scorecardresearch

क्रीडा : बादशहा!

फिरकीपटूही आक्रमकतेच्या बळावर सामना जिंकवून देऊ शकतात, हे वॉर्नने नव्वदीच्या काळात चाहत्यांच्या मनावर बिंबवले.

ऋषिकेश बामणे response.lokprabha@expressindia.com

दिनांक : ४ जून, १९९३. स्थळ : मँचेस्टर. इंग्लंडचा नामांकित फलंदाज माइक गॅटिंग स्ट्राइकवर. त्यातच कारकीर्दीतील पहिल्याच ‘अ‍ॅशेस’ कसोटी सामन्यात छाप पाडण्याचे दडपण वेगळे; परंतु समोर मोठा फलंदाज आहे याचा विचार करून ऑस्ट्रेलियाचा २३ वर्षीय अवलिया भांबावला नाही. उलट त्याने टाकलेल्या पहिल्याच चेंडूपुढे गॅटिंगची भंबेरी उडाली. लेग स्टम्पच्या बाहेर पडलेल्या चेंडूने उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या गॅटिंगचा ऑफ स्टम्प उडवला. हाच चेंडू पुढे जाऊन ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ (बॉल ऑफ दी सेंच्युरी) म्हणून ओळखला जाऊ लागला. यांसारख्या असंख्य अविश्वसनीय चेंडूंद्वारे प्रतिस्पर्धी फलंदाजांना चकवणारा आणि १५ वर्षे चाहत्यांचे निखळ मनोरंजन करणारा महान लेगस्पिनर म्हणजे शेन वॉर्न.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या वॉर्नची ४ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. थायलंडमधील कोह सामुई येथे वयाच्या ५२व्या वर्षी वॉर्नने अखेरचा श्वास घेतला. ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट मैदान (एमसीजी) येथे ३० मार्च रोजी जवळपास लाखभर चाहत्यांच्या साक्षीने वॉर्नवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. वॉर्नचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित राहणार आहेत. ४ मार्चला सकाळीच वॉर्नने ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज रॉडनी मार्श यांच्या निधनाबाबत ट्वीट केले होते; परंतु हेच ‘ट्वीट’ त्याचे आयुष्यातील अखेरचे ‘ट्वीट’ ठरेल, असा कोणी विचारही केला नव्हता.

टप्पा पडल्यानंतर चेंडूला दीड हाताहून अधिक वळण देण्यात वॉर्न वाकबगार होता. फिरकीपटूही आक्रमकतेच्या बळावर सामना जिंकवून देऊ शकतात, हे वॉर्नने नव्वदीच्या काळात चाहत्यांच्या मनावर बिंबवले. साधारण १० पावलांची हळुवार धाव घेत तो उजव्या हाताने चेंडू टाकायचा. मुख्य म्हणजे हात हवेत असतानाच त्याच्या चेंडूची दिशा, वेग आणि टप्पा हे समीकरण साधलं जायचं. खेळपट्टीवर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर तो किती अंशात वळणार, हे समोरील निष्णात फलंदाजाला समजेपर्यंत त्याची यष्टी उडालेली असायची. मुळात भारत, श्रीलंका, पाकिस्तान यांसारखे आशिया खंडातील देशच सर्वोत्तम फिरकीपटू घडवू शकतात, हा गैरसमज वॉर्नने मोडीत काढला. कसोटी प्रकारात एकूण ७०८ बळी मिळवणाऱ्या वॉर्नची फलंदाजाला बाद केल्यानंतर जल्लोष करण्याची शैलीही निराळीच. त्यामुळे प्रतिकूल खेळपट्टय़ांवर खेळून यशाचे शिखर सर करणारा वॉर्न अनेकांना श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनपेक्षा उजवा वाटतो. त्याच्या भात्यातील वैविध्य व नजाकतीमुळेच ‘फिरकीचा जादूगार’ असे बिरुद त्याला मिळाले आणि भारतीय चाहत्यांनाही तो आपलासा वाटू लागला. त्यामुळे वॉर्नसारखा विजयवीर ऑस्ट्रेलियाला पुन्हा मिळणे कठीणच.

मेलबर्न येथे १९६९ मध्ये वॉर्नचा जन्म झाला. त्यानंतर २३ वर्षांनी म्हणजेच २ जानेवारी, १९९२ रोजी वॉर्नने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले; परंतु सुरुवातीलाच त्याला छाप पाडता आली नाही. १९९३ची अ‍ॅशेस मालिका वॉर्नच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली. इंग्लंडविरुद्धच्या सहा कसोटींमध्ये त्याने तब्बल ३४ बळी मिळवले. याच मालिकेत त्याने गॅटिंग यांना तो अफलातून चेंडू टाकला.

मैदानाबाहेरील कारनाम्यांमुळेही वॉर्न कायम चर्चेत राहिला. १९९४च्या श्रीलंका दौऱ्यात खेळपट्टी आणि वातावरणाची माहिती देण्यासाठी एका भारतीय सट्टेबाजाकडून वॉर्नने लाच घेतली होती. यामध्ये मार्क वॉ याचाही समावेश होता. १९९८ मध्ये त्यांनी याविषयी कबुली दिली. त्यानंतर उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे वॉर्नला २००३च्या विश्वचषकाला मुकावे लागले. चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसावा यासाठी आपल्या आईने औषध दिले होते. त्यामध्ये उत्तेजक असल्याचे आपल्याला ठाऊक नव्हते, असे त्या वेळी वॉर्न म्हणाला; परंतु त्याच्या अनुपस्थितीतही ऑस्ट्रेलियाने जेतेपद कायम राखले. त्याशिवाय अनेक महिलांशी असलेला प्रेमसंबंधांमुळे २००५ मध्ये पत्नी सिमोनशी घटस्फोट झाला. २००६ मध्ये त्याचे नाव एका ‘सेक्स स्कँडल’मध्ये प्रकाशात आले. वॉर्नचे निधन झाल्यानंतर पुढील काही दिवस त्याची नग्नावस्थेतील छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. थायलंडमधील निवासस्थानीही त्याच्या खोलीबाहेर मसाज करणाऱ्या महिलांचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आले. मात्र तेथील पोलिसांनी केलेल्या तपासानुसार वॉर्नचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र यांसारख्या असंख्य प्रकरणांमुळे वॉर्नभोवती वादाचे भोवरे नेहमीच फिरत राहिले.

डिसेंबरमध्ये वॉर्नच्या कारकीर्दीवरील माहितीपट प्रकाशित झाला. यामध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध साकारलेली हॅट्ट्रिक, ७०० बळींचा टप्पा, फलंदाजीतील वॉर्नचे योगदान यांसह विविध टप्प्यांवर सुरेख विश्लेषण करण्यात आले आहे. २००७ मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर वॉर्नने २००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले. मुख्य म्हणजे सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी यांसारखे नामांकित खेळाडू प्रतिस्पर्धी संघांचे कर्णधार असताना तसेच संघात बहुतांशी युवा खेळाडूंचा भरणा असूनही वॉर्नने राजस्थानला जेतेपद मिळवून देत सर्वाची मने जिंकली. मग २०१३ मध्ये त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला आणि समालोचन, प्रशिक्षण याकडे मोर्चा वळवला. ‘शेन वॉर्न फाऊंडेशन’द्वारे वॉर्न आजारी आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसलेल्या मुलांना साहाय्यही करत होता. गेल्या शतकातील सर्वोत्तम पाच क्रिकेटपटूंमध्ये वॉर्नचा क्रमांक लागतो. भारताविरुद्ध फारसे यश त्याला मिळवता आले नसले तरी सचिन तेंडुलकरशी त्याची मैत्री सर्वश्रुत आहे. १४५ कसोटी, १९४ एकदिवसीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वॉर्नने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण १००१ (कसोटीत ७०८ आणि एकदिवसीयमध्ये २९३) बळी मिळवले. त्यामुळे मैदानावर गाजवलेल्या वर्चस्वामुळे दर्दी क्रिकेटरसिकांच्या मनात वॉर्न कायम अजरामर राहील!

मराठीतील सर्व लोकप्रभा ( Lokprabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Article about cricketer shane warne life shane warne biography zws