आशियाई क्रीडा स्पर्धा या जरी क्रमवारीसाठी महत्त्वाच्या नसल्या तरी, त्यात सहभागी होणं हा देशाच्या सन्मानासाठी महत्त्वाचे असते. अशा प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या तयारीत मात्र आपला ढिसाळपणा दिसून येतो.

घरी शुभकार्याची लगबग उडालेली आहे. पाहुण्यांरावण्यांचा गोतावळा जमलेला आहे. मानपान, शिष्टाचार हे सगळं रीतीबरहुकूम व्हावं यासाठी ज्येष्ठा-श्रेष्ठांना सल्ला विचारला जातोय. बच्चेकंपनीचा धुडगूस एकीकडे सुरू आहे. आयुष्यात येणारा अनवट क्षण काही तासात अनुभवणार असणाऱ्यांच्या मनातही काहीतरी हलतंय.. कार्य परगावी असतं- त्यासाठी गाडय़ांची व्यवस्था केलेली असते. हा त्या गाडीत, तो त्या, याला मागे ठेवा, तो येईल त्याचा तो.. असे एक ना अनेक बेत- कोणी तरी लांबच्या आत्या येणार असतात. त्यांच्यासाठी खास माणूस पाठवला जातो. हे सगळं एखाद्या लग्नघरातलं वर्णन वाटतंय ना? मंडळी, तुमचा कयास बऱ्यापैकी बरोबर आहे, पण सगळा नाही. कार्य शुभ आहे खरं, पण ते लग्न नाही तर ती आहे आशियाई क्रीडा स्पर्धा.
कार्य दूरच्या गावात हा तुमचा अंदाज एकदम अचूक- पार दक्षिण कोरियातल्या इन्चॉन येथे. आपण कुणी कधी पाहिलं अथवा ऐकलंही नाही हे नाव आणि गावही. आता अनामिक हुरहुर, पोटात फुलपाखरं वगैरे जे काही म्हणतात असं होणारी ६७९ मंडळी रवाना होत आहेत. कोणी खूप आधी किंवा कोणी समीप घटिकेला. बरं ही एवढी सहाशेच्या वर मंडळी, पण प्रत्येकाचा पक्ष वेगळा- कारभार वेगळा. आता पक्ष म्हटल्यावर एकदम कान टवकारू नका. निवडणुका आल्या आहेत जवळ, पण तो पक्ष नाही. यांचा पक्ष एकच खेळणे. आणि कारभार आपापल्या खेळांचा. कार्य सिद्धीस नेण्यास आशियाई कौन्सिल समर्थ आहेच, पण तरीही आपण नारायणरूपी फौज घेतली आहे. एकदम तय्यार अशी. पण तुम्ही म्हणाल यात गोंधळ कुठं दिसत नाही, जाणवत नाही. अहो, साहजिक नाही ते, कोणी परक्याला सांगतं का घरातलं भांडणतंटा. तिकडे इन्चॉनमध्ये बिगुल वाजलं, हत्तीवरून साखर वाटून झाली तरी आपलं म्हणजे भारताचं कोण जाणार हेच ठरलेलं नव्हतं. नुसता पुख्खा झोडणाऱ्यांना नेण्यापेक्षा काही लागलं-सवरलं तर कामाला येतील अशांनाच नेणार ठरवलं. तेव्हा कुठं ९३५ चा आकडा ६३५ वर आलाय. उगाच नाही म्हटलं मोठं कार्य काढलंय म्हणून.
ऑलिम्पिकनंतरची सगळ्यात मोठी क्रीडा स्पर्धा एवढा मान आशियाई क्रीडा स्पर्धेला आहे. ‘एशियाड’ या नावानेही ही स्पर्धा ओळखली जाते. एसटीची एशियाड बस सेवा, अप्पू, रंगीत टीव्ही अशा आपल्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टींशी निगडित गोष्टींची मुहूर्तमेढ या स्पर्धेनेच रोवली आहे. विशेष म्हणजे पहिलीवहिली आशियाई क्रीडा स्पर्धा १९५१ साली भारतातच झाली होती. त्यामुळे आपणच रुजवलेल्या अंकुराचं अजानबाहू पसरलेल्या भल्याथोरल्या वृक्षात झालेलं रूपांतर अनुभवण्याचा हा क्षण. ऑलिम्पिक अवाढव्य असतं. जगाच्या कानाकोपऱ्यांत पसरलेल्या क्रीडापटूंमध्ये सर्वोत्तमाचा मुकाबला रंगतो ते ऑलिम्पिक. मात्र क्रीडाविश्वाच्या पंढरीत सगळ्यांनाच जाणं जमतं असं नाही. ऑलिम्पिकच्या भव्यतेचं प्रतिरूप म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धा. सात खंडांपैकी एका खंडप्राय पसरलेल्या आशिया या तीन अक्षरी शब्दांत सामावलेल्या विस्तीर्ण परिघातील क्रीडापटूंचा कुंभमेळा. प्रतिरूप आहे त्यामुळे ही स्पर्धाही चार वर्षांनी होते. शेवटची चीनमधल्या गुआंगझाऊ येथे झाली होती आणि आता दक्षिण कोरियात.
क्रिकेटचा महापूर असलेल्या भारताच्या दृष्टीने या स्पर्धेचं महत्त्व समजून घ्यायला हवं. अभिनव बिंद्राच्या ऑलिम्पिक सुवर्णपदकानंतर क्रिकेटोत्तर खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. सायना नेहवाल, सानिया मिर्झा, लिएण्डर पेस, गगन नारंग, राही सरनोबत, विजेंदर सिंग, सुशील कुमार, मेरी कोम या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम अभिनवच्या सुवर्णपदकाने केलं. अभिनवच्या सुवर्णपदकाआधीपासून हे सगळे खेळ भारतात खेळले जात होतच, मात्र त्यांची ओळख, प्रचार आणि प्रसार सगळ्याला मर्यादिततेची खीळ बसलेली. बाजारपेठा क्रिकेटने व्यापलेल्या, प्रायोजक क्रिकेटपटूंच्या मागे आणि या सगळ्यापेक्षाही मोठं ते म्हणजे क्रिकेटपटूंना असलेला अफाट लोकाश्रय. हे चित्र एका रात्रीत बदलणं शक्य नव्हतं. अभिनवच्या यशाने एक ठिणगी पेटली. क्रिकेट सोडूनही खेळ आहेत, जगातले अन्य देश हे खेळ खेळत आहेत, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा अशा स्पर्धाच्या निमित्ताने या खेळांतले सर्वोत्तम नैपुण्य जगासमोर येतं. हे समजून घेण्याची प्रक्रिया अभिनवने सुरू करून दिली. टीव्हीच्या आक्रमणाने अन्य खेळ पाहायचे असतात, त्यांचीही मजा लुटायची असते ही शिकवणी झाली. या विचार संक्रमणामुळे काही वर्षांपूर्वी आलेले-गेलेले पुरत्या सीमित स्पर्धा आपल्याला राष्ट्रीय प्रतिष्ठेच्या वाटू लागल्या आहेत. २०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक झालं. त्यात आपण पदकं मिळवली. पदकांची संख्या किती यापेक्षाही आपण जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंना टक्कर देऊ शकतो हे सिद्ध झालं. पुढचं ऑलिम्पिक ब्राझीलमधल्या रिओ दी जानिरो येथे होणार आहे. या चार वर्षांत दोन महत्त्वाची जंक्शन्स लागणार आहेत. एक नुकतंच लागलं- राष्ट्रकुल स्पर्धेचं. आणि दुसरं या आठवडय़ात सुरु होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेचं.
कुठल्याही मोठय़ा स्पर्धेची तयारी खूप आधीपासून सुरू होते. पण लालफितीच्या कारभारामुळे स्पर्धा चार-पाच दिवसांवर आलेली असतानाही आपले कोण खेळाडू आणि पदाधिकारी जाणार हेच निश्चित झालेलं नव्हतं. क्रीडा मंत्रालय, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि विविध राष्ट्रीय क्रीडा संघटना यांच्या समन्वयाने संघाची निवड केली जाते. मात्र हे सगळं शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच होतं. शेवटच्या वृत्तानुसार ५१६ खेळाडू आणि १६३ प्रशिक्षक आणि पदाधिकारी असा मोठा ताफा भारताने पाठवण्याचं निश्चित केलं आहे. प्रत्येक खेळाचं आंतरराष्ट्रीय स्पर्धाचं वेळापत्रक अतिशय व्यस्त असतं. या स्पर्धेतील कामगिरीनुसार क्रमवारीत आगेकूच किंवा पीछेहाट होते. आशियाई स्पर्धा हा या वेळापत्रकाचा भाग नाही, त्याद्वारे क्रमवारीचे गुणही मिळणार नाहीत. मात्र काही गोष्टी देशाप्रति सन्मान या सदरात मोडतात. आशियाई क्रीडा स्पर्धा ही याच सदरात मोडणारी. सर्वोत्तम प्रदर्शन कोणाला करता आले यापेक्षा पदक कोणी पटकावलं याकडेच सामान्य क्रीडारसिकाचं लक्ष असतं. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आपण ६४ पदकांसह तालिकेत पाचवं स्थान पटकावलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने बलाढय़ चीन समोर उभा ठाकला आहे. त्यांच्या जोडीने आशियाई खंडात क्रीडा क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अन्य देशांचं आव्हानही भारतासमोर आहे. त्यामुळे मुकाबला सोपा नक्कीच नाही.

तिरंदाजी
ऐतिहासिक वारसा लाभलेला हा खेळ. प्रसिद्धी, चकमकाटापासून दूर सरावात मग्न असणारे आपले तिरंदाज या स्पर्धेच्या निमित्ताने प्रसिद्ध होऊ शकतात. अत्यंत सामान्य परिस्थितीतून अनोखी भरारी घेणारी दीपिका कुमारी सध्या खराब फॉर्मशी झगडताना दिसते आहे. मात्र महिनाभराच्या विशेष सराव शिबिरानंतर नव्या दमाने प्रतिस्पध्र्याचा सामना करण्यासाठी ती सज्ज झाली आहे. तिरंदाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई देशांचेच वर्चस्व आहे. या वर्चस्व गाजवणाऱ्यांच्या यादीत आपला समावेश होतो का हे पाहणे रंजक ठरणार आहे.
बॅडमिंटन
सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू यांच्यातली निकोप स्पर्धा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. भारतीय बॅडमिंटनला चेहरामोहरा मिळवून देण्याचे काम सायनाने केले. लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या सायनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण प्रदर्शन करत भारताचा झेंडा रोवला आहे. भारताची फुलराणी ही बिरुदावली पटकावणाऱ्या सायनाच्या कामगिरीत लंडन ऑलिम्पिकनंतर मात्र मोठी घसरण झाली आहे. ढासळता फॉर्म आणि दुखापतींचा ससेमिरा यामुळे सायनाला सुपरसीरिज स्पर्धेचे जेतेपद पटकावता आले नव्हते. यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर करत सूर गवसल्याचे संकेत दिले. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेतून तिने दुखापतीमुळे माघार घेतली तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतच तिला गाशा गुंडाळावा लागला. सायनाच्या यशात प्रशिक्षक गोपीचंद यांची भूमिका निर्णायक आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी बदल म्हणून सायनाने बंगळुरू येथील प्रकाश पदुकोण यांच्या अकादमीत विमल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्याचा निर्णय घेतला. हा बदल सायनाचे नशीब बदलवणार का, हा खरा प्रश्न आहे. सायनाची घसरण होत असतानाच गोपीचंद यांचीच शिष्या पी. व्ही. सिंधूने जागतिक अजिंक्यपद आणि राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदकासह आपल्या नावाची मोहोर उमटवली आहे. एकोणीस वर्षीय सिंधूने चीनच्या खेळाडूंची मक्तेदारी मोडत स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनसह इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड असे एकापेक्षा एक देशांच्या खेळाडूंचे आव्हान समोर असणार आहे. एका पर्वाचा अस्त दुसऱ्या पर्वाची रुजुवात असते. या स्पर्धेच्या निमित्ताने सायना का सिंधू याचा फैसला होणार आहे. पुरुष खेळाडूंमध्ये गुणवत्ता निश्चितच आहे, मात्र त्यांच्या कौशल्याला सातत्याची जोड देण्याची गरज आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या कश्यपवर भारताच्या आशा केंद्रित झाल्या आहेत. अनुभवी ज्वाला गट्टाने दुखापतीमुळे माघार घेतली असल्याने दुहेरीत आपले आव्हान कमकुवत झाले आहे.
नेमबाजी
पदकांचा आधारवड असलेला हा खेळ. प्रत्येक व्यक्तीचा एक हक्काचा माणूस असतो. अडीअडचणीच्या वेळी, बऱ्या-वाईट प्रसंगात हा व्यक्ती नेहमीच धावून येतो. एरवीही तो त्याचं काम इमानेइतबारे करतच असतो. पदकांसाठी नेमबाजी हा असा हक्काचा आधार आहे. जागतिक स्तरावर आपले नेमबाज सातत्याने चांगली कामगिरी करत असतात. हाच फॉर्म त्यांनी या स्पर्धेतही कायम राखावा अशी आशा आहे. क्रिकेटेत्तर खेळांना ओळख मिळवून देणाऱ्या अभिनव बिंद्राची ही शेवटची आशियाई क्रीडा स्पर्धा असण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर शेवट गोड करण्यासाठी अभिनव उत्सुक आहे. रिओ ऑलिम्पिकवारी थोडक्यात हुकलेला गगन नारंग आशियाई खंडात प्रभुत्व गाजवण्यासाठी आतुर आहे. गेल्या वर्षभरात पिस्तूल नेमबाजीत देदीप्यमान कामगिरी करणारा जितू राय भारताचे आशास्थान आहे. महिलांमध्ये कोल्हापूरची राही सरनोबत ग्लासगोप्रमाणे इन्चॉनमध्येही पदक पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. नुकत्याच स्पेनमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत राहीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. हाताला झालेल्या गंभीर दुखापतीतून ती पूर्णपणे सावरलेली नाही, मात्र तरीही तिच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. शाळा सोडून नेमबाजीचा ध्यास घेतलेली सोळावर्षीय मलायका गोएल आणि पिस्तूल प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कमावणारी आणि मुंबईकर हिना सिद्धू हेही पदकाचे संभाव्य दावेदार आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून नेमबाजीत संक्रमण पाहायला मिळणार आहे. बिंद्रा-नारंग या अनुभवी खेळाडूंच्या बरोबरीने युवा खेळाडू जबाबदारी पेलण्यासाठी सिद्ध होताना दिसत आहेत.
टेनिस
आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहे, त्याच काळात आंतरराष्ट्रीय टेनिसच्या महत्त्वपूर्ण स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेद्वारे क्रमवारी गुण मिळवण्यासाठी भारतीय टेनिसपटू उत्सुक आहेत. आशियाई स्पर्धेत देशासाठी पदक पटकवायचे का वर्षअखेरीस होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी अन्य स्पर्धात सहभागी व्हायचे अशा द्विधा मन:स्थितीत भारतीय टेनिसपटू अडकले. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अमेरिकन ओपन स्पर्धेत सानिया मिर्झाने मिश्र दुहेरीचे जेतेपद पटकावले. क्रमवारी गुणांसाठी आशियाई स्पर्धेतून माघार घेण्याचे संकेत दिले होते. मात्र जनभावनेचा आदर करत, क्रमवारीच्या ९०० गुणांवर पाणी सोडत तिने आशियाई स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा स्पर्धेत खेळणार नाहीत. पेससारखा अनुभवी योद्धा नसल्याने टेनिसमधल्या हमखास पदकाची शक्यता मावळली आहे.
बॉक्सिंग
खेळाच्या विकासासाठी, खेळाडूंचं हित जपण्यासाठी संघटनेची आवश्यकता असते. मात्र बॉक्सिंगच्या बाबतीत सगळेच फासे उलटे. जागतिक बॉक्सिंग महासंघाने भारतीय बॉक्सिंग संघटनाच बरखास्त केलेली. प्रशासकीय तिढय़ात अडकल्याने भारतीय बॉक्सिंगपटूंना स्वतंत्र झेंडय़ाखाली खेळावं लागत होतं. आपले बॉक्सर जागतिक स्तरावर उत्तम कामगिरी करूनही त्यांची पाठराखण करायला कोणीच नाही अशी स्थिती होती. खेळात नको त्या शक्तींचा शिरकाव झाला की काय दुर्दशा ओढवू शकते याचा प्रत्यय गेल्या वर्षभरात आला. बॉक्सिंगपटूंच्या सुदैवाने हा तिढा काही दिवसांपूर्वीच सुटला आणि सनदशीर मार्गाने भारतीय बॉक्सिंग संघटनेची कार्यकारिणी तयार झाली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय महासंघाच्या नियमावलीनुसार ही सगळी प्रक्रिया झाली. यानंतरही भारतीय बॉक्सिंगपटूंना तिरंग्याचं प्रतिनिधित्व करता येईल का, याबाबत साशंकता होती. मात्र तूर्तास तरी स्पर्धेतला त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. अखिल कुमार, मनोज कुमार, शिवा थापा, देवेन्द्रो सिंग यांच्यासह पाच वेळा विश्वविजेती मेरी कोम यांच्यावर भारताची भिस्त आहे.
स्क्वॉश
भारतीय क्रीडा क्षेत्राला ग्लॅमर मिळवून देणारी गोल्डन गर्ल दीपिका पल्लिकलकडून भारताला अपेक्षा आहेत. नियमाला बगल देऊन उपांत्यपूर्व फेरीत भारताच्याच दीपिका पल्लिकल आणि जोस्ना चिनप्पा आमनेसामने येणार आहेत. या अजब प्रकारामुळे भारताचे हक्काचे पदक हिरावले गेले आहे. या प्रकाराने निराश झालेली दीपिका पल्लिकलने माघार घेण्याचे संकेत दिले होते. मात्र अखेर तिने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक क्रमवारीत सोळाव्या स्थानी असलेला सौरव घोषालची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे.
अॅथलेटिक्स
आपण बरं नि आपलं काम बरं या न्यायाने वागणारी ही मंडळी. बाकी खेळांप्रमाणे या खेळाडूंना प्रसिद्धी मिळत नाही. मात्र तरीही ट्रॅकवर घाम गाळणाऱ्या या खेळाडूंकडून भारताला पदकाची खात्री आहे. विकास गौडा, टिंटू लुका, प्रीजा श्रीधरन, अश्विनी अकुंजी, मुंबईकर सिद्धान्थ थिंगाल्या हे सगळेच गेले महिनाभर कसून सराव करीत आहेत. त्यांच्या मेहनतीला इन्चॉनमध्ये पदकरूपी फळ मिळावं अशी इच्छा आहे.
हॉकी
राष्ट्रीय खेळ असूनही हॉकीची होणारी परवड दुर्दैवी अशी आहे. प्रशिक्षक आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचा प्रचंड ताफा असूनही हॉकी संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. एके काळी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवशाली पर्व असणारा भारतीय हॉकी संघ किमान आशियाई स्तरावर मूलभूत कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. महिला हॉकी संघ पुरुषांच्या तुलनेत चांगली कामगिरी करीत आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने नारी शक्तीला श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची संधी आहे.
फुटबॉल
शनिवार-रविवारी इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा स्पर्धेचे सामने पाहणं एवढीच भारतीय फुटबॉल रसिकांची या खेळाशी सलगी. जागतिक क्रमवारीत भारताचं स्थान चिंताजनक वाटावं असं आहे, मात्र आशियाई स्तरावर पुरुष आणि महिला संघांना सन्मान कमावण्याची संधी आहे.
कबड्डी
हमखास पदकाची संधी असलेला हा खेळ. मातीतला खेळ म्हणून संभावना होणाऱ्या कबड्डीला प्रो-कबड्डी स्पर्धेने नवा आयाम मिळवून दिला. बॉलीवूड तारे-तारकांपासून कॉर्पोरेटपर्यंत सर्वाना भुरळ पाडणारी कबड्डी आशियाई स्पर्धेत पदकाचा हुकमी एक्का आहे.
वेटलिफ्टिंग
आपल्या वजनापेक्षा कैक पटींनी जास्त वजन उचलणं ही अगदीच कष्टप्रद गोष्ट. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टिंगपटूंनी सुरेख कामगिरी केली आहे. सुखेन डे, सतीश शिवालिंगम, खुमकचाम संजिता चानू, सईखोम मीराबाई चानू हे सगळे पुन्हा एकदा पदकाच्या शर्यतीत आहेत.
कुस्ती
प्रतिस्पध्र्याना चीतपट करणाऱ्या युवा मल्लांचा चमू भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे. सुशील कुमारच्या अनुपस्थितीत योगेश्वर दत्त हा अनुभवी खेळाडू नेतृत्व करीत आहे. अमित कुमार, बजरंग कुमार, नरसिंग यादव यांच्यासह विनेश फोगट, बबिता कुमारी या महिला कुस्तीगीर आशियाई स्तरावर दबदबा राखण्यासाठी तय्यार आहेत.
अन्य
टेबल टेनिसचा दहासदस्यीय संघ आपलं नशीब अजमावणार आहे. या खेळातलं आशियाई देशांनी प्रभुत्व राखलं आहे. मात्र भारतीय संघासमोरचं आव्हान खडतर आहे. हैदराबादमध्ये सराव केंद्र असणाऱ्या रोइंगपटूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. या स्पर्धेतले काही खेळ आशियाई परिघातच खेळले जातात. सिपॉकटेकरॉ, ज्युदो, वुशू ही त्याची काही उदाहरणं. याव्यतिरिक्त जिम्नॅस्टिक्स, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण यांमध्ये ठसा उमटवण्याची भारताला संधी आहे.