lp01नितीश रणदिवे याने ‘Band means being in relationship with each other’, या एका वाक्यात बॅण्डची अतिशय साधी, सोपी आणि मनाला भावणारी व्याख्याच सांगितली. निमित्त होतं ‘ताल मॅट्रिक्स’ या बॅण्डच्या कलाकारांशी झालेल्या गप्पांचं. श्रीला तांबे, मंदार पिलवलकर, नितीश रणदिवे, मधुर पडवळ आणि आदिनाथ पाटकर हे या बॅण्डचे कलाकार. श्रीला गायिका, मंदार गायकही आहे आणि तबलाही उत्तम वाजवतो. नितीश पर्कशनिस्ट आहे. मधुर गिटारिस्ट तर बॅण्डमधील सर्वामध्ये ज्युनिअर आर्टिस्ट आदिनाथ कीबोर्ड, हार्मोनियम आणि पियानिका ही वाद्यं वाजवतो. बॅण्डच्या नावावरूनच तो फ्युजन बॅण्ड आहे, हे कळतं. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, सुगम संगीत याला पाश्चात्त्य ठेक्याची जोड देत एक फर्मास म्युझिकल डिलाइट सादर करणं हे या बॅण्डचं वैशिष्टय़. बंदिश, ठुमरी, गझल, कव्वाली, सूफी रचना आणि मराठी-हिंदी गाण्यांचं फ्युजन ही बॅण्डची खासियत. शिवाय सिंथेसायझर, हार्मोनियम, पियानिका, तबला, ढोलक, जेम्बे, कॅजो, ड्रम्स या वाद्यांच्या साथीने ताना, आलापी, तिहाई निरनिराळ्या पॅटर्न्‍समध्ये सादर करून वाद्यांचीच जुगलबंदी करणं, हा तर या बॅण्डचा हातखंडा. फ्युजनच्या बरोबरीनेच ‘ताल मॅट्रिक्स’ शंकरा, वाचस्पती, सरस्वती, हंसध्वनी या शास्त्रीय रागांवर आधारित स्वरचनादेखील सादर करतो. 

‘फ्युजन म्हणजे नेमकं काय हे कळणं फार महत्त्वाचं आहे. आपण कशाचं फ्युजन करतोय, ते दोन भिन्न वाद्यांचं आहे की दोन स्वरांचं, हे कळायला हवं. त्यानंतर त्याचं सादरीकरण कसं करावं, याचा विचार करावा लागतो. खरं तर फ्युजन म्हणजे दोन भिन्न संस्कृतींचा सांगीतिक मिलाफ’, इतक्या सोप्या शब्दांत नितीशने ‘फ्युजन’चं ‘कन्फ्युजन’ दूर केलं. ‘ताल मॅट्रिक्स’विषयी अधिक जाणून घेताना श्रीला, नितीश आणि आदिनाथ यांच्याशी झालेल्या गप्पांतून त्यांची केवळ संगीताची जाणच नव्हे तर पॅशन कळून येत होती. बॅण्डची सुरुवात कशी आणि कुठून झाली, याविषयी श्रीला सांगते, ‘आम्ही सारे रुईयाइट्स. प्रत्येक जण म्युझिकविषयी पॅशनेट. एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकाने आयोजित केलेल्या ‘युथ नेक्सस’ या स्पधेर्त या बॅण्डला इव्हेंट करायचा होता. आम्ही सगळे एकमेकांना ओळखत तर होतोच. बॅण्ड इव्हेंटच्या निमित्ताने एकत्र आलो. फ्युजनशी संबंधित काही नाव असावं, म्हणून ‘ताल मॅट्रिक्स’ हे नाव सुचलं.’ स्पर्धेत आलेले सगळे बॅण्ड्स रॉक, मेटल होते. त्यांपैकी ‘ताल मॅट्रिक्स’ हा एकच बॅण्ड शास्त्रीय, लोकसंगीत आणि वेस्टर्न ऱ्हिदमचं फ्युजन करणारा होता. नितीश सांगतो, ‘परफॉर्मन्स झाल्यावर आम्हाला जिंकण्याची खात्रीच नव्हती कारण जरी परफॉर्मन्स चांगला झालेला तरी काही चुकाही झाल्या होत्या. त्यात आम्हाला पहिला क्रमांक मिळाला त्यामुळे कॉलेजचेही गुण वाढून एक लाखांचं भरघोस बक्षीस मिळालं.’
lp58त्यानंतर एका वर्षी गणेशोत्सवात एका रेडिओ चॅनलच्या शोमध्ये परफॉर्मन्स झाला. ‘पेप्सी यंगिस्तान’साठी ‘हम जिते है वहाँ’ हे कॉम्पोझिशन त्यांनी केले. त्यावरील व्हिडीओही त्यांच्यावरच चित्रित झाला. रुईया कॉलेजचं अँथमही त्यांनी तयार केले. याशिवाय अनेक फेस्टिव्हल्स, चॅरिटी शोज, दिवाळी पहाट कार्यक्रम त्यांनी केले. कॉलेजचे दिवस बॅण्डसाठी प्रयोग करण्याचे, शिकण्याचे, चुकण्याचे, चुका सावरण्याचे होते. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, युथ फेस्टिव्हलमध्ये बक्षिसं मिळत असल्यामुळे कॉलेजमधून उत्तम पाठिंबा मिळत होता. त्याचबरोबर वेगवेगळ्या फ्युजन, गझल कॉन्सर्ट्सना एकत्र जाण्यामुळे जाणिवा विस्तारत होत्या. आदिनाथ म्हणाला, ‘आम्हाला चांगलं गाता-वाजवता येतं म्हणून आम्ही ते सादर करत नाही तर त्या सादरीकरणामागे एक स्पष्ट विचार असतो. शिवाय प्रत्येक ट्रॅकमध्ये प्रत्येकाने त्याला येत असलेलं वाद्य वाजवलंच पाहिजे, हा अट्टहास नसतो. एखादं वाद्य अमुक तऱ्हेने का वाजवायचं किंवा एखादी तान अमुक पद्धतीने का घ्यायची, याचा विचार करत म्युझिकॅलिटी जपणं फार महत्त्वाचं असतं. जुगलबंदी करताना मंदार तबला वाजवतोय म्हणून नितीशनेही हातातील ड्रम, ढोलक बडवायचे याला अर्थ नसतो तर एकमेकांच्या सादरीकरणाचा बाज सांभाळत, वरचढ न होता पूरक ठरेल हा विचार करणं आणि तसं वाजवणं महत्त्वाचं आहे. इथे इगोला थारा नाही.’
आदिनाथ या बॅण्डमध्ये तसा उशिरा आला. तो लहानपणापासूनच हार्मोनियम उत्तम वाजवतो. शास्त्रीय संगीताबरोबरच वेस्टर्न म्युझिकल टम्र्स माहीत असणंही गरजेचं आहे, असं त्याला वाटतं आणि या गोष्टी मधुरने फार शिकवल्या, हे आदिनाथ सांगतो. त्याचं कारण काय तर कधी आंतरराष्ट्रीय कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली तर त्यांच्याशी बोलताना, ‘काळी पाच’ बोलण्यापेक्षा वेस्टर्न म्युझिकल टम्र्स वापरल्याने मेळ साधणं सोपं होईल. त्याचबरोबरीने कॉर्ड प्रोग्रेशन, नोटेशनही समजण्याची आवश्यकता आहे. रिहर्सल आणि जॅम सेशन्सविषयी श्रीला सांगते की, ‘बऱ्याचदा वेळेअभावी पुरेशा रिहर्सल्स झालेल्या नसायच्या किंवा कॉलेजमध्ये आमच्यापैकी कोणी ना कोणी इतर इव्हेंट्सला साथीला जायचे, त्यामुळे कमी वेळात झालेल्या रिहर्सलच्या जोरावरच स्टेज गाजवायचो. आता जे काही होईल ते स्टेजवरच’ असं म्हणत अनेक ऑन द स्पॉट परफॉर्मन्सेस दिलेत; पण त्यातूनही अनेक गोष्टी शिकलो. चुका झाल्यावर पॅनिक न होता एकमेकांना नजरेनेच खुणावत पटकन चूक सावरायचो. त्यामुळे हजरजबाबीपणा वाढला. अर्थात त्याला एकमेकांतील अंडरस्टॅण्डिंग कारणीभूत आहे.’
श्रीलाने सुधा वाटवे, अंजली पोहनकर, पं. संजीव चिमलगी या गुरूंकडून कंठसंगीताचं शिक्षण घेतलंय. ती लहानपणापासूनच रिअ‍ॅलिटी शोज, देशविदेशांत स्टेज शो, नाटक-चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करीत आहे. तिने जैवतंत्रज्ञानात एमएससी केलं असून ती हेल्थकेअर अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करते. नितीशने उस्ताद झाकीर हुसेन यांच्या संगीतविद्यालयातून तबल्याचे शिक्षण घेतले आहे. जेम्बे, काजो, कहॉन, उदु, काँगा यांसारखी लॅटिन, आफ्रो-क्युबन वाद्यंही तो वाजवतो. मधुरला वेस्टर्न म्युझिकची आवड असली तरी तो भारतीय लोकसंगीत आणि त्यांतील विविध वाद्यांचा अभ्यास करतोय. ‘इश्कवाला लव्ह’ या मराठी चित्रपटात त्याने संगीतकार म्हणून पदार्पण केलंय. तो एक टॅटू आर्टिस्टही आहे. मंदारदेखील मराठी नाटक-चित्रपटांसाठी संगीत, पाश्र्वगायन करतोय. मधुरसारखा तोही लोकसंगीताकडे वळलाय. भारतीय लोकसंगीताचा बारकाव्यांसकट अभ्यास करता यावा यासाठी दोघांची भ्रमंतीही सुरू असते. आदिनाथ अनेक संगीतनाटकांना साथ देतोय. व्यक्तिश: हे सगळे आपापल्या व्यावसायिक जगात खूपच व्यस्त आहेत. बॅण्ड हा पूर्णवेळ आणि कायमचा करिअर ऑप्शन का नाही याविषयी नितीश सांगतो, ‘आपल्याकडे बॅण्ड कल्चर मोठय़ा प्रमाणावर रुळलं नाही. जे काही एस्टॅब्लिश्ड बॅण्ड्स आहेत तेही संख्येनं कमी. गुणवत्तेसोबत आर्थिक गणिताच्या बळावरही ते मोठे झाले. बॅण्ड कल्चर न रुळण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे बॉलीवूड. चित्रपटांची शैली जशी बदलली तशी संगीताची धाटणीही बदलली. गेल्या काही वर्षांत एकाच चित्रपटात वेगवेगळ्या फ्लेवर्सची गाणी येऊन लोकप्रिय व्हायला लागली. यामुळे चित्रपट संगीत सर्वसमावेशक होत गेलं. आपल्याकडे क्लब कल्चरही चांगल्या प्रकारे फोफावलं नाही. केवळ उच्चभ्रू परिसरात मोजकेच क्लब्ज आहेत. त्यातही बॅण्ड्स कमी आहेत. या सगळ्या कारणांमुळे आज केवळ बॅण्ड्सवर अवलंबून राहणं कठीण आहे आणि म्हणूनच आम्हीसुद्धा व्यक्तिश: वेगवेगळ्या ठिकाणी कामे करतो. इतर प्रोफेशनल असाइनमेण्ट्स स्वीकारतो. त्यातून होणारी कमाई अर्थातच विविध वाद्यं, तांत्रिक उपकरणं घेण्यासाठी कामी येते. आमची अनेक इन्स्ट्रमेण्ट्स अशीच जमवली आहेत.’
भारतात बॅण्ड्सकडे व्यावसायिक दृष्टीने पाहिले जात नाही. परफॉर्मन्स करायच्या अगोदर साउंड चेकसारख्या तांत्रिक बाबी तपासायला पुरेसा वेळ दिला जात नाही. बऱ्याचदा कुशल तंत्रज्ञांचा अभाव असतो. अशा अडचणींना तोंड देत बॅण्ड्सना परफॉर्मन्स द्यावा लागतो. सगळ्यांना संगीतविश्वातच राहायचंय, पूर्णवेळ करिअर म्हणून संगीत करण्याचा निर्णय आहे. यासाठी सगळ्यांनाच घरून पूर्ण पाठिंबा आहे. ‘शक्ती’ हा ‘ताल मॅट्रिक्स’चा आवडता बॅण्ड. त्या व्यतिरिक्त ते ‘टोटो’, ‘स्टाँप’ हे बॅण्ड्सही ते ऐकतात. प्रत्येकाच्या सांगीतिक ज्ञानाचा मेळ साधत, वेगवेगळे फ्लेवर्स आणत ‘ताल मॅट्रिक्स’चा नवीन कटेंट द्यायचा विचार आहे.
ओंकार पिंपळे