सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा भावना आणि व्यवहार अर्थात मन आणि बुद्धी यांच्यात समतोल राखणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गाची बाजू वरिष्ठांपुढे प्रभावीपणे मांडाल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. त्याच्या कलात्मकतेला वाव मिळेल. मुलांवर केलेले संस्कार कामी येतील. त्यांच्यातील समाजकार्याची आवड दिसून येईल. श्वास लागणे, धाप लागणे असे त्रास आढळल्यास त्वरित उपचार घ्यावेत.

वृषभ चंद्र-नेपच्यूनचा युतीयोग हा उत्साहवर्धक आहे. नव्या संकल्पनांना पूरक वातावरण मिळेल. सकारात्मक विचारांनी इतरांना धीर द्याल. गरजवंतांना दिशा दाखवाल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकाल. सहकारीवर्गाला सढळ हाताने मदत कराल. कौटुंबिक वातावरण शिस्तीचे पण प्रेमाचे राहील. मुलांसाठी केलेले आर्थिक नियोजन कामी येईल. उत्सर्जन संस्थेसबंधित त्रास, जळजळ होणे अशा समस्या उदभवतील. काळजी घ्यावी.

मिथुन बुध-नेपच्यूनचा नवपंचम योग हा बुद्धिमत्तेला अंत:स्फूर्तीची जोड देणारा योग आहे. नवनिर्मितीसाठी पूरक ग्रहमान आहे. गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात साकल्याने विचार करून योग्य निर्णय घ्याल. सहकारीवर्गाच्या समस्या समजून घ्याव्यात. जोडीदाराचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढेल. मुलांच्या बाबतीत शुभ वार्ता समजतील. नातेवाईकांच्या भेटीगाठी लांबणीवर पडतील. उष्णतेच्या विकारांवर वेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत.

कर्क रवी-चंद्राचा नवपंचम योग हा स्फूर्तिदायक योग आहे. हाती घेतलेल्या योजना पुढल्या टप्प्यावर न्याल. नोकरी-व्यवसायात अचानक महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.  सहकारीवर्गाला मदतीचा हात द्याल. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा कामासाठी खर्चाची तरतूद करून ठेवाल. जोडीदाराची उमेद वाढवाल. त्याच्या कामाची दखल घ्याल. नातेवाईकांच्या तब्येतीच्या तक्रारी वाढतील. कामाच्या ताणतणावामुळे चक्कर येणे, डोकं जड होणे असे त्रास उद्भवतील.

सिंह गुरू-मंगळाचा समसप्तम योग उदात्त विचारांना प्रत्यक्षात आणणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात मंगळाची ऊर्जा आणि गुरूचे ज्ञान यांचा उत्तम संगम दिसून येईल. सहकारीवर्गाला समाजकार्यासाठी उद्युक्त कराल. वडीलधाऱ्या आदरणीय व्यक्तींकडून मोलाचा सल्ला मिळेल. जोडीदाराच्या कष्टाचे चीज झाल्याने कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. मुलांच्या कामाला गती मिळेल. लहान-मोठय़ा प्रवासात पडणे, मार लागणे यापासून सावधगिरी बाळगावी.

कन्या चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा बुद्धिमत्तेला चालना देणारा योग आहे. चंद्राच्या कृतिशीलतेला बुधाच्या बुद्धिचातुर्याची जोड मिळाल्याने कामाला गती येईल. नवे संकल्प तडीस न्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताचा आदर करून त्याचे काटेकोरपणे पालन कराल. सहकारीवर्गाच्या कामातील कमतरतांमुळे चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. याची खबरदारी आधीपासूनच घ्यावी. मुलांना चिकाटी आणि सातत्याचे धडे द्यावे लागतील. डोळ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

तूळ चंद्र-गुरूचा युतीयोग हा प्रगतिकारक योग आहे. गुरुजनांच्या सान्निध्याचा लाभ होईल. नोकरी-व्यवसायात महत्त्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवाल. वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारीवर्गाच्या समस्यांना वाचा फोडाल. आर्थिक बाजू सावरून धराल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे सापडतील. धीर धरावा. जोडीदाराच्या कामाच्या स्वरूपातील बदल स्वीकारण्यास थोडा काळ जाईल. मुलांच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष पुरवावे लागेल. आतडय़ांना सूज आल्यास दुर्लक्ष नको.

वृश्चिक चंद्र-हर्षलचा लाभयोग हा संशोधनात्मक कार्यात यश देणारा योग आहे. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून त्यात अपेक्षित प्रगती कराल. नवनिर्मितीचा आनंद मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. सहकारीवर्गाच्या साथीने कामात लक्षणीय प्रगती होईल. मुलांमधील चांगले गुण वाढीस लावण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. जोडीदार नव्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडेल. कौटुंबिक वातावरण ‘एकमेका साहाय्य करू’ या तत्त्वावर आकार घेईल. पित्ताचा त्रास वाढेल.

धनू चंद्र-नेपच्यूनचा लाभयोग हा स्फूर्तिदायक योग आहे. वाचन, लेखनात प्रगती कराल. वंदनीय व्यक्तींचा सहवास आणि मार्गदर्शन लाभेल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या हिमतीवर काही जबाबदाऱ्या स्वीकाराल. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण कराल. सहकारीवर्गासह काही बाबतीत जुळवून घेणेच श्रेयस्कर ठरेल. मुलांना प्रेमासह शिस्तीचे धडे द्याल. वळण लावाल. कुटुंब सदस्यांना लहानमोठय़ा प्रवासाचे योग येतील. पाठीचे दुखणे वाढेल. श्वसनाचे त्रास वाढल्यास वैद्यकीय उपचार घ्यावेत.

मकर रवी-चंद्राचा समसप्तम योग हा यशकारक योग आहे.  प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. नोकरी-व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तांत्रिक समस्या दूर कराव्या लागतील. आर्थिक गणिते आणि गुंतवणूक याबाबत बारकाईने विचार कराल. वरिष्ठ आणि सहकारीवर्गाला जोडणारा दुवा बनाल. जोडीदाराच्या कामात यश मिळेल. मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होईल. आपल्या गुरुजनांचे मार्गदर्शन मिळेल. श्वसनविकारांवर नियंत्रण ठेवा. प्राणायामचा अवलंब करा.

कुंभ चंद्र-शुक्राचा समसप्तम योग हा कलाकौशल्याला तंत्रज्ञानाची जोड देणारा योग आहे. नातेसंबंध अधिक दृढ होतील. नोकरी-व्यवसायात करार करताना आवश्यक ती सावधानी बाळगा. वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. सहकारीवर्गासह संबंध सुधारतील. गुरुजनांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात मानाचे स्थान मिळवेल. कौटुंबिक समस्या चर्चा करून सोडवाल. मुलांच्या गुणांचा योग्य विकास होईल. कामाचा व्याप आणि अतिविचारांनी डोकं शिणेल.

मीन चंद्र-शनीचा लाभयोग हा मेहनतीला यश देणारा योग आहे. शनीच्या चिकाटीला आणि मुत्सद्दीपणाला चंद्राच्या कुतूहलाची साथ मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न कराल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवणे कठीण जाईल. सहकारीवर्ग आपल्या बाजूने उभा राहील. न डगमगता आगेकूच करावी. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मुलांच्या समस्यांचे निराकरण कराल. पोटात आग पडेल.