News Flash

राशिभविष्य : दि. २७ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२१

रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक योग आहे.

horoscope
साप्ताहिक राशिभविष्य : असा असेल तुमचा आठवडा

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष रवी-चंद्राचा नवपंचम योग हा यशकारक योग आहे. प्रगतीचा मार्ग दाखवणाऱ्या रवीला चंद्राच्या कृतिशीलतेची जोड मिळेल; परंतु घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. नोकरी-व्यवसायात मेहनत फळास येईल. वरिष्ठांच्या सूचनांचे काटेकोर पालन कराल. सहकारी वर्गाच्या हजरजबाबीपणाचा योग्य प्रकारे उपयोग होईल. जोडीदाराचा त्याच्या कामकाजात अधिक वेळ खर्ची पडेल. मुलांचा अभिमान वाटेल. परंपरांचा आदर कराल. अपचनाचा त्रास वाढल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृषभ गुरू-चंद्राचा केंद्रयोग हा मार्गदर्शक योग ठरेल. गुरूच्या ज्ञानाला चंद्राच्या कुतूहलाची साथ मिळाल्याने नवे क्षेत्र खुले होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल. सहकारी वर्गाकडून लहान-मोठय़ा चुका होतील. काळजी घ्यावी. मुलांना त्यांच्या जबाबदारीवर स्वत:चे निर्णय घेऊ द्याल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचे अधिकार वाढतील. रीतिरिवाजानुसार आपली कर्तव्ये पार पाडाल. पोटाचे आणि श्वासाचे विकार वाढण्याची शक्यता आहे. काळजी घ्यावी.

मिथुन गुरू-चंद्राचा नवपंचम योग हा प्रेरणादायी योग आहे. अनुभवी ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. नव्या उमेदीने आपल्या आवडीचे काम कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाच्या समस्या समजून घ्याल. काही बाबतीत मुलांचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. जोडीदाराची साथसोबत चांगली मिळेल. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. शरीरातील अतिरिक्त उष्णतेमुळे उत्सर्जन संस्थेचे विकार बळावतील. पोट सांभाळा.

कर्क चंद्र-मंगळाचा केंद्रयोग ऊर्जादायी योग आहे. आपले पूर्वीचे अनुभवच आपले मार्गदर्शक ठरतील. आपल्या गुणदोषांची पारख करणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा दबाव सहन करावा लागेल. त्यांची मर्जी सांभाळून सहकारी वर्गाकडून  मदत घ्यावी. जोडीदाराच्या कष्टाचे दिवस आता संपतील. एकमेकांना समजून घ्याल. मुलांसाठी अतिरिक्त खर्च वाढतील. सणवार आनंदाने साजरे कराल. मनाची चंचलता कमी करून आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित कराल.

सिंह चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा उत्साहवर्धक योग आहे. मंगळाचा जोश आणि चंद्राचे चैतन्य यांचा मेळ जुळेल. बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या पाठबळामुळे महत्त्वाचे प्रकल्प सुरू होतील. सहकारी वर्गाची मेहनत कामी येईल. कामाचे व्यवस्थापन चांगले कराल. जोडीदाराची कामे वाढतील. त्याच्या साथीने मुलांसाठी योग्य अशा योजना आखाल. संस्कृतीचे जतन कराल. डोकेदुखी आणि पित्तविकार बळावण्याची शक्यता आहे.

कन्या चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा बुद्धिचातुर्यदर्शक योग आहे. भावनांचा कारक चंद्र आणि बुद्धीचा कारक बुध यांच्या समन्वयाने कठीण प्रसंगातून शिताफीने बाहेर पडाल. नोकरी-व्यवसायात नैतिक डावपेच खेळावे लागतील. हाती घेतलेले काम जबाबदारीसह पूर्ण कराल. मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात शिस्तीचेही महत्त्व पटवून द्याल. सामाजिक चालीरीतींचे भान राखाल. जोडीदाराला त्याच्या पेचातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य कराल. पित्ताशयाचं दुखणं वाढेल.

तूळ रवी-चंद्राचा लाभयोग हा आशादायक योग आहे. नव्या जोमाने स्वत:ला कामात झोकून द्याल. नोकरी-व्यवसायात मोठय़ा मंडळींच्या भेटीगाठी होतील. चर्चा यशस्वी होतील. सहकारी वर्गाकडून अपेक्षित साहाय्य मिळेल. जोडीदार त्याच्या पदाला साजेसा अधिकार गाजवेल. मुलांच्या इच्छा पूर्ण होतील. त्यांची प्रगती होईल. कौटुंबिक परंपरा जपाल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी होतील. नव्या पिढीतील नव्या विचारांचे स्वागत कराल. जखम झाल्यास ती चिघळेल. विशेष काळजी घ्यावी.

वृश्चिक चंद्र-रवीचा केंद्रयोग हा प्रयत्नांना यश देणारा योग आहे. रवीच्या अधिकाराला चंद्राच्या उत्साहाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात कडक शिस्तीचे वातावरण असेल. सबुरीने घ्यावे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपली प्रगती करून घ्याल. नवनव्या गोष्टी शिकाल. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. मित्रांकडून आनंदाच्या वार्ता समजतील. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. मुले मार्गी लागतील. उष्णतेचे विकार त्रासदायक ठरतील. पित्तप्रकोप होण्याची शक्यता आहे.

धनू मंगळ-नेपच्यूनचा समसप्तम योग उत्स्फूर्तता देणारा योग आहे. आपले विचार मुद्देसूदपणे मांडाल. नोकरी-व्यवसायात आपले सादरीकरण यशस्वी ठरेल; परंतु सर्वाना आपले म्हणणे पटेल असा आग्रह धरू नका. विरोधकांना सामोरे जावे लागेल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. मुलांचे हट्ट पुरवण्याआधी त्याच्याबरोबर चर्चा करणे हिताचे ठरेल. आपल्या संस्कृतीचे संवर्धन कराल. मानसिक समाधान मिळेल. पोटाचे विकार दुर्लक्षित करू नका. पथ्य पाळा.

मकर चंद्र-शनीचा नवपंचम योग हा मेहनतीचे फळ देणारा योग आहे. शनीच्या चिकित्सक वृत्तीला चंद्राच्या कुतूहलाची साथ मिळेल. संशोधनासाठी पोषक ग्रहमान आहे. नोकरी-व्यवसायात कलात्मक विचारांना पुष्टी मिळेल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. जिद्दीने व नेटाने आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. जोडीदाराच्या कामाचा वेग वाढेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. पारंपरिक चालीरीतींना आधुनिक वळण द्याल. मुले योग्य निर्णय घेतील. श्वसन व पचन कार्य जपा.

कुंभ चंद्र-नेपच्यूनचा लाभयोग हा स्फूर्तिदायक योग आहे. या दोन्ही संवेदनशील ग्रहांचा नावीन्यपूर्ण निर्मितीच्या कार्यात हातभार लागेल. नोकरी-व्यवसायात नव्या विचारधारेचा सन्मान होईल. आस्थापनेच्या हिताच्या गोष्टींचे निर्णय घ्याल. सहकारी वर्गाला प्रशिक्षण द्याल. जोडीदाराचा त्याच्या कार्यक्षेत्रात अधिकार वाढेल. मुलांच्या नाजूक समस्या चर्चेने सोडवाल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा मान राखाल. वाचन, लेखन आणि सादरीकरण यात विशेष प्रगती कराल. प्राणायाम आवश्यक!

मीन चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा भावनाप्रधान योग आहे.  इतरांच्या भावनांचा विचार करताना स्वत:चेही मानसिक स्वास्थ्य जपाल. नोकरी-व्यवसायात व्यावसायिक नातेसंबंध दृढ होतील. वरिष्ठ अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवतील. सहकारी वर्गाचा हेका फार काळ टिकणार नाही. जोडीदाराचा व्यावहारिक आणि कलात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरेल. एकमेकांचे विचार जुळतील. मुलांवर चांगले संस्कार कराल. हृदयाचे आरोग्य आणि रक्ताभिसरण संस्था यांची काळजी घ्यावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2021 5:38 pm

Web Title: astrology from 27th august to 2nd september 2021 horoscope star sign zodiac sign dd 70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २० ते २६ ऑगस्ट २०२१
2 राशिभविष्य : दि. १३ ते १९ ऑगस्ट २०२१
3 राशिभविष्य : दि. ६ ते १२ ऑगस्ट २०२१
Just Now!
X