04 December 2020

News Flash

पर्यटन विशेष : आइस हॉकीचा थरार

आइस हॉकी हा बर्फावर खेळला जाणारा एक सांघिक खेळ आहे, जो सामान्यत: रिंकमध्ये (बर्फावरील खेळांसाठी तयार केलेले मैदान) खेळला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

आदित्य जोशी

लडाखमध्ये सर्वसामान्य पर्यटकांना आवडेल, असं काय आहे, हा प्रश्न अनेकजण विचारतात. खरं सांगायचं तर लडाख हा प्रांत सर्वसामान्यांच्या निसर्गाच्या व्याख्येत बसणाराच नाही, परंतु तिथे जे काही आहे ते अद्भुत, विस्मयकारक, उत्तुंग आणि अफाट आहे. विविध रूपांत सामोरे येणारे लडाख, मे ते सप्टेंबर दरम्यान पर्यटकांसाठी खुले असते. ऑक्टोबरपासून ते बर्फाची रजई पांघरू लागते. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीत श्रीनगर आणि मनालीकडून लडाखला जोडणारे रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद होतात. विमानसेवा सुरू असते, पर्यटन मंदावलेले असते. या काळात लेहमध्ये फिरण्याचा वेगळाच आनंद असतो. सिंधू, झंस्कारसारख्या नद्याच नाही तर भारत, चीनदरम्यानचा पँगाँग सरोवरसुद्धा गोठलेले असते. याच काळात या बर्फाळ मैदानावर खेळली जाते आइस हॉकी. या परिसरातला हा लोकप्रिय खेळ आहे.

आइस हॉकी हा बर्फावर खेळला जाणारा एक सांघिक खेळ आहे, जो सामान्यत: रिंकमध्ये (बर्फावरील खेळांसाठी तयार केलेले मैदान) खेळला जातो. हा खेळ वेगवान आणि खेळाडूंच्या शारीरिक क्षमतांची परीक्षा घेणारा खेळ म्हणून ओळखला जातो. कॅनडा, मध्य आणि पूर्व युरोप, नॉर्डिक देश, रशिया आणि अमेरिकेत आइस हॉकी सर्वाधिक लोकप्रिय आहे. आइस हॉकी हा कॅनडाचा अधिकृत राष्ट्रीय हिवाळी खेळ आहे. याव्यतिरिक्त, आइस हॉकी हा बेलारूस, क्रोएशिया, झेक प्रजासत्ताक, फिनलॅण्ड, लाटविया, रशिया, स्लोव्हाकिया, स्वीडन आणि स्वित्झलॅण्डमधील सर्वात लोकप्रिय हिवाळी खेळ आहे. उत्तर अमेरिकेची ‘नॅशनल हॉकी लीग’ (एनएचएल) ही पुरुषांच्या आइस हॉकीसाठीची सर्वोच्च संस्था आहे. ही जगातील सर्वात व्यावसायिक आइस हॉकी लीग आहे. ‘कॉन्टिनेंटल हॉकी लीग’ (केएचएल) ही रशिया आणि पूर्व युरोपमधील लीग आहे. ‘इंटरनॅशनल आइस हॉकी फेडरेशन’ (आयआयएचएफ) ही आंतरराष्ट्रीय आइस हॉकीची औपचारिक संस्था असून ती आयआयएचएफ आंतरराष्ट्रीय स्पर्धा सांभाळते आणि आयआयएचएफ जागतिक क्रमवारी राखते. जगभरात, ७६ देशांमध्ये आइस हॉकी फेडरेशन आहेत.

  • भारतातील आइस हॉकी

१३० कोटींच्या आसपास लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात, लडाखसारख्या फक्त ३० हजारांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या भागातून पुरुषांच्या आणि महिलांच्या राष्ट्रीय आइस हॉकी टीम तयार झाल्या आहेत. या प्रांतातील रहिवासी हिवाळ्यात विरंगुळा म्हणून आइस हॉकी खेळू लागले, आणि हळूहळू या खेळात पारंगत होत गेले. विशेष म्हणजे सरावासाठी आवश्यक साधने नसतानासुद्धा वर्षभरात केवळ दोन महिन्यांसाठी तयार होणाऱ्या रिंकवर सराव करून आपले संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत सहभागी होतात. दुर्दैवाची गोष्ट अशी की डेहराडूनमध्ये असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची रिंक ही पुरेसे पाठबळ न मिळाल्याने बंद आहे. परंतु क्रिकेटला धर्म मानणाऱ्या भारतात आइस हॉकीला हळूहळू ओळख मिळू लागली आहे. सिमला, काश्मीर आणि लडाख या भागात प्रामुख्याने आइस हॉकी खेळली जाते. कारण हिवाळा सुरू झाल्यानंतर ही सर्व ठिकाणे आपल्या अंगावर बर्फाची चादर ओढतात. हिवाळ्यात दिसणारे यांचे पांढरेशुभ्र रूप मन मोहून टाकते.

लडाखवासीयांसाठी हा खेळ म्हणजे हिवाळ्यातील संथ जीवनातला विरंगुळा आहे. लडाखमध्ये याला शीन किंवा तलावाची हॉकी म्हणूनही ओळखले जाते. समुद्र सपाटीपासून जवळपास ११ हजार ५०० फूट उंचावर असलेल्या कारझु गावात आइस हॉकी रिंक आहे.  आइस हॉकीचे स्थानिक चाहते तसेच देश विदेशातील आणि हौशी खेळाडू या दिवसांत लडाखच्या या रिंकवर आपले कौशल्य आजमावताना दिसतात. लडाख विंटर स्पोर्ट्स क्लबच्या माहितीनुसार आपल्या देशात या काळात अंदाजे १० ते १२ हजार खेळाडू आइस हॉकी खेळतात. भारताचा आइस हॉकीशी परिचय साधारण १९९५ मध्ये झाला. कालांतराने लडाखमधील तरुण या खेळात प्रावीण्य मिळवू लागले आणि भारताची राष्ट्रीय आइस हॉकी टीम २००९ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धामध्ये भाग घेऊ  लागली.

  • महिलांचा आइस हॉकी संघ

लडाखमधील आइस हॉकीचा हंगाम साधारणत: अडीच महिने टिकतो. वेगवेगळे क्लब तसेच ग्रामीण संघटना या काळात हिवाळी शिबिरे आणि स्पर्धा आयोजित करतात. परंतु यापैकी बहुतेक स्पर्धा केवळ पुरुषांसाठीच आयोजित केल्या जातात. महिलांसाठी फारशा आइस हॉकी स्पर्धा नाहीत. ही त्रुटी लक्षात घेऊन  एलडब्ल्यूआयएचएफने जानेवारी २०१६ मध्ये लेहमधील छुचोट स्पोर्ट्स अ‍ॅण्ड वेलफेअर असोसिएशनसह महिला संघांसाठी एक विशेष स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत चार संघ सहभागी झाले होते. भारतीय महिला राष्ट्रीय आइस हॉकी संघ हा महिलांच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणारा आइस हॉकी संघ आहे. आंतरराष्ट्रीय आइस हॉकी महासंघाचे सदस्य भारतीय आइस हॉकी असोसिएशन या संघाची देखरेख करत आहे. ही टीम २०१६ मध्ये तयार करण्यात आली होती. ती सध्या आशिया विभाग एकच्या आयआयएचएफ महिला चॅलेंज चषक स्पर्धेत भाग घेते. या संघातील बहुतांश महिला लडाखमधील आहेत.

  • पहिल्या विजयाची चव

२०१७ मध्ये झालेल्या आइस हॉकी आशिया कपमध्ये दुसऱ्या सामन्यात भारतीय महिला आइस हॉकी टीमने फिलिपाईन्सच्या संघाचा रोमांचकारी लढतीत ४-३ ने पराभव केला. भलेही भारतीय महिला संघाची त्या संपूर्ण मालिकेतील  कामगिरी फारशी चांगली झाली नाही, पण या सामन्यातील विजयामुळे महिला हॉकीच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे भारतीय महिला आइस हॉकी संघ मेहनत घेऊ लागला. त्यांच्याबद्दल समाजमाध्यमांमध्ये वाचून कॅनडासाठी आइस हॉकीमध्ये ऑलिम्पिकमध्ये चार वेळा सुवर्णपदक मिळवलेल्या हायली विकेनहेजरने  (Hayley Wickenheiser) २०१८ मध्ये लेहला भेट दिली. तिने या टीमला प्रशिक्षणासाठी कॅनडाला पाठवावे अशी भारतीय हॉकी महासंघाला विनंती केली. सोबतच या टीमने ‘विकफेस्ट’ म्हणजेच विकेनहेजर फिमेल वर्ल्ड हॉकी फेस्टिव्हल (WICKFEST- Wickenheiser Female World Hockey Festival) मध्ये भाग घ्यावा, असेही सुचवले.  यातून वाढलेल्या उत्साहाचा परिणाम म्हणजे नवीन पिढीला प्रेरणा देण्यासाठी ‘लडाख विमेन आइस हॉकी फाऊंडेशन’ने ‘पॅगोंग युथ को ऑपरेटिव्ह सोसायटी’च्या मदतीने फोब्रांग या समुद्रसपाटीपासून १४ हजार ६३५ फुटांवर असलेल्या गावात डिसेंबर २०१९ मध्ये दुसरी आइस हॉकी टुर्नामेंट भरवली होती.

या व्यतिरिक्त लडाखच्या हिवाळ्यामध्ये अनेक ट्रेक आयोजित केले जातात. यात ट्रेकर्सना सर्वात जास्त खुणावतो तो चद्दर ट्रेक. डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत झंस्कार नदी गोठून तिच्यावर बर्फाचा अक्षरश: राजमार्ग तयार होतो. झंस्कार व्हॅलीमधील रहिवासी या काळात उदरनिर्वाहासाठी याच मार्गाने लेहला येतात. झंस्कार व्हॅली आणि लेह यांच्यातील अंतर कमी करणाऱ्या या मार्गावर अनेक आव्हाने असतात. हौशी पर्यटकांना हा मार्ग दरवर्षी खुणावतो. गोठलेल्या नदीवरून चालणं, नदी किनाऱ्यावर  तंबू बांधून राहणं हे साहस आयुष्यात एकदा तरी करायला हवं. काही फूट बर्फाचा थर असतो. त्याच्याखालून खळाळत वाहणाऱ्या प्रवाहाचा आवाज ऐकण्यात जो थरार आहे त्याची इतर कशाशीच तुलना होऊ शकत नाही. त्याचबरोबर स्नो लेपर्ड ट्रेल, गगनाला गवसणी घालणाऱ्या शिखरांचे ट्रेकही याच काळात होतात. हौशी छायाचित्रकारांसाठी तर हा ऋतू म्हणजे पर्वणीच. काळ जणू काही गोठला आहे याचा अनुभव घ्यायचा असेल तर या दिवसांत लडाखला नक्की भेट द्यायला हवी.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 1:16 am

Web Title: article on ice hockey game abn 97
Next Stories
1 सॅण्टोरिनी
2 पातागोनिया..
3 रमणीय यमाई
Just Now!
X