कॅप्टन कोण?

पंजाबमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार सक्रिय झाले असून त्यात जवळच्याच नवी दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’ या राजकीय पक्षानेही विशेष रस घेतला आहे.

voting new
(प्रातिनिधिक छायचित्र)

विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com
पंजाबमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्री बदलण्याचा कार्यक्रम पूर्ण केला. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधातील वादळ गेले वर्षभर घोंघावतच होते. मात्र काहीही झाले तरी ‘आपल्याला पर्याय नाही’, असेच त्यांना स्वत:ला वाटत होते. काँग्रेसमध्ये पर्याय नाही तो फक्त गांधी घराण्याला. चरणजीत सिंग चन्नी यांचा पर्याय मुख्यमंत्रीपदासाठी वापरताना दलित मतांची खेळी काँग्रेसने सध्या तरी चांगली खेळलेली दिसते. या चालीमागे दोन महत्त्वाच्या घडामोडी आहेत. पंजाबमध्ये दलित व्होटबँक परिणाम घडवू शकते एवढय़ा टक्केवारीची निश्चितच आहे. त्यातच भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या अकाली दलाने आता मायावतींच्या बहुजन समाज पार्टीशी सोयरीक जुळवली आहे; अर्थात त्यामागेही दलित मतपेटीचेच राजकारण आहे. जवळपास भारतातील अनेक राज्यांमध्ये दलित मतपेटी ही साधारणपणे १५ ते १८ टक्कय़ांच्या आसपास आहे. काही राज्यांमध्ये तर ही टक्केवारी २०च्या आसपासही आहे, मात्र त्यांचा अपवाद. पंजाबमध्ये निवडणुकीचे वारे जोरदार सक्रिय झाले असून त्यात जवळच्याच नवी दिल्लीत सत्तेत असलेल्या ‘आप’ या राजकीय पक्षानेही विशेष रस घेतला आहे. दिल्लीनंतर जे राज्य जिंकण्याची शक्यता ‘आप’ला वाटते आहे, त्यात पंजाबचा समावेश आहे. ‘आप’चे निवडणूक चिन्ह असलेली ‘झाडू’ दलित समाजाचेच प्रतिनिधित्व करते, असे ठसवून सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनीही पंजाबमध्ये दलित मतपेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. या अवस्थेत चरणजीत सिंग चन्नी यांची निवड मुख्यमंत्रिपदी करणे ही काँग्रेसची डोकेबाज खेळी आहे.

या खेळीने नेमका किती फरक पडेल हे निवडणूक निकालानंतरच कळेल. मात्र त्यात चन्नी यशस्वी झाले आणि त्यांना मुख्यमंत्रिपदी काँग्रेसने कायम ठेवले तर भविष्यातील निवडणुकांमध्ये दलित मतपेटीचा मुद्दा अधोरेखित करणारी चर्चा निश्चितच होऊ शकते. सध्या तरी त्यांच्यावर ‘तात्पुरते मुख्यमंत्री’ अशी टीका होते आहे. दलितांना तात्पुरता वापर झालेला नकोय. त्यामुळे विजय मिळाल्यास काँग्रेस संदेश काय देते ते महत्त्वाचे असेल.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने जोरदार मुसंडी मारत केंद्रात सत्ता काबीज केली त्यावेळेस असे चित्र निर्माण झाले होते की, जातीपातींपलीकडचे असे हे वेगळे राजकारण ठरावे. तसे पाहिले तर सर्वाधिक दलित खासदार सध्या भाजपामध्येच आहेत. शिवाय आरपीआय किंवा लोक जनशक्तीसारखे दलितांचे नेतृत्व करणारे पक्षही सोबत आहेतच. पलीकडच्या बाजूस दलितांच्या काही पक्ष- संघटना अशा आहेत की, ज्या कधीही भाजपासोबत जाणार नाहीत. मात्र काँग्रसने दीर्घकाळ आपला वापर करून घेतला अशी त्यांची धारणा आहे. दलित ऐक्याचे अनेक प्रयत्न आजवर झाले मात्र, त्यात फारसे कुणालाही यश आलेले नाही. या पाश्र्वभूमीवर काँग्रेसच्या या खेळीने पुन्हा एकदा दलित मतपेटी केंद्रस्थानी आणली आहे. आता येणाऱ्या काळात पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या निवडणुका आहेत; त्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकांचा सूर स्पष्ट करतील, असे विद्यमान चित्र आहे. दलितकेंद्री राजकारण नेमका कोणता पक्ष व्यवस्थित करेल, यावर पुढचे गणित बरेचसे अवलंबून असेल अशी शक्यता चन्नी यांच्या खेळीमुळे निर्माण झाली आहे आणि अर्थातच यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस चर्चेत आली. मात्र या संपूर्ण नाटय़ाचा एक दुसरा भाग तो नवज्योतसिंग सिद्धू यांच्याशी संबंधित आहे. राजकारणाच्या तापलेल्या तव्यावर आपली पोळी शेकणारा संधिसाधू अशी त्यांची प्रतिमा आहे. आणि सिद्धूला कॅप्टनविरोधात उभे करून काँग्रसने ही खेळी रचली. ही या खेळीची नकारात्मक बाजू आहे. एका वाहिनीच्या लोकप्रिय हास्यमालिकेत सिद्धू हास्यफवारकाची भूमिका निभावतात. तो अभिनय असतो आणि तुलनेने सोपाही. मात्र पंजाबमध्ये घडले ते गंभीर राजकारण होते की, केवळ हसे झालेले फुसके नाटय़ याचा निवाडा थेट निवडणुकीच्या रिंगणातच होईल, तेव्हाच ठरेल खरा कॅप्टन कोण?

vinayak parab

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Assembly elections 2022 punjab gets a new cm mathitartha dd