विनायक परब @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

भारतीय सीमेवर लडाख परिसरात चीनच्या कुरबुरींना सुरुवात झाल्यानंतर ‘सावधपण सर्वविषयी’ हे मथितार्थ लिहिले होते. गेल्या तीन आठवडय़ांत परिस्थिती खूपच बदलली असून सोमवारी थेट संघर्षांनंतर २० भारतीय जवान शहीद होण्याची गंभीर घटनाही घडली. त्यानंतर पंतप्रधानांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात भारत हा शांततेच्या मार्गाने जाणारा देश असला तरी देशाचे अखंडत्व व सार्वभौमत्वाबाबत कोणतीही तडजोड करणार नाही, चोख उत्तर देऊ, असे सांगितले, ते योग्यच होते. एका बाजूला हे सुरू असताना दुसरीकडे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी हल्ला पूर्वनियोजित होता, असे चीनला सुनावले. हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेधही केला. परराष्ट्र व्यवहारनीतीतील हा कणखर बदल स्वागतार्ह आहे. त्यात सातत्य असायला हवे, इतकेच. भारतात हे सुरू असताना पलीकडच्या बाजूस काय दिसते, चीनचे वर्तन काय सांगते, हेही पाहणे तेवढेच महत्त्वाचे ठरावे.

गलवान हा आपलाच भूभाग आहे, असे ठासून सांगण्याचा प्रयत्न चीनने केला. भारतानेच सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. चीनच्या बाजूस किती मनुष्यहानी झाली, याची आकडेवारी त्यांनी बिलकूल जाहीर केली नाही, त्यांच्या व्यवहारात पारदर्शकता नाही. आणि हे एवढे सगळे झाल्यावर चर्चेतून प्रश्नावर तोडगा काढण्याचा मनोदय त्यांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केला. चूक भारताची असती तर चीनने आक्रस्ताळे रूपच धारण केले असते. त्यामुळे चीनच्या वर्तनावरून खोट कुठे आहे, हे कळते.

गेल्या काही वर्षांत जगाचा गुरुत्वमध्य आशिया खंडाकडे सरकला आहे. चीन तो आपल्या बाजूने खेचण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्याही खेपेस आम्ही म्हटले होते की, चीन एखादी कृती करतो त्या वेळेस एका दगडात दोन नव्हे, तर पाच पक्षी मारण्याचा प्रयत्न करतो. सध्या चर्चा आहे ती, करोनाचे उगमस्थान म्हणून खराब झालेले नाव आणि देशांतर्गत वाढलेला काहीसा असंतोष यापासून लक्ष वेगळीकडे वळविणे. हा यामागच्या हेतूंपैकी एक आहे. केवळ एवढेच नाही तर चीनला शेजारील राष्ट्रांना हेही सांगायचे आहे,  की दादागिरी आमचीच चालेल. सध्या व्हिएतनाम, फिलिपिन्स, तैवान, मलेशिया सर्वाशीच त्यांचे वाद आहेत. हाँगकाँगच्या वादाकडे तर संपूर्ण जगाची नजर आहे. आपणच शिरजोर असल्याचा संदेश इतर देशांना देणे हाही यामागचा एक महत्त्वाचा हेतू आहेच.

याशिवाय चीन मानसशास्त्रीय युद्धही खेळते आहे. मात्र हे फारच कमी जणांना लक्षात आले आहे. १९६२ साली सुरुवात गलवान खोऱ्यातील चीनची घुसखोरी आणि संघर्षांनेच झाली होती. भारतीयांनी नंतर त्या युद्धाचा धसका घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तीच चाल करून भारतीयांच्या मानसिकतेला धक्का देता येतो का, हे पाहण्याचाही चीनने प्रयत्न केलेला दिसतो.

सध्या भारतीयांच्या मनात चीनविषयी तीव्र संताप आहे, तो साहजिक आणि समजण्यासारखा आहे. काहींना वाटते बालाकोटसारखा सर्जिकल स्ट्राइक करावा; पण चीन म्हणजे काही लेचापेचा पाकिस्तान नव्हे, याची भारत सरकारलाही जाणीव आहे. त्यामुळे तो उपाय नाही. भारत सरकारलाही राजकीय, राजनय आणि लष्करी अशा तिन्ही आघाडय़ांवर बुद्धिबळाच्या चाली खेळाव्या लागतील. प्रसंगी आपणही आक्रमक आहोत असा संदेश आक्रमण न करता सीमेवर लष्करी हालचालींतून द्यावा लागेल. त्याच वेळेस एका बाजूस राजकीय म्हणजे दोन राष्ट्रप्रमुखांमधील संवादाद्वारे प्रयत्न आणि तिसरीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदूी व प्रशांत महासागरातील शक्तिशाली देशांना सोबत घेऊन चीनची कोंडी करावी लागेल. वुहानच्या चौकशीवरून त्याचप्रमाणे हाँगकाँगमधील मानवाधिकारांच्या उल्लंघनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनची कोंडी करणे अशा एकाच वेळेस अनेक चाली करून चीनला हे दाखवून द्यावे लागेल की, कठीण चिनी वज्रास भेदू ऐसे..कठोर धोरण भारत अमलात आणू शकतो!