सुप्रिया दाबके

करोनाच्या संकटात युरोपातील फुटबॉल लीग प्रेक्षकांशिवाय यशस्वीपणे सुरू झाल्या आहेत खऱ्या, पण २७ सप्टेंबरपासून फ्रेंच खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत प्रेक्षकांना प्रवेश देणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे क्रीडाजगतासाठी एक आश्वासक पाऊल पडल्याचे दिसते. पॅरिस येथे रंगणारी फ्रेंच ग्रँडस्लॅम दरवर्षी मे महिन्यात होते. वास्तविक जूनमध्ये होणारी विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धा ज्याप्रमाणे रद्द झाली त्याप्रमाणे फ्रेंच ग्रँडस्लॅमही रद्द होऊ शकली असती. मात्र फ्रेंच ग्रँडस्लॅम सप्टेंबपर्यंत लांबणीवर टाकून फ्रेंच टेनिस महासंघाने आणि फ्रान्सच्या सरकारने खेळालाही तितकेच महत्त्व देत असल्याचे अधोरेखित केले आहे.

करोनाच्या संकटात तीन महिने क्रीडाविश्वदेखील पूर्णपणे ठप्प झाले होते. मात्र जर्मनीतील बुंडेसलिगा फुटबॉल स्पर्धा प्रेक्षकांशिवाय यशस्वीपणे सुरू झाली. बायर्न म्युनिकने नुकतेच विक्रमी सलग आठवे बुंडेसलिगा जेतेपदही पटकावले. करोनाच्या काळात आरोग्यविषयक काळजी घेऊन ज्या प्रकारे जर्मनीमध्ये बुंडेसलिगा सुरू करण्यात आली, त्याचे जगातून कौतुक झाले. त्याच धर्तीवर स्पेनमध्ये ला-लिगा आणि इंग्लंडमध्ये इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल सुरू झाले. प्रेक्षकांशिवाय फुटबॉल स्पर्धा सुरू झालेल्या असताना जगप्रसिद्ध टेनिसचीही चर्चा सुरू होती. ३१ ऑगस्टपासून अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम स्पर्धा आणि २७ सप्टेंबरपासून फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेतील करोनाची सद्य:स्थिती पाहता तेथे अमेरिकन खुली स्पर्धा नियोजित वेळेत होणार की नाही, हे अजून निश्चित झालेले नाही. मात्र फ्रेंच ग्रँडस्लॅम २१ सप्टेंबरऐवजी आठवडाभर लांबणीवर टाकून निश्चितपणे ती स्पर्धा आयोजित करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल टाकण्यात आले आहे.

फ्रेंच टेनिस महासंघाने तर प्रेक्षकांनाही सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रवेश देणार असल्याचे जाहीर केले आहे. ‘फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रेक्षक असणार हे निश्चित आहे. किती प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश द्यायचा हे सरकारी यंत्रणांशी चर्चा करून ठरवू. स्पर्धेसाठी तिकीटविक्री या महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होईल,’ असे फ्रेंच टेनिस महासंघाचे अध्यक्ष बर्नार्ड ग्युडिसेली यांनी सांगितले. प्रेक्षकांचे प्रोत्साहन हे कोणत्याही टेनिस खेळाडूसाठी तितकेच महत्त्वाचे आहे. युरोपातील फुटबॉलमध्ये लीग सुरू झाल्या असल्या तरी खेळाडूंना प्रेक्षकांची उणीव भासत असल्याचे सातत्याने दिसून येते. वास्तविक गोल केल्यानंतर कोणताही खेळाडू हा नेहमी प्रेक्षकांकडे धावत जाऊन हात उंचावतो. मात्र यंदा तेच पाठीराखे प्रेक्षक मैदानात नसल्याचे या फुटबॉलपटूंना पदोपदी जाणवत आहे. प्रेक्षक नसल्याने अनेक फुटबॉल स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या बसण्याच्या जागेवर विविध चित्रे लावण्यात आली आहेत. स्टेडियममध्ये प्रेक्षक प्रोत्साहन देत असल्याचे व्हिडीओ अधूनमधून दाखवण्यात येतात. प्रेक्षक जसा फुटबॉलपटूच्या प्रत्येक किक्वर जल्लोष असतो तसा जल्लोषाचा आवाजही लावण्यात आला आहे, मात्र हे सर्व कृत्रिम असल्याचे खेळाडूंना सहज जाणवत आहे. व्यावसायिक खेळाडू या नात्याने त्यांच्या खेळावर या सगळ्याचा परिणाम होत नसला तरी सामना जिंकून दिल्यानंतर मनाला लाभणारे समाधान त्यांना जाणवत नसल्याचे चित्र दिसते. फुटबॉलच्या सामन्यांमध्ये गोल केल्यानंतर खेळाडू आलिंगन देतात, हस्तांदोलन करतात. या सर्वावर करोनामुळे निर्बंध घालण्यात आले असले, तरी माणसाच्या भावना सर्वोच्च आहेत हेदेखील या लढती पाहताना जाणवते. कारण खेळाडू गोल केल्यावर एकमेकांना आलिंगन देत आहेत.

फुटबॉलचे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे कोणत्याही खेळात खेळाडूला प्रोत्साहन हे लागतेच. टेनिसच्या बाबतीत सांगायचे तर या खेळात सुरक्षित अंतर सहज राखले जात असले तरी प्रेक्षकांचा पाठिंबा हा महत्त्त्वाचा असतो. ग्रँडस्लॅमसारख्या मोठय़ा स्पर्धामध्ये येणारे प्रेक्षक तर टेनिसचे सर्वात चांगले जाणकार असतात असेच त्यांच्या टाळ्यांवरून जाणवते. टेनिसपटू जेव्हा चुका करतात तेव्हा ‘ओह’ असा एकच सूर एकाच दमात संपूर्ण टेनिस कोर्टवर घुमतो. टेनिसपटू जेव्हा एखादा चांगला फटका खेळतात तेव्हा प्रेक्षकांकडून तितकेच चांगले प्रोत्साहनही मिळते. टेनिसपटू टेनिस कोर्टवर आल्यापासून पूर्णवेळ प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या असतात आणि त्या खेळाडूलाही त्या प्रेक्षकांची तितकीच गरज असते. स्वित्र्झलडचा रॉजर फेडरर, सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि स्पेनचा राफेल नदाल यांच्या देशांमध्ये ग्रँडस्लॅम स्पर्धा होत नाहीत. मात्र यांचे चाहते जगभरात असल्याने ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत त्यांच्या प्रत्येक लढतींना उपस्थित राहून ते त्यांना मोठय़ा प्रमाणात प्रोत्साहन देतात.

फ्रान्स आणि स्पेनचे फुटबॉल संघ जेव्हा आमनेसामने असतात तेव्हा एक वेगळेच द्वंद्व पाहायला मिळते. मात्र त्याच फ्रेंच प्रेक्षकांकडून स्पेनच्या राफेल नदालला आतापर्यंत सर्वाधिक प्रेम मिळाले आहे. नदालने विक्रमी १२ वेळा फ्रेंच ओपन जिंकून तेथील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यंदा फ्रेंच ओपन प्रेक्षकांच्या उपस्थित होणार असल्याचे आयोजकांनी जाहीर केल्यामुळे अर्थातच सर्वात जास्त आनंद नदालला झाला असेल. कारण तो १३व्यांदा ही स्पर्धा जिंकण्याची तयारी करत असेल, यात शंका नाही. स्वित्र्झलडचा २० ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर दुखापतींमुळे या संपूर्ण वर्षांला मुकणार आहे. त्याची अनुपस्थिती अमेरिकन आणि फ्रेंच स्पर्धेत जाणवणार आहे. मात्र जोकोव्हिच आणि नदाल हे सर्वोत्तम टेनिसपटू गेल्या काही महिन्यांच्या करोनामुळे मिळालेल्या विश्रांतीनंतर कसा खेळ उंचावतात हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे. जोकोव्हिचने तर फ्रेंच स्पर्धेतूनच पुनरागमन करणार असल्याचे याआधीच म्हटले आहे. अमेरिकन स्पर्धेच्या कठोर नियमांमुळे यंदा त्या स्पर्धेत खेळणार नसल्याचे जोकोव्हिच आणि नदाल यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. ‘अमेरिकन खुल्या स्पर्धेसाठी यंदा जे नियम करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे ते कठोर आहेत. खेळाडूंना स्वतंत्र विमानाने आणण्यात येत असल्याचे कळते. सहभागी खेळाडूंना अमेरिकेत येताना त्यांचा नेहमीचा प्रशिक्षकांचा संघही आणता येणार नाही. हे नियम खूप कठोर वाटत आहेत. या स्थितीत अमेरिकन स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार करत आहे. थेट फ्रेंच स्पर्धेतून पुनरागमन करेन,’ असे जोकोव्हिचने सांगितले.

अमेरिकन ग्रँडस्लॅमसारखी फ्रेंच ओपनची स्थिती नाही. ‘टेनिस विश्वातील अव्वल १०० मधील ७५ खेळाडू सध्या युरोपात वास्तव्यास आहेत. या स्थितीत ते फ्रेंच ओपनमध्ये सर्वोत्तम कामगिरी करतील,’ असा विश्वास फ्रेंच टेनिस महासंघाकडून व्यक्त करण्यात आला आहे. यंदाची फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धा आठवडाभर लांबणीवर टाकून २७ सप्टेंबरपासून होणार असल्याने त्याचा आणखी एक फायदा कमी क्रमवारी असणाऱ्या टेनिसपटूंनाही होणार आहे. कारण कमी क्रमवारीच्या खेळाडूंना पात्रता स्पर्धामध्ये सहभागी होता येईल. पात्रता स्पर्धेत सहभागी होऊन ग्रँडस्लॅमसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न तर हे कमी क्रमवारीचे टेनिसपटू करतीलच पण जोडीला सामने खेळल्याने त्यांना कमाईदेखील करता येणार आहे. करोनामुळे टेनिस ठप्प झाल्याने कमी क्रमवारीच्या खेळाडूंना मोठा आर्थिक फटका बसला आहे. अनेक टेनिसपटू हे सामन्यात खेळून मिळणाऱ्या कमाईवर अवलंबून असतात. मात्र करोनामुळे सामनेच होत नसल्याने या कमी क्रमवारीच्या खेळाडूंची खऱ्या अर्थाने पंचाईत झाली होती. या खेळाडूंना आर्थिक मदत देण्यासाठी फेडरर, जोकोव्हिच आणि नदाल या अव्वल खेळाडूंनी पुढाकार घेतला होता. अखेर गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघानेही (आयटीएफ) दखल घेत कमी क्रमवारीच्या खेळाडूंना आर्थिक मदत दिली आहे.

खेळांचे महत्त्व हे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. अभ्यासात ज्याप्रमाणे कारकीर्द करता येते तशीच खेळातही करता येते. करोनामुळे क्रीडा विश्वावर परिणाम झाला आहे, हे सत्य कोणीच नाकारू शकत नाही. मात्र एक चांगली सकारात्मक सुरुवात नवीन चांगल्या गोष्टी घडायला उपयोगी पडते. त्याप्रकारची अपेक्षा फ्रेंच ग्रँडस्लॅमच्या बाबतीत ठेवता येऊ शकते. ज्याप्रमाणे बुंडेसलिगा या जर्मनीतील फुटबॉल स्पर्धेने करोनाच्या संकटातही खेळ सुरू राहू शकतो हे दाखवले तसेच फ्रेंच ओपनदेखील टेनिस खेळ सुरू राहू शकतो आणि तोदेखील प्रेक्षकांसह, हे जगाला दाखवून देईल यात शंका नाही. भारताच्या बाबतीत सांगायचे तर ग्रँडस्लॅम टीव्हीवरून पाहणाऱ्यांची संख्यादेखील कमी नाही. सध्या भारतातून फुटबॉल लीगनाही टीव्हीवरून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारतातही ‘आयपीएल’ खेळवण्याची चर्चा सुरू आहे. हे सर्व चित्र क्रीडा जगताचा उत्साह पुन्हा पहिल्यासारखा वाढवेल यात शंका नाही.

response.lokprabha@expressindia.com