20 November 2019

News Flash

औषधाविना उपचार : मद्य न पेयं, पेयं ना स्वल्पं, सुबहुवारिद्यंवा।

आयुर्वेदात दारूमुळे होणाऱ्या विकारांचे विस्तृत वर्णन आहे. कुठेच दारू प्यावी, आपलीशी करावी असा सांगावा नाही. आयुर्वेदात सांगितलेले मद्य व आताची दारू यात महद्अंतर आहे.

| February 20, 2015 01:04 am

01khadiwaleआयुर्वेदात दारूमुळे होणाऱ्या विकारांचे विस्तृत वर्णन आहे. कुठेच दारू प्यावी, आपलीशी करावी असा सांगावा नाही. आयुर्वेदात सांगितलेले मद्य व आताची दारू यात महद्अंतर आहे. तरी शास्त्रकारांनी वरीलप्रमाणे मद्य पिऊ नये, प्यायचे झाले तर अल्प प्रमाणात, अत्यल्प प्रमाणात तेसुद्धा भरपूर पाणी मिसळून घ्यावे असे सांगितले आहे. उन्हाळा, शरद ऋतू या काळात त्याचा तीव्र निषेध केला आहे. दारूचे दुर्गुण सर्वानाच माहीत आहेत. पण यकृताचे कार्य दारू कसे बिघडवते हे पाहावयाचे असल्यास जलोदर, कावीळ, यकृत किंवा पांथरीची सूज असणाऱ्या आपल्या आसपासच्या रोग्यांचा तपास करावा. मग दारूचे व्यसन करून औषध मागावयास येणाऱ्या रोग्यांना, दारूऐवजी ‘घोडय़ाचे मूत्र प्या’! असे खडीवाले कडाडून का सांगतात हे कळेल. 

दारू हे प्रथम पचन व्हावे, भूक लागावी, पोटातील गॅस दूर व्हावा, झोप लागावी, आपले दु:ख विसरावे म्हणून लोक घेतात. सुरुवातीचे आठ-पंधरा दिवस त्याचा थोडाफार वरवर उपयोग होतो असे दिसते. नंतर दारू जी माणसांचा ताबा घेते ती कायमची, त्याला संपवेपर्यंत. दारू यकृताचा नाश करते. ती सरळ रक्तात पोचते. शरीरातील स्निग्ध, ओजस्वरूपी जीवनाचा दर क्षणाला नाश करते.
शास्त्रात दारूचे मधुर, कडू, तुरट, तिखट इत्यादी रस सांगितले असून ती सारक, रोचक, दीपक, तीक्ष्ण, उष्ण, लघू, आल्हाददायक, पौष्टिक, स्वर, स्मृती व वर्ण याकरिता हितावह तसेच निद्रानाश व अतिनिद्रा या दोन्हींकरिता उपयुक्त सांगितली आहे. विधिपूर्वक घेतल्यास शरीरातील विविध स्रोतसांचे मार्ग खुले करते.
पण मद्य घेणाऱ्याचा आपल्या तोंडावर कधीच ताबा राहात नाही. त्यामुळे गुण राहातात बाजूला, न शरीरात विषाचा झपाटय़ाने प्रसार करण्यास गुण दारू तात्काळ दाखवते. अल्सर, तोंड येणे, जळवात, मूळव्याध, भगंदर, मूतखडा, कावीळ, जलोदर, यकृत विकार, गरमी, परमा, एड्स, गांधी उठणे, जखमा, त्वचा विकार, पोटदुखी, मलावरोध, हाडांचे विकार, हृद्रोग व क्षय या विकारांत दारू पिणे म्हणजे ‘आपले थडगे आपणच खणणे आहे.’

आयुर्वेदीय प्राचीन ग्रंथात पाणी, दूध, तेल, तूप या द्रव द्रव्यांबरोबर मद्याबद्दलही विस्ताराने वर्णन केलेले आहे. त्या काळातील मद्य कल्पना आजच्या दारूपेक्षा फारच वेगळी होती. आयुर्वेदीय ग्रंथात नवीन मद्य व जुने मद्य, तांदळाच्या पिठापासूनची दारू-सुरा; ताडी; माडी किंवा शिंदी, बेहडय़ाची साल व तांदळाच्या पिठापासून केलेली दारू तसेच विविध आसवारिष्टे, द्राक्षासव, खर्जुरासव, साखर, गूळ, ऊसाचा रस, ऊसाचा शिजवलेला रस, मधापासून केलेली दारू अशा विविध प्रकारच्या दारूंची निर्मिती व कमी-अधिक गुणदोष सांगितले आहेत.
तंबाखू, विडी, सिगरेट, गुटका, मशेरी, तपकीर, तंबाखू, टूथपेस्ट, दारू, ब्रॅन्डी, वाइन, रम अशा विविध निकोटिन व अल्कोहोलच्या उत्पादनाच्या दुष्परिणामाबद्दल मी आपणा सर्वाशी सुसंवाद साधण्याचे कारण नाही. कारण या व्यसनांमुळे काय बरे-वाईट होते हे या व्यसनाचा कमी-अधिक वापर करणाऱ्या, घरच्या नातेवाईकांना व व्यसन न करणाऱ्या तसेच वैद्यकीय क्षेत्रांतील लहानथोरांना माहिती आहेच. माझ्या वैद्यकीय व्यवसायामुळे माझ्याकडे प्रतिदिन मंडळी येत असतात. त्यांच्या तक्रारी, लक्षणे, रोग, अडचणी हे ऐकल्यानंतर मी तरुणांपासून वृद्धांकरिता माझा पथ्यापथ्याचा लाल कागद हातात घेतो. रुग्णांच्या तक्रारींचा मागोवा घेताना; मलावरोध, हाडांचे विकार, प्राणवह स्रोतसांचे विकार, रक्तक्षय, पांडुता, कावीळ, डोळय़ांचे विकार, जलोदर, संधिवात, मुंग्या येणे, हृद्रोग, मूत्रपिंड विकार, सी.आर.एफ., नपुंसकता अशा रुग्णांना ‘तुम्हाला काही व्यसन आहे का’, असे विचारायला लागते. हे व्यसन बंद करणार असाल तर तुम्हाला मी औषधोपचार सुचवू शकतो अशी माझी भूमिका असते. बहुधा अशी ठाम भूमिका घेतली तर रुग्ण व त्यांचे नातेवाईक जरूर ऐकतात. व्यसनमुक्तीचा प्रामाणिक प्रयत्न करतात.
ज्यांना मनापासून दारू सोडायची इच्छा आहे त्यांनी दारू प्यावीशी वाटते त्या वेळेस दोन-तीन कागदी लिंबाचा केवळ रस, साखर, पाणी किंवा मीठ न मिसळता प्यावा. मग खुशाल दारू प्यावयास घ्यावी. बहुधा दारू घशाखाली उतरत नाही. कारण दारू व आंबट लिंबू रस यांचा परस्परविरोध आहे. ज्यांना असे करावयाचे नाही त्यांच्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तींनी या दारुडय़ा माणसाच्या जेवणात कोशिंबीर, चटणी, रायते, भाज्यांत सायट्रिक अॅसिड किंवा लिंबूक्षार नावाचे साखरेच्या कणासारखे केमिकल मिसळतात, ते चार-पाच कण टाकावेत. ते फार आंबट असतात. त्याची किंमत नाममात्र असते. कोणत्याही केमिस्टकडे किंवा आयुर्वेदीय औषधी उत्पादकांकडे मिळतात. मी विनामूल्य देतो.
भूक लागत नाही, पचन होत नाही म्हणून सबब सांगून जे मद्यपान करू इच्छितात त्यांना कुमारीआसव, द्राक्षारिष्ट, पिप्ललादि काढा, पंचकोलासव असे काढे करून पहावे. फायदा निश्चित होतो.
जी मंडळी झोपेकरिता किंवा चिंता दूर व्हावी म्हणून किंवा दु:ख विसरण्याकरिता मद्यप्राशन करू इच्छितात त्यांनी शतधौत घृत झोपण्यापूर्वी कानशिले, कपाळ, तळहात, तळपाय यांना जिरवावे; नाकात दोन थेंब टाकावेत. स्वत:च्या प्रश्नाव्यतिरिक्त कोणताही विषय किंवा वर्तमानपत्रातील बातमी डोळय़ांसमोर आणावी, चटकन झोप लागते. गरज पडली तर निद्राकर वटी सहा गोळय़ा झोपताना घ्याव्यात. शांत झोपेकरिता आणखी दोन उपाय म्हणजे सायंकाळी लवकर व कमी जेवण घ्यावे. जेवणानंतर किमान वीस ते तीस मिनिटे फिरून यावे.
‘एकच प्याला’ नाटक लिहिणारे महान मराठी साहित्यिक श्रीराम गणेश गडकरी, महात्मा गांधी, संत विनोबा, संत गाडगेमहाराज यांना प्रणाम!
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

First Published on February 20, 2015 1:04 am

Web Title: ayurved 2
Just Now!
X