News Flash

राशिभविष्य : दि. २१ ते २७ मे २०२१

मकर : चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे आपली मेहनत आणि चिकाटी कामी येईल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे आत्मविश्वास वाढेल. धावपळ, दगदग सत्कारणी लागेल. प्रयत्नांना यश येईल. नोकरी-व्यवसायात योग्य निर्णय घ्याल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग मदतीला धावून येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मानावा लागेल. मनाविरुद्ध गोष्टी स्वीकाराव्या लागतील. मुलांच्या शंकांचे निरसन कराल. जोडीदाराच्या कामात अडथळे आले तरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. डोकेदुखी आणि घशाचे इन्फेक्शन  यांचा त्रास होईल. पथ्य पाळा.

वृषभ चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे भावनांच्या जाळ्यात अडकून न पडता विचारांना प्राधान्य द्याल. मित्र-मंडळींच्या मदतीला धावून जाल. नोकरी-व्यवसायात इतरांना हिताच्या गोष्टी सुचवाल. वरिष्ठांना आपली बाजू ठामपणे पटवून द्यावी लागेल. सहकारी वर्गाची साथ अपेक्षित आहे. हाती घेतलेली कामे धीम्या गतीने पुढे सरकतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. परिस्थितीकडे सकारात्मकतेने बघाल. मुलांना कलेची आवड लावाल. मूत्र विकार सतावतील. योग्य औषधोपचार घ्यावेत.

मिथुन चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे चंद्राच्या कृतिशीलतेला मंगळाच्या तंत्रज्ञानाची जोड मिळेल. नव्या संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. हाती घेतलेली कामे पूर्णत्वास जातील. मेहनत कामी येईल. सहकारी वर्गाला मदत कराल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या वाढत्या जबाबदाऱ्यांसह कामाचा ताणही वाढेल. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. उष्णतेमुळे उत्सर्जन संस्थेविषयक प्रश्न उद्भवतील.

कर्क चंद्र-शनीच्या लाभ योगामुळे चिकाटीने व संयमाने परिस्थिती हाताळाल. कामाचा व्याप वाढेल. नोकरी-व्यवसायात नव्या अडचणींना तोंड द्यावे लागेल. सहकारी वर्गाच्या मदतीने मार्ग सापडेल. धीर सोडू नका. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. नातेवाईकांमधील एकोपा वाढेल. मुलांना योग्य मार्गदर्शनाची गरज भासेल. अपचनाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेवर औषधोपचार घ्यावेत. रोगप्रतिकारशक्ती वाढवावी.

सिंह रवी-गुरूच्या केंद्र योगामुळे महत्त्वाच्या कामात अडथळे येतील. काही कामे लांबणीवर पडतील.  मिळालेल्या वेळेचा सदुपयोग कराल. नव्या गोष्टी शिकून घेण्याकडे कल असेल. नोकरी-व्यवसायात शिस्तीसह कलात्मक गोष्टींवरही लक्ष केंद्रित कराल. सहकारी वर्गाला मार्गदर्शन कराल. त्यांचा निर्भीडपणा उपयोगी ठरेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. मुलांना तर्कशुद्ध विचारांची जोड द्याल. सांधे व शिरा आखडल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

कन्या रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या मताला इतरांकडून संमती मिळेल. विचारांमधील प्रगल्भता प्रभावीपणे मांडाल. नोकरी-व्यवसायात बौद्धिक बलाने तसेच हिमतीने पुढे जाण्याचा यशस्वी प्रयत्न कराल. सहकारी वर्गावर सगळ्या जबाबदाऱ्या सोपवू नका. जोडीदाराच्या कष्टाचे योग्य असे मूल्यमापन होणार नाही. त्याला आपल्या आधाराची गरज भासेल. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी करावा. मुलांची मानसिकता समजून घ्याल. बद्धकोष्ठ आणि वातविकार बळावतील.

तूळ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भावनिक तसेच वैचारिक गुंता अलगद सोडवाल. नाती जपाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांची मते मान्य करावी लागतील. काही निर्णय आपल्या मनाविरुद्ध स्वीकाराल. सहकारी वर्गाची बाजू समजून घ्यावी. जोडीदाराच्या कार्यात यश मिळेल. त्याच्या शब्दाला मान मिळेल. कुटुंबातील एकोपा वाढेल. मुलांच्या शैक्षणिक समस्यांवर उपाय सापडेल. आतडय़ांचे कार्य मंदावेल. पथ्य आणि औषधोपचार वेळेवर सुरू करावा. दुर्लक्ष करू नका.

वृश्चिक चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे नातेवाईकांना आपलेपणाने मदत कराल. नोकरी-व्यवसायात अनेक बऱ्यावाईट अनुभवांची मालिका सुरू राहील. धीर सोडू नका. सहकारी वर्गावर विश्वास ठेवा. जोडीदारासह प्रेमाचे नाते दृढ होईल. एकमेकांना आधार द्याल. कौटुंबिक जबाबदाऱ्या नेटाने पार पाडाल. मुलांची प्रगती होईल. ताणतणाव कमी होईल. लहानसहान गोष्टी मनावर घेऊन त्यांचा अतिविचार करू नका. आवडत्या छंदात रमून जाल. वैचारिक विश्रांती घ्यावी.

धनू बुध-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे बुधाच्या व्यावहारिक वागणुकीने भावनिक आंदोलनांवर नियंत्रण ठेवाल. ताबा मिळवाल. नोकरी-व्यवसायात खाचाखोचांचा बारकाव्याने अभ्यास करून योग्य निर्णयाप्रत पोहोचाल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. जोडीदाराच्या समयसुचकतेचा कुटुंबाला लाभ होईल. नुकसान टळेल. नव्या संकल्पनांवर विचारविनिमय सुरू कराल. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. डोळे लाल होणे, कोरडे होणे तसेच घसा खवखवणे अशा तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

मकर चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे आपली मेहनत आणि चिकाटी कामी येईल. नोकरी-व्यवसायात आपले म्हणणे मुद्देसूदपणे मांडाल. वरिष्ठांवर प्रभाव पाडाल. सहकारी वर्गाच्या लहानमोठय़ा चुका त्यांच्या निदर्शनास आणून द्याल. समजूतदारीने नात्यातील तिढा सोडवाल. जोडीदाराच्या सल्ल्याने वागावे. मुलांना आपली मते मांडण्याची संधी द्याल. सांधेदुखी, पित्तविकार आणि अपचनासारखे जुने त्रास डोकं वर काढतील. वैद्यकीय सल्ल्यानुसार पथ्य आणि व्यायाम करावा.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे आत्मिक बळ वाढेल. कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळेल. नोकरी-व्यवसायात मेहनतीला यश येईल. आपल्या कार्यक्षेत्रातील अनुभवी व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. सहकारी वर्गाला आवश्यक ती मदत कराल. जोडीदाराची धावपळ वाढेल. अडचणीतून मार्ग काढत तो पुढे जाईल. मुलांचा आत्मविश्वास वाढेल. कौटुंबिक समस्यांवर उपाय शोधाल. उत्सर्जन संस्थेसंबंधित प्रश्न उद्भवतील. व्यायामाला प्राधान्य द्यावे. पथ्य पाळा.

मीन चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्याल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन हितकारक ठरेल. नोकरी-व्यवसायात बाहेर गाव किंवा परदेशातील कामांना गती मिळेल. अपेक्षित लोकांशी संपर्क साधाल. वरिष्ठ आणि सहकारी वर्गामध्ये वैचारिक मिलाप घडवून आणाल. जोडीदाराची सकारात्मक भूमिका अतिशय लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. मान आणि खांदे यातील शिरा आखडतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 22, 2021 8:17 am

Web Title: astrology from 21st to 27th may 2021 rashibhavishya dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १४ ते २० मे २०२१
2 राशिभविष्य : ७ ते १३ मे २०२१
3 राशिभविष्य : ३० एप्रिल ते ६ मे २०२१
Just Now!
X