News Flash

राशिभविष्य : १६ एप्रिल ते २२ एप्रिल २०२१

आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या लाभयोगामुळे आचार आणि विचार यांच्यात सूत्रबद्धता येईल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या लाभयोगामुळे आचार आणि विचार यांच्यात सूत्रबद्धता येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या शिस्तीचा अनुभव घ्याल. जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण कराल. सहकारी वर्गाकडून चांगले साहाय्य मिळेल. जोडीदाराच्या रागाचा पारा वरवर जाईल. रागाचे मूळ शोधणे आवश्यक! मुलांच्या प्रगतीसाठी विशेष कष्ट घ्याल. कौटुंबिक वातावरण शांत राहील. मज्जासंस्थेसंबंधित त्रास डोके वर काढण्याची शक्यता आहे. नियमित व्यायाम आवश्यक!

वृषभ शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे शनीची मेहनत, जिद्द, चिकाटी यांना चंद्राच्या सकारात्मकतेची जोड लाभेल. नोकरी-व्यवसायात उत्तम व्यवस्थापन सांभाळाल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाच्या मदतीला पुढे व्हाल. जोडीदाराशी पटवून, जुळवून घ्यावे लागेल. काही विषयांवर सध्या मौनच बरे! मुलांना अडचणींवर मात करणे सोपे जाईल. आपले संस्कार कामी येतील. उत्सर्जनसंस्थेविषयक विशेष खबरदारी घ्यावी लागेल. उष्णतेपासून स्वत:चा बचाव करावा लागेल.

मिथुन चंद्र-मंगळाच्या युती योगामुळे बौद्धिक आव्हाने लीलया पेलाल. एकंदरीत उत्साह वाढेल. परिस्थितीला धीराने सामोरे जाल. नोकरी-व्यवसायात लाभदायक वार्ता समजतील. मेहनतीला  पर्याय नाही. वरिष्ठांच्या मताशी सहमत नसलात तरी सध्या आपले मत व्यक्त न करणे बरे! जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात आपले नाव काढेल. मेहनतीचे चीज होईल. मुलांची कामे मार्गी लागतील. नातेवाईकांना मदत कराल. फोड, पुटकुळ्या, गळू यांचे त्रास अंगावर न काढता औषधोपचार घ्यावेत.

कर्क चंद्र व शुक्र या दोन भावनाप्रधान ग्रहांच्या लाभयोगामुळे वागण्या-बोलण्यात हळवेपणा येईल. एखाद्याचे बोलणे जिव्हारी लागेल. नोकरी-व्यवसायात उत्तम कामगिरी पार पाडाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्ग आपल्या गुणांची चुणूक दाखवेल. जोडीदाराच्या मेहनतीचे, कष्टाचे फळ मिळेल. धैर्य दाखवाल. मुलांना वेळेवर मदतीचा हात द्याल. त्याच्या अडचणी समजून घ्याल. मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी आपले छंद जोपासवेत. व्यायाम करावा.

सिंह मंगळ-गुरूच्या नवपंचम योगामुळे  मंगळाचे तंत्रज्ञान आणि गुरूचे ज्ञान, अभ्यासक वृत्ती यांचा संगम होईल. परिस्थितीशी मिळतेजुळते घ्यावे लागेल. नोकरी-व्यवसायात रखडलेल्या कामांना गतिमान कराल. सरकारी कामे लांबणीवर पडतील. आर्थिक व्यवहार सावधतेने करावेत. सहकारी वर्ग कामाचा पुढाकार घेतील. जोडीदाराच्या बुद्धिमतेचा कस लागेल. मुलांच्या कष्टाचे चीज होईल. रक्तातील घटक कमीअधिक झाल्याने वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल. औषधोपचार घ्यावा.

कन्या मंगळ-बुधाच्या नवपंचम योगामुळे शारीरिक आणि वैचारिक शक्ती उपयोगात आणाल. विचारांती घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. आपली मते ठामपणे मांडाल. नोकरी-व्यवसायात भाषण, संभाषण, मुलाखती यात आपली विशेष छाप पाडाल. सहकारी वर्गाची मदत उपयोगी ठरेल. जोडीदाराच्या लहानमोठय़ा अपेक्षा पूर्ण कराव्यात. अन्यथा त्याची नाराजी दिसेल. मुलांच्या विचारसरणीला शिस्तीच्या चौकटीत बसवाल. रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवावे. काळजी घ्यावी.

तूळ चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे भावनांच्या आहारी न जाता व्यवहार नीट सांभाळाल. विचारांना योग्य दिशा द्याल. नोकरी-व्यवसायातील अनुभवातून नव्या गोष्टी शिकाल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाकडून मिळालेल्या सूचनांचा विचार कराल. जोडीदार त्याच्या कामातील अडचणींवर मात करून आपला ठसा उमटवेल. मुलांची शैक्षणिक प्रगती होईल. त्याच्या कामात यश मिळेल. पोटऱ्या व तळपाय यांचे दुखणे सतावेल. व्यायामाची आवश्यकता भासेल. योग्य काळजी घ्यावी.

वृश्चिक चंद्र-गुरूच्या समसप्तम योगामुळे ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनाने आगेकूच कराल. नोकरी-व्यवसायात प्रगतिकारक भरारी घ्याल. परिस्थितीचा विचार करूनच पुढील गोष्टींची आखणी कराल. गुरूच्या ज्ञानाचा उपयोग आपल्या कार्यक्षेत्रात योग्य प्रकारे कराल. वरिष्ठांच्या पसंतीस उतराल. सहकारी वर्गासह लाभदायक बोलणी होतील. मुलांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मित्रमंडळींना मदत कराल. अचानक उष्णतेचे विकार बळावतील.

धनू चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे नवी उमेद निर्माण होईल. परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी योग्य व्यक्तींच्या मदतीचा हात मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या अडचणींना तोंड द्यावे लागेल. धीराने घ्यावे. चिडचिड कमी करावी. सहकारी वर्गाकडून विशेष साहाय्य मिळेल. कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. जोडीदाराच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे. मुलांनी आपला वेळ सत्कारणी लावावा. उष्णतेने होणारे त्वचाविकार बळावतील. वैद्यकीय सल्ला आणि उपचार अवश्य घ्यावेत.

मकर रवी-बुधाच्या अंशात्मक युतीयोगामुळे बुध अस्तंगत पावेल. उच्च पदाचा अभिमान बाळगाल; परंतु अधिकाराचा गरजेनुसार उपयोग करावा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांसह तात्त्विक वाद होतील. समजूतदारपणा दाखवावा. सहकारी वर्गाचा रोष पत्करून आगेकूच कराल. जोडीदाराची विशेष साथ लाभेल. नातेवाईकांच्या मदतीने कामे  होतील. कापणे, भाजणे, खरचटणे यांपासून सावधगिरी बाळगणे महत्त्वाचे ठरेल. मानसिक तणावामुळे डोकेदुखीचा त्रास होईल.

कुंभ बुध-गुरूच्या लाभ योगामुळे आपली बौद्धिक पातळी उंचावेल. परिस्थितीचा सारासार विचार करून समंजसपणा दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारून यशस्वीरीत्या पूर्ण कराल. सहकारी वर्गाचा सल्ला लाभदायक ठरेल. प्रवासावर प्रतिबंध येतील. जोडीदाराची त्याच्या कामात उत्तम छाप पडेल. मुलांना आपले छंद जोपासण्याची योग्य संधी मिळेल. छातीत वा पोटात वातामुळे दुखणे संभवते. योग्य ती काळजी घ्यावी.

मीन रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे कर्तृत्व गाजवाल. आपल्या कर्तबगारीने कार्यक्षेत्रात चमकाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. वैचारिक गोंधळ दूर होतील. हितचिंतकांची मदत मिळेल. सहकारी वर्गाला नव्या पद्धतीचे प्रशिक्षण द्याल. जोडीदाराच्या आर्थिक समस्या सुटतील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना आधार द्याल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. उष्णतेने डोकेदुखी आणि डोळ्यांची जळजळ होणे असा त्रास संभवतो. विशेष काळजी घ्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 1:44 pm

Web Title: astrology from 16th april to 22 april 2021 horoscope rashibhavishya dd 70
Next Stories
1 वर्धापनदिन विशेष : राशिभविष्य – ९ एप्रिल ते १६ एप्रिल २०२१
2 राशिभविष्य : २ एप्रिल ते ८ एप्रिल २०२१
3 राशिभविष्य : २६ मार्च ते १ एप्रिल २०२१
Just Now!
X