सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com
मेष चंद्र-हर्षलचा लाभ योग हा स्पष्टवक्तेपणाला पाठिंबा देणारा योग आहे. हर्षलची संशोधक वृत्ती आणि चंद्राचे कुतूहल यामुळे नावीन्यपूर्ण घटना घडतील. नोकरी-व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. वरिष्ठांपुढे नवे विचार मांडाल. सहकारी वर्गाकडून चांगली साथ मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याचे नाव चमकेल. मुलांची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नव्या खरेदीचे आराखडे मांडाल. उष्णतेचे विकार बळावतील. आहाराकडे लक्ष द्यावे.

वृषभ चंद्र-गुरूचा युतियोग हा आशादायी योग आहे. मेहनतीला अपेक्षित फळ देणारा आणि नवा किरण दाखवणारा योग आहे. नोकरी-व्यवसायात भाग्यकारक बदल घडतील. जेष्ठ वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाचे आराखडे खरे ठरतील. जोडीदाराच्या मदतीने कुटुंबासाठी मोठे पाऊल उचलाल. मुलांना मेहनतीचे महत्त्व पटवून द्याल. न पटणाऱ्या गोष्टींवरून चिडचिड करणे टाळा. श्वसन आणि उत्सर्जन संस्थेच्या कार्यात बिघाड झाल्यास वैद्यकीय तपासणी करावी.

मिथुन चंद्र-शुक्राचा नवपंचम योग हा भावनांचे योग्य प्रकारे संगोपन करणारा योग आहे. उद्योगशीलतेला पोषक अशा या योगामुळे नव्या संकल्पना अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात आलेल्या अडचणींवर शांत डोक्याने विचार करावा. घाईने कोणताही निर्णय जाहीर करू नये. सहकारी वर्गाचा स्पष्टवक्तेपणा एखाद्या ठिकाणी लाभदायक ठरेल. जोडीदाराला आपल्या आधाराची गरज भासेल. मुलांचा समंजसपणा वाखाणण्याजोगा असेल. पोटाची काळजी घ्या.

कर्क चंद्र-शनीचा लाभ योग हा कष्टसाध्य योग आहे. चंद्राच्या कुतूहलाला शनीच्या सातत्याची जोड मिळेल. काही बाबींवर अधिक मेहनत घेतली तर त्या साध्य कराल. नोकरी-व्यवसायात अचानक मोठे निर्णय घ्यावे लागतील. वरिष्ठांच्या पाठिंब्यामुळे हाती घेतलेल्या कामांना गती मिळेल. सहकारी वर्गावर पूर्णपणे विसंबून राहू नका. जोडीदाराच्या कामातील गुंता वाढल्यास त्याला आपल्या आधाराची गरज भासेल. मुलांचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. पचनाचा त्रास बळावेल.

सिंह चंद्र-बुधाचा समसप्तम योग हा समयसूचकतादर्शक योग आहे. चंद्राच्या भावनांचे हिंदोळे बुधाच्या बुद्धिमत्तेमुळे स्थिरवतील. सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात अधिकाराचे पद योग्य प्रकारे भूषवाल. वरिष्ठांच्या आदेशाचा मान राखाल. सहकारी वर्ग विशेष हिमतीने आगेकूच करेल. त्यांच्या कामाची दाद द्याल. जोडीदाराची रखडलेली कामे धीम्या गतीने मार्गी लागतील. मुलांच्या समाजप्रियतेला पाठिंबा द्याल. सर्दी, पडसे आणि कफ विकार उद्भवतील.

कन्या बुध-गुरूचा नवपंचम योग हा गुणवर्धक योग आहे. बुधाची व्यावहारिक बुद्धी आणि गुरूचे अनुभवाचे ज्ञान यांचा मिलाप आपली कमाल दाखवेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी राखून महत्त्वाच्या कामाची पूर्तता कराल. सहकारी वर्ग आपल्याला साहाय्य करेल. व्यावहारिक नातेसंबंध जपाल. जोडीदाराच्या कामात अधिक ढवळाढवळ करू नका. मुलांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. ओटीपोटात दुखणे, वातविकार सतावणे असा त्रास होईल.

तूळ चंद्र-शुक्राचा केंद्र योग हा कल्पकतादर्शक योग आहे. उपलब्ध गोष्टींतून आकर्षकपणा निर्माण कराल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेल्या कामांची स्थिती सुधरवाल. त्यात आवश्यक असे बदल करण्याचा निर्णय सर्वांसाठी हितावह ठरेल. वरिष्ठ आणि सहकारी वर्ग यांच्यातील दुवा ठराल. जोडीदाराच्या कामाच्या ताणाचा परिणाम त्याच्या तब्येतीवर दिसून येईल. मुलांच्या बाबतीत नव्या योजना आखाल. विचारांची दिशा बदलल्याने समस्यांवर उपाय सापडतील. अट्टहास सोडाल.

वृश्चिक चंद्र-गुरूचा लाभ योग हा मार्गदर्शक योग ठरेल. वैचारिक गोंधळ कमी होऊन योग्य मार्ग निवडाल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्गाची मनधरणी करावी लागेल. त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे द्याल. जोडीदाराचा स्पष्टवक्तेपणा लाभदायक ठरेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मुलांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा असेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. मान आणि खांदे यांचे दुखणे वाढल्यास दुर्लक्ष करू नका.

धनू चंद्र-नेपच्यूनचा युतीयोग हा सकारात्मक दृष्टी देणारा योग आहे. नव्या उत्साहाने कामाची जबाबदारी स्वीकाराल. नोकरी-व्यवसायात सरकारी कामे पुढे सरकतील. स्वत:च्या हिमतीच्या जोरावर दिलेला शब्द पाळाल. सहकारी वर्गाची मदत उल्लेखनीय असेल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात उन्नती होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी धावपळ करावी लागेल. मुलांच्या समंजसपणाचे कौतुक कराल. डोळ्यांची काळजी घ्यावी. शांत झोप आवश्यक!

मकर शुक्र-शनीचा केंद्र योग हा कर्तव्यपूर्तीचे समाधान देणारा योग आहे. शुक्राच्या कलात्मक दृष्टीला शनीच्या चिकाटीची पुष्टी मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्या गुणांची कदर करतील. सहकारी वर्गासह व्यवहार संभाळाल. जोडीदाराची चिडचिड वाढेल. त्याच्यासाठी वेळ राखून ठेवावा लागेल. मुलांना दिलेल्या सवलतींचा ते योग्य प्रकारे उपयोग करतील. शेजाऱ्यांसह शब्द जपून वापरावेत. पायाच्या शिरा आखडतील. वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे ठरेल. औषधोपचार घ्यावा लागेल.

कुंभ चंद्र-बुधाचा नवपंचम योग हा विवेकबुद्धीदर्शक योग आहे. भावभावनांचा कारक चंद्र आणि व्यावहारिक बुद्धीचा कारक बुध यांच्यात समतोल साधला जाईल. नोकरी-व्यवसायात अडचणी आल्या तरी त्यातून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जाण्यास वाट सापडेल. सहकारी वर्गातील सदस्य आपल्या प्रश्नांनी ग्रस्त असतील. जोडीदाराला विशेष मेहनत घेऊन स्वत:ला सिद्ध करावे लागेल. मुलांचे काम मार्गी लागेल. तणावयुक्त वातावरणात डोकं शांत ठेवणे आवश्यक!

मीन चंद्र-मंगळाचा समसप्तम योग हा उत्साहवर्धक योग आहे. नव्या जोमाने पुन्हा एकदा सुरुवात कराल. नोकरी-व्यवसायात योग्य कामासाठी आवश्यक व्यक्तीची नेमणूक कराल. वरिष्ठांच्या सूचनांचे अचूकपणे पालन कराल. सहकारी वर्गाच्या मेहनतीला यश येईल. जोडीदार त्याच्या कामातील बारकावे योग्य प्रकारे टिपून अमलात आणतील. मुलांचे प्रश्न हळुवारपणे सोडवाल. कुटुंबासाठी वेळ राखून ठेवाल. कमरेचे दुखणे बळावल्यास औषधोपचारासह विश्रांतीची आवश्यकता भासेल.