विजया जांगळे

गेल्या वर्षभरात काही सवयी, संज्ञा, बातम्या, अफवा करोनापेक्षाही अधिक वेगाने व्हायरल झाल्या. आता लसी आल्या आहेत. आज ना उद्या आयुष्य पूर्वपदावर येईल, पण तरीही २०२०चे काही ट्रेण्ड्स २०२१ मध्ये आणि त्यापुढेही बराच काळ कायम राहतील..

एक साथ अनुभवली म्हणून आता आपण सर्व जण आयुष्यभर मास्क घालून फिरू, दुकानासमोर आखलेल्या वर्तुळात उभे राहू, शाळा-ऑफिस सारे काही कायमच घरी सुरू राहील, लोक परदेशात जाणार नाहीत, उघडय़ावर काही खाणार नाहीत.. असे होणे तर शक्य नाही. आता रुग्णांचे आणि मृतांचे आकडे घटले तरी आहेत, पण आकडे जेव्हा गगनचुंबी उंचीवर होते, तेव्हाही अनेकांचे मास्क केवळ शोभेपुरते होते, संधी मिळताच अनेक जण बाजारात ‘फेरफटका’ मारायला निघत होते, मॉर्निग वॉकच्या नावाखाली गप्पाष्टके भरवत होते आणि पूर्वीच्याच ‘ऐटीत’ सार्वजनिक ठिकाणी थुंकतही होते. त्यामुळे जेव्हाकेव्हा साथीचे भय संपेल तेव्हा बरेच काही पूर्ववत होईल, पण काही बदल मात्र बराच काळ रेंगाळतील. माणूस इतिहासातून काही ना काही शिकत असतो. ही प्रक्रिया काही वेळा तात्पुरती असते, अनेकदा अतिशय संथ आणि सूक्ष्म असते, पण ती सुरू असते.

जेवणाआधी हात धुवावेत, खोकताना- शिंकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा, पाणी उकळून गाळून प्यावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, उघडय़ावरचे किंवा एकमेकांचे उष्टे खाऊ नये, सार्वजनिक ठिकाणच्या पृष्ठभागांना शक्यतो स्पर्श करू नये असे बरेच काही अगदी लहानपणापासून आपल्याला शिकवले जाते. मोठे झाल्यावर आपण त्यातले किती सल्ले आचरणात आणतो आणि किती विसरून जातो, हा भाग अलाहिदा; पण यातल्या बऱ्याच आरोग्यविषयक सवयी, पद्धतींचा उगम इतिहासात येऊन गेलेल्या साथींमध्ये असावा. कोविडच्या साथीने केवळ आरोग्य क्षेत्रालाच हादरे दिले नाहीत, तर त्याबरोबरच आर्थिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांतही भूकंप घडवले. त्यामुळे या साथीनंतर एकूणच जीवनविषयक कल्पना काही प्रमाणात बदलतील. काळाच्या उदरात काय दडले आहे हे कोणालाच ठामपणे सांगता येऊ शकत नाही. (ज्यांनी २०२० अनुभवले ते हे कधीच अमान्य करणार नाहीत.) पण म्हणून त्यात डोकावूच नये असे नाही. दीर्घकाळ रेंगाळू शकतील अशा काही ट्रेण्ड्सचा वेध घेण्याचा प्रयत्न..

*  #वर्कफ्रॉमहोम, #वर्केशन

टाळेबंदीच्या काळात अनेक कंपन्यांतील कर्मचाऱ्यांनी एक-दोन दिवस नव्हे, तर महिनोन्महिने घरून काम केले. सुरुवातीला अनेकांना तांत्रिक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले, मात्र आता हा नवा प्रकार कंपनी आणि कर्मचारी दोघांच्याही अंगवळणी पडला आहे. त्यामुळे आजवर केवळ अपवादात्मक असलेले वर्क फ्रॉम होम मुख्य प्रवाहात येण्याच्या मार्गावर आहे. एखाद्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलात अवाच्या सवा भाडे भरून कार्यालयासाठी जागा घ्यायची, त्यात कर्मचाऱ्यांसाठी आसन व्यवस्था, संगणक, वातानुकूलन यंत्रणा, इंटरनेट, उपाहारगृह, स्वच्छतागृहादी सर्व सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, या सुविधांच्या देखभालीसाठी माणसे नेमायची, एवढय़ा सगळ्या उठाठेवीपेक्षा  कंपन्यांसाठी वर्क फ्रॉम होम फायद्याचे आहे. कर्मचाऱ्यांना घरूनच काम करायला सांगून या सर्व सुविधा मिळवण्याची आणि त्यांची देखभालही करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवरच सोपवणे सोयीचे आहे. कर्मचाऱ्यांचेही यात काही नुकसान नाही. सोमवार ते शुक्रवार किंवा शनिवार रोज सकाळी-संध्याकाळी ट्रेन, बसच्या गर्दीत उभे राहण्यापुरती जागा शोधत किंवा वाहनांच्या गर्दीतून आपल्या दुचाकी, चारचाकीसाठी वाट काढत, प्रदूषण, ऊन-पावसाचा सामना करत सरासरी तीन-चार तास प्रवासात घालवण्यापेक्षा आपल्याच घरात बसून शांतचित्ताने काम करणे कर्मचाऱ्यांसाठी सुखावह आहे. त्यामुळे साथ सरली, तरी हा ट्रेण्ड पुढे सुरू राहण्याची शक्यता आहे.

सरकारी किंवा कोणत्यातरी खात्रीशीर नोकरीत ‘चिकटायचे’ आणि आयुष्य म्हातारपणासाठी बचत करण्यात व्यतीत करायचे, ही जगण्याविषयीची संकल्पना गेल्या काही पिढय़ांनी मोडीत काढली आहे. आज बहुतेक तरुणांना नोकरीव्यतिरिक्तही आयुष्य असते, मित्र-मैत्रिणी असतात, त्यांना जग पाहायचे असते, विविध कौशल्ये आत्मसात करायची असतात, भरभरून अनुभव घ्यायचे असतात.  कितीही उत्तम पॅकेज मिळाले तरी आठवडय़ाच्या सहा दिवसांचे प्रत्येकी आठ तास ऑफिस नावाच्या एका खोलीत अडकून पडणे त्यांना झेपत नाही, पण साथीने त्यांना उत्तम नोकरी आणि मनासारखे आयुष्य यांचा मेळ घालण्याचा मार्ग दाखवला. अनेकांनी महिनाभरासाठी हिमालयातले एखादे कॉटेज किंवा निळाशार अथांग समुद्र दाखवणारी बाल्कनी असलेले गेस्ट हाऊस महिना- दोन महिन्यांसाठी बुक केले. कामाच्या वेळी काम आणि काम झाले की भटकंती, तिथले समाजजीवन जाणून घेणे, स्थानिक भाषा अवगत करणे, एखादी कला शिकणे याचा मेळ जुळून आला. येत्या काळात हा ट्रेण्ड रुजेल, त्यासाठी अनुकूल सुविधा देण्यासाठी टुरिझम आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री सज्ज आहेच.

बाकी छोटय़ा छोटय़ा मीटिंग्जसाठी विमानाच्या तिकिटांवर खर्च करून सर्व अधिकाऱ्यांना एकत्र गोळा करायचे, त्यांना राहण्या-खाण्या-मनोरंजनाच्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या, या सगळ्याच्या नियोजनासाठी माणसे नेमायची हे सारे खर्च आणि व्याप झूम आदी अ‍ॅप्सवरच्या बैठकांनी दूर केले आहेतच. त्याचा लाभ घेणेही साथ संपली, कार्यालये गजबजली तरी सुरूच राहील.

*  #ओटीटीरिलीज

चित्रपटाचा उत्तम दृक्-श्राव्य अनुभव घ्यायचा असेल, तर चित्रपटगृहाला पर्याय नाही, हे निर्विवाद! पण कोविडने मल्टिप्लेक्स आणि त्यावर आधारित संपूर्ण अर्थव्यवस्थाच बंद पाडली. एके काळी ‘ब्लॅक’मध्ये तिकीट खरेदी करून ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहिल्याचे किस्से रंगवून सांगितले जायचे. मल्टिप्लेक्स आली आणि त्यातले थ्रिल काहीसे कमी झाले. तेव्हा सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांची जी अवस्था होती, ती गेल्या काही महिन्यांत मल्टिप्लेक्सने अनुभवली. थिएटरशिवायही चित्रपट प्रदर्शित होऊ शकतात आणि त्यांची चर्चाही रंगू शकते, हे ओटीटीने दाखवून दिले. सगळेच चित्रपट काही ओटीटीवर प्रदर्शित करणे व्यवहार्य नाही, पण संसर्गाचे भय दूर झाले, चित्रपटगृहे पुन्हा गजबजली तरी अपरिहार्यतेतून पुढे आलेला ओटीटी रीलीजचा पर्याय भविष्यातही कायम राहील; कदाचित बाळसेही धरेल. बडय़ा बॅनरच्या बिग बजेट चित्रपटांसाठी जरी मल्टिप्लेक्सला पर्याय नसला, तरी लो बजेट चित्रपटांसाठी, नव्या निर्माता- दिग्दर्शकांसाठी मात्र हा उत्तम पर्याय ठरू शकेल. यातून ओटीटी आणि चित्रपट निर्माते या दोघांसाठीही काही नवीन रेव्हेन्यू मॉडेल्स विकसित केली जाऊ शकतील.

दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे टीव्ही बंद असला, तरी मनोरंजन सुरू राहू शकते आणि तेसुद्धा आपल्या विशिष्ट आवडी आणि सवडीप्रमाणे करवून घेता येऊ शकते, हे कळण्याच्या प्रक्रियेने टाळेबंदीच्या काळात वेग घेतला. रोज ठरल्यावेळी टीव्हीसमोर बसून त्याच- त्याच घासून गुळगुळीत झालेल्या मालिका पाहणे अंगवळणी पडलेल्यांसाठी या नव्या माध्यमाने खऱ्या अर्थाने विविधरंगी मनोरंजनाचा खजिना खुला केला. तरुणांबरोबर आई-बाबा, आजी-आजोबांची पिढीही आता नव्या वेबसीरिजवर चर्चा करताना आणि ओटीटीवर रीलीज होणाऱ्या चित्रपटांची वाट पाहताना दिसू लागली आहे. हा बदल आता कायमस्वरूपी टिकेल, वाढत जाईल. आपल्याशी जोडल्या गेलेल्या या नव्या वयोगटाच्या अभिरुचींचा विचार करून आशयनिर्मिती करण्याचा प्रयत्नही ओटीटीवर सुरू होईल.

*  #तंत्रस्नेहीज्येष्ठनागरिक, #ऑनलाइनशॉपिंग

वीज बिल, फोन बिल भरण्यासाठी रांगा लावणारे, बसल्याजागी होणाऱ्या कामांसाठी बँका-पोस्टात फेऱ्या घालत राहणारे, हाती स्मार्टफोन असला तरी कॉल घेण्या आणि करण्यापलीकडे त्याविषयी काहीही माहीत नसणारे ज्येष्ठ नागरिक आता घरी वाय-फाय कोणते लावायचे यावर चर्चा करू लागले आहेत. संसर्ग ऐन भरात असताना, दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा असताना, रिक्षा-टॅक्सी बंद असताना या ज्येष्ठांनी चिडचिड करत का असेना, पण ऑनलाइन शॉपिंग शिकून घेतले. दूर कोणत्या तरी शहरात घडणाऱ्या कौटुंबिक समारंभांना ऑनलाइन उपस्थिती लावली. ‘किती सोपे आहे हे!’ हा साक्षात्कार झालेली ही पिढी आता यापुढेही ऑनलाइन व्यवहार सराईतपणे करत राहील. अल्लाद्दीनचा जादूचा दिवा आता त्यांना गवसला आहे. त्यामुळे छोटय़ा छोटय़ा कामांसाठी नातवंडांना ‘बटर’ लावत बसण्याची गरज आता त्यांना उरणार नाही.

दुसरा एक बदल म्हणजे, आजवर फोन आणि अन्य गॅझेट्स, कपडे, पादत्राणे, अ‍ॅक्सेसरीज, पुस्तके अशा अनेक वस्तू आपण ऑनलाइन ऑर्डर करत होतो, पण अनेकांच्या वाणसामानाची यादी मात्र जवळच्या वाण्याकडेच जात होती. ठरलेल्या भाजीवाल्या मावशी आणि फळवाल्या काकांकडूनच भाज्या-फळांची खरेदी केली जात होती. टाळेबंदीत कोविड रुग्ण सापडलेल्या इमारती सील होऊ लागल्या, अनेक कुटुंबांना गृहविलगीकरणात राहावे लागले आणि अपरिहार्यतेचा भाग म्हणून भाज्या, फळे, धान्याची ऑनलाइन खरेदी सुरू झाली. साथकाळात झालेली ही सवय यापुढेही कायम राहील.

*  #डीअर्बनायझेशन

औद्योगिकीकरण सुरू झाले आणि जिथे कारखाने तिथे राहणे अपरिहार्य ठरले. गावाकडची ऐसपैस घरे, शेत आपली माणसे सोडून लोक पोट भरण्यासाठी अनेक तडजोडी करून शहरांत राहू लागले. शहरांतली गर्दी वाढली, जगणे महागले आणि जीवनाचा दर्जा मात्र खालावत गेला. पैसे कमावण्यासाठी रोज ऑफिसला जाणे गरजेचे नाही, हे साथीने निदर्शनास आणून दिले आहे. ऑफिसजवळ घर घेण्यासाठी आयुष्यभर कर्जबाजारी होणे, दाटीवाटीच्या परिसरातल्या लहानशा घरात राहणे, गर्दी-प्रदूषणाचा सामना करत रोज प्रवास करणे आणि त्यात आयुष्यातला अतिशय सर्जनक्षम काळ वाया घालवणे, आरोग्याला दुय्यम स्थानी ठेवणे नवी पिढी नाकारू शकते. शहरापासून लांब, आपल्याला हव्या त्या गावांत राहून तेवढेच उत्पन्न मिळवू शकते. असे झाले तर शहरांवरचे, तिथल्या पायाभूत सुविधांवरचे ओझे काही प्रमाणात का होईना हलके होईल. तो भार निमशहरी भागांत विभागला जाऊन तिथल्या पायाभूत सुविधांत सुधारणा होऊ शकेल.

*  #अत्यावश्यकसेवा

टाळेबंदीनंतर अनेकांच्या नोकऱ्या, व्यवसाय ठप्प झाले, शाळा-कार्यालये बंद पडली, अनेकांना घरी राहून काम करणे भाग पडले. पण एक वर्ग असा होता जो त्या भीतीच्या सावटातही जीव संकटात घालून कार्यरत होता. डॉक्टर, पोलीस, परिचारिका, वॉर्डबॉय, सफाई कामगार, बसचे चालक-वाहक, बँकांतले कर्मचारी, दुकानदार, भाजीवाले या साऱ्यांचे आपल्या आयुष्यात काय स्थान आहे हे या साथीने निदर्शनास आणून दिले. अगदी लहान-लहान गरजांसाठी आपण समाजावर किती अवलंबून आहोत, याची साथीने दिलेली जाणीव दीर्घकाळ सोबत राहील, राहायला हवी.

 

*  #शेजारधर्म

कोणत्याही संकुलात जा, रोज सकाळी घराला कुलूप लावून शाळा-कॉलेज, ऑफिस, पाळणाघर गाठणारी कुटुंबं दिसतात. दरवाजाला सकाळी लावलेले कुलूप रात्रीच उघडले जाते. बहुतेकांचा वीकेण्ड एक तर घरातली आठवडाभराची साचलेली कामे उपसण्यात आणि वेळ शिल्लक राहिलाच तर मॉल, मल्टिप्लेक्स, हॉटेल, शॉपिंग, गेटटुगेदरमध्ये जातो. शेजाऱ्यांच्या घरात बसून गप्पा मारण्याएवढा वेळ कोणाकडेच नसतो. अनेकांना तर आपल्या शेजारच्या घरात राहणाऱ्यांचे नावही माहीत नसते. ‘काही संबंधच नाही’, ‘कधी गरजच पडली नाही’, अशी त्यामागची कारणे असतात. साथीच्या काळात ज्यांच्यावर गृहविलगीकरणात राहण्याची वेळ आली त्यांना शेजारधर्माचा खरा अर्थ उमगला. भाज्या, फळे, दूध एवढेच नव्हे तर तयार जेवणाचे डबेही अनेकांनी या संकटात अडकलेल्या शेजाऱ्यांपर्यंत पोहोचवले. ज्यांची घरे रिकामी होती त्यांनी आपले घरही रुग्णांना खुले करून दिले. याच्या अगदी विरुद्ध टोकाचे अनुभवही अनेकांना आले. संपूर्ण इमारतीने वाळीत टाकण्यासारख्या अमानुष घटनाही घडल्या. पण आपण कितीही स्वयंपूर्ण असलो तरी समाजावर अवलंबून असतो, आपल्या आजूबाजूला कोण राहते हे जाणून घेणे, त्यांच्याशी परिचय करून घेणे, त्यांच्या सुखदुखात आपापल्या परीने सहभागी होणे आवश्यक आहे, याचे या साथीने रुजवलेले भान कायम राहील.

*  #छंद, #फिटनेस

आयुष्य सुंदर करण्यासाठी केवळ पैसा पुरेसा नाही. स्वतला वेळ देणे अतिशय आवश्यक आहे. एखादा छंद जोपासला, कलेची साधना केली तर रिकामा वेळही सहज सरतो, पोकळी भरून निघते हे उमगण्याएवढा वेळ या साथीने शर्यतीत धावणाऱ्या माणसांना दिला. काहींनी जिवंत राहण्यासाठी धावता धावता मागे राहून गेलेले अनेक छंद जोपासण्यास पुन्हा सुरुवात केली, तर काहींना आपल्यातली सर्जनशीलता प्रथमच गवसली. उत्तम आयुष्यासाठी निरोगी आणि तंदुरुस्त शरीर आवश्यक असल्याचे भान या साथीने दिले आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्या कलाकौशल्यांकडे, फिटनेसकडे, आहाराकडे खास लक्ष देणाऱ्यांचे प्रमाण काही अंशी तरी वाढेल.

*  #आत्मविश्वास, #शाश्वतता

उत्तम नोकरी, आलिशान घर, गाडी, परदेशी सहली, नवनवी उपकरणे, ब्रॅण्डेड कपडे अ‍ॅक्सेसरीज, उत्तमोत्तम रेस्टॉरन्ट्स आणि या सगळ्यांचे समाजमाध्यमांवरचे अपडेट्स याशिवाय आपण जिवंत कसे राहणार असे वाटण्याचा हा काळ. पण गेल्या वर्षभराने घराच्या चार भिंतीतले नाटय़, त्यातली पात्रे, त्यात रोज रंगणारे प्रयोग आणि यातून अगदी मोफत मिळणारे चिरंतन समाधान प्रत्येकाच्याच निदर्शनास आणून दिले. वरवरच्या, अल्पकाळ टिकणाऱ्या गोष्टी कोणत्या आणि आयुष्यभरासाठी पुरणारा आनंद कशात दडला आहे, हे उलगडून दाखवले. आपल्याबरोबरची, आयुष्याला पुरतील अशी भासणारी माणसे क्षणार्धात आयुष्यातून नाहीशी होऊ शकतात, याचे भान बराच काळ टिकेल. आपल्या माणसांसाठी वेळ काढणे आता सहजी पुढे ढकलले जाणार नाही. ही आजचा क्षण पुरेपूर जगण्याची वृत्ती बराच काळ साथ देईल. सर्वात महत्त्वाचा आहे तो आत्मविश्वास! नोकरी-व्यवसाय ठप्प झालेला असताना, घरापासून दूर एकटे असताना, परत घरी कधी जाता येईल हे माहीत नसताना, स्वयंपाक येत नसताना, विलगीकरणात असताना, श्वास घेणेही कठीण झाले असतानाही खेळ संपलेला नसतो.. तो जिंकता येऊ शकतो हा आत्मविश्वास आता पुढे बराच काळ पुरेल. पुढच्या अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी तो पुरेसा ठरेल.

response.lokprabha@expressindia.com