lp01बॅण्ड म्हटलं की डोळय़ासमोर रॉक, पॉप संगीताचे बॅण्ड येतात. पण, लोकसंगीत आणि पाश्चिमात्य वाद्यांचा संगम घडवून आणला आहे ‘इंडो जिप्सिज्’ बॅण्डने! नयन कवळे आणि दुर्गेश खोत हे एकाच इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिकत असताना कॉलेजच्या विविध कार्यक्रमात भाग घेत असत. तेव्हापासून नयनची अशी इच्छा होती की, स्वत:चा एक बॅण्ड असावा. वेगळय़ा प्रकारचं संगीत लोकांपर्यंत पोहोचावं. भारतीय संस्कृतीचा, लोकसंगीताचा पाया असलेला बॅण्ड तयार करावा आणि त्यांच्यामार्फत समाजजागृतीचे संदेश संगीताद्वारे लोकांपर्यंत पोहोचवावे, या हेतूतून ‘इंडो जिप्सिज्’चा आरंभ झाला. पहिली चार वर्षे बॅण्डसाठी चांगले कलाकार शोधण्यात गेली आणि ऑक्टोबर २०११ मध्ये ‘इंडो जिप्सीज्’ने पहिला कार्यक्रम केला. सौरभ शेटय़े आणि नयन विविध गणपतीच्या कार्यक्रमांतून भेटले आणि नयनने सौरभला बॅण्डबद्दल विचारलं. इतर सर्व बॅण्डचे कलाकारसुद्धा असे विविध लोकांच्या संपर्कातून भेटत गेले. यातील बरेच जण इंजिनीअरिंग महाविद्यालयात शिकत होते. पण सौरभच्या मते, शिक्षण आधी मग संगीत अशा घरातील वातावरणामुळे शिक्षण पूर्ण केले. पण नऊ ते पाच नोकरी करणं जमणार नाही असं ठरविल्यावर मात्र पालकांकडून दोन वर्षांचा कालावधी स्वत:च्या आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्यासाठी मागितला आणि नशिबाने आज ते त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात चांगलं काम करीत आहेत, याचा त्यांना आनंद वाटतो.

२०१३ मध्ये व्ही टीव्हीच्या स्पर्धेत ‘इंडो जिप्सिज्’ला पहिल्या क्रमांक मिळाला आणि विजेत्या संघाला ‘इंडियन ओशन’ या सुप्रसिद्ध बॅण्डच्या कार्यक्रमात सादरीकरण करण्याची संधी मिळाली आणि तेव्हा ‘इंडियन ओशन’मधल्या सुश्मित सेन यांनी ‘इंडो जिप्सिज्’चे विशेष कौतुक करून त्यांचा हुरूप आठवला आणि प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे एम टीव्हीवर त्यांनी कार्यक्रम सादर केला आहे. रोटरॅक्ट क्लब आयोजित ‘जागरूक युवा पुरस्कार’ देऊनही त्यांना सन्मानित केलं गेलं आहे. याशिवाय वसरेवामध्ये सीक्रेट गार्डन वीकेण्ड फेस्टिवल, अंधेरीमध्ये ‘वॉस्सप’ महोत्सवमध्ये इंडो जिप्सिज्’ने लोकांची मनं जिंकून घेतली. मुंबईबरोबरच कानपूर, गोवा, पुणे इ. ठिकाणी विविध महोत्सवात त्यांनी आपली कला सादर केली आहे. रॉक आणि पॉपचं फॅड चालू असताना या तरुणांनी भारतीय संस्कृती जपण्यासाठी भारतीय लोकसंगीतावर आधारित बॅण्ड बनविण्याचं ठरविलं. ‘इंडियन ओशन’, ‘शक्ती’ अशा फोक बॅण्डवरून प्रेरित होऊन स्वत:चा ‘इंडो जिप्सिज्’ तयार केला. भारतीय संस्कृतीचं प्रतीक म्हणून ‘इंडो’ आणि गावकरी, फिरत्या जमातीचं प्रतीक म्हणून ‘जिप्सिज्’ असा विचार करून हे नाव ठरवलं गेलं. या टीमला असं वाटतं की, आपल्याकडील पारंपरिक संगीतात खूप जादू आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद आपल्या सांगीतिक ठेक्यांमध्ये आहे. याच पारंपरिक संगीताला आजच्या युगातील संगीताची जोड देऊन त्याचं एक सुंदर सादरीकरण करण्यासाठी ‘इंडो जिप्सिज्’ प्रयत्नांत आहे. यांच्या बॅण्डचं वैशिष्टय़ असं की ते सामाजिक जागृतीचा संदेश त्यांच्या बॅण्डच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवतात. शेतकऱ्यांची आत्महत्या, जवानांविषयी अभिमान असे अनेक विषय त्यांनी हाताळले आहेत. त्यांच्या बॅण्डसाठी गाणीदेखील तेच लिहितात आणि कधीकधी त्यांचा मित्र कौस्तुभ भालेकर यांची मदत घेतात.
lp54‘इंडो जिप्सिज्’च्या मते त्यांच्या गाण्यांना वयोमर्यादा नाही. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना आपलीशी वाटतील अशी गाणी तयार करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या कार्यक्रमांनाही विविध वयोगटातील प्रेक्षकवर्ग हजेरी लावून त्याचा आनंद लुटतात. ‘इंडो जिप्सिज्’ची टीमसुद्धा प्रेक्षकांना त्यांच्या कार्यक्रमात सामावून घेतात. त्यांना गाण्याची ओळ म्हणायला लावून किंवा गाण्यावर ठेका धरायला सांगून प्रेक्षकांचा सहभाग वाढवतात, जेणेकरून ते गाणं प्रेक्षकांना आपलंसं वाटायला लागतं. दुर्गेश खोतच्या मते लोकसंगीत लोकांना पटकन आपलंसं वाटतं आणि कलाकार-प्रेक्षक यातील देवाण-घेवाण त्यामुळे सोपी होते व कार्यक्रमाला अजून बहार येते. सतत नवनवीन प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो. विविध भारतीय आणि परदेशी वाद्यांचा उपयोग कल्पकतेने करत असतात आणि परदेशी वाद्यांमध्येसुद्धा परदेशी पारंपरिक वाद्ये, उदा. आफ्रिकन जेम्बे इ. चा वापर प्रामुख्याने करतात.
पाश्चिमात्य बॅण्डच्या लोकप्रियतेबद्दल सौरभ म्हणाला की, ‘ही भारतीय लोकांची मानसिकता आहे, की परदेशातून मान्यता आली की, इथे ती गोष्ट चांगली म्हणून समजली जाते. रघु दीक्षितलासुद्धा लंडनमध्ये बोलावलं होतं, त्यानंतर त्याची भारतातली लोकप्रियता वाढली. पण हळूहळू परिस्थिती सुधारत्येय. भारतीय बॅण्डकडे लोकांचं लक्ष वाढायला लागलंय. रेडिओ सीटी., एम टीव्ही इंडिजसारख्या विविध रेडिओ आणि टीव्ही वाहिन्या नवनवीन स्वतंत्र बॅण्डसना प्रोत्साहन देऊ लागल्या आहेत. त्यांच्यासाठी विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे खास आयोजन करून अशा कलाकारांना लोकांपुढे आणण्यासाठी अशा वाहिन्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की पाश्चिमात्य बॅण्डस्च्या बरोबरीने लोकांनी भारतीय बॅण्ड ऐकले तर त्यांना नक्कीच ते आवडतील.’ सौरभचं असंही म्हणणं आहे, ‘भारतात याचा अधिक प्रचार होण्यासाठी विविध बॅण्डसनी एकमेकांना प्रोत्साहन देणं आणि मदत करणं गरजेचं आहे, त्यामुळे त्या संस्कृतीला भारतात मान्यता मिळायला मदत होईल.’
‘इंडो जिप्सिज्’मध्ये सौरभ शेटय़े गायक आहे तर दुर्गेश खोत कीबोर्ड वाजवतो. नयन कवळे गिटारवर आणि अमित म्हात्रे ड्रम्सवर साथ करतात; तर तबला व इतर तालवाद्यांसाठी विनायक गवस आणि बेससाठी आदित्य जयन साथ करतात. ‘इंडो जिप्सिज्’ शिवाय इतर वेळी हे सगळे कलाकार संगीत क्षेत्राशी निगडितच काम करतात. सौरभ आणि दुर्गेश संगीतनिर्मिती क्षेत्रात काम करतात, तर इतर सर्व त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात वादनाचे क्लासेस घेतात. जवळपास सगळेच मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून असल्याने घरातल्यांची या क्षेत्राला लगेच मान्यता मिळवणं कठीण होतं. पण घरातल्यांनी विश्वास ठेवून या सर्वाना वेळ दिला आणि आता त्यांची विविध कामं बघून त्यांचा पाठिंबा संपादन केला आहे. आजकालच्या काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइटसारखा दुसरा उत्तम पर्याय नाही, असा विचार करूनच ‘इंडो जिप्सिज्’ने स्वत:ची वेबसाइट चालू केली, त्याबरोबर फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, यूटय़ूबवर ते कार्यशील आहेत. फेसबुकवर त्यांचे नऊ हजार फॅन्स आहेत, तर यूटय़ूबवरसुद्धा त्यांच्या व्हिडीओला खूप लाईक्स मिळतात. या माध्यमातून नवीन प्रयोगांबद्दल कार्यक्रम, स्पर्धा, व्हिडीओ या सगळय़ांबद्दल माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं होतं आणि बॅण्डच्या प्रेक्षकवर्गात आणि लोकप्रियतेत भर पडते, असा त्यांचा अनुभव आहे. सोशल मीडियामुळे कार्यक्रम मिळण्यास मदत होते, असेही सौरभचे म्हणणे आहे. ‘इंडो जिप्सिज्’ ही संस्था नोंदवली आहे, जेणेकरून त्यांच्या कामावर त्यांचा (कॉपीराईट) मालकी हक्क मिळवण्यास मदत होते आणि कुठल्याही कार्यालयीन कामात अडथळे निर्माण होत नाहीत.
एक टीम म्हणून काम करताना सामंजस्याने काम करणं खूप महत्त्वाचं असतं. सौरभ म्हणतो, ‘आमच्यात खूप मतभेद होतात, तात्पुरती भांडणं होतात, पण ती खूप महत्त्वाची असतात. आम्ही एकमेकांच्या मागे वाईट बोलत नाही. जे मनात येतं ते तोंडावर बोलतो. सगळय़ांच्या मतांचा विचार करून एखादी रचना बनविली जाते आणि आमच्यातले मतभेद आम्ही बोलून दाखवतो, यामुळे सगळय़ात चांगले कामच आमच्याकडून घडते. कधीकधी गाणी किंवा रचना पूर्णपणे रद्द केली जाते. जोपर्यंत सर्वाच्या मनासारखं आणि चांगलं काम घडत नाही, तोपर्यंत आम्ही ते सादर करत नाही. महत्त्वाचं म्हणजे या सर्जनशील प्रक्रियेसाठी एकमेकांना नीट समजून घेणं, दररोज भेटणं महत्त्वाचं असतं. आम्ही रोज संध्याकाळी जॉगिंग करतो, ज्यामुळे आमचा सराव तर होतोच, पण त्या बरोबरीने चांगल्या संगीत रचनांसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया घडत राहते. एखादी रचना तयार करण्याच्या प्रक्रियेत बरेचदा गाण्याचे शब्द आणि धून हातात हात घालून बनतात, तर कधी शब्द आधी मग धून किंवा कधी कधी उलटय़ा क्रमात ही प्रक्रिया घडते. ‘इंडो जिप्सिज्’चं एक वैशिष्टय़ म्हणजे, ते बऱ्याच गाण्यांचं चित्रीकरणसुद्धा करतात. त्यामधून ते किती व्यावसायिक प्रमाणावर आणि चांगल्या दर्जाचं काम करत आहेत, हे दिसून येतं.
बॅण्ड म्हटलं की, अजून एक महत्त्वाचा पैलू म्हणजे परफॉर्मिग स्टाईल. शास्त्रीय मैफिलीसारखं केवळ प्रेक्षकवर्ग निष्क्रिय असून चालत नाही, तर बॅण्डच्या सादरीकरणासाठी खूप जास्त ऊर्जा, शक्ती लावावी लागते. परफॉर्मिग स्टाईल आपल्यात उतरवण्यासाठी ग्रुमिंग करावं लागतं. ‘अनुभवातून आणि वेगवेगळय़ा प्रकारच्या प्रेक्षकवर्गाला सामोरं जाण्यामधून सादरीकरणाची पद्धत आपण शिकत जातो. आम्ही आमच्या पेहरावावर पण काम केलंय. आधी फक्त कुडते घालायचो, आता प्रत्येकाच्या स्वभाववैशिष्टय़ाप्रमाणे त्यांचे त्यांचे पोशाख आहेत आणि प्रत्येकाचं एक वेगळं कॅरॅक्टर असल्याने बॅण्डमध्ये विविधता दिसून येते’, असं दुर्गेशने सांगितलं. साधारणत: एक ते दीड तासाच्या कार्यक्रमात साताठ गाणी सादर केली जातात व सर्व गाणी आणि संगीत ‘इंडो जिप्सिज्’ची असते. चित्रपटातील गाणी ते सादर करत नाहीत, हेदेखील त्यांचे वेगळेपण लोकांना भावते. त्यांची मांडणीदेखील अशी असते, ज्यात प्रत्येकाला बोलायची आणि एकल वादनाची संधी मिळते. सर्वाना समान दर्जा बॅण्डमध्ये दिला जातो. त्यामुळे हे टीमवर्क अधिक प्रभावी बनते. या क्षेत्रात अडचणीदेखील आहेतच. ‘प्रथम म्हणजे घरातल्यांना या क्षेत्राविषयी खात्री वाटणं आणि त्यांचा पाठिंबा मिळवणं हे एक आव्हान भारतातील मुलांना अनुभवायला मिळतं. त्यानंतर या क्षेत्रात आर्थिक स्थिरतेचा प्रश्न असतो. बरेचदा कमी पैशांत कार्यक्रम करावे लागतात. पण अशावेळी याच क्षेत्रात इतर कामसुद्धा जोडीने करत राहणं गरजेचं असतं. दहा वर्षांपूर्वी भारतात जी परिस्थिती होती, त्यापेक्षा नक्कीच आशावादी परिस्थिती आज आहे. हळूहळू लोकांचा बॅण्डकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्यामुळे भविष्यात बॅण्डला भारतात चांगले दिवस येतील’, असं मत सौरभने व्यक्त केलं.
विविध कॉपरेरेट कार्यक्रम, म्युझिक फेस्टिवलमध्ये कार्यक्रम करणं आणि त्यासाठी प्रयत्न करत राहणं, हा सध्या नजीकच्या भविष्यातील ‘इंडो जिप्सिज्’चा विचार आहे. असा हटके, भारतीय परंपरेचं जतन करणारा आणि सामाजिक विषयांवर संगीताद्वारे भाष्य करणारा ‘इंडो जिप्सिज्’ बॅण्ड सातासमुद्रापार आपली कला पोहोचवेल, अशी खात्री वाटते!
तेजाली कुंटे