News Flash

संरक्षण : ऑपरेशन टायगरशार्क्‍स

कधी नव्हे ते दक्षिणेतील धडक कारवाईसाठी दक्षिण भारतात दोन सक्षम हवाई तळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(संग्रहित छायाचित्र)

विनायक परब

देशाचे संरक्षण म्हटले की, पूर्वी केवळ पाकिस्तानच आठवायचा, मात्र गेल्या २० वर्षांमध्ये परिस्थितीत मोठा बदल झाला असून त्यामुळेच यापूर्वी शांत राहिलेली पूर्व किनारपट्टी आणि दक्षिणेकडील हिंदूी महासागराचा प्रांत हा आता अतिशय संवेदनशील प्रदेश ठरला आहे. चीनच्या वाढत्या कारवाया हे त्याचे प्रमुख कारण. विस्तारवादी चीनची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बंगालचा उपसागर, हिंदूी महासागर आणि अरबी समुद्र अशा भारताच्या तिन्ही बाजूंना विविध कारवायांच्या माध्यमातून आक्रमक धोरण स्वीकारलेल्याचे दिसते आहे; या तिन्ही ठिकाणी समुद्रामध्ये चीनच्या नौदलाचा वावर खूप मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. भारतासाठी ही मोठीच डोकेदुखी ठरली आहे. त्याची दखल भारतीय नौदलाने घेतली असून त्यांनी त्यानुसार आपल्या सागरी मोर्चेबांधणीत काही महत्त्वपूर्ण असे बदलही केले आहेत. मात्र तरीही गरज होती ती काही मिनिटांच्या अवधीमध्ये या तिन्ही समुद्रांमध्ये धडक कारवाई करण्याच्या क्षमतेची. अर्थात, यासाठी भारतीय हवाईदलाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे कधी नव्हे ते दक्षिणेतील धडक कारवाईसाठी दक्षिण भारतात दोन सक्षम हवाई तळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यातील पहिला हवाई तळ तमिळनाडूमध्ये सुलूर येथे अस्तित्वात आला. तो स्क्वाड्रन क्रमांक ४५ म्हणून ओळखला जातो. त्याला ‘फ्लाइंग ड्रॅगर्स’ असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये पूर्णपणे भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान तेजस एमके१ चा समावेश आहे. मात्र चीनसारख्या आक्रमक देशाच्या छातीत धडकी भरवायची तर त्यासाठी ब्रह्मास्त्रच भात्यात असायला हवे, असा विचार पुढे आला आणि त्यानंतर बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर एकाच भरारीत गाठता येईल असे लष्करीदृष्टय़ा महत्त्वाचे ठिकाण म्हणून तंजावूरची निवड करण्यात आली. तंजावूरच्या या दक्षिणेतील दुसऱ्या महत्त्वाच्या तळाचे उद्घाटन अलीकडेच सोमवार, २० जानेवारी रोजी नवनियुक्त सरसेनाध्यक्ष जनरल बिपिन रावत यांच्या उपस्थितीत पार पडले. सध्या या तळावर केवळ सहाच सुखोई तैनात असली तरी वर्षभरात येथे १८ लढाऊ विमानांचे पूर्ण स्क्वाड्रन कार्यरत असेल. ब्राह्मोस हे सुपरसॉनिक क्रुझ वर्गातील क्षेपणास्त्र असून कोणत्याही वातावरणात एकाच वेळेस हवेतून समुद्रावर त्याचप्रमाणे हवेतून भूपृष्ठावर नेमका मारा करून लक्ष्यभेद करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. जगातील अतिशय अद्ययावत क्षेपणास्त्रामध्ये ब्राह्मोसचा समावेश होतो. तंजावूर येथील हा हवाई तळ स्क्वाड्रन क्रमांक २२२ म्हणून ओळखला जातो तर त्याचे टोपणनाव आहे टायगरशार्क्‍स! तंजावूरचे असलेले लष्करी महत्त्व आणि अद्ययावत ब्राह्मोसधारक सुखोई या दोन्हींचा मेळ साधल्याने हे संरक्षण क्षेत्रातील गेमचेंजर असेल, असा उल्लेख सरसेनाध्यक्षांनी केला, ते खरेच आहे. कारण अतिशय भेदक आणि प्रसंगी शत्रूच्या छातीत धडकी भरविणारे असा मेळ भारताने साधला आहे. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने हे अतिमहत्त्वाचे ठरेल. चीनने बंगालचा उपसागर किंवा हिंदी महासागरात कोणतीही आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास त्याला वेळीच अटकाव करण्यास त्यामुळे मदतच होईल. महत्त्वाचे म्हणजे तंजावूरच्या हवाई तळ निर्मितीसाठी २०२१ साल मुक्रर करण्यात आले होते. मात्र हिंदूी महासागरातील वेगात बदलणारी परिस्थिती पाहून हा तळ तातडीने कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सामरिकशास्त्रामध्ये हवाई प्रभुत्वाला एक वेगळेच महत्त्व असते. जमिनीवर प्रत्यक्ष पायी किंवा एखाद्या वाहनातून गस्त घातली जाते. सीमेवर सैनिक तैनात असतात. त्यांच्यामार्फत आपल्या सीमांचे रक्षण केले जाते. सागरामध्ये आपल्या हद्दीत गस्त घालून सागरी सीमांचे रक्षण केले जाते. आकाशातही अशाच प्रकारे एक काल्पनिक सीमारेषा अस्तित्वात असते. या आपल्या हद्दीतच नव्हे तर आपल्या प्रभावक्षेत्रामध्येही हवाई गस्त घातली जाते. शस्त्रसज्ज लढाऊ विमानांच्या साहाय्याने दर काही तासांनी अशी गस्त सुरू असते, त्यामुळेच शत्रूला जरब बसते. २०१७ साली बंगालच्या उपसागरामध्ये भारताने सुधारित सुखोईमधून ब्राह्मोसच्या माध्यमातून यशस्वी लक्ष्यभेद केला. त्यानंतर २०१९ मध्ये दुसरा यशस्वी लक्ष्यभेद करण्यात आला.

आजवर आपल्याकडे दक्षिणेत अशा प्रकारे हवाई गस्त घालण्यासाठी आणि कारवाई करण्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी सोय नव्हती. सुखोईचे हवाई तळ आदमपूर, हलवारा, सिरसा, बरेली, पुणे, तेजपूर आणि चाबुआ असे देशभरात विखुरलेले आहेत. या ठिकाणांहून हिंदूी महासागर गाठणे आणि तंजावूरहून गाठणे यात महद्अंतर आहे. म्हणूनच तंजावूरचा हा तळ कारवाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. गरजही अशाच प्रकारच्या हवाई प्रभुत्वाची होती. चिनी सागरी कारवायांना आता हवाई शह देण्याचा भारताचा प्रयत्न असेल!

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 1:20 am

Web Title: article on operation tigersharks vinayak parab abn 97
Next Stories
1 शब्दार्त : अतर्क्य लीला..
2 कृती पूर्वेकडे
3 भविष्य : दि. ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२०
Just Now!
X