13 August 2020

News Flash

किशोरांचं वास्तव: संवाद साधताना.. भाग- २

आईवडील एकीकडे मुलांना तू अजून लहान आहेस असंही म्हणत असतात आणि दुसरीकडे मोठा झालास तरी एवढंही कळत नाही असंही ऐकवत असतात. अशा दुटप्पीपणामुळे मुलं मात्र

| September 12, 2014 01:20 am

आईवडील एकीकडे मुलांना तू अजून लहान आहेस असंही म्हणत असतात आणि दुसरीकडे मोठा झालास तरी एवढंही कळत नाही असंही ऐकवत असतात. अशा दुटप्पीपणामुळे मुलं मात्र गोंधळून जातात.

किशोर वयातील मुलं वेडीवाकडी वागत राहतात. त्यामुळेच घरात रागवारागवी होते, असं बहुसंख्य पालकांचं मत असतं. कारण तसा त्यांचा अनुभव असतो. अधिक डोळसपणे या वास्तवाकडे पाहिल्यास आपली वागणूकच अन्यायकारक असते, हे ध्यानात येतं. आजवर मुलं लहान असल्यानं नकळतच आपल्याला त्यांच्यावर अधिकार गाजवायची सवय जडलेली असते. मुलांना त्या वयात स्वत:चं मत नसल्यानं ती आज्ञाधारकपणे आपण देऊ त्या चौकटीत सामावून जातात. किशोरवयात स्वत:चं ‘स्व’पण शोधताना मुलं ‘स्व’तंत्र वृत्तीनं वागू लागतात. त्यामुळे ती आपलं सांगणं नाकारतात. इथं वादावादी सुरू होते.
वरवर पाहता गोष्टी अगदी साध्या दिसतात. मुलांचा नकार तरीही स्पष्ट दिसतो. अविनाशला एकदा मी त्याच्या आई-बाबांसोबत रात्री जेवायला बोलावलं. त्यानं फोनवरच स्पष्ट नकार दिला. संध्याकाळी मी स्वयंपाकाच्या गडबडीत असताना हा आला. थेट स्वयंपाकघरातच येऊन बसला आणि म्हणाला, ‘‘मावशी, चहा कर बाई झक्कसा. दोघं जण चहा पिऊ आणि मग करतो मी तुला लागेल ती मदत.’’ सकाळचा तुटकपणे बोललेलाच अविनाश का हा, असा प्रश्न स्वत:लाच विचारीत मी आधण ठेवायला उठले. अविनाशची टकळी सुरू झाली.
तो म्हणाला, ‘‘मावशी, मला तुझ्या घरी यायला खूप आवडतं, पण आई-बाबांबरोबर नाही. खरं तर हल्ली मला त्यांच्याबरोबर घरीपण राहावसं वाटत नाही. सरळ उठून हॉस्टेलवर जावंसं वाटतं, पण बाबांना खर्च करायला लावत नाही. मी काहीही करतो म्हटलं की झाले यांचे प्रश्न सुरू. ‘हे काय नवीन खूळ?’, ‘आत्ताच नडलंय का हे करायचं?’ मला तर सतत काही ना काही नवीन करून पाहावंसं वाटतं; पण त्यांना वाटतं, अभ्यास टाळायला म्हणून मी या पळवाटा शोधतोय. आता तूच सांग, मी जर अभ्यास टाळत असेन तर इतके उत्तम मार्क्‍स मला मिळत राहिले असते का? परवा मी जिमला जातो म्हणताच आई चिडली. म्हणाली, ‘आता अभ्यासाचा उजेड पाडा काय पाडायचो तो. असे रंगढंग करायला पुढे अख्खं आयुष्य पडलंय.’ आता तूच सांग मावशी, शरीर डौलदार असावंसं वाटणं हा काही गुन्हा आहे का? आई स्वत: मात्र सलमानच्या आणि त्या अतुल कुलकर्णीच्या कुठल्याशा मराठी सिनेमात दिसणाऱ्या शरीरयष्टीचं, फिटनेसचं कौतुक करीत असते. तेसुद्धा करिअर सांभाळतच एकीकडे ही मेहनत घेताहेत नं? काय बरोबर आणि काय चूक, तेच मला अशा विरोधापायी कळेनासं होतं. काय चूक आणि काय बरोबर हे आता त्यांनी मला ठरवू द्यावं. ठेच लागली तरी चालेल, पण मला माझ्या वाटेनं थोडं तरी जाऊ द्यावं. पण मी काहीही करतो म्हटलं की झाला यांचा उपदेश सुरू! मैलभर आधीच धोक्याचे कंदील दाखवीत बसतात दोघंही.’’
माझ्या बहिणीची मुलगी शर्मिला जेमतेम तेरा-चौदा वर्षांची आहे. स्वत:च्या घरी स्वयंपाकघरात पाऊलही टाकत नाही, पण इथं आली की उत्साहानं मला मदत करते. नवनवीन पदार्थ उत्साहनं करू पाहते. स्वयंपाकाची खूप हौस आहे तिला, हा माझा अनुभव. तिच्या आईचं मत मात्र माझ्या अगदी उलट. एकदा शर्मिलाला या बाबतीत छेडलं तर ती म्हणाली, ‘‘मावशी, तू कशी मला छान मदत करू देतेस. आई आणि आज्जीचं तसं नसतं. मी काही करू लागले की झाली यांची शिकवणी सुरू. ‘शर्मिला, भांडं नीट विसळून घे गं’, ‘शर्मिला वाटाणे सोलते आहे, पण कीडबीड नीट पाहा हं’, ‘शर्मिला, एवढी कोळंबी धुऊन दे गं, पण पोटातला काळा दोरा मात्र काढायला विसरू नकोस हं.’ आता एवढंही न कळायला मी काय कुक्कुलं बाळ आहे का?’’
शर्मिलाची आई आणि आजी तिची मदत ती मोठी झाली आहे म्हणून हक्कानं घेत होत्या, पण त्याच वेळी तिला एखाद्या लहान मुलीसारखं सतत वागवीत होत्या. शर्मिलाला हे सहन होत नव्हतं. ती मोठी झाली आहे. काम करायची तिची क्षमता जशी वाढली आहे तशीच तिची विचार करण्याची क्षमताही वाढली आहे. तिच्या मोठं होण्याचा आदर आई आणि आजीकडून व्यक्त होणं आज आवश्यक आहे.
स्वत:च्या मनोविश्वात जी उलथापालथ सुरू असते त्याची संगती स्पष्टपणे लावणं या मुलांना कधी कधी जमत नसतं. त्यांच्या मागण्या पालकांना अनेकदा क्षुल्लक वाटतात, पोरकटही वाटतात, पण त्यांच्या दृष्टीनं त्या त्यांच्या खूप आवश्यक गरजा असतात. त्या मागण्यांचा स्वीकार पालकांनी केला म्हणजे मुलांना तो स्वत:चाच स्वीकार त्यांनी केल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्यांना अगदी सुरक्षित वाटतं. रूपाच्या कॉलेजात परवा ‘साडी डे’ होता. तिला आईची एखादी छानशी साडी हवी होती. ती आईला म्हणाली, ‘‘आई, तू मला साडी नीट नेसव. गर्दीच्या वेळी मला साडी नेसून ट्रेनमध्ये चढायला जमणार नाही म्हणून तू मला कॉलेजला सोड आणि मग तू त्याच टॅक्सीनं पुढे ऑफिसला जा.’’ आईनं स्पष्ट नकार दिला आणि तिला एक जुन्यातलीच साडी काढून दिली. रूपा हिरमुसली. आई ऑफिसला गेल्यावर ती मैत्रिणीकडे गेली. तिचीच साडी नेसून मनाजोगता नट्टापट्टा करून त्या दोघी टॅक्सीनं कॉलेजला गेल्या. संध्याकाळी पुन्हा मैत्रिणीकडे जाऊन जामानिमा उतरून ती सावकाश घरी आली. तिच्या आईला घरी आल्यावर आपली साडी तशीच कॉटवर पडलेली दिसली. रूपा घरी येताच आईनं विचारलं, ‘‘काय गं, साडी नाहीच नेसलीस वाटतं?’’ रूपा घुश्श्यातच म्हणाली, ‘‘ ‘साडी डे’ला मी साडी नेसली नाही, असं कसं शक्य आहे? मी प्रीतीची साडी नेसून गेले.’’ स्वत:चा राग लपवीत आई तिला म्हणाली, ‘‘घरी येऊन तरी बदलायची होतीस साडी. मला तुझा थाटमाट बघता आला असता.’’ त्यावर रूपा म्हणाली, ‘‘माझ्या साडी नेसण्याचं तुला एवढं अप्रूप आहे असं सकाळी काही जाणवलं नाही मला.’’ रूपाच्या आईनं रूपाला हवी तशी एखादी छान साडी देऊन तिला नटायला शक्य ती मदत करणं आवश्यक होतं. मग रूपा मैत्रिणीसोबत टॅक्सीनं कॉलेजला गेलीही असती. रूपाला आईच्या अलिप्तपणाचं खूप वाईट वाटलं.
अभिनवला पडलेला प्रश्न आणखीच वेगळा. त्याच्या कॉलेजात ‘विचित्र डे’ होता. त्यासाठी एक मुलगा चक्क चणिया-चोळी घालून मुलीसारखा नटून आला होता. घरी येताच अभिनवनं मोठय़ा हौसेनं आईला ती गंमत सांगितली. त्यावर ती म्हणाली, ‘‘ही कसली अवदसा बाई!’’ अभिनवला हे अनपेक्षित होतं. त्याला प्रश्न पडला होता की, बॉलीवूडमधल्या नटांचं साडय़ा घालून स्त्री-वेशात वावरण्याचं, अगदी अमिताभच्या काळापासून आईला कौतुक वाटतं. मग तिला आपल्या मित्राचं साडी नेसणं का बरं खटकावं? ती मात्र तिला अवदसा वाटावी, हे कसं?
या वयाच्या मुलांना त्यांच्या बोलण्या-वागण्यातून समजून घेणं हे कठीण असतं हे खरं, पण त्याचबरोबर ही मुलं पालकांच्या विचारसरणीतल्या दुटप्पीपणावर जेव्हा नेमकं बोटं ठेवतात, तेव्हा ते वास्तव स्वीकारताना पालकांचाही तोल जातो आणि ते चिडतात. मिहीरच्या आईच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न ठरलं. त्याचे वडील हयात नसल्यानं त्याची आई देवदेवक कशी ठेवणार, असं तिचं दु:ख ती मिहीरच्या आईला सांगताच मिहीरची आई तिला म्हणाली, ‘हे बुरसटलेले विचार सोडून दे. काळ किती पुढे गेलाय! आपण स्त्रिया पुरुषांइतक्याच समर्थपणे अनेक जबाबदाऱ्या पार पाडतो आहोत. तूसुद्धा कमरेला सुपारी लाव आणि कर सगळे विधी.’ तिची मैत्रीण यावर गप्प बसली. तिच्या तुलनेत स्वत:च्या आईच्या पुरोगामी विचारसरणीचा मिहीरला खूप अभिमान वाटला, पण दोनच महिन्यांनंतर आपल्या मुलानं एका ख्रिश्चन मुलीशी लग्न ठरविल्याचं सांगत जेव्हा मामा आला, तेव्हा आई म्हणाली, ‘तू समजाव त्याला. आपल्या घरी इतके कुळाचार असतात. सून म्हणून तिलाच सारं करायचंय. मग ती सून परधर्मी कशी चालणार?’ आई पुढे म्हणाली, ‘अरे त्यानं ऐकलं नाही तर निदान तिला तरी तू हिंदू करून घे.’ आईचा अहंकार असा दुटप्पी आहे, हे ध्यानात येताच मिहीर म्हणाला, ‘आई, तू स्वत:ला पुरोगामी समजतेस, पण तो केवळ मुखवटा आहे. मामा, तू अशी धर्मातराची सक्ती त्या मुलीवर कशी करणार? का म्हणून? ज्याला त्याला आपापला धर्म प्रियच असणार नं?’ आई खूप चडफडली. मामा जाताच ती मिहीरला म्हणाली, ‘तूपण तुझ्या भावासारखीच एखादी आण घरात. माझं बापडीचं काय?’
अनेकदा या मुलांना काय म्हणायचंय ते पालकांना समजतं. पण तरीही त्यांची अभिव्यक्ती मुलांना खटकते. ‘तुला काय वाटतंय ते कळतंय मला. तुझ्या वयाचा होतो तेव्हा माझीदेखील हीच पंचाईत व्हायची,’ असं बाबांनी म्हटल्यावर मुलगा म्हणणार, ‘शक्यच नाही. तुम्हाला कसं कळणार ते?’ या मुलांच्या मते त्यांच्या जाणिवा, त्यांचे अनुभव सारं काही अगदी अनोखं, अपूर्व असतं. आपले आईबाबा एकेकाळी आपल्या वयाचे होते तेव्हा या साऱ्यातून तेही गेले आहेत, ही कल्पनाच या वयाच्या मुलांना करता येत नाही. पालकांच्या स्वत:च्या किशोर वयातील समजूतदारपणाच्या गोष्टी तर त्यांना मुळीच ऐकायच्या नसतात. आपल्या किशोर वयातील समंजसपणाच्या गोष्टी आपण त्यांना सांगू गेलो तर ती म्हणतात, ‘बाबा तुमचे दिवस गेले आता. तुमचं पुराण नाही ऐकायचं मला.’ प्रत्येक वेळी या मुलांना समजून घेत मदतीचा हात पुढे करताना आपल्या ठायीच्या संयमाची कसोटी लागते. धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशीच गत होते.
आपली आणि या मुलांची आवडनिवडही पार वेगळी असते. लोक त्यांना काय म्हणतील या विचारापायी आपल्याला त्यांनी रूढीप्रिय वागावंसं वाटतं. तर या मुलांना नवं जग, विशेषत: वेगळं नवं जग साकारायची खुमखुमी असते. नीट केस कापून भांग पाडावा, असं बाबांना वाटायचं, पण केदारनं पार डोक्यावर केसांचं टोपलं वाढवलं. त्याच्या बाबांना ते पारोसं आणि ओंगळ वाटलं, पण ते केदारला म्हणाले, ‘नवी स्टाइल वाटतं. आमच्या डोळ्यांना सवयीचं नसल्यानं ती फार आवडत नाही, पण तुझे दोस्त मात्र वाखाणत असतील नं ही स्टाइल!’ त्यावर तो म्हणाला, ‘बाबा, आवडली म्हणजे काय? ती भैरवी तर म्हणाली, की केदार आता तू आमच्यातलाच वाटायला लागलास हं!’
या मुलांशी बरोबरीच्या नात्यानं पालकांनी वागावं हे खरं पण या वागण्यातही आणि एक विरोधाभास आहे. आपण त्यांना आपल्यासारखं मोठं मानायचं मात्र त्यांच्या पातळीवर मात्र नाही उतरायचं, असं काहीसं त्यांना वाटत असतं. म्हणजेच आपण त्यांना आपल्या पातळीवर येऊ द्यायला हवं. आपण पोरवयात पुन्हा नाही जायचं, अशी त्यांची अपेक्षा असते.
परवा रजनी आणि तिची आई लग्नाला गेल्या. तिची आई खूप देखणी, बांधेसूद आहे. अजूनही लग्नाला नटूनथटून जायची तिची हौस ओसरलेली नाही. खरं तर थोडासा जामानिमा केला, तरी ती चारचौघींत उठून दिसते. लग्नात तिला पाहून कुणीसं म्हणालं, ‘आहेस तशीच आहेस बाई तू अजून. रजनीएवढी मोठी मुलगी असेल असं तुझ्याकडे पाहून वाटतच नाही. मोठी बहीणच वाटतेस तू तिची.’ रजनीला हे ऐकून आईचाच खूप राग आला. दुसऱ्या दिवशी ती आपल्या मैत्रिणीला सांगत होती, ‘फार बाई नटायचा सोस आईला. तिचं ते नटणं, गॉगल कपाळावर चढवून बोलत बसणं बिलकूल आवडत नाही मला. आईनं नीटनेटकं जरूर राहावं, पण कितीही झालं तरी आईनं आईसारखं नको का दिसायला?’
सुमनचा परवा पन्नासावा वाढदिवस झाला. उठल्या उठल्याच तिचा लेक म्हणाला, ‘ऌंस्र्स्र्८ इ्र१३िँं८ आई. पन्नाशी झाली आता. आजपासून बंद कर ते केस रंगविणं आणि चेहऱ्याला रोगण लावणं. थोडी प्रौढ दिसलीस, म्हातारी दिसू लागलीस, तरी हरकत नाही. तरुण दिसायचा अट्टहास पुरे झाला आता.’
अशी वक्तव्यं ऐकल्यावर आई-बाबांनी त्यामागचं वास्तव थोडं अधिक विचारपूर्वक समजून घेऊन आपली जीवनशैली थोडी बदलायला हवी. मुलं थोडी मोठी झाली, की पालकांना, विशेषत: आईला, थोडा सुटवंगपणा येतो. मुलांना घरी सोडून आई-बाबांना छान मैफलींना, चित्रप्रदर्शनांना, पुस्तकप्रदर्शनांना शांतपणे जाता येतं. स्वत:च्या आवडीचे छंद जोपासून स्वत:ची वाढ करायला त्यांना आता थोडी सवड काढता येते. या टप्प्यावर मिळणाऱ्या कौटुंबिक स्थैर्याचा उपयोग पालकांनी स्वत:साठी करायचा जर प्रयत्न केला, तर मुलांना ते खूप आवडतं. सरोजला या टप्प्यावर लेखनाला फुरसत मिळू लागली. तिनं एक पुस्तक लिहिलं. त्याला बक्षीस मिळालं. बक्षीस समारंभाला तिचा मुलगाच तिला बाईकवरून घेऊन गेला. सकाळी उठल्यावर तो तिला म्हणाला, ‘आई दुपारी मी घरी येईन, तेव्हा नास्ता बनवायच्या भानगडीत पडूच नकोस म्हणजे दुपारी थोडी विश्रांती मिळेल तुला. थोडी नीट तयारीही करता येईल तुला. उगीच धापा टाकत निघायला नको. अगं आज खूप लोक तुला ऐकायला येतील, तसेच तुला पाहायला म्हणूनही येतील. माझ्या कट्टय़ावरच्या दोन-तीन मित्रांचे आई-बाबाही येणार आहेत तिथं. त्यांना तुला पाहायची खूप उत्सुकता आहे.’
वास्तवाकडे नेमक्या कोनातून पाहायला शिकलं, की आपली मुलं आपलं किती मनापासून कौतुक करतात, ते अनुभवायची संधी आपल्याला अनायासे मिळते आणि जाणवतं, मोठं झालं आपलं लेकरू आता.

स्वत:च्या मनोविश्वातील उलथापालथीची संगती स्पष्टपणे लावणं या वयातील मुलांना कधी कधी जमत नसतं. त्यांच्या मागण्या पालकांना अनेकदा क्षुल्लक, पोरकटही वाटतात, पण मुलांच्या दृष्टीनं त्या खूप आवश्यक असतात.

आपल्या किशोर वयातील समंजसपणाच्या गोष्टी आपण सांगू गेलो तर मुलं म्हणतात, ‘बाबा तुमचे दिवस गेले आता. तुमचं पुराण नाही ऐकायचं मला.’ प्रत्येक वेळी या मुलांना समजून घेत मदतीचा हात पुढे करताना आपल्या ठायीच्या संयमाची कसोटी लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2014 1:20 am

Web Title: art of proper conversation with children
Next Stories
1 कविता : वर्षां
2 गोल्डन रेलिश
3 सहस्रशब्दमंजुषा।
Just Now!
X