सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष : चंद्र-शनीचा केंद्रयोग आपल्यातील चिकाटी वाढवेल. संयम कामी येईल. नोकरी-व्यवसायात आपली प्रतिक्रिया सामंजस्याने मांडाल. चर्चेतील मुद्दे लाभदायक ठरतील. सहकारी वर्गाची मदत मिळाल्याने मोठी मजल गाठाल. मुलांच्या हिताचे निर्णय घ्याल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याच्या कामाची गती वाढेल. कुटुंबात आनंद वार्ता पसरेल. उत्साह वाढेल. आर्थिक नियोजनावर अधिक भर द्यावा. कटू शब्द कटाक्षाने टाळा. मानेचे स्नायू आखडल्यास हलका व्यायाम करावा.

वृषभ : चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा कायदेविषयक कामांना गती देणारा योग आहे. भावनांना विचारांची चांगली बैठक द्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाचा पल्ला गाठाल. उमेद टिकून राहील. सहकारी वर्गाच्या विचारांना दुजोरा द्याल. जोडीदार नव्या उत्साहाने कामाला सुरुवात करेल. मागचे विसरून जाण्यातच शहाणपणा ठरेल. मुलांवर केलेल्या संस्कारांची धन्यता वाटेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील. मूत्रविकार सतावतील. वैद्यकीय सल्ला व उपचार घ्यावे लागतील.

मिथुन : रवी-चंद्राचा केंद्र योग हा सुरळीत चाललेल्या कामात अडचणी आणणारा ठरेल, पण डगमगू नका. पुढे योग्य मार्ग सापडेल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. कामातील उत्साह वाढेल. सहकारी वर्गाची साथ मिळेल. सामाजिक कार्यात हातभार लावाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात प्रगतिकारक वार्ता येतील. मुलांच्या बाबतीत हळवेपणा जाणवेल. महत्त्वाचे निर्णय घेताना भावुक होऊ नका. घशाचे इन्फेक्शन त्रासदायक ठरेल. पोटाचे विकार बळावतील. पथ्य पाळा.

कर्क : चंद्र-मंगळाचा लाभ योग हा कृतीला ऊर्जेची जोड देणारा योग आहे. मनातील विविध कल्पना कृतीत आणाल. नोकरी-व्यवसायात अनपेक्षित गोष्टींना सामोरे जावे लागेल. पर्यायी व्यवस्था तयार ठेवा. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवाल. सहकारी वर्गाची उल्लेखनीय साथ मिळेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज होईल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल. कौटुंबिक समस्येवर विचारविनिमय करून मार्ग सापडेल. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पथ्य पाळणे आवश्यक!

सिंह : चंद्र-गुरूचा नवपंचम योग हा आत्मविश्वास वाढवणारा योग आहे. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. प्रयत्न सफल होतील. नोकरी-व्यवसायात आपली पत वाढेल. नवी जबाबदारी स्वीकाराल. सहकारी वर्गाच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे द्याल. जोडीदाराचा सल्ला आपल्यासाठी आणि कुटुंबासाठी हितकारक ठरेल. मुलांना नव्या संधी मिळतील. नातेवाईकांच्या भेटीतून मार्ग निघेल. अपचनाचा त्रास झाल्यास घरगुती उपचार उपयोगी पडतील. व्यायामाची सवय लावून घ्यावी लागेल.

कन्या : गुरू-रवीचा नवपंचम योग हा यशकारक योग आहे. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात मिळालेल्या संधीचे सोने करून दाखवाल. मनाची दोलायमान स्थिती मात्र स्थिर ठेवावी. सहकारी वर्गाकडून कामे करून घेताना नित्य नव्या समस्यांना तोंड द्याल. जोडीदाराला आपल्या आवडत्या गोष्टींसाठी वेळ काढता येईल. मुलांच्या मेहनतीला यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. यकृताचे आरोग्य जपा. वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार याकडे दुर्लक्ष नको!

तूळ : रवी-चंद्राचा नवपंचम योग हा प्रयत्नांना यश देणारा योग आहे. आशादायक स्थिती निर्माण होईल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद भूषवाल. सहकारी वर्गाकडून अपेक्षा पूर्ण होतील. कौटुंबिक प्रश्न ऐरणीवर येतील. सामोपचाराने निर्णय घ्यावा. जोडीदाराची ओढाताण होईल. एकमेकांच्या आधाराची गरज भासेल. मुलांच्या भल्यासाठी काही निर्णय बदलाल. परिस्थितीचा विचार करूनच पाऊल पुढे टाकाल. अतिविचारांनी डोकं जड होईल. वैचारिक विश्रांती व प्राणायाम उपयोगी पडेल.

वृश्चिक : चंद्र-मंगळाचा नवपंचम योग हा कामाला गतिमानता देणारा योग आहे. नवनवीन प्रयोग करून बघण्याकडे कल असेल. नोकरी-व्यवसायात परिस्थितीचा गांभीर्याने विचार कराल. निर्णय घेताना घाई करू नका. सहकारी वर्गावर चिडचिड न करता त्यांची बाजू समजून घ्यावी. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्न लवकरच सुटतील. जोडीदाराच्या अस्वस्थ स्थितीत त्याला आपली साथ देणे आवश्यक ठरेल. वेळात वेळ काढून त्याच्या सान्निध्यात राहावे.

धनू : शुक्र-नेपच्यूनचा नवपंचम योग हा कल्पकता वाढवणारा योग आहे. कामासंबंधित किंवा आपल्या छंदासाठी काही नवीन योजना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात बुद्धिचातुर्य उपयोगी पडेल. समस्यांवर चर्चा करून उकल शोधाल. सकारात्मक विचारांमुळे प्रगती होईल. सहकारी वर्गाची साथ चांगली मिळेल. जोडीदाराच्या कामातील प्रश्न सहज सुटणारे नाहीत. थोडे धीराने घ्यावे. मुलांच्या बाबतीत जोडीदाराचा सल्ला विचारात घ्याल. आहारावर नियंत्रण ठेवा.

मकर : चंद्र-मंगळाचा केंद्र योग मेहनतीचे योग्य फळ देणारा आणि उत्साहवर्धक योग आहे. नोकरी-व्यवसायात प्रतिस्पर्धीसह वाद टाळावेत, अन्यथा आपली ऊर्जा वाया जाईल. वरिष्ठांच्या सूचनांचे काटेकोर पालन कराल. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. मुलांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असेल. आपल्या हिमतीची दाद मिळेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. पाठ, कंबर, मणका यांची विशेष काळजी घ्यावी. वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावा.

कुंभ : चंद्र-गुरूचा केंद्र योग ऐश्वर्यकारक आणि लाभदायक योग आहे. अनुभवी व्यक्तींचा वेळेवर मिळालेला सल्ला उपयोगी पडेल. नोकरी-व्यवसायात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत डोक्यावर टांगती तलवार राहील. सहकारी वर्गाच्या साहाय्याने काम हलके होईल. धीर मिळेल. मुलांना नवी उमेद द्याल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. आप्तेष्टांच्या भेटी होण्याची शक्यता आहे. कुटुंब सदस्य सामाजिक चळवळीत सामील होतील. दूषित पाण्यामुळे पोटाचे स्वास्थ्य बिघडेल. काळजी घ्यावी.

मीन : चंद्र-शुक्राचा केंद्र योग नातेसंबंधात दृढता निर्माण करेल. नित्याची कामे कल्पकतेने पूर्ण कराल. संकटातून संधीचा शोध घ्याल. नोकरी-व्यवसायातील अडचणी चातुर्याने दूर कराल. सहकारी वर्गाची लबाडी उघडकीस आणाल. संस्थेचे नुकसान टाळाल. जोडीदार स्वत:च्या हिमतीवर मोठी उडी घेण्याचा प्रयत्न करेल. त्याला आपली साथ द्याल. मुलांच्या भविष्याची चिंता करू नका. छाती व फुप्फुसाचे आरोग्य सांभाळावे. व्यायामाची आवश्यकता भासेल.