सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष : आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामाला गती मिळेल. यश, कीर्ती, मानसन्मान मिळेल. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घ्यायची तयारी दाखवाल. सहकारी वर्ग आपल्या मताला दुजोरा देईल. धडाडीने नवे उपक्रम हाती घ्याल. जोडीदाराच्या आíथक गणिताची घडी नीट बसेल. कुटुंब सदस्यांच्या कार्याला उत्तेजन द्याल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. खांदेदुखी वा रक्ताभिसरणाच्या तक्रारी सतावतील.

वृषभ : चंद्र आणि नेपच्यून या भावनाप्रधान ग्रहांच्या युतीयोगामुळे मनाविरुद्ध गोष्टी घडल्यास त्याचा जास्त त्रास जाणवेल. परंतु सकारात्मक विचार करून त्यातूनच नव्या संकल्पना सुचतील. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दिशेने पावले उचलाल. सहकारी वर्गाची विशेष साथ मिळेल. संस्थेच्या लाभाचा विचार कराल. जोडीदाराचे काम हळूहळू वेग घेईल. दोघे मिळून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. कुटुंब सदस्यांमधील वाद मिटवताना दमछाक होईल.

मिथुन : गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे कामाला गती मिळेल. चंद्राच्या नावीन्याला गुरूच्या सखोल अभ्यासाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात नवनिर्मितीच्या कार्यात सहभागी व्हाल. सहकारी वर्ग बौद्धिक पातळीवरही चांगली मदत करेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडथळ्यांची मालिका संपत येईल. परंतु यासाठी त्याची शक्ती नाहक खर्ची पडेल. त्याला आपला आधार आवश्यक आहे. कौटुंबिक वातावरण शांततेचे असावे. शब्दाने शब्द वाढवू नये.

कर्क : चंद्र आणि बुध या गतिमान ग्रहांच्या लाभ योगामुळे व्यवहारचातुर्याचा चांगला उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात विरोधाला सामोरे जाऊन आपले मत मंजूर करून घ्याल. वरिष्ठांचे पाठबळ मिळवाल.  जोडीदाराचे प्रश्न सोडवताना संयम बाळगा. त्याची चिकाटी उल्लेखनीय असेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. शेजारीपाजारी तसेच नातेवाईकांना आधार द्याल. जठराला सूज येऊन पचन बिघडेल. पथ्य पाळणे आवश्यक. वेळीच औषध घ्यावे.

सिंह : रवी आणि गुरू या बलवान ग्रहांच्या समसप्तम योगामुळे प्रगतिकारक प्रवास कराल. रवीची प्रतिष्ठा आणि गुरूचे यश आपल्या पदरी पडेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. आपले विचार नव्या पद्धतीने इतरांपुढे मांडाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडचणी चच्रेने सोडवाल. त्याला धीर द्याल. कुटुंबाला आपला भक्कम आधार वाटेल. मात्र कुटुंबीयांवर अधिकार गाजवू नका. छाती, बरगडय़ा आणि पाठीची विशेष काळजी घ्यावी लागेल.

कन्या : चंद्र आणि मंगळाच्या युतीयोगामुळे वैचारिक कामात प्रगती कराल. प्रेम आणि धाडस यांचा एकत्रितपणे उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात गरजूंना मदत करण्याची तयारी दाखवाल. वरिष्ठांच्या नियम-बंधनात राहून सर्वाच्या हिताचा निर्णय घ्याल. सहकारी वर्गाचे साहाय्य मिळेल. जोडीदाराची वैचारिक आणि भावनिक पातळीवर दमणूक होईल. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. ओटीपोटाचे दुखणे अंगावर काढू नका. वैद्यकीय सल्ला अवश्य घ्यावा.

तूळ : गुणग्राहक चंद्र आणि ज्ञानकारक गुरू यांच्या लाभ योगामुळे नव्या विषयाच्या अभ्यासात आगेकूच कराल. नोकरी-व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींकडून चांगले मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गाकडून कायदेविषयक कामे मार्गी लावाल. नातेवाईकांच्या उपयोगी पडाल. जोडीदाराच्या कामात कार्यशक्ती अधिक प्रमाणात खर्ची पडेल. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. पित्त आणि वाताचा त्रास होईल. घरगुती उपाय उपयोगी ठरतील.

वृश्चिक : चंद्र-शनीच्या केंद्र योगामुळे हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. चिकाटीने पुढे जाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या म्हणण्याला विरोध कराल. आपले मत ठामपणे मांडाल. सहकारी वर्गाची अपेक्षित साथ न मिळाल्यास खचून जाऊ नका. जोडीदार आपली स्थिती समजून घेईल. शांत डोक्याने निर्णय घ्यावा. कुटुंब सदस्यांजवळ मनमोकळ्या गप्पा मारल्याने धीर मिळेल. जोडीदार कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवेल. अपचनाच्या तक्रारी वाढतील.

धनू  : रवी-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे नव्या संकल्पना अमलात आणाल. लेखनात अंत:स्फूर्ती मिळेल. कलेच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाची साथ चांगली मिळेल. नोकरी-व्यवसायात नियम, कायदे यांचे उल्लंघन कराल. सहकारी वर्गाकडून मदत मिळेल. जोडीदाराच्या सूचक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. ताणतणाव वाढेल. कौटुंबिक वातावरण तापू देऊ नका. डोक्याचे व्याप वाढतील. निर्णय घ्यायची घाई करू नका. सर्द वातावरणामुळे घशाला इन्फेक्शनची शक्यता.

मकर : शनी-चंद्राच्या लाभ योगामुळे अनेक कामांवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा एका वेळी एक काम कराल. जिद्दीने व चिकाटीने कामे पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना कामातील अडचणी आणि तांत्रिक प्रश्न समजावून द्याल. सहकारी वर्गाचा विश्वास संपादन कराल. त्यांच्यातील आत्मविश्वास जागा कराल. जोडीदाराला भावनिक आधार द्याल. त्याच्या कार्यक्षेत्रातील कामांना म्हणावी तशी गती मिळणार नाही. उदासीनता वाढेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील.

कुंभ : रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे आरोग्य चांगले राहील. रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात नवी आव्हाने स्वीकारायची तयारी दाखवाल. वरिष्ठांच्या मताप्रमाणे निर्णय घेऊन कामाला गती द्याल. अडचणींवर मात करता करता दमछाक होईल. सहकारी वर्गाच्या मदतीमुळे मोठा आधार मिळेल. जोडीदारासह मनमोकळे बोलणे आवश्यक! अन्यथा गरसमज वाढतील. आíथक बाजू सावरून धराल. कुटुंब सदस्यांच्या गरजा पूर्ण करणे आव्हानात्मक ठरेल.

मीन : चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे निर्णय राबवाल. सहकारी वर्गाकडून कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी जिकिरीने पार पाडावी लागेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील समस्यांमुळे त्याची चिडचिड वाढेल. समजून घेणे आवश्यक! छाती, हृदय, फुप्फुस यांची काळजी घ्यावी. कामाचा ताण घेऊ नका. डोके शांत ठेवा.