lp01‘संगीत माने ना धर्म जात संगीत से जुडी कायनात.’ संगीत हे विश्वात्मा आहे त्याला कोणत्याही लेबलाखाली अडकवून ठेवता येत नाही. एक स्वच्छंद खळाळणारा उन्मुक्त झरा म्हणजे संगीत. प्रत्येकाच्या मनात छोटीशी का होईना संगीताने जागा व्यापलेली असते. जगातल्या कोणत्याही संगीताला कसलीही ओळख लागत नाही. त्याचे आणि आपले सूर जुळले की ते आपलेच होऊन जातात. असंच जगातल्या प्रत्येक संगीत प्रकाराला कवेत घेऊन आपलंसं करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रयोगशील कलाकारांमध्ये एका बॅण्डचे नाव आवर्जून घ्यावंसं वाटतं. ते म्हणजे ‘इंडीवा’ या बॅण्डचं. 

आपल्या मातीशी नातं सांगून जागतिक संगीताला गवसणी घालणारा हा बॅण्ड चार मुलींनी मिळून सुरू केला. खरंतर यातल्या तिघींनी वयाचं तरुणपण केव्हाच पार केलं होतं, पण मन आणि त्याच्यात वसलेलं संगीत मात्र चिरतरुण होतं आणि आजही आहे. त्याला वयाचा कोणताच अडसर नव्हता.
मर्लिन डिसुझा, व्हिव्हिअन पोचा, हम्सिका अय्यर आणि श्रुती भावे अशा या चौघी. मर्लिन आणि व्हिव्हिअन यांना या बॅण्डची कल्पना सुचली. मर्लिन ही पिआनिस्ट आहे आणि एक उत्तम संगीत दिग्दर्शिकासुद्धा. तिचा स्वत:चा म्युझिक स्टुडिओ आहे. आजवर तिने अनेक गाणी रचून त्यांना संगीतसुद्धा दिले आहे. जवळपास ४०० च्यावर कॉन्सर्ट्स तिच्या नावावर जमा आहेत. इंडीवाच्या गाण्यांना चाली देण्याचे, दिशा देण्याचे काम हे मुख्यत्वेकरून मर्लिन सांभाळते. व्हिव्हिअन पोचा हेसुद्धा संगीत क्षेत्रातले एक प्रसिद्ध नाव. तिने वयाच्या बाराव्या वर्षी संगीत क्षेत्रात पाऊल टाकले आणि अजूनही ती त्याच उत्साहाने आपले पाय घट्ट रोवून या क्षेत्रात उभी आहे. जॅझर रॉक ब्लूज फ्यूजन अशा सर्वच संगीत प्रकारांशी ती जवळीक साधते. मर्लिन बॅण्डची गिटारिस्ट आणि गायिकासुद्धा आहे. मर्लिन आणि व्हिव्हिअन या दोघांनाही संगीत नाटय़क्षेत्राचा उत्तम अनुभव आहे. हम्सिका अय्यर हे नाव तर सध्या बॉलीवूडमध्ये चर्चिले जातेय. तिची ‘रा वन’ मधले ‘छम्मक छल्लो.’ आणि ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे ‘वन टू थ्री फोर.’ ही दोन्ही गाणी खूपच लोकप्रिय झाली आहेत. कर्नाटकी संगीताचा वारसा जपणारी हम्सिका हिंदुस्थानी आणि कर्नाटकी संगीताचा उत्तम मेळ साधते. या चौघींमधील शेंडेफळ म्हणता येईल अशी मेंबर म्हणजे श्रुती भावे. घरातूनच संगीताचा वारसा लाभलेली श्रुती एक उत्कृष्ट व्हायोलिन वादक तर आहेच त्याचबरोबर हिंदुस्थानी संगीताची बैठक लाभलेली एक उत्तम गायिकासुद्धा आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच शास्त्रीय नृत्यातही पारंगत असलेली श्रुती ही एक अष्टपैलू कलाकार आहे.
अशा या चार ‘इंडीवाज्’चा बॅण्ड साधारण २०१२ च्या अखेरीस तयार झाला. मर्लिन आणि व्हिव्हिअनने यासाठी हम्सिकाला विचारले. हम्सिका तेव्हा संगीतकार कौशल इनामदारांबरोबर काम करायची. श्रुतीही त्यांच्या कार्यक्रमात सहभागी व्हायची. हम्सिकाला जेव्हा श्रुतीबद्दल कळले तेव्हा तिने बॅण्डचा चौथा मेंबर होण्यासाठी तिला विचारले आणि काहीतरी वेगळं करायला मिळणार म्हणून श्रुतीही आनंदाने सहभागी झाली. यानंतर इंडिवाचा संगीतमय प्रवास सुरू झाला. संगीताच्या चार वेगवेगळ्या आयामांशी नातं सांगणाऱ्या या चार ‘दिवाज्’नी एकत्र येऊन संगीताच्या अनेक पटलांना स्पर्श करण्यास सुरुवात केली.
lp60आजवर या बॅण्ड्सनी अनेकविध भाषांमध्ये गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत, बंगाली, मल्याळम यांसारख्या भारतीय भाषाच नव्हे तर अरेबिकसारख्या भाषेलाही आपलेसे केले आहे. भारतीय मातीला जागतिक संगीताशी जोडण्याकडे यांचा कल आहे. भारतीय लोकसंगीताचा गोडवा इतर संगीतप्रकारात मिसळून त्याला स्वत:चा पर्सनल टच देणं ही इंडीवाची खासियत. आजपर्यंत केलेल्या प्रत्येक गाण्यामध्ये त्यांचं हे वैशिष्टय़ हमखास जाणवतं. २०१३ मध्ये दुबईला झालेल्या ‘बोल्ड टॉक्स’ या महिलांविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत इंडीवाने परफॉर्म केलं होतं. त्यांच्या परफॉर्मन्सने पहिल्यांदाच ही परिषद संगीतमय झाली. त्यानंतर कव्वाली हा प्रकार हाताळताना त्यांनी ‘नजरे’ हे गाणं रचले. नेहमीच मुलींच्या ‘हुस्न’ची तारीफ होणाऱ्या या प्रकारात त्यांनी प्रथमच पुरुषांचे कौतुक केले आहे. सतत काहीतरी प्रयोगशील अनोखे करण्यावर इंडीवाचा भर असतो. बॅण्ड निर्मिण्याचे हेच एक प्रमुख कारण होते असे बॅण्ड मेंबर श्रुती सांगते. आम्हाला प्रत्येक संगीत प्रकाराची गोडी चाखायची होती. आमच्या सर्जनशीलतेला मुक्त वाव द्यायचा होता आणि बॅण्डमुळे हे सारं शक्य होतं म्हणूनच इंडीवा जन्मला.
आपल्याकडच्या स्थानिक बॅण्ड्सना आंतरराष्ट्रीय बॅण्ड्स इतकी प्रसिद्धी मिळताना दिसत नाही. तरुणांमध्ये ते त्या प्रमाणात लोकप्रिय नाहीत ही गोष्ट इंडीवाला मात्र पटत नाही. त्यांच्या मते तुम्ही लोकांसमोर स्वत:ला कसे सादर करता यावर प्रसिद्धी, लोकप्रियता अवलंबून असते. आजही तरुण अनेक स्थानिक बॅण्ड्सची गाणी उचलून धरतात. आम्ही मध्यंतरी लखनौला एका साहित्य महोत्सवामध्ये परफॉर्म केलं आणि तिथे आम्हांला अनपेक्षित असा प्रतिसाद मिळाला आणि विशेष म्हणजे तिथे फक्त तरुण नाही तर प्रत्येक वयोगटातील माणसे उपस्थित होती. आणि त्या सगळयांनीच आम्हांला भरभरून प्रतिसाद दिला. आम्ही तिथे गायलेली गाणी ही सर्वस्वी आमची होती. तरीही आमच्या प्रत्येक गाण्याला तिथे वन्स मोअर मिळाला. या प्रसंगाचे आम्हाला आजही कुतूहल वाटते.
संपूर्णपणे मुलींचा बॅण्ड आहे त्यामुळे इंडीवाला कधी सापत्न वागणूक मिळाली नाही. उलट त्यांनी अनेक प्रसिद्ध बॅण्ड्सच्या खांद्याला खांदा लावून परफॉर्म केलंय. आम्ही स्त्री म्हणून कसे सादर करतो यापेक्षा एक कलाकार म्हणून काय सादर करतो याकडे प्रेक्षकांनी लक्ष द्यावं.
इंडीवा हा जागतिक संगीताचा आत्मा असलेला भारतीय मातीतला बॅण्ड आहे. त्यांनी आजपर्यंत जवळपास पूर्ण भारत पालथा घातला आहे. लोकगीतांना ग्लोबल टच देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिलाय. एका मराठी वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात त्यांनी ‘वल्हव रे नाखवा’ला दिलेला ‘जॅझी’ टच सगळ्यांनाच भावला. वेगवेगळे प्रयोग करण्यावर त्यांचा भर असतो. चार बायका एकत्र आल्या की एकमेकींच्या कागाळ्या अन् गॉसिपिंग करण्यात वेळ घालवतात हा समज इंडीवाने आपल्या संगीताद्वारे खोटा ठरवलाय. चार बायका एकत्र आल्या की श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी कलाकृती निर्माण करू शकतात.
आज अनेक मुलांना बॅण्डची ही वेगळी वाट चोखाळाविशी वाटायला लागली आहे. इंडीवाचा या सगळयांना एकच सल्ला आहे. ‘बी प्रॅक्टिकल’. प्रत्येक गोष्टीला जसे फायदे आहेत तसंच रिस्कही आहे. बॅण्डसुद्धा याला अपवाद नाही. इंडीवामधील प्रत्येकजणीचे आज बॅण्डशिवाय स्वतंत्र करिअर आहे. त्यामुळे या क्षेत्रातील धोके ओळखूनच वाटचाल करा. स्वत:चे वेगळेपण राखा. प्रयोगशील राहा. नव्या गोष्टी धुंडाळा. पण आपल्या मातीत पाय घट्ट रोवून. त्यांच्या याच खुबीमुळे ‘इंडिवा’ या खऱ्या अर्थाने ‘इंडिअन दिवाज्’ होतात.

२०१३ ला दुबई येथे ‘बोल्ड टॉक्स’ या महिलांविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘इंडीवा’ने ‘सुनो’ हे स्त्रीप्रधान गाणं सादर केलं.
प्राची साटम