scorecardresearch

बदलती समीकरणे!

आशिया खंडातील समीकरणे आता वेगात बदलत आहेत, याचा प्रत्यय गेल्या महिन्याभरात संपूर्ण जगाला तेवढय़ाच वेगात आला.

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

आशिया खंडातील समीकरणे आता वेगात बदलत आहेत, याचा प्रत्यय गेल्या महिन्याभरात संपूर्ण जगाला तेवढय़ाच वेगात आला. बायडेन प्रशासनाने भारताचा समावेश अफगाणिस्तानच्या चर्चेत करण्यासाठी लिहिलेले पत्र असेल किंवा मग पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांना भारत- पाकिस्तान शांततेचा झालेला साक्षात्कार असेल, समीकरणे बदलताहेत हे निश्चितच! अर्थात असा साक्षात्कार होऊन समीकरणे बदलत नसतात, अनेकदा तशी परिस्थिती निर्माण होते किंवा परिस्थितीच भाग पाडते. पाकिस्तानच्या बाबतीत नेमके हेच झाले आहे. परिस्थितीने त्यांना भारताशी शांतीसलोखा करण्यास भाग पाडले आहे. कारण भारताशी सततचा संघर्ष पाकिस्तानला शब्दश परवडणारा नाही. जागतिक परिस्थितीमध्येही प्रामुख्याने अमेरिकेत नेतृत्वबदल झाला आहे. अर्थात पलीकडच्या बाजूस भारतासाठी हे सारे पथ्यावर पडणारे आहे. किंबहुना यामध्ये भारतासाठी अनेक नव्या संधी दडलेल्या आहेत. अफगाणिस्तानसंदर्भात होणाऱ्या अमेरिका-तालिबान चर्चेत भारतही असावा यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केले. मात्र त्याला अफगाणिस्तानमधील विद्यमान सरकारवगळता रशिया, चीन यांनी विरोधाच केला. मात्र आता बायडेन प्रशासन कणखर असल्याने त्यांचे ऐकण्याशिवाय पर्याय नाही. कारण काहीही का असेना, चर्चेतील भारताचा सहभाग आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा आहे. म्हणूनच अलीकडे पार पडलेल्या हार्ट ऑफ एशिया या चर्चेप्रसंगी भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी उपस्थित राहणे याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर अफगाणिस्तानामध्ये तात्पुरते शांती सरकार अस्तित्वात येईल, त्यानंतर निवडणुकाही होतील. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मध्यस्तीने होणाऱ्या चर्चेमध्ये रशिया, चीन, पाकिस्तान, इराण या अफगाणिस्तानशी सीमा लागून असलेल्या देशांसह भारतही सहभागी असेल. यापूर्वी भारताला या चर्चेतून वेगळे काढण्यात आले होते. शांती सरकारमध्ये तालिबानचाही समावेश असणारच आहे. चर्चेत अफगाणिस्तानच्या नव्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांबद्दलही सविस्तर चर्चा होणार आहे. ही सर्व तत्त्वे मान्य करावीच लागतील, अशी अमेरिकेची प्रमुख अट आहेच. अन्यथा आम्ही आहोतच इथे, अद्याप अफगाण भूमी आम्ही सोडलेली नाही, असा गर्भित इशाराही देण्यास अमेरिका विसरलेली नाही!

भारत ही आशिया खंडातील एक महत्त्वाची सत्ता आहे, असा संदेश अमेरिकेच्या या पत्राने जगाला दिला आहे. भारताने दरम्यानच्या काळात चीनची कोंडी करण्यासाठी घेतलेल्या ‘क्वाड पुढाकारा’चेही हे एक फलित आहे. बायडेन सत्तास्थानी आल्यामुळे भारतासाठी आता गोष्टी थोडय़ा सोप्या झाल्या आहेत. अफगाणी नागरिकांमध्ये भारताविषयी आत्मीयता आहे आणि भारताचे अफगाणिस्तानशी प्राचीन ऋणानुबंध आहेत. त्यामुळेच अफगाणिस्तानच्या नवनिर्माणामध्ये भारताचा लक्षात येईल असा सहभाग असणे आवश्यक आहे. भारतासाठी ही नामी संधी असणार आहे. शिवाय यानिमित्ताने भारतही प्रथमच तालिबानशी थेट चर्चेत सहभागी असेल आणि त्यांच्यातील सौम्य इस्लामी मूलतत्त्ववादी जे भारतासोबत या कामी काम करण्यास तयार असतील त्यांच्यासोबत मोट बांधता येईल. दहशतवादविरोधातील लढय़ासाठी ही चर्चा अतिशय महत्त्वाची असेल. हा तोच कालखंड आहे की, जेव्हा पाकिस्ताननेही शांततेसाठी हात पुढे केला आहे. अफगाणिस्तानच्या निमित्ताने आशियाई विकासास प्राधान्य देत पाकिस्तानचे येथील महत्त्व कमी करण्याची नामी संधीही भारतासाठी आता चालून आली आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवरही पाकिस्तानने दहशतवाद्यांचे कारखानेच जणू काही चालविले अशी स्थिती होती. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवायचे तर हीच नामी संधी आहे. अशी संधी परत मिळणे नाही. त्यामुळे आता भारताने डोक्याने खेळी खेळावी!

मराठीतील सर्व मथितार्थ ( Matitarth ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Asia india afghanistan pakistan china mathitartha dd

ताज्या बातम्या