क्रिकेट हा खेळ नव्हे तर धर्मच असलेल्या आपल्या देशात आता इतर खेळांचंही महत्त्व वाढायला लागलं आहे, हे इन्चॉनमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धामधल्या पदकांच्या कमाईवर नजर टाकली की लक्षात येतं.
आपण १९८३ साली क्रिकेट विश्वचषक जिंकला, त्यानंतर आपल्याकडे क्रिकेटची पाळंमुळं रुजायला सुरुवात झाली. नाही तर पूर्वी साहेबांचा खेळ एवढेच काय ते आपल्याला माहीत होतं. काही वर्षांपूर्वी देशामध्ये क्रिकेटचे स्तोम एवढे वाढलेले होते, की भारतात फक्त क्रिकेटच खेळले जाते, असा क्रीडा विश्वामध्ये समज होता. हा समज दूर व्हायला सुरुवात झाली ती बीजिंगमधल्या ऑलिम्पिक पदकांपासून. त्यानंतर भारताची पदके वाढत गेली आणि नवीन खेळांमध्ये भारत चमकायला लागला. नवी आशा आणि नवी उमेद पदकांची झोळी भरू लागली. पण त्यापूर्वी भारताने हॉकीमध्ये सुवर्णलूट केली होती. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक कांस्य भारतात आणले होते. त्याचबरोबर आशियाई खेळांमध्येही आपली बरी कामगिरी होत होती; पण सध्या जर का इन्चॉनमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेवर नजर टाकली, तर एक गोष्ट दिसून येते आणि ती म्हणजे भारत नवीन खेळांमध्ये पदके मिळवायला लागला आहे, अजिंक्यपदाच्या जवळपास पोहोचायला लागला आहे.
पूर्वी नेमबाजी, कुस्ती, बॉक्सिंग, अॅथलेटिक्स, टेनिस असे काही बोटांवर मोजण्याइतके खेळ सोडले तर बाकीचे खेळाडू फक्त परदेशवारीला जात असल्याची टीका होत होती; पण आताचे चित्र सकारात्मकरीत्या बदलले आहे. मुळात आपली, सरकारची या खेळांकडे पाहायची दृष्टी बदलली आणि त्यामुळेच या खेळांची सुधारणा होताना दिसते. दहा वर्षांपूर्वी स्क्वॉश, कनॉइंग हे खेळ किती जणांच्या ओठांवर होते, किती जणांना ते माहीत होते. संख्या फारच कमी असेल. पण आता या खेळांमध्येही भारत पदक पटकावू लागला आहे, पदकांची नवी आशा निर्माण करू लागला आहे आणि त्यामुळेच भारताला काही ठरावीक खेळांवर पदकांसाठी विसंबून राहण्याची गरज नक्कीच नाही. नाही तर पूर्वी काही खेळ सोडल्यास भारताची गणती कशामध्येच नव्हती; पण आता भारताने या नवीन खेळांमध्ये आपली जागा निर्माण करत सर्वानाच दखल घ्यायला लावली आहे.
प्रत्येक गोष्टीमागे काही गोष्टी असतात, तशा या स्क्वॉशच्या प्रगतीच्या मागेही काही गोष्टी नक्कीच आहेत. भारताच्या या देदीप्यमान यशामागे सायरस पोंचा यांच्या चेन्नईतील अकादमीचा मोलाचा वाटा आहे. कारण या अकादमीने सौरव, महेश, हिरदरपाल सिंग, दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पासारखे हिरे घडवले आहेत. मलेशियाचे मेजर मनिआम यांच्या मार्गदर्शनाखाली या साऱ्यांनी स्क्वॉशचे धडे गिरवले असून आता यापुढे या खेळाला अजूनही मोठी मजल मारायची आहे.
खेळाला मोठी मजल मारायची असेल तर संघटना बळकट असायला हवी. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचे बंधू एन. रामचंद्रन हे बरीच वर्षे भारतीय संघटनेवर होते. या वेळी त्यांच्यावर खेळाडूंना संधी देत नसल्याचे आरोप झाले, पण त्यांचे काहीच बिघडले नाही. उलटपक्षी, खेळ आणि खेळाडूंना उपेक्षित ठेवणाऱ्या रामचंद्रन यांची जागतिक संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, यासारखे दुर्दैव कोणते असू शकेल. खेळासाठी आवश्यक पायाभूत सुविधा संघटनेला उभारता आल्या नाहीत, त्यामुळेच खेळाडूंना दुसऱ्या देशात, राज्यात जाऊन सराव करावा लागतो. त्यासाठी संघटना काहीच करताना दिसत नाही, फक्त खेळाडूंनी पदक जिंकल्यावर त्यांच्याबरोबर छायाचित्रे काढायला सारेच पुढे पुढे करत असतात.
यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारताला अजून एका खेळाने सुखद धक्का दिला आणि तो खेळ म्हणजे कनॉइंग होय. नौकानयन या खेळामध्ये भारताने साफ निराशा केली. गेल्या आशियाई स्पर्धेत भारताने एक सुवर्ण, तीन रौप्य आणि एका कांस्यपदकाची कमाई केली होती; पण यंदा मात्र भारताला तीन कांस्यपदकेच पटकावता आली. पण कनॉइंगसारख्या नव्या प्रकारामध्ये मात्र भारताने पदकाची आशा निर्माण केली. इन्चॉनमध्ये जाऊन भारतीय संघाने विदेशी बोटी विकत घेतल्या आणि याचा त्यांना चांगलाच फायदा झाला. रविवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यांमध्ये तब्बल सहा स्पर्धकांनी अंतिम फेरीत धडक मारत पदकांची आशा निर्माण केली होती.
अश्वारोहण हा तसा जुनाच खेळ. देशामध्ये घोडय़ांच्या शर्यती आपण पाहिल्या आहेत, त्याच धर्तीवर स्पर्धात्मक रूप म्हणजे अश्वारोहण. आतापर्यंत भारताची या खेळात लक्षणीय कामगिरी पाहायला मिळालेली नव्हती. यंदाच्या स्पध्रेत भारताच्या याशान झुबिन खंबाटाने अश्वारोहण स्पर्धेच्या उडी मारण्याच्या प्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. या स्पर्धेमध्ये घोडय़ाबरोबरच घोडेस्वाराचेही कसब पणाला लागत असते. त्यामुळे या प्रकारात भारताने केलेली कामगिरी नक्कीच दखल घेण्यासारखी आहे.
या खेळाडूंना आता गरज आहे ती प्रोत्साहनाची. सर्वच स्तरांमधून, अगदी प्रसारमाध्यमांतूनदेखील. नाहीतर एखाद्या क्रिकेटपटूने शतक झळकावले तर त्याची मोठी छायाचित्रे छापली जातात, वृत्तवाहिन्यांवर ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणून दाखवली जाते. हीच बातमी वारंवार प्रसारितही केली जाते. पण देशासाठी जे रक्ताचे पाणी करून पदक जिंकतात, त्यांना सापत्न वागणूक का दिली जाते, हेदेखील अनाकलनीय आहे. क्रिकेटने आतापर्यंत देशाला किती पदके जिंकून दिली? आशियाई स्पर्धासाठी बीसीसीआय भारताचा दुसऱ्या दर्जाचाही संघ पाठवत नाही. त्यांना मात्र दमदार प्रसिद्धी दिली जाते, पण ज्यांच्यामुळे सर्व देशांपुढे तिरंगा फडकतो, राष्ट्रगीत गायले जाते, त्यांच्या नशिबी अशी अवहेलना का, हादेखील मोठा प्रश्न आहे.
आता कुठे पदकांची पालवी फुटायला सुरुवात झाली आहे. ही पालवी जर बहरायला हवी असेल तर तिला जपायला हवे. आता काही खेळ प्रगती करताना दिसत आहेत, पण अजून बरेच असे खेळ आहेत की जिथे भारताची कामगिरी सुधारताना दिसत आहे. त्यामध्ये पदक मिळत नसेल कदाचित, पण कामगिरीतील सुधारणा नक्कीच पदकांची आशा दाखवणारी आहे. या खेळांसाठी, खेळाडूंसाठी सरकारने पुढे यायला हवे. एखाद्या खेळाडूने पदक पटकावले तर त्याच्यावर बक्षिसांची खैरात होते, पण जेव्हा त्याला खरी गरज असते तेव्हा मात्र त्याला कोणीही मदत करत नाही. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला चांगली सुविधा मिळायलाच हवी. आपण खेळांमध्ये आता चीनचे उदाहरण देतो. पण तिथली क्रीडा संस्कृती, तिथल्या सरकारने दिलेल्या सोयी-सुविधा आपण पाहत नाही. त्यांची पदकेच आपल्याला दिसतात, पण त्यामागच्या गोष्टी दिसत नाहीत. आपल्याकडे पोषक आहार म्हणून खेळाडूंना काय दिले जाते, त्यांच्यासाठी प्रशिक्षक आहे का, पायाभूत सुविधा कोणत्या स्तराच्या आहेत, याचा पुन्हा एकदा सरकारने विचार करायला हवा.
लोकांनीदेखील या खेळाडूंच्या पाठीवर शाबासकीची थाप मारायला हवी. त्यांना लोकाश्रय मिळायला हवा. लोक जेव्हा भरभरून कौतुक करतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास कमालीचा दुणावेल आणि ही पदकांची संख्याही वाढेल. सरकार, क्रीडा संघटना, क्रीडा प्राधिकरण या साऱ्यांनी या खेळाडूंच्या सुविधांमध्ये हात आखडता घेऊ नये. जर सुविधा देऊ शकत नसाल तर पदकांची अपेक्षा करण्यात काहीच हशील नाही. हे सारे गैरच. हे खेळ आणि खेळाडू भारताच्या नव्या आशा आहेत, त्यांना जपायला हवं, शाबासकी, प्रोत्साहन, सोयी-सुविधा द्यायला हव्यात, तरच भारत क्रीडा विश्वामध्ये आपला दबदबा निर्माण करू शकतो.
