सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे आपल्या बेधडकपणाला बुधाच्या व्यवहारीपणाचा लगाम बसेल. घाईघाईने निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मान्य करावा. सहकारीवर्गाच्या प्रश्नांवर विचार करावा लागेल. जोडीदाराच्या साथीने कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणे योग्य ठरेल. मुले आपल्या कष्टाचे चीज करतील. त्यांच्या क्षेत्रात मेहनत घेतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मित्रमंडळींच्या भेटीगाठी लांबणीवर पडतील. डोळ्यांची काळजी घ्यावी.
वृषभ चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे चंद्राच्या कार्यशीलतेला मंगळाच्या उत्साहाची जोड मिळेल. रेंगाळलेली कामे हातावेगळी कराल. रीतसर मार्गानेच पुढे जाणे इष्ट ठरेल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ व्यक्तींकडून मोलाचे मार्गदर्शन मिळेल. सहकारीवर्गाच्या तक्रारी फारशा मनावर घेऊ नका. जोडीदाराच्या कामाच्या तणावामुळे मानसिक स्थिती कमजोर होईल. एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे! मुले त्याची मते व्यक्त करतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. वातविकार सतावतील.
मिथुन भाग्यस्थानातील चंद्र-नेपच्यूनच्या युतियोगामुळे भावना आणि अंत:स्फूर्ती यांचा उत्तम संयोग होईल. शब्द जपून वापरावेत. नोकरी-व्यवसायातील प्रश्नांवर अतिविचार केल्याने डोकं सुन्न होईल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. सहकारीवर्गाला कामाचे स्वरूप समजावून द्याल, पण त्यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळणार नाही. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध करावे लागेल. मुले आपली कर्तव्ये पार पाडतील. उष्णतेचे विकार बळावतील.
कर्क शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे आपल्या चंचल स्वभावाला शनीच्या शिस्तीचा लगाम बसेल. वरिष्ठांचे प्रश्न जाचक वाटतील. अंतिम निर्णय जाहीर करताना डोकं शांत ठेवणे महत्त्वाचे! कामाचा ताण नियंत्रित ठेवावा. नातेवाईकांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळेल. जोडीदाराची मानसिक स्थिती दोलायमान असेल. आपल्या आधाराची त्याला गरज भासेल. मुलांच्या समस्या चर्चेने सोडवाल. पचन आणि आतडय़ांचे त्रास अंगावर न काढता वेळेवर औषधोपचार घ्यावा लागेल.
सिंह चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे शिस्तीसह माया-ममतेलाही तितकेच महत्त्व द्याल. जवळच्या व्यक्तींना आपला आधार वाटेल. नोकरी-व्यवसायात नव्याने स्वीकारलेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पूर्ण करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. सहकारीवर्गावर सोपवलेली कामे व्यवस्थितपणे करून घ्याल. जोडीदार त्याची कर्तव्ये जिकिरीने पार पडेल. कुटुंबातील ताणतणाव चर्चेने कमी करण्याचा प्रयत्न करावा. मुलांची मते ऐकून घ्यावी लागतील. पाठीचे दुखणे उद्भवेल.
कन्या चंद्र-शनीच्या केंद्र योगामुळे काही गोष्टींबाबत मनस्ताप करून घ्याल. नोकरी-व्यवसायात सद्य:स्थितीचा विचार करूनच पुढचे पाऊल उचलावे लागेल. कामाचे आयोजन करावे. सहकारीवर्गाच्या मदतीने कामे वेळेवर पूर्ण होतील. जोडीदाराला आपल्या कामातून समाधान मिळेल. मुलांनास्वातंत्र्य द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. रोगप्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे ठरेल. अपचनाच्या तक्रारी डोकं वर काढतील. आहार, व्यायाम आणि वैद्यकीय उपचार यांकडे विशेष लक्ष द्यावे.
तूळ पंचम स्थानातील शुक्र-नेपच्यूनच्या युतियोगामुळे कामातील रेखीवपणा वाखाणण्याजोगा असेल. कलात्मक दृष्टिकोनातून कामाची पूर्तता कराल. नोकरी-व्यवसायात शैक्षणिक क्षेत्र वा प्रशिक्षण विभागात महत्त्वाची कामगिरी पार पाडाल. सहकारीवर्गाचा मोलाचा सल्ला स्वीकारण्यातच शहाणपण आहे. जोडीदाराला अनेक अडचणींतून मार्ग काढत पुढे जावे लागेल. कौटुंबिक कलह दूर ठेवा. मुलांच्या समस्या त्यांच्या त्यांनाच सोडवू द्या. मांडय़ा व पोटऱ्यांमध्ये गोळे येतील.
वृश्चिक मंगळ आणि चंद्राच्या लाभ योगामुळे एकंदरीत कामातील उत्साह वाढेल. अडचणींना तोंड देत पुढे जाणे आता आपल्या अंगवळणी पडले आहे. डोक्याला ताप न देता सद्य:स्थितीशी जुळवून घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. जोडीदार त्याच्या क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावेल. मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाण करून द्यावी. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुरूम, पुटकुळ्या, फोड यांचा त्रास वाढण्याची शक्यता आहे.
धनू रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे आत्मविश्वास बळावेल. हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. प्रयत्नांना यश येईल. नोकरी-व्यवसायात नव्या जबाबदाऱ्या पेलण्याची तयारी दाखवाल. सहकारीवर्ग तसेच मित्रमंडळी यांच्याकडून मदतीचा हात पुढे येईल. खर्चावर नियंत्रण आवश्यक! जोडीदाराच्या स्वभावातील सकारात्मक बदल मनाला आनंद देईल. एकमेकांच्या साथीने कौटुंबिक समस्या सोडवाल. मुलांना शिस्तीचा बडगा दाखवाल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.
मकर चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात आपले सादरीकरण प्रभावी आणि यशस्वी ठरेल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारीवर्गाकडून साहाय्याची फारशी अपेक्षा न ठेवणे बरे! जोडीदाराचे काम जोमाने पुढे जाईल. त्याच्या गुणांना चांगला वाव मिळेल. मुलांचा आत्मविश्वास वाढवाल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. नातेवाईकांच्या आनंदात सामील होण्याची संधी मिळेल. रक्ताभिसरण संस्था थोडय़ा प्रमाणात त्रास देईल.
कुंभ चंद्र व शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या युतियोगामुळे व्यवहारचातुर्य दाखवाल. आपल्यासह इतरांच्या लाभाचाही विचार कराल. नोकरी-व्यवसायात आपल्या बुद्धिमत्तेला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. शांत डोक्याने व साकल्याने निर्णय घ्याल. सहकारीवर्गाच्या समस्या आस्थापनेपुढे मांडाल. न्यायासाठी झगडाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याला नव्या गोष्टीचे प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. कुटुंबात एकोपा निर्माण होईल. डोळे आणि खांदे यांचे आरोग्य सांभाळावे.
मीन चंद्र-शनीच्या लाभ योगामुळे चंद्राच्या चंचलतेवर शनीच्या शिस्तीचे आणि सातत्याचे नियंत्रण राहील. हितशत्रूंचे बोलणे मनाला लावून घेऊ नका. आपल्या कामाचे फळ आपल्याला उशीर झाला तरी नक्की मिळेल. वरिष्ठांचा सल्ला हितावह ठरेल. सहकारीवर्गाच्या कामावर बारीक लक्ष ठेवावे. जोडीदाराने आपल्या कामातील निर्णय घेताना घाई करू नये. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांच्या गरजा पूर्ण कराल. मणक्यासंबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.