयोगासाठी नकार दिला, कारण आम्हाला आणखी चांगलं काम करून आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं आहे. कारण परदेशात प्रयोग करू तेव्हा आम्ही आमच्या देशाचं प्रतिनिधित्व करू. त्यामुळे चांगलं काम करून, आणखी नाव उंचावूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ.’
या बॅण्डचं वैशिष्टय़ म्हणजे कोणतीही प्रस्थापित गाणी यांच्या कार्यक्रमात सादर केली जात नाहीत. ते स्वत: सगळे मिळून गाणी लिहितात, संगीतबद्ध करतात आणि ती सादर करतात. ही गाणी मुख्यत्वे करून आयुष्य, मानवी भावभावना, प्रेम, मानसिकता यांवर बेतलेली असतात. ‘गाणी तयार करताना आमचा कल प्रामुख्याने त्या गाण्यातल्या मेलडी, संगीत यावर असतो. भाषेपेक्षा त्यातली भावना महत्त्वाची वाटते. मेलडी आली की शब्दांना महत्त्व प्राप्त होतंच. फार वेगळं काही करण्याचा आमचा प्रयत्न नसतो. तसंच फ्युजन, शास्त्रीय संगीत अशीही टोकं आमच्या गाण्यांमध्ये नाहीत. लाइट म्युझिक असा आमच्या बॅण्डचा बाज आहे. मुळात आम्ही तयार केलेली गाणी सर्वप्रथम आम्हाला आवडली पाहिजे. कारण आम्ही ते एन्जॉय केलं तर श्रोते करतील’, असं अजिंक्य सांगतो. केवळ तरुणाईच नव्हे तर इतर वयोगटातील श्रोतेही त्यांची गाणी गुणगुणत असतात.
पाश्चिमात्य देशांमध्ये बॅण्ड या संकल्पनेला कमी वेळात चांगला प्रतिसाद मिळतो. तिथे त्यांना फॉलोही केले जाते. पण, ही संकल्पना भारतात अजून तितकीशी प्रस्थापित झाली नाही. याबाबत अजिंक्यने सगळ्यांच्या वतीने मत मांडलं, ‘पाश्चिमात्य देशांतल्या सिनेमांमध्ये गाणी नसतात. त्यामुळे तिथे मूव्ही स्टार्स आणि म्युझिशिअन स्टार्स वेगवेगळे आहेत. पण, आपल्याकडे बॉलीवूडच किंग आहे. त्यामुळे म्युझिशिअन हे दुसऱ्या स्थानावर आहेत. पण, अलीकडे त्यांनाही महत्त्व प्राप्त होऊ लागलं आहे. काही कार्यक्रमांमुळे त्यांनाही लोकप्रियता मिळू लागली आहे. बॉलीवूड किंग आहेच. तो राहणारच आहे. पण, आता त्याला पर्याय येऊ लागले आहेत. त्यामुळे बॅण्ड ही संकल्पना आपल्याकडेही आता रुजू होऊ पाहतेय.’ या बॅण्डमधल्या मंडळींना संगीताशिवाय इतर काही छंद आहेत. सोहम आणि अजिंक्यला सिनेमे बघायला खूप आवडतात. तर राहुल आर्टिस्ट असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत काही तरी कला शोधत असतो. निखिलला तांत्रिक गोष्टींमध्ये रस असल्यामुळे तो गॅजेट्सबाबत माहिती ठेवून असतो. वीरेंद्रला खेळांची आवड आहे. फुटबॉल, क्रिकेट अशा खेळांचे त्याला अपडेट्स असतात. तर या बॅण्डचा मॅनेजर शिवकुमारचं वाचन उत्तम आहे. त्याला अनेक विषयांची माहिती असते. त्याने काही गाण्यांसाठी शब्दही रचले होते. या सगळ्यांच्या आवडीनिवडीचा उपयोग त्यांना त्यांच्या कामात होतो.
उच्चशिक्षण घेऊन, चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी करत असतानाही या बॅण्डमधल्या मुलांना संगीतातल्या प्रेमाने एकत्र आणलं. या प्रेमापोटी त्यांनी त्यांचा स्वत:चा बॅण्ड सुरू केला. त्यात लोकप्रिय झालेली, प्रस्थापित गायकांची गाणी घेऊन त्याचं फ्युजन किंवा पाश्चिमात्य प्रयोग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. तर स्वत: लिहून संगीतबद्ध केलेली गाणी रसिकांसमोर सादर करण्याचा त्यांचा प्रयास असतो. त्यांना मोठं होण्याची घाई नाही. कासवाच्या गतीने जाऊ पण, स्वत:चं स्थान प्रस्थापित करू असा दृष्टिकोन मनात बाळगून ‘स्पर्श’ बॅण्ड प्रयोगशील कार्यक्रम सादर करतात. त्यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी त्यांना आनंद देऊन जातात म्हणूनच त्यांचं संगीत प्रेक्षकांसाठी हे आनंद‘स्पर्श’ ठरतं.

‘स्पर्श’ंचं आणखी चांगलं काम करून आंतरराष्ट्रीय स्तरावर जायचं ध्येय असल्याने त्यांनी दुबईतल्या शोसाठी नकार दिला.
चैताली जोशी