News Flash

जीवाची ‘मुंबई २४ तास’

मुंबई.. कधीही न झोपणारे शहर. आता हे शहर आपल्या बिरुदाला ‘जागू’ शकणार आहे

(संग्रहित छायाचित्र)

कव्हरस्टोरी

विजया जांगळे

लंडन, पॅरिस, लास वेगासचा दर्जा गाठण्यासाठी अजून खूप अवकाश आहे. आता कुठे आपण २४ तास जागण्याचे स्वप्न पाहू लागलो आहोत. महाआघाडी सरकारचा अध्यादेश ‘मुंबई २४ तास’ या संज्ञेला जागणारा आहे. यात मद्यपान, दंगा-मस्ती अशा ‘नाइटलाइफ’ला स्थान नाही. सध्या शहर २४ तास खुले ठेवण्याचे आव्हान पार पाडायचे आहे. शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याच्या दिशेने उचललेले एक सकारात्मक पाऊल, एवढेच सध्या त्याबद्दल म्हणता येईल.

मुंबई.. कधीही न झोपणारे शहर. आता हे शहर आपल्या बिरुदाला ‘जागू’ शकणार आहे. महाआघाडी सरकारने ‘मुंबई २४ तास’ला मान्यता दिली असली, तरी सध्या हे प्रयत्न प्रायोगिक पातळीवरच आहेत. ठरावीक ठिकाणी आणि ठरावीक स्वरूपाच्याच आस्थापना खुल्या ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. पात्रतेसाठी अनेक अटीही घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे रातोरात महसूल, रोजगार वाढेल अशी अपेक्षा जशी सयुक्तिक ठरणार नाही तसेच सांस्कृतिक अध:पतन होईल, बलात्कार-व्यसनाधीनता वाढेल, अशी टीकेची झोड उठवणेही विपर्यास करणारेच ठरेल. सध्या तरी जगभरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरांनी जो प्रयोग करून पाहिला आणि त्यात यशही मिळवले त्या दिशेने उचललेले एक पाऊल, अशाच दृष्टिकोनातून या प्रयोगाकडे पाहावे लागेल.

मुंबईत ‘नाइटलाइफ’ सुरू व्हावे यासाठी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे २०१३ पासून पाठपुरावा करत होते. महायुती सरकारमध्ये पर्यटन मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी आपला हा मुद्दा रेटणे स्वाभाविक होते. २२ जानेवारीला राज्य सरकारने अध्यादेश काढला, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संकल्पनेचे नामकरण ‘नाइटलाइफ’ ऐवजी ‘मुंबई २४ तास’ असे केले. सध्याची नियमावली पाहता या प्रयोगासाठी हे नाव अधिक समर्पक ठरते. नाइटलाइफ म्हटले की सर्वात आधी डोक्यात येतात ते रात्रभर खुले राहणारे बार, क्लब्ज, डिस्को. पण ‘मुंबई २४ तास’मध्ये या आस्थापनांना स्थानच देण्यात आलेले नाही. जिथे-जिथे मद्य विकले जाते त्या सर्व आस्थापनांसाठी अबकारी विभागाने (एक्साइज डिपार्टमेंट) ठरवून दिलेली रात्री दीडचीच मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे. दीडनंतर केवळ रेस्टॉरन्ट्स, दुकाने, सलोन्स उघडी ठेवता येतील. मल्टिप्लेक्सबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. रात्रपाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि मुंबई पाहायला आलेल्या पाहुण्यांची खाण्या-पिण्याची गैरसोय होणार नाही, आवश्यक वस्तू-सेवा त्यांना मिळतील एवढेच सध्या तरी या संकल्पनेचे स्वरूप आहे. त्यामुळे व्यसनाधीनता वाढेल, ही भीती फोल ठरते आणि ‘मुंबई २४ तास’ हे नामकरणही सध्या पुरते समर्पक ठरते. असे असतानाही, विरोधी पक्षाने सगळी चर्चा मद्यपान आणि पब संस्कृतीभोवतीच फिरत राहील याची काळजी घेतली.

भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शहर रात्रभर खुले राहिल्यास शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण होईल असा आक्षेप घेतला. राज पुरोहित यांनी तर या निर्णयामुळे निर्भयासारखी बलात्काराची प्रकरणे वाढतील, अशी टोकाची भीती व्यक्त केली. यात लक्षात घेण्यासारखा मुद्दा हा की राज्यात भाजपाची सत्ता असताना २०१७ मध्ये अशाच स्वरूपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या वेळी पोलिसांनी आक्षेप घेतल्यामुळे तो मागे घ्यावा लागला होता. त्या वेळी एका खासगी कंपनीकडून या संदर्भातला अहवालही मागवण्यात आला होता. मुंबईत नाइटलाइफला परवानगी मिळाल्यास देश-विदेशांतील पर्यटकांचा या शहरात राहण्याचा कालावधी आणि त्यांच्याकडून शहरात होणारा सरासरी खर्च वाढेल, असा अंदाज त्या अहवालात वर्तवण्यात आला होता. आता महाआघाडी सरकारने त्याच निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेताच सांस्कृतिक अध:पतनाची आवई उठवली जात आहे.

*  रेस्टॉरन्ट्स

मुंबई २४ तास खुली ठेवण्यास परवानगी तर मिळाली आहे, आता प्रश्न उद्भवतो तो प्रतिसादाचा. रात्रभर आस्थापना खुल्या ठेवणे कोणावरही बंधनकारक नाही, असे सरकारने म्हटले आहे. पण दुकाने, हॉटेल्स रात्रभर सुरू ठेवायची असतील, तर कामाची आणखी एक पाळी वाढवावी लागेल. तीन पाळ्यांमध्ये काम सुरू ठेवणे किती आस्थापनांना परवडेल, हा कळीचा मुद्दा आहे. यासंदर्भात ‘आहार’ या रेस्टॉरन्ट्सच्या संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी सांगतात, ‘मुंबई २४ तास खुली ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय स्वागतार्हच आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यावसायिकांना वेळेच्या बंधनांत अडकून न पडता हवा तेवढा वेळ व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. फक्त सुरुवातीला तरी अंमलबजावणीत काही अडथळे येतील. एक पाळी वाढवायची म्हणजे तेवढे कर्मचारी नेमावे लागतील. कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणाऱ्या खर्चाचा विचार करून त्या तुलनेत चांगला व्यवसाय होईल, असे ज्यांना वाटेल, ते व्यावसायिक रात्रीही रेस्टॉरंट्स खुली ठेवतील. कामाच्या दिवसांमध्ये रात्री फारसा प्रतिसाद मिळेल, असे वाटत नाही. शुक्रवार रात्रीपासून रविवार रात्रीपर्यंतच रेस्टॉरन्ट्स खुली ठेवणे फायदेशीर ठरेल, असे वाटते. पण केवळ विकेंडपुरते कर्मचारी मिळणे कठीण आहे. रोज रात्री ग्राहक येतील, असे भाग म्हणजे मोठय़ा रेल्वे स्थानकांचे परिसर. तिथे परगावांतून आलेल्या व्यक्तींची खाण्या-पिण्याची सोय होऊ  शकते, मात्र सध्या परवानगी दिलेल्या परिसरांत एकाही रेल्वे स्थानकाच्या परिसराचा समावेश नाही. दादर, सीएसटी, कुर्ला, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रेसारख्या स्थानकांच्या परिसरांत हॉटेल्स २४ तास खुली ठेवण्याची परवागनी मिळणे आवश्यक आहे.’

फूड ट्रकला मात्र संघटनेचा विरोध आहे. याविषयी आपले मत मांडताना शिवानंद शेट्टी सांगतात, ‘फूड ट्रक हे मुळातच पादचाऱ्यांच्या हक्कांवर आणि रेस्टॉरन्ट्सच्या व्यवसायावर अतिक्रमण आहे. परदेशांत जिथे नाइट लाइफ आहे, तिथेही रस्ते किंवा पदपथांवर खुर्च्या-टेबल मांडून पदार्थ वाढण्याची सोय नाही. फेरीवाल्यांकडून पदार्थ खरेदी करून चालता-चालता त्याचा आस्वाद घेता येतो, पदार्थ बांधून (पार्सल) नेता येतो. पण रस्त्यावर बसून खाण्यास परवानगी नाही. फूड ट्रकला परवानगी दिल्यास हे ट्रक कुठेही नेले जाण्याची आणि नियम पायदळी तुडवत व्यवसाय केला जाण्याची भीती आहे. त्यामुळे फूड ट्रकचा मुद्दा वगळता या निर्णयाचे स्वागतच आहे.’

*   फूड ट्रक

२७ जानेवारीपासून फूड ट्रक सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यासंदर्भातील निर्णय फेब्रुवारीत घेण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली आहे. जुहू आणि गिरगाव चौपाटी, बीकेसी, बँडस्टॅण्ड आणि नरिमन पॉइंटला एनसीपीएजवळ फूड ट्रक सुरू करण्याचे नियोजन आहे. रात्री १० ते पहाटे ६ वाजेपर्यंत ते खुले ठेवता येतील. प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त पाच ट्रक लावण्याची परवानगी दिली जाईल. दोन ट्रक दरम्यान किमान २० मीटर अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक ट्रकला फोल्ड करता येणाऱ्या १६ खुर्च्या मांडता येतील. मात्र त्यासाठी पदपथाची ४० टक्क्यांपेक्षा अधिक जागा व्यापता येणार नाही. फूड ट्रकमुळे स्वस्तात पेटपूजा शक्य होणार असली, तरी नियम पाळले जातात की नाहीत हे पाहणे, या साचणारा कचरा आणि होणारा गोंगाट यावर नियंत्रण ठेवणे ही पालिका आणि पोलिसांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

*   किरकोळ विक्रेते

किरकोळ विक्रेत्यांमध्ये या निर्णयाविषयी फारसा उत्साह नाही. रात्री दीडनंतर कितीसे ग्राहक खरेदी करायला येणार आणि त्यांच्यासाठी अख्खी एक शिफ्ट राबवणे कितपत शहाणपणाचे ठरणार, अशी साशंकता त्यांच्यामध्ये आहे. काही खास सवलती असतील, त्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळेल आणि तेव्हाच ‘मुंबई २४ तास’चा फायदा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

नाइटलाइफची चर्चा सुरू झाली तेव्हा अनेकांना डान्सबार बंदीपूर्वीची मुंबई आठवली. पण बार, पब्जना यातून वगळ्यात आले आहे. त्याविषयी बारबालांसाठी काम करणाऱ्या वर्षां काळे म्हणतात, ‘शहर २४ तास खुले राहिले तर रस्त्यांवर जाग राहील. बलात्कार, छेडछाडीची प्रकरणे वाढतील, असा आक्षेप घेतला जात आहे. पण हे प्रकार तर दिवसाढवळ्याही होतात. उलट शहरात रात्रीही रहदारी सुरू राहिली तर गुन्हेगारांवर थोडा वचक राहील. गुन्हे घडले, तरी लगेच निदर्शनास येतील आणि तक्रार नोंदवणे, मदत मिळवून देणे ही कामे जलद होतील. बेस्टने बससेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने उशिरापर्यंत बससेवा सुरू राहिल्यास नोकरीनिमित्त बाहेर पडलेल्या आणि शेवटची ट्रेन मिळू न शकलेल्या महिलांना घरापर्यंत पोहोचणे सोयीचे होईल. जागतिक दर्जाचे शहर हवे तर हे प्रयत्न केलेच पाहिजेत. बारसुद्धा दीडनंतर खुले ठेवावेत, अशी मागणी सध्या करणे योग्य नाही. आताशी या प्रकल्पाची सुरुवात झाली आहे, अशा स्थितीत यंत्रणांवरचा ताण वाढवणे चुकीचे ठरेल.’

जगभरातील अनेक शहरांत परदेशी पाहुण्यांना नाइटलाइफच्या माध्यमातून आपल्या देशाच्या सांस्कृतिक वैविध्याची, खाद्यसंस्कृतीची, वास्तुवैभवाची, कलांची ओळख करून दिली जाते. या माध्यामातून शहरांना प्रचंड महसूल मिळतो. पण तिथेही हे परिवर्तन रातोरात झालेले नाही. सुरुवातीला त्यांनाही मद्यपी, गर्दुल्ले, भुरटे चोर अशा समस्यांचा सामना करावा लागला. पण त्यांनी समस्या निर्माण होतील म्हणून रात्रजीवनावर बंधने घालण्याऐवजी त्याचे योग्य प्रकारे नियमन केले. जगभरातील अनेक महानगरांतील नाइटलाइफच्या नियमनासाठी पथदर्शी ठरले ते अ‍ॅमस्टरडॅम!

*   रात्रकालीन महापौर

अ‍ॅमस्टरडॅममधील रात्रकालीन महापौर (नाइट मेयर) ही संकल्पना इतर अनेक शहरांनी स्वीकारली. नाइटलाइफमुळे निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी २०१२ मध्ये मिरिक मिलान हे रात्रकालीन महापौर म्हणून पुढे आले. रात्रीच्या जगातल्या समस्यांचा अभ्यास करून सरकारला त्या सोडवण्याचे मार्ग सुचवण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. मद्यपी आणि गुन्हेगारांमुळे बेजार झालेले अमस्टरडॅमचे नाइटलाइफ सुस्थितीत आणले. रहदारीला शिस्त लावण्यापासून तक्रारी नोंदवण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यापर्यंतच्या सर्व सुविधा त्यांनी आपल्या कार्यकाळात उपलब्ध करून दिल्या.

यातून प्रेरणा घेऊन नंतर लंडन, पॅरिस, टोकियो, लॉस एन्जेलिस, सॅन फ्रान्सिस्कोसह अनेक महानगरांत रात्रकालीन महापौरपद निर्माण करण्यात आले. बर्लिनमध्येही सुरुवातीला गुन्हेगारी, अस्वच्छता, गोंगाट, अमली पदार्थाची विक्री, चोऱ्या अशा नाइटलाइफशी संबंधित अनेक समस्या होत्या. तिथे शहरात आलेल्या पाहुण्यांशी संवाद साधण्यासाठी, त्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी तरुणांचे गट तयार केले गेले. त्यातून या समस्या बऱ्याच प्रमाणात घटल्या.

नाइटलाइफसाठी सर्वाधिक प्रसिद्ध शहरांपैकी एक म्हणजे लंडन. मद्यपानाव्यतिरिक्तही अनेक पर्याय तिथे उपलब्ध आहेत. वेस्टएंड ‘थिएटर डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखले जाते. रात्रीच्या वेळी तिथे जाऊन नाटक पाहता येते. ‘सेरिमनी ऑफ कीज’ ही रात्रीच्या वेळी ‘टॉवर ऑफ लंडन’ कुलूपबंद करण्याची ७०० वर्षे जुनी परंपरा पाहण्याची संधी तिथे पर्यटकांना मिळते. खाद्यभ्रमंतीत सहभागी होता येते. लंडनचे विहंगम दृश्य दाखवणारा ‘लंडन आय’ तर सर्वानाच आकर्षित करतो. काही वस्तुसंग्रहालयेही रात्री खुली ठेवली जातात. इथल्या स्काय गार्डनला भेट देणे, ‘हॅरी पॉटर’ चित्रपटातील लोकेशन्स पाहणे, कॉमेडी शोचा आनंद घेणे असे अनेक पर्याय इथे उपलब्ध आहेत. त्यातील काही विनामूल्य आहेत. पॅरिसच्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी फेरफटका मारत आयफेल टॉवरचे सौंदर्य न्याहाळण्याचा आनंददायी अनुभव पर्यटक घेतात. कॅबरे शोसुद्धा पर्यटकांना आकर्षित करतात. आर्ट डेकोने सजलेल्या पूलमध्ये पोहण्याचा आनंद घेता येतो.

एखादे आशियाई शहर नाइटलाइफसाठी किती पर्याय उपलब्ध करून देऊ  शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हाँगकाँग. रेड लाइट एरिया आणि असंख्य क्लब्जच्या पलीकडेही हाँगकाँगमध्ये पाहण्यासारखे बरेच काही आहे. शहराच्या सौंदर्याचा पुरेपूर लाभ इथल्या रेस्टॉरन्ट्सनी घेतला आहे. शहराची झगमगती स्कायलाइन पाहता पाहता मद्याचा आस्वाद घेण्याची संधी अनेक आलिशान ‘पारदर्शी’ रेस्टॉरन्ट्सनी उपलब्ध करून दिली आहे. क्रूझमधून प्रवास करत वैशिष्टय़पूर्ण ठिकाणेही पाहता येतात. रात्री उशिरापर्यंत चित्रपटगृहे खुली ठेवली जातात. लास वेगासमधील नाइटलाइफ ही तर तरुणांसाठी पर्वणीच. संगीत, नृत्याच्या तालावर थिरकण्यासाठी अनेक तरुण पर्यटक या शहरात येतात. पट्टायातील ‘अल्काझार शो’ हेपर्यटकांसाठी खास आकर्षण आहे. आकर्षक वस्त्रे परिधान केलेल्या समलिंगी व्यक्तींचे नृत्यकौशल्य प्रेक्षणीय असते.

‘मुंबई २४ तास’ ही संकल्पना यशस्वी करायची असेल, तर अशाच स्वरूपाचे पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील. मुंबईच्या टोकाला असलेला राणीचा रत्नहार म्हणजेच मरीन ड्राइव्ह, गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट, रेल्वे मुख्यालय, मुंबई महापालिकेची इमारत, वांद्रे-वरळी सागरी सेतू अशी अनेक आयकॉनिक ठिकाणे पर्यटकांसमोर सादर करता येतील. त्याव्यतिरिक्त, जुहू, गिरगावसारख्या चौपाटय़ा, वांद्रे बँड स्टॅण्ड, वरळी सी फेस अशी ठिकाणेही पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करावी लागतील. दक्षिण मुंबईत ब्रिटिशकाळातील वास्तुवैभवाशी ओळख घडवून देणारे इंडो सारसेनिक- गॉथिक शैलीशी परिचय करून देणारे, भारतीय स्वातंत्र्यलढय़ाशी संबंधित ठिकाणांना भेट देऊन त्यांच्या इतिहासाची सफर घडवणारे, घारापुरी लेण्यांची माहिती देणारे हेरिटेज वॉक आयोजित करता येतील. दिवसा गजबजलेल्या रस्त्यांवर सायकलस्वारी त्रासाची ठरते. रात्रीच्या वेळी नरिमन पॉइंट ते वाळकेश्वर अशी सायकस्वारी आयोजित करता येईल. शहरात सीएसएमटी आणि वांद्रे येथे रंगभवन (खुला रंगमंच) आहे. तिथे गीत-नृत्याचे कार्यक्रम आयोजित करून वापरात नसलेल्या अशा खुल्या रंगमंचांना संजीवनी देता येईल. घारापुरी येथील गुंफांमध्ये पूर्वी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वतीने एलिफंटा महोत्सव आयोजित केला जात असे. भव्य लेणींच्या पाश्र्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम पाहाणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरत असे. विविध कारणांनी बंद पडलेले असे महोत्सव पुन्हा सुरू करून सर्वच वयोगटांतील पर्यटकांना आकर्षित करता येईल. शहरातील मॉल्समध्ये, समुद्रकिनारी स्थानिक कलाकारांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देता येईल. शहराला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. क्रूझ किंवा शिडाच्या बोटीतून समुद्रात जाऊन किनाऱ्यावर चमचमणारी मायानगरी पाहण्याचा अनुभव पर्यटकांना देता येईल. शहरातील अनेक खाऊगल्ल्या रोज हजारो कर्मचाऱ्यांची भूक भागवतात. त्या रात्रीही सुरू ठेवता येतील. तसे झाल्यास देशी पर्यटकही  मुंबईत एखाद-दोन रात्री मुक्काम करतील.

परदेशी पर्यटकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा आणि अनुभव मिळवून देणे हे मात्र मोठेच आव्हान ठरणार आहे. त्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सातत्याने करत राहणे अपरिहार्य ठरेल. सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करावी लागेल. स्वच्छतेचे मापदंड पाळण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. रेड लाइट, बार, क्लब, कसिनो संस्कृतीपासून दूर राहूनही ‘मुंबई २४ तास’च्या माध्यमातून परदेशी चलन भारतात आणायचे असेल, तर असे विविध पर्याय शोधावे लागतील. त्यामुळे दिवसा होणारी पर्यटकांची गर्दी विभागली जाऊ शकेल. त्यातून तरुणांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. गरजू विद्यार्थी सकाळी शिक्षण घेऊन रात्री उदरनिर्वाहासाठी काम करू शकतील.

शहराला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याची स्वप्ने पाहताना आपल्या सामाजिक मानसिकतेत थोडा बदल करणे आवश्यक आहे. स्थानिकांना स्वच्छता, स्त्री-पुरुष समता, आलेल्या पाहुण्यांचा आदर अशा अनेक सवयी अंगी रुजवाव्या लागतील. आपले वर्तन ही आपल्या देशाची प्रतिमा आहे, हे सतत लक्षात ठेवावे लागेल. सर्व यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून एकत्रितपणे काम केल्यास २४ तास शहराची संकल्पना नक्कीच लाभदायक ठरू शकते. रात्री कार्यरत असलेला कर्मचारी वर्ग, रहिवासी आणि रात्रीचा आनंद घेण्यासाठी येणारे पर्यटक यांच्यात सामंजस्य निर्माण होणे आवश्यक आहे. आपण सारेच एकमेकांवर अवलंबून आहोत हे त्यांच्या लक्षात आले की बरेच काम सोपे होईल.

  नियमावलीचे स्वरूप..

*   रात्री दीडनंतर मद्यविक्री करता येणार नाही. रात्री एकनंतर मद्य मागवता येणार नाही. ‘बार रात्री दीडनंतर बंद केला जाईल’ अशी सूचना ग्राहकांना सहज दिसेल अशा ठिकाणी लावावी लागेल.

*   रात्री दीड वाजल्यानंतर मद्य विकल्यास, संबंधित रेस्टॉरंटचा परवाना दोन वर्षांसाठी रद्द केला जाईल. मॉलला रात्री व्यवसाय करण्याची परवानगी कायमस्वरूपी नाकारली जाऊ  शकते.

*   रात्रभर आस्थापना खुल्या ठेवणे बंधनकारक नाही.

*   सध्या केवळ कंपाऊंड आणि फाटक असणाऱ्या आस्थापनाच रात्री खुल्या ठेवता येतील. अनिवासी भागांतील आस्थापनांनाच रात्री व्यवसाय करण्याची परवानगी आहे.

*   आस्थापनेने पालिकेच्या सर्व नियमांची आणि कागदपत्रांची पूर्तता केलेली असल्यास रात्री व्यवसाय करण्यासाठी कोणतीही वेगळी परवानगी घ्यावी लागणार नाही. सीसीटीव्ही असणे अनिवार्य आहे. पार्किंगची सोय करावी लागेल.

*   अंतर्गत सुरक्षेची व्यवस्था आस्थापनांनी स्वत:च करावी. पोलीस केवळ बाह्य़ परिसराच्या सुरक्षेकडे लक्ष देतील. पोलिसांची सुरक्षा हवी असल्यास, स्वतंत्र शुल्क भरावे लागेल.

*   ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची काळजी आस्थापनांना घ्यावी लागेल. आपल्या आवारात संगीताचे कार्यक्रम आयोजित करता येतील, मात्र त्यासाठी शुल्क आकारता येणार नाही.

२४ तास’ कुठे?

*   रात्रभर खुले राहणारे परिसर :

नरिमन पॉइंट, मरीन ड्राइव्ह, काळा घोडा, लोअर परेल, बीकेसी

*   फूड ट्रकची ठिकाणे (अंतिम निर्णयानंतर) : दादर, सीएसटी, कुर्ला, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वांद्रे.

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:01 am

Web Title: article on life of mumbai 24 hours abn 97
Next Stories
1 बदलत्या नियमांआडून राज्यात पाणथळी गायब
2 टिकटॉकचा धुमाकूळ
3 टिकटॉक चालते जोमात!
Just Now!
X