सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे ऊर्जादायक वातावरण निर्माण कराल. इतरांना प्रेरणा द्याल. समूहाचे नेतृत्व कराल. नोकरी-व्यवसायात निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक! सहकारी वर्गावर त्यांच्या बुद्धिमत्तेला आव्हानात्मक अशी जबाबदारी सोपवाल. जोडीदाराच्या कामातील अडचणी दूर करताना त्याची दमछाक होईल. मुलांच्या संबंधातील कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. वातविकार बळावतील. अपचनाचा त्रास वाढेल.

वृषभ चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे कलात्मक विचारांना उत्तेजन मिळेल. मुलांच्या संगोपनाच्या दृष्टीने नव्या संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात बौद्धिक पातळीवरील आव्हाने पेलाल. वरिष्ठांच्या संमतीने प्रगतिकारक पावले उचलाल. सहकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात अनिश्चितता येईल. वादग्रस्त विषय त्याने टाळावेत. मुलांच्या गरजा पुरवताना खर्च हाताबाहेर जातील. कौटुंबिक वातावरण हलके ठेवाल. ओटीपोटाचे दुखणे बळावेल.

मिथुन चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे शुक्राच्या कलात्मक दृष्टिकोनाला चंद्राची भावनापूर्ण वृत्ती पोषक ठरेल. एखाद्या कार्यक्रमाचे आरेखन उत्तम प्रकारे कराल. नोकरी-व्यवसायात सहज होणाऱ्या कामांसाठीदेखील अधिक वेळ, ऊर्जा खर्च करावी लागेल. सहकारी वर्गाचे तानमान पाहून त्यांच्यावर विशेष जबाबदाऱ्या सोपवाल. संधीचा लाभ घ्याल. मुलांना कर्तव्याची जाणीव करून देणे आवश्यक! जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. अतिरिक्त उष्णतेमुळे पित्ताचे प्रमाण वाढेल.

कर्क चंद्र-गुरूच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या नावीन्याला गुरूच्या ज्ञानाची जोड मिळेल. ओळखीच्या व्यक्ती मदतीला धावून येतील. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेली कामे वेगाने पुढे जातील. महत्त्वाचे निर्णय ठामपणे घ्याल. रागावर नियंत्रण ठेवावे. सहकारी वर्गाचा सल्ला लाभदायक ठरेल. जोडीदाराला आपल्या आधाराची गरज भासेल. त्याची मन:स्थिती द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवाल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता समजतील. कमरेच्या खालच्या भागाचे आरोग्य जपावे.

सिंह चंद्र-मंगळाच्या समसप्तम योगामुळे नव्या जोमाने पुढे सरसावाल. हिमतीने कामे पूर्णत्वाला न्याल. शारीरिक मेहनत घ्यायचीही वेळप्रसंगी तयारी ठेवावी. नोकरी-व्यवसायात योग्य ठिकाणी अधिकार गाजवाल. सहकारी वर्गात दरारा निर्माण कराल. जोडीदाराच्या बुद्धिवादी स्वभावामुळे मोठे नुकसान टळेल. त्याच्या कामातील व्यवहारचातुर्यामुळे त्याची पत वाढेल. कौटुंबिक ताणतणाव कमी कराल.  आहार, व्यायाम आणि विश्रांती या त्रिसूत्रीचे योग्य पालन करावे.

कन्या आत्मकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे नव्या योजना आखून त्या कार्यान्वित कराल. नोकरी-व्यवसायात आर्थिक लाभ होतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील पावले उचलाल. सहकारी वर्गाची चांगली मदत मिळेल. त्यांच्यातील गुणांचे कौतुक कराल. जोडीदाराच्या कामातील अडचणी दूर होतील. ताण कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. बौद्धिक, वैचारिक तणावामुळे डोके जड होईल.

तूळ चंद्र-नेपच्यूनच्या समसप्तम योगामुळे अंत:स्फूर्ती जागृत होईल. उत्स्फूर्त लेखन कराल. कलात्मक दृष्टिकोनाला नेतृत्वाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून विचारल्या गेलेल्या प्रश्नांना हुशारीने सामोरे जाल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचे खटके उडतील. त्याने शब्दांवर नियंत्रण ठेवणे इष्ट! मुलांच्या समस्या सोडवताना त्यांच्या बाजूनेही विचार करून पाहावा. रक्ताभिसरणासंबंधित प्रश्न उपस्थित होतील.

वृश्चिक चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक क्षेत्रात प्रगती कराल. भावनांमध्ये गुंतून न पडता व्यावहारिक दृष्टीने विचार करून पुढे जाल. नोकरी-व्यवसायात कामकाजातील पद्धतीत बदल होतील. नव्याचा स्वीकार कराल. सहकारी वर्गाला वेळप्रसंगी मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराला अनेक अडचणींवर मात करावी लागेल. त्याची शारीरिक व मानसिक दमणूक होईल. कुटुंब सदस्यांच्या बुद्धीचे आणि कष्टाचे चीज होईल. ताप, उष्णतेचे विकार असे त्रास होतील.

धनू ऊर्जेचा स्रोत रवी आणि उत्साहदायक मंगळ यांच्या केंद्र योगामुळे हाती घेतलेल्या कामाला गती येईल. नव्या जोमाने कामे पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात नवे करार करताना सावधगिरी बाळगा. सर्व अटी काळजीपूर्वक तपासून पाहा. सहकारी वर्गाच्या समयसूचकतेचा लाभ होईल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्राव्यतिरिक्त इतर कामात स्वत:ला गुंतवून घेईल. आपल्या छंदांसाठी वेळ राखून ठेवाल. कुटुंबातील सदस्यांसह शेजारीपाजारी यांच्यासमवेत वेळ आनंदात जाईल.

मकर शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या उत्सुकतेला शनीची चिकाटी पोषक ठरेल. कामाला वेग येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळवणे कठीण जाईल. सहकारी वर्गाची मदत होईल. ज्येष्ठांचे अनुभव मार्गदर्शक ठरतील. जोडीदाराच्या कामामधील अडचणी दूर होतील. मेहनतीचे फळ मिळेल. कुटुंबातील सदस्यांमधील वादविवाद टाळा. मुलांना आर्थिक लाभ होईल. श्वसनाचा त्रास झाल्यास दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ल्यासह प्राणायाम उपयोगी पडेल.

कुंभ चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे  स्मरणशक्तीचा उत्तम उपयोग होईल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती कराल. भावनांच्या आहारी न जाता विचारपूर्वक कृती कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना काही गोष्टींचा खुलासा द्यावा लागेल. सहकारी वर्गाची साथ मिळाली तरी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जिकिरीने पार पाडाव्या लागतील. आर्थिक बाजू बळकट होईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात काही ना काही कुरबुरी चालू राहतील. त्याचा मनस्ताप वाढेल. कौटुंबिक जबाबदारी दोघे मिळून पार पाडाल.

मीन शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे चंद्राच्या चंचलतेला शनीच्या चिकाटीचा लगाम बसेल. मेहनतीचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे नवे अनुभव गाठीशी येतील. सहकारी वर्गाच्या अडचणी, प्रश्न समजून घ्याल. जोडीदाराच्या कामाचा व्याप आणि ताप वाढेल. त्याने शब्द जपून वापरावेत. कुटुंब सदस्यांना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मुलांची कामे मार्गी लागतील. कामाच्या गडबडीत मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष नको!