सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष बुध-नेपच्यूनचा लाभ योग प्रेरणादायी योग आहे. कामकाजातील तोचतोपणा दूर कराल. नावीन्यपूर्ण गोष्टी अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची संमती मिळेल. परदेशासंबंधित कामे रखडतील. जोडीदाराची स्थिती समजून घ्याल. कौटुंबिक वाद चर्चेने मिटवाल. मुलांच्या भविष्याची चिंता करू नका. आपले संस्कार त्यांना कणखर बनवतील. श्वसन विकार आणि वातविकार बळावतील. हवामानातील बदलाचा आपल्यावर परिणाम होईल. काळजी घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ शनी-चंद्राचा नवपंचम योग हा परिश्रमाला कुतूहल आणि नावीन्याची जोड देणारा योग आहे. जिद्द आणि चिकाटीचे फळ मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने प्रगती कराल. सहकारी वर्गाची मदत मिळेल. जोडीदाराची चिडचिड कमी करण्याचा प्रयत्न कराल. त्याला विचारस्वातंर्त्य द्याल. मुलांच्या गुणांचे कौतुक होईल. सर्दी, खोकला आणि डोकेदुखी यांकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय उपचार घ्यावा लागेल. काळजी करू नका.

मिथुन चंद्र-बुधाचा केंद्र योग हा मन आणि बुद्धी यात समतोल साधणारा योग आहे. भावनांवर विचारांचे नियंत्रण राहील. मित्रमंडळींची चूक नसताना त्यांच्यावर राग धरणे उचित नाही. समोरच्याची स्थिती समजून घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने मोठय़ा जबाबदारीची धुरा पेलून धराल. मुलांना अभ्यासाचे गांभीर्य आणि महत्त्व पटवून द्याल. शारीरिक उष्णतेमुळे आणि बाह्य वातावरणामुळे त्वचा विकार बळावतील.

कर्क चंद्र-शुक्राचा केंद्र योग हा कला संवर्धक योग आहे. नातेसंबंध जपताना बाकीच्या गोष्टी दुय्यम वाटतील. नोकरी-व्यवसायात नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घ्याल. वरिष्ठांचा विरोध पत्करावा लागेल. सहकारी वर्गाकडून कामे वेळेत करून घेताना अतिरिक्त ऊर्जा खर्ची पडेल. जोडीदाराचा वैचारिक गुंता सुटेल. कामात स्पष्टता दिसून येईल. रखडलेली कामे उरकून टाकण्याचा अट्टहास नको. मुलांना अभ्यासाची गोडी लावावी लागेल. लहान-मोठय़ा कारणाने मन खट्टू होऊ देऊ नका.

सिंह रवी-चंद्राचा नवपंचम योग आपल्या कार्याचा नावलौकिक वाढवणारा आहे. नोकरी-व्यवसायात आपल्या मताचा मान ठेवला जाईल. वरिष्ठ आपल्या मुद्दय़ावर चर्चा करतील. सहकारी वर्गाची बाजू मुद्देसूद मांडाल. जोडीदार गुंतागुंतीच्या प्रसंगी योग्य सल्ला देईल. मुलांच्या मेहनतीचे चीज होईल. त्यांचे कौतुक कराल. अभिमान वाटेल. गरजवंताला दिलदारपणे मदत कराल. युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे. बोटांचे सांधे आखडतील. व्यायाम आवश्यक!

कन्या चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा आपल्या कलात्मक दृष्टीला पोषक ठरणारा योग आहे. नित्याच्या गोष्टीतही रस निर्माण कराल. मित्रमंडळींना आपला सहवास हवा हवासा वाटेल. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण कमी होईल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांना  संस्थेच्या प्रगतीची माहिती द्याल. जोडीदाराला नव्या कल्पना सुचतील. व्यापारी तत्त्वावर विचार कराल. मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागेल. रक्तातील घटकांचे प्रमाण बदलेल.

तूळ चंद्र-गुरूचा नवपंचम योग नव्या गोष्टी शिकण्यासाठी, प्रशिक्षण घेण्यासाठी पूरक असा योग आहे. नोकरी-व्यवसायात  लांबणीवर पडलेली कामे संबंधित व्यक्तीच्या निदर्शनास आणून द्याल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारी वर्गातील काहींना हे रुचणार नाही. पण त्याकडे दुर्लक्ष करावे. जोडीदाराची प्रगती होईल. परंतु खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मुलांच्या बाबतीत समाधानकारक बातमी समजेल. कामाचा ताण कमी करण्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.

वृश्चिक चंद्र-मंगळाचा केंद्र योग हा उत्साह आणि उत्सुकता वाढवणारा योग आहे. मनाप्रमाणे वागताना कोणाला दुखावत तर नाही ना याची खबरदारी घ्यावी. नोकरी-व्यवसायात आपले कौशल्य दाखवण्याचे  योग आहेत. लहान-मोठय़ा बाबी काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आपल्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. जोडीदाराचा त्याच्या कार्यक्षेत्रातील आत्मविश्वास बळावेल. मुलांना विचारस्वातंर्त्य द्याल. पित्त आणि डोकेदुखीची शक्यता वाढेल.

धनू चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा भावना आणि व्यवहार जपणारा, नातेसंबंध जोपासणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात नवे करार करताना विशेष सावधानी बाळगावी. आपल्या कार्यपद्धतीला वरिष्ठांकडून चांगली दाद मिळेल. मेहनतीला फळ लाभेल. सहकारी वर्गाकडे लक्ष देणे गरजेचे ! जोडीदाराला आर्थिक स्थैर्य मिळेल. कौटुंबिक जबाबदारीची जाण ठेवाल. मुलांच्या हिताचा विचार योग्य ठरेल. नसा, शिरा आखडणे याचा त्रास वाढल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.

मकर चंद्र-मंगळाचा लाभ योग आत्मविश्वास वाढवणारा योग आहे. केलेला निश्चय पूर्णत्वास न्याल. कामातील चिकाटी, सातत्य हेच आपल्या यशाचे रहस्य असेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आणि सहकारी वर्गाची मोलाची साथ मिळवाल. जोडीदार त्याच्या कामाच्या व्यापात व्यस्त असेल. तरीही आपल्यातील स्नेहबंध चांगले जपले जातील. मुलांच्या भविष्यातील योजनांचा विचार कराल. अनेक विचारांनी डोकं जड होईल. प्राणायाम, ध्यानसाधना केल्यास हलके, ताजेतवाने वाटेल.

कुंभ चंद्र-गुरूचा समसप्तम योग हा यशकारक आणि प्रगतीकारक योग आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद प्राप्त होतील. नव्या संकल्पना अमलात आणताना साकल्याने विचार कराल. नोकरी-व्यवसायात अधिकार योग मिळतील. सहकारी वर्गाला वेळेवर मदत कराल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मुलांना आपल्या कर्तव्याची जाणीव योग्य पद्धतीने करून द्याल. पोटाचे विकार बळावल्यास वैद्यकीय सल्ला आणि औषधे घ्यावीत.

मीन बुध-शुक्राचा युती  योग हा उद्योजकता आणि आर्थिक दृष्टीने  महत्त्वाचा योग आहे. कलागुणांना उत्तेजन मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतीकारक बातमी समजेल. वरिष्ठ अधिकारी नवी जबाबदारी सोपवतील. सहकारी वर्गाची मदत मिळवताना त्रास होईल. अडथळे पार करत पुढे जायची तयारी ठेवाल. जोडीदाराची कामाच्या व्यापात खूप दमछाक होईल. मुलांना योग्य मार्गदर्शन मिळून त्यांची गती वाढेल. मान, खांदे आणि दंड यांचे दुखणे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Astrology from 24th to 31st december 2021 horoscope zodiac sign rashibhavishya bhavishya dd
First published on: 24-12-2021 at 16:50 IST