सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष गुरू-बुधाच्या षडाष्टकयोगामुळे प्रयत्नांना यश मिळणे कठीण होईल. ज्ञान आणि बुद्धीचा योग्य उपयोग करून घेणे हिताचे ठरेल. चिडचिड वाढेल. नोकरी-व्यवसायात परिस्थितीपुढे नमते घ्यावे लागेल. सहकारीवर्गाने सुचवलेले मुद्दे लाभदायक ठरतील. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नवे करार करेल. नियम व अटी नीट तपासून घ्याव्यात. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. पित्त आणि कफाचा त्रास अंगावर काढू नका.

वृषभ चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे मनातील इच्छा पूर्ण होतील. कामातील उत्साह वाढेल. अपेक्षित व्यक्तींशी संपर्क साधता येईल. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध करावे लागेल. सहकारीवर्गाचा विश्वास संपादन कराल. जोडीदारासह असलेले वरवरचे मतभेद दुर्लक्षित करून एकमेकांच्या हिताचा विचार कराल. कुटुंब सदस्य समाजोपयोगी कार्यात सहभागी होतील. कफामुळे घसा व छाती भरून येईल. घरगुती उपचारांनी बरे वाटेल.

मिथुन चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे आनंद आणि उत्साह वाढेल. इतरांना त्यांच्या कामात उत्तेजन द्याल. नोकरी-व्यवसायात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडाल. वरिष्ठांचा सल्ला लाभकारक ठरेल. सहकारीवर्ग त्यांच्यावरील अन्याय निदर्शनास आणून देईल. जोडीदाराच्या कामातील अडथळ्यांमुळे त्याची वैचारिक दमणूक होईल. आपला सल्ला त्याला उभारी देईल. कौटुंबिक वातावरण एकोप्याचे राहील. अपचनामुळे पोट दुखणे, पित्तामुळे डोके दुखणे संभवते.

कर्क कृतिशील चंद्र आणि ऊर्जाकरक रवी यांच्या लाभयोगामुळे अपेक्षित यश मिळवाल. कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात ध्येयपूर्तीकडे वाटचाल कराल. वरिष्ठांचे बोलणे  मनाला लागेल. तरी आपला मार्ग सोडू नये. सहकारीवर्गाची मदत मिळेल. जोडीदाराच्या पोकळ अपेक्षांना आवर घालावा लागेल. त्याची नाराजी दूर करण्यासाठी थोडे त्याच्या कलेने घ्याल. नातेवाईकांच्या संबंधात गैरसमज वाढतील. फोड, पुळ्या, पू होणे असा त्रास संभवतो. त्वचेची निगा राखा.

सिंह चंचल चंद्र आणि कुतूहलप्रिय बुध यांच्या युतीयोगामुळे नव्या प्रयोगांना प्रोत्साहन द्याल. नोकरी-व्यवसायात मात्र महत्त्वाचे निर्णय घेताना शांत डोक्याने विचार करावा. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गाकडून वेळेत काम पूर्ण करून घ्याल. जोडीदाराच्या समस्यांवर उपाय शोधाल आणि त्याच्या हिताचा सल्ला त्याला द्याल. मित्रमंडळी एकमेकांच्या मदतीला धावून जातील. कुटुंब सदस्यांच्या मनातील भावनांचा उद्रेक झाल्यास त्यांना समजून घ्याल. धीर द्याल.

कन्या चंद्र-गुरूच्या समसप्तमयोगामुळे विचारांमध्ये सकारात्मक बदल होतील. ज्येष्ठ व्यक्तींचा पाठिंबा व आधार मिळेल. नोकरी-व्यवसायात कल्पक विचार प्रभावीपणे मांडाल. सहकारीवर्गाला आपल्या योजनांची पूर्वकल्पना द्याल. कायद्यातील आणि सरकारी नियमातील खाचाखोचांचा बारकाईने अभ्यास कराल. जोडीदाराच्या मदतीने कौटुंबिक परिस्थिती व्यवस्थित हाताळाल. कुटुंब सदस्यांना त्यांच्या अडचणीतून बाहेर काढाल. आर्थिक मदत कराल.

तूळ  चंद्र-शुक्राच्या युतीयोगामुळे नव्या संकल्पना अमलात आणाल. विचार आणि तांत्रिक कला यांचा अनोखा समन्वय दिसून येईल. नोकरी-व्यवसायात आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलाल. वरिष्ठांच्या सल्ल्याने कामात गती येईल. सहकारीवर्गाला प्रोत्साहन देणे आवश्यक! जोडीदाराची चिडचिड त्रासदायक होईल. त्याला परिस्थितीची सकारात्मक बाजू दाखवणारा दृष्टिकोन द्याल. मान, खांदे व पाठदुखीकडे विशेष लक्ष द्यावे.

वृश्चिक बुध व नेपच्यूनच्या षडाष्टकयोगामुळे व्यवहार व भावना यांचा ताळमेळ बसणार नाही. नोकरी-व्यवसायात अनेक वर्षांपासूनची व्यावसायिक नाती जपाल. सहकारीवर्गाकडून मोठी मदत मिळेल. वरिष्ठांच्या अनुभवाचे बोल स्मरणात ठेवून योग्य निर्णय घ्याल. जोडीदाराच्या नाजूक मन:स्थितीत त्याला आपला भावनिक आधार द्याल. आपल्या समस्या बाजूला ठेवून त्याच्या मनाला उभारी द्याल. कपालशूळ, अर्धशिशी, पित्त, अपचन यांचा त्रास होईल.

धनू ऊर्जाकारक रवी आणि तंत्रज्ञानाचा कारक मंगळ यांच्या नवपंचमयोगामुळे  कामातील उत्साह वाढेल. मेहनतीला यश येईल. नोकरी-व्यवसायात प्रगती कराल. मान, अधिकार वाढेल. सहकारीवर्गाच्या कामावर योग्य नियंत्रण ठेवाल. कामातील कुचराईची विशेष दखल घ्याल. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे मोठे नुकसान होण्याचे टळेल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव कमी होतील. मित्रमंडळींसह विचारांची देवाणघेवाण करणे आवश्यक!

मकर बुध-मंगळाच्या नवपंचमयोगामुळे बुधाची बुद्धिमत्ता आणि मंगळाचे धाडस यांचा उत्तम मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात पर्यायी व्यवस्था कामी येईल. वरिष्ठांपुढे आपली मते प्रभावीपणे मांडाल. सहकारीवर्गाची नाराजी दूर कराल. त्यांच्या हिताचा सल्ला  द्याल. नवे करार करताना सावधगिरी बाळगावी. जोडीदाराच्या कामाची पद्धत तणावपूर्ण असेल. त्याच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी करावा. उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचमयोगामुळे विद्याव्यासंग वाढेल. अंत:स्फूर्तीने नव्या रचना, लेखन कराल. नोकरी-व्यवसायात संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. नवे विचार सभेपुढे मांडण्याचे धाडस दाखवाल. सहकारीवर्गाची मदत घेऊन अपेक्षित कार्य साध्य कराल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात पत वाढेल. अधिकार, जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंब सदस्यांना शैक्षणिक क्षेत्रातील वेगळे अभ्यासक्रम स्वीकारण्याची संधी मिळेल. छाती व घशात कफ दाटेल.

मीन चंद्र-मंगळाच्या नवपंचमयोगामुळे नव्या उत्साहाने कामाला लागाल. मरगळ झटकून धाडस दाखवाल. आपली नापसंती न दर्शवता सध्या तरी आहे तसे स्वीकारणे इष्ट! सहकारीवर्गाची कोंडी ज्येष्ठ वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न कराल. कामाचा वेग वाढला नाही तरी जबाबदारीचा ताण मात्र वाढेल. जोडीदाराच्या पाठीचा त्रास काही प्रमाणात डोकं वर काढेल. दुर्लक्ष नको!