सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूचा समसप्तम योग हा ऊर्जादायी आणि यशकारक योग आहे. मोठय़ा व्यक्तींकडून  मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांची मर्जी राखाल. विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने नव्या जबाबदाऱ्या स्वीकाराल. मुलांना हिताच्या गोष्टी सांगून त्यांचे मनोबल वाढवाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. नातेवाईकांकडून शुभ वार्ता समजतील. घसा-डोळ्यासंबंधित तक्रारी उद्भवल्यास त्यावर वैद्यकीय उपाय करावा.

वृषभ रवी-नेपच्यूनचा केंद्र योग स्फूर्तिदायक आणि नवनिर्मितीचा कारक योग आहे. वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला उपयोगी ठरेल. अंतिम निर्णय जाहीर करताना शांतपणे विचार करावा. नोकरी-व्ययसायात मोठी मजल माराल. सहकारी वर्गाकडून काम करून घेताना लहानमोठय़ा चुका होण्याचा संभव आहे. अधिक सतर्कता आवश्यक! मुलांच्या बाबतीत अतिविचारांनी डोकं जड होईल. जोडीदाराला नव्या संधी उपलब्ध होतील. ओटीपोटाचे दुखणे बळावेल.

मिथुन चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा यशकारक स्थिती निर्माण करणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. जुन्या ओळखीच्या व्यक्तींच्या मदतीने पेचप्रसंगातून सहीसलामत बाहेर पडाल. सहकारी वर्गाची कामे रेंगाळतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचा विशिष्ट ठसा उमटेल. मुलांच्या कलागुणांना उत्तेजन मिळेल. शेजाऱ्यांना मदत करण्याची संधी मिळेल. आपले छंद जोपासताना सामाजिक बांधिलकीचे भान ठेवाल. फोड, पुटकुळ्यांमध्ये पाणी साठेल.

कर्क चंद्र-मंगळ यांचा युतियोग भावनांना कृतीची जोड देणारा ठरेल. मनातील संकल्पना कृतीत उतरवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीकारक पावले उचलाल. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळण्यास विलंब लागेल. काही कामे रखडतील. जोडीदाराची मेहनत कारणी लागेल. परंतु त्याची अतिश्रमाने दमणूक होईल. मुलांच्या विचारांना सकारात्मक वळण द्याल. मित्र मंडळी, आप्तजन आणि नातेवाईकांशी संपर्क साधल्याने कौटुंबिक वातावरण उत्साही राहील.

सिंह रवी-चंद्र यांचा लाभ योग हा यशकारक आणि प्रेरणादायी योग आहे. हाती घेतलेल्या कामांना गती येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागेल. सहकारी वर्गाची मदत घेऊन कामाचा महत्त्वाचा टप्पा गाठाल. मुलांच्या प्रगतीसाठी मेहनत घ्याल. जोडीदाराचे काम जलदगतीने पुढे जाईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. अचानक अपेक्षित बातमी मिळेल. कामाच्या व्यापात कंबर आणि पाठीचा मणका यांची काळजी घ्यावी.

कन्या चंद्र-बुधाचा केंद्र योग भावनांच्या आंदोलनांवर नियंत्रण ठेवणारा योग आहे. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित कराल. नोकरी-व्यवसायात आर्थिक बाजू भक्कम बनेल. आपले निर्णय योग्य ठरतील. सहकारी वर्गाकडून अपेक्षांबाबत सबुरीने घ्यावे. जोडीदाराला आपल्या भावनिक आधाराची गरज भासेल. मुलांच्या मेहनतीचे त्यांना योग्य फळ मिळेल. नातेवाईकांना आपल्या ओळखीचा लाभ करून द्याल. दूषित पाण्यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवतील.

तूळ  शुक्र-हर्षलचा लाभ योग हा कलेला तंत्रज्ञान व आधुनिकतेची जोड देणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. सहकारी वर्गाकडून कामे पूर्ण करून घेताना अतिरिक्त ऊर्जा खर्च करावी लागेल. डोकं शांत ठेवणे महत्त्वाचे! जोडीदाराच्या कामकाजात अचानक बदल होतील. मुलांच्या समस्या सामोपचाराने दूर कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी वेळ राखून ठेवाल. वातविकार बळावतील. काळजी घ्यावी.

वृश्चिक चंद्र-बुधाचा लाभ योग बौद्धिक पातळी उंचावणारा योग आहे. नव्या कार्यक्षेत्रात पदार्पण कराल. भावना आणि विचार यांचा समतोल राखाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताप्रमाणे वागणे आणि निर्णय घेणे कठीण जाईल. डगमगू नका. सहकारी वर्गासह नातेसंबंध सुधारतील. जोडीदाराच्या मताला योग्य मान मिळेल. मुलांना आपली समस्या स्पष्टपणे मांडण्याची संधी द्याल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्याचा प्रयत्न सफल होईल. हवामानातील बदलांमुळे सर्दीपडसे होईल.

धनू चंद्र-शुक्राचा लाभ योग हा आपल्यातील कलात्मकतेला उत्तेजन देणारा ठरेल. नव्या संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात हाती आलेल्या संधीचे सोने कराल. मेहनत घेऊन आपल्या वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. समयसूचकतेचा उपयोग होईल. मुलांना अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवाल. पाठीच्या मणक्यासह मज्जा संस्थेची विशेष काळजी घ्यावी लागेल. व्यायाम आणि पथ्य यांच्याकडे लक्ष द्यावे.

मकर चंद्र-नेपच्यूनचा समसप्तम योग हा उत्स्फूर्त प्रतिसाद देणारा योग आहे. एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन घडवाल. नोकरी-व्यवसायात स्वत:सह इतरांची प्रगती कशी होईल यावर लक्ष केंद्रित कराल. सहकारी वर्गाच्या कामाचा अंदाज घेऊन नव्या योजना त्यांच्यावर सोपवाल. परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घ्याल. मुलांना आपले मत व्यक्त करण्याची संधी द्याल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. जोडीदाराचे काम नवे वळण घेईल. उष्णतेचे विकार, स्नायूंचे आजार बळावतील.

कुंभ चंद्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा मानसिक समतोल राखणारा आणि मनोबल वाढवणारा योग आहे. आपल्या कार्यक्षेत्रात नव्या योजना मांडाल. वरिष्ठांचे पाठबळ मिळवाल. सहकारी वर्गासह पुढील कार्याची आखणी विशेष उल्लेखनीय पद्धतीने कराल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. त्याच्या कामकाजात प्रगतीकारक निर्णय घेतले जातील. मुलांच्या प्रश्नांना योग्य उत्तरे सापडतील. रक्तातील घटकांचे प्रमाण कमी अधिक झाल्यास दुर्लक्ष करू नका. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मीन चंद्र-हर्षलचा नवपंचम योग हा आधुनिकतेला पारंपरिक गोष्टींची साथ देणारा योग आहे. जुन्या पद्धतीतील वैज्ञानिक दृष्टिकोन समाजापुढे मांडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मते मान्य करून पुढील कार्यवाही वेगाने कराल. जोडीदाराची कामाच्या व्यापामुळे त्याची दमणूक होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने सोडवाल. कान ठणकणे, कानाच्या मागचा भाग सुजणे असे त्रास उद्भवल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.