lp01भारतीय शास्त्रीय आणि पाश्चिमात्य संगीताचा उत्तम मिलाप आणि कुशल तरुण वादकांनी त्याचे केले दमदार सादरीकरण याचा अनोखा संगम बघायला मिळतो तो ‘ऊर्जा’ बॅण्डमध्ये! युवा पिढीतील प्रसिद्ध सतारवादक चिंतन कट्टी याच्या संकल्पनेतून साकारलेला ‘ऊर्जा’ बॅण्ड म्हणजे संगीत क्षेत्रातील तरुणाईच्या सर्जनशील ऊर्जेचा आविष्कार आहे.

तीन वर्षांपूर्वी या बॅण्डची मुहूर्तमेढ रोवली गेली असली तरी हा बॅण्ड गेल्या वर्षभरात जास्त कार्यरत झाला आहे. स्वत: चिंतन कट्टी, सुप्रसिद्ध सतार वादक पं. शशांक कट्टी यांचा मुलगा असल्याने शास्त्रीय सतार वादनाचा वारसा त्याला प्राप्त झाला आहे. परंतु सध्या फास्टफूडच्या जमान्यात तरुण पिढी शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम ऐकण्यास फारशी उत्सुक दिसत नाही. शास्त्रीय संगीत ऐकण्यासाठी लागणारा संयम सध्याच्या युवा पिढीत दिसत नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीताचा जर पाश्चिमात्य संगीताबरोबर मिलाफ करून, बॅण्डच्या स्वरूपात सादरीकरण केले, तर ते तरुणाईला आकर्षित करू शकेल, या विचारातून ‘ऊर्जा’ची निर्मिती झाली. ‘ऊर्जा’मध्ये सतार वादन चिंतन कट्टी आणि तबला वादन रूपक धामणकर करतो तर कीबोर्डवर राहुल हिर्लेकर ड्रम्ससाठी ख्वाब हरिया, गिटारसाठी क्रोसबी फर्नाडिस आणि तालवाद्यांसाठी केयूर बर्वे साथ करतो. राहुल, रूपक आणि चिंतन एका इंटरनॅशनल शाळेमध्ये वाद्यशिक्षक म्हणून काम करतो. त्यामुळे त्यांची एकमेकांशी ओळख आणि मैत्री होतीच. इतर वादकसुद्धा संगीत क्षेत्रातच कार्यरत असल्याने विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी होत असत. जेव्हा चिंतनने ही कल्पना सर्वासमोर मांडली, तेव्हा सगळेच या प्रयोगात सामील व्हायला राजी झाले व ‘ऊर्जा’ला तरुणाईच्या ऊर्मीची आणि ऊर्जेची साथ मिळाली. गेल्या वर्षभरात त्यांनी गांधी जयंतीनिमित्त ‘गेट वे ऑफ इंडिया’ समोर आणि मुंबई विद्यापीठात ‘अखिल भारतीय विज्ञान संमेलनात’ प्रस्तुतीकरण केले.
lp56‘ऊर्जा’मधील सगळेच संगीत क्षेत्रात स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. चिंतन अनेक शास्त्रीय सतार वादनाचे कार्यक्रम करीत असतो. मग अशा शास्त्रीय बैठकीमध्ये आणि बॅण्डमध्ये मुख्य फरक काय जाणवतो, यावर चिंतनचे मत असे आहे की, ‘शास्त्रीय संगीताच्या मैफिलीमध्ये सादरीकरणाची पद्धत, क्रम ठरलेला असतो. साथसंगतीची वाद्येदेखील ठरावीकच वापरली जातात आणि अशी मैफील तास-दीड तास चालते; परंतु, ‘ऊर्जा’सारख्या फ्युजन बॅण्डमध्ये आम्हाला सादरीकरणात सवलत असते. ठरावीकच राग वापरून त्याचा विस्तार करणं अपेक्षित नसतं तर आम्ही विविध प्रयोग या बॅण्डद्वारे करू शकतो. आमच्या बॅण्डमध्ये पश्चिमात्य संगीतात वापरली जाणारी वाद्ये आहेत, त्यामुळे ट्रम्सच्या ठेक्याबरोबर भारतीय वाद्यांचे सादरीकरण करण्यात एक वेगळा अनुभव मिळतो. तसेच फ्युजन बॅण्डच्या सादरीकरणाचा वेळ शास्त्रीय मैफिलीपेक्षा कमी असतो. ६-७ मिनिटांचा एक संच बॅण्डमध्ये वाजवला जातो कारण त्याहून लांबवले तर ते लोकांसाठी कंटाळवाणे ठरू शकते.’ अशा कमी वेळाच्या आणि जास्त वेग असलेल्या बॅण्ड प्रस्तुतीकरणामुळे तरुणाईला यात अधिक रस वाटतो. शास्त्रीय वादनाच्या बैठकीला मुख्यत्वे जाणकार वर्ग आणि शास्त्रीय संगीत शिकत असलेले, गोडी असलेले विद्यार्थी येतात. मात्र बॅण्डचा कार्यक्रम सर्वसामान्य कुणीही प्रेक्षकवर्ग आवडीने बघायला येतात. फक्त तरुण वर्गच नाही; तर लहान मुलं, वयस्कर मंडळीही हजेरी लावतात.
आपण कुठलाही कार्यक्रम बघायला जातो, तेव्हा त्याच्या मागची मेहनत मात्र आपल्याला कळत नाही, कारण आपण फक्त त्या मेहनतीमधून बाहेर आलेला आविष्कार बघतो. पण त्या ६-७ निमिटांच्या प्रस्तुतीमागेसुद्धा किती विचार, वेळ आणि ऊर्जा खर्च करावी लागते याबद्दल सांगताना रूपक म्हणतो, ‘आमच्या बॅण्डमध्ये तबला आणि सतार हे कुठल्याही रचनेचा पाया म्हणून वापरतो. सतार आणि तबल्याच्या सहाय्याने धून बसवली की मग बाकीच्या वाद्यांच्या ठेक्याने ती खुलविण्याचा प्रयत्न करतो. भारतीय वाद्यांच्या जोडीला पश्चिमात्य वाद्यांचा ठेका वेगळय़ा प्रकारची रंगत आणतो एखादी रचना करताना प्रत्येक वादकाला समान अधिकार असतो. मग विविध गोष्टी आम्ही करून, वाजवून बघतो. अशा प्रयोगांतूनच एखाद्या चांगल्या रचनेची निर्मिती होते, सगळ्यात चांगलं काय वाटतंय आणि सर्वाना पटतंय, याचा विचार करून रचना निश्चित केली जाते. कधी कधी एखादा राग घेऊन त्यावर आधारित रचना करतो तर कधी कधी ठेक्याच्या सहाय्याने ही प्रक्रिया केली जाते. पण आम्ही नेहमी आमचा कार्यक्रम जास्त लयीत चालू करतो. कारण प्रेक्षकांना खिळवून ठेवायला त्याचा उपयोग होतो. इतक्या प्रक्रियेतून गेल्यावर आपण जी धून ऐकतो, ती बरेचदा आपल्या डोक्यात रेंगाळत राहते. कारण बॅण्डच्या सादरीकरणात ती ठरावीक धून बरेचदा वाजविली जाते आणि बाकीच्या वेळात प्रत्येक वादकाला थोडी मोकळीक देऊन रचना खुलविण्याचा प्रयत्न केला जातो.’ ‘ऊर्जा’च्या नावातच त्यांच्या बॅण्डचं व्यक्तिमत्त्व दिसून येतं. त्यांच्या बॅण्डच्या प्रस्तुतीची सुरुवातच वेगवान आणि ऊर्जापूर्ण असते. याबाबत बोलताना चिंतन म्हणाला, ‘आधी रचना बांधली आणि त्यावरून ‘ऊर्जा’ या नावाचा विचार केला.’
पाश्चिमात्य देशांमध्ये बॅण्ड संस्कृती आधीपासून प्रचलित आहे व तेथील बॅण्ड खूप लोकप्रिय आहेत. भारतात ही संस्कृती रूढ होत्येय, पण अजूनही इथली जनता पाश्चिमात्य बॅण्ड इतका प्रतिसाद भारतीय बॅण्डसना देताना दिसत नाहीत. याबाबत रूपकचं मत असं आहे की, ‘पाश्चिमात्य देशांत आधीपासून ही संस्कृती असल्याने तेथील बॅण्डची नावं प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाली आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांचा श्रोतृवर्ग अधिक आहे, पण सध्या भारतातसुद्धा भारतीय बॅण्ड्सना प्रोत्साहन मिळू लागले आहे. पूर्णपणे प्रस्थापित व्हायला वेळ लागेल, पण सुरुवात नक्कीच झाली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना नेहमीच मूळ गोष्ट बघायला आवडते जसं पश्चिमात्य देशातून बॅण्ड संस्कृती उदयाला आल्याने आपल्याकडील लोकांना पाश्चिमात्य बॅण्ड आवडतात, तसं पाश्चिमात्य देशांत भारतीय संगीतासाठी भारतीय कलाकारांनाच जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळते.’ भारतात ही संस्कृती रुजू होते आहे याचा दाखला म्हणजे अनेक प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय वादकांचेही बॅण्ड आपल्याला पाहायला मिळतात. तौफिक कुरेशी, राकेश चौरसिया इ. अनेक वादक बॅण्डसाठी पण वादन करतात. आज अनेक बॅण्ड उदयाला येत आहेत. त्यामध्ये ‘ऊर्जा’चे वेगळेपण हे आहे की त्यातील सर्वजण २३-३० वयोगटातील तरुण आहेत, आपापल्या क्षेत्रात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. इतर रॉक बॅण्डच्या तुलनेत ‘ऊर्जा’ एक फ्युजन बॅण्ड म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करत आहे. इतर बॅण्डबरोबर त्यांची स्पर्धा ते मानत नाहीत. सर्व प्रकारच्या बॅण्डचे कार्यक्रम बघायला ‘ऊर्जा’ची टीम जात असते.
बॅण्ड म्हटला म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे टीमवर्क. मतभेदांमुळे हा समूह विभागला जाऊ शकतो. पण ‘ऊर्जा’मध्ये सगळे एकमेकांचे जवळचे मित्र आहेत. त्यामुळे फक्त व्यावसायिक संबंध न ठेवता ते मित्र म्हणून एकत्र काम करतात. एकमेकांच्या मतांचा आदर करतात. त्यामुळे मतभेद होत नाहीत आणि ‘ऊर्जा’मध्येच फक्त परफॉर्म करायचं असंही बंधन त्यांच्यावर नाही, ते इतर बॅण्डबरोबर पण कार्यक्रम करू शकतात. अशा खेळीमेळीच्या वातावरणामुळे चांगल्या दर्जाचं काम ते करू शकतात यात वाद नाही. बरेचदा बॅण्डमध्ये एक गायक असतो, परंतु ‘ऊर्जा’ मात्र पूर्णपणे वाद्यवृंद आहे. वादकांचे कौशल्य लोकांपुढे आणण्यासाठी आणि सर्व कलाकारांना समान ओळख मिळण्यासाठी ‘ऊर्जा’मध्ये केवळ वाद्यांच्या समावेश केलाय. ऊर्जामध्ये रचनाच मुख्यत्वे वाजवल्या जातात. चित्रपट गीतांची धून फार क्वचित वापरली जाते.
‘ऊर्जा’मधील सर्वाना घरातून पूर्ण पाठिंबा आहे. हे सर्व कलाकार पूर्ण वेळ संगीत क्षेत्रातच कार्यरत आहेत. अशा नवोदित बॅण्डपुढे प्रश्न असतो तो भांडवल आणि आर्थिक स्थिरतेचा. ‘हळूहळू हे प्रश्न सुटतील. या घडीला अधिकाधिक लोकांसमोर कार्यक्रम करण्यावर आमचा भर आहे’, असं चिंतन सांगतो. या क्षेत्रात आव्हानंही बरीच आहेत. रूपकच्या मते, कार्यक्रम मिळवणं, नवनवीन प्रयोग करून अधिकाधिक उत्तम रचना बनवणं ही आव्हानं आहेत. सगळ्यांच्या व्यग्र दिनक्रमामध्ये ‘वेळ’ काढून भेटणं हेही एक आव्हान ठरतं. या सगळय़ा आव्हानांवर मात करत संगीत क्षेत्रात स्वत:चे योगदान देण्यासाठी ‘ऊर्जा’ सतत प्रयत्न करत आहे आणि एक दिवस ‘ऊर्जा’चे नाव सर्वत्र व्हावे अशी त्यांची मनोकामना आहे. त्यांच्या रचना ध्वनिमुद्रित करून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तसेच सोशल मीडियावर पब्लिसिटीसाठी प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आहे.
तेजाली कुंटे