14 December 2019

News Flash

शरीराला हितकारक – २

जलपान ‘उदकं आश्वासकराणां श्रेष्ठम्’ सर्व प्रकारच्या उपलब्ध पाण्याच्या प्रकारांचा विचार आरोग्याच्या दृष्टिकोनातून केला तर ‘उकळलेले पाणी’ पहिल्या क्रमांकाचे पाणी.

| August 14, 2015 01:13 am

01khadiwaleजलपान
‘उदकं आश्वासकराणां श्रेष्ठम्’ सर्व प्रकारच्या उपलब्ध पाण्याच्या प्रकारांचा विचार आरोग्याच्या दृष्टिकोनातून केला तर ‘उकळलेले पाणी’ पहिल्या क्रमांकाचे पाणी. त्यानंतर अत्यंत सुरक्षित पाणी म्हणजे सुंठ चूर्णयुक्त पाणी, नंबर तीन नागरमोथा चूर्ण, सिद्धजल आणि त्यानंतर चुन्याची निवळी किंवा सुधाजल.
नुसत्या अन्नग्रहणाने शरीर सुधारणार नाही, त्याकरिता त्यानंतर नुसते गरम पाणी प्यावे. त्यामुळे शरीरातील जलतत्त्व कमी होत नाही. रसक्षय किंवा डीहायड्रेशनचा धोका रहात नाही. गरजेप्रमाणे या पाण्यात कणभर मीठ आणि चिमूटभर साखर किंवा चमचाभर मध घालावा. अशा जलपानावर एखादा दिवस जरूर काढावा. त्यामुळे सतत लघवी होत राहते आणि शरीराचे क्लिन्झिंग होते.
मौन
‘मौनं सर्वार्थ साधनम्’ हे वचन सर्वानाच माहीत आहे. मौन हा असाच मोठा उपाय अनेक विकारात आहे. रक्तदाबवृद्धी, खोकला, दमा, स्वरभंग, क्षय, ताप या विकारांत तर माणसाची बोलती आपोआपच बंद होत असतेच, पण त्यापेक्षा अनेक पित्त व वायूच्या विकारांत विशेषत: दुर्बलता, पांडू, अम्लपित्त, अल्सर, हर्निया, प्रोस्टेट ग्लँड, पोटदुखी, छातीत दुखणे या विकारांत मौनाचा आश्रय करावा. माणसाची ताकद दोन प्रकारे खर्च होत असते. सतत बोलणे, सतत वाचन किंवा डोळ्याचा वापर. याकरिता तोंडाला कुलूप जरूर लावावे.
अंजन – सुरमा
फार प्राचीन काळापासून आपल्या देशात डोळ्यांत काजळ, सुरमा, नेत्रांजन करण्याची पद्धत आहे. त्याकरिता अ‍ॅण्टिमनी या धातूपासून बनविलेले सुरमा, मोत्याचा सुरमा, कापराचे अंजन, मधाचे अंजन, तूप, एरंडेल तेल असे नाना प्रकार वापरले जातात. आधुनिक विज्ञानाप्रमाणे अ‍ॅण्टिमनी किंवा सुरमा या धातूंचे अंजन कितीही सूक्ष्म, घोटलेले असले तरी वापरू नये असे आहे. मला वाटते हे मत मानावे. धातूचा कण केव्हा तरी डोळ्याला त्रास देणारच. मध व एरंडेल हे सर्वात सुरक्षित अंजन आहे. खुपऱ्या टोचणी, खाज याकरिता त्याचा चांगलाच उपयोग होतो. लासरू, डोळ्यातून पू येणे, कंड याकरिता मधाचेच अंजन उपयुक्त आहे. मध मात्र खात्रीचा हवा. एरंडेल तेलाचे अंजन उष्णतेशी संबंधित डोळ्याचे विकारांना लागू आहे. डोळ्याची लाली, तळावणे, भगभग, फार वाचताना त्रास, रूक्षता याकरिता एरंडेल अंजन चांगले. असेच तूप, लोणीही वापरता येईल. सदासर्वदा वापरता येईल असे एरंडेल व मध अंजन एकत्र अंजन चांगले, पण दोन्ही एकत्र करून ठेवले तर काही काळाने दोन्ही गोष्टी त्याच्या कमीअधिक वजनाने वेगळ्या होतात. लहानांपासून थोरांपर्यंत अंजन वापरायचे असल्यास कापूर जाळून तूप लावलेल्या तांब्याच्या ताम्हणावर धरलेले काजळ तयार करावे.
गुळण्या (गंडूष, कवल)
गुळण्या दोन प्रकारच्या करता येतात. एका प्रकारांत तोंड खुळखुळून चुळा भराव्या, त्यास कवल म्हणतात. चष्म्याचा नंबर जाण्याकरिता साध्या पाण्याच्या गुळण्या उपयुक्त आहेत. सर्दी, पडसे, खोकल्याकरिता मीठ, हळद, गरम पाण्याच्या गुळण्या उपयुक्त आहे. तोंड आले असले तर तूप पाण्याच्या गुळण्या कराव्या. तोंडात व्रण असले तर व्रणशुद्धीकरता मधपाण्याच्या गुळण्या कराव्यात. तोंड वाकडे होणे या विकारात तेल व कोमट पाणी अशा गुळण्या कराव्या. याच प्रकारे ही पातळ द्रव्ये तोंड भरून ठेवली, तोंड खुळखुळ हलवले नाही, तर वरील विकारांत गंभीर अवस्थेत जास्त फायदा होतो. या प्रकारास गंडूष असे म्हणतात.
गोमय, गोमूत्र
गोमय व गोमूत्र हे दोन पदार्थ आपण कमी लेखू नयेत. या दोघांच्या मिश्रणाने शरीरास अभ्यंग केला तर त्वचा स्वच्छ व हलकी होते. गोमयाचे पाणी व गोमूत्र घेऊन यकृत, प्लीहा या अवयवांच्या सूज, मंद भूक, कावीळ, जलोदर या विकारांत उपयोग होतो. महारोगी, ओलो-कोरडे इसब, सोरायसिस या विकारांनी ग्रस्त रुग्णांनी गोमय पाणी व गोमूत्र संबधित भागाला लावून पाहावे. हेच पाणी प्यायल्याने कफ व मलावरोध ही प्रमुख लक्षणे असलेल्या दमेकऱ्यांना आराम पडतो.
स्वमूत्रोपचार
स्वमूत्रोपचार किंवा शिवाम्बूचे एक फॅड होऊन राहिले आहे. माझ्याकडे एकदा पन्नाशीचे एक गृहस्थ विलक्षण थकवा येतो म्हणून आले. तपासणीत काही दोष नव्हता. अधिक माहिती घेता ते नित्य शिवाम्बु प्रयोग करीत हे कळले. ते थांबविल्याबरोबर त्यांचा थकवा गेला. त्यांना त्या प्रयोगात केव्हा थांबावे हेच कळले नव्हते. निसगरेपचारतज्ज्ञांच्या मते शिवाम्बू शरीरात उपयुक्त असते. तुमच्या आमच्यापेक्षा ब्रह्मदेवाला जास्त अक्कल आहे. त्याने अशुद्ध रक्त शुद्ध होण्याकरिता शरीरात एक विलक्षण यंत्रणा निर्माण केली आहे. तेथे अशुद्ध रक्त शुद्ध होण्याकरिता परत येते. याप्रमाणे आपले मूत्र आपण पेय म्हणून उपयोग होणार असते तर ब्रह्मदेवानेच तशी योजना आपल्या शरीरात केली नसती का? स्वमूत्र हे शरीराच्या बाहेरच गेले पाहिजे एवढा तरी विवेक या उपचारांचे अवडंबर माजविणाऱ्यांनी ठेवावा.
पर्णस्वेद
‘अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने’ या सुभाषितात किती मोठा अर्थ आहे हे आम्ही आमच्या आसपासच्या परिसरात नैसर्गिक साधनांचा सुयोग्य वापर योग्य प्रकारे केला की लक्षात येते. वृद्ध माणसांच्या सांधेदुखी, गुडघेदुखी या विकारांत वडाची पाने थोडे तेल लावून गरम करून बांधली की काय विलक्षण गुण देतात ते प्रत्यक्ष वापर करूनच पहायला हवे. याच प्रकारे शेवगा, निरगुडी, एरंड पाने यांचा पाण्यात उकळून केलेला शेक उपयुक्त आहे. रुईच्या पानांचा वापर दाहक आहे. पण अति कफप्रधान सूज विकारांत, कफ प्रवृत्तीच्या, बळकट माणसावर प्रयोग करायला हरकत नाही. रुईच्या पानाने व्रण होत नाही ना याची काळजी मात्र घ्यावी. त्याकरिता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच रुई पानांचा प्रयोग करावा.
मातीचा लेप
पोटावर मातीचा लेप हा जैन समाजातील वृद्धांकरिता खास उपचार आहे. पोटाच्या सूज, फुगणे, आग होणे याकरिता गार, गरम वा जाड, पातळी मातीचा लेप अवस्थेप्रमाणे लावावा. मातीच्या लेपाचा फायदा वार्धक्यात लघवी कोंडली असता लगेच होतो. मातीच्या लेप लावल्याबरोबर तास-दोन तासांत लघवी मोकळेपणाने होते. एखाद्या अति वृद्ध व्यक्तीला विनाक्लेश मरण पाहिजे असेल, शेवटी लघवी अडखळून त्रास होऊ नये अशी अपेक्षा असली तर जैन ज्ञानी लोक हा उपाय करतात.
पोटावर वात व ग्लास
बेंबी व आसपासच्या भागातील पोटदुखी, वायू धरणे याकरिता कापसाची वात एका मोठय़ा नाण्यावर ठेवून ते नाणे बेंबीवर ठेवावे. त्या पेटत्या वातीवर ग्लास ठेवावा. पेटलेल्या वातीमुळे उत्पन्न होणारी उष्णता लहान आंतडय़ातील गुंतागुंत मोकळी करते. पोटदुखी थांबवते. वृद्धांकरिता हा अक्सीर इलाज आहे.
दंतधावन
रात्री दात घासले पाहिजेत याविषयी कुणाचेच दुमत असणार नाही. त्याकरिता म्हणजे रात्री दात घासण्याकरिता कात, कापूर, लवंग असे मिश्रण फारच चांगले. त्यामुळे रात्री दातांत अडकलेले कण दात खराब होऊ देत नाहीत. सकाळी दात घासल्यानंतर आपण लगेचच खातो-पितो. त्यामुळे दातातील विकृती दुरुस्त व्हायला सकाळच्या दात घासण्याचा फारसा उपयोग होत नाही.
अनन्नग्रहण
अनन्नग्रहण किंवा उपवास हा मोठा उपाय आहे. अन्न ग्रहण केले नाही तर कफ, पित्त आणि आमांश हे विकार बळावत नाहीत. काही प्रमाणात वायू तसेच पित्ताचे विकार त्रास देतील. पण त्यापेक्षाही फायदे जास्त आहेत. क्षुद् बोध होतो. शरीरातील मलाला उत्सर्जनाला वेळ मिळतो. पचनयंत्रणेवरचा ताण कमी होतो. अग्नीचे कार्य सुधारते. शरीर हलके होते. संतर्पणोत्थ म्हणजे खाऊन- पिऊन फाजील दोष वाढवणारे विकार बंद होतात. मूळव्याध, भगंधर, सूज, रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, स्थौल्य, खाज या विकारांत अनन्नग्रहण हा उत्तम उपाय जरूर करावा. किती दिवस हे ज्याने त्याने आपल्या क्षमतेप्रमाणे ठरवावे.
चिंता मिटवा
अनेक विकारांचे कारण चिंता हेच असते, असे म्हणतात. आपले मरण लवकर ओढवून घेण्याकरिता उत्तर आयुष्यात विशेषत साठीच्या पुढे चिंता हे एक मोठे कारण आहे. बिनधास्त बेफिकिरीत राहणे जमले पाहिजे. आपण पडलो तर फरशीला खड्डा पडेल, पण आपल्याला काही होता कामा नये, असे भक्कम मन पाहिजे. आयुर्वेद शास्त्रकारांनी मधुमेह विकारात व्याप मागे लावून घ्या बिझी रहा, खूप काम करा म्हणजे मधुमेह आटोक्यात राहील असे सांगितले आहे. चिंता वाढवून अनिद्रा, हृद्रोग, मधुमेह, त्वचारोग, पांडुरोग, क्षय आणि शेवटी सर्वनाश होतो हे लक्षात घ्यावे. ‘चिंता चितेची बहीण आहे’ ही वॉर्निग कायम लक्षात ठेवावी.
फलाहार
उपवास आणि जलपान या प्रयोगानंतर शरीरात काम करावयास ताकद यावी म्हणून फलाहारावर रहावे. त्यासाठी आपल्या प्रकृतीप्रमाणे पोटभरू किंवा मूत्रल, हृद्य, रुचकर, पाचक, रसाळ, थंड किंवा उष्ण फळे निवडावी. रस काढून फळांची मजा घालवू नये. शक्यतो नैसर्गिक अवस्थेत पिकलेले फळ खावे. ज्यूस नको. ज्यांना शक्य आहे, त्यांनी एक दिवस द्राक्षायोग करावा. म्हणजे दिवसभर तहान, भूक लागली तर पाणी न पिता, अन्न न खाता फक्त गोड द्राक्षे वारंवार खावीत. दिवसभरात ८०० ग्रॅम द्राक्षे पुरेशी होतात. दिवसभराचे सर्व शारीरिक, बौद्धिक श्रम उत्तम प्रकारे करता येतात. एकदा हा प्रयोग जरूर करून बघावा. मात्र ही द्राक्षे एप्रिल महिन्यातील गोड-केवळ गोडच असावीत.
व्यसने लांब ठेवा
तंबाखू, बिडी, सिगारेट, तपकीर, पान पराग, जर्दा, तंबाखूची टूथपेस्ट यांच्या शरीरावरील विषारी दुष्परिणामांबद्दल नव्याने लिहिण्याची खरे तर गरज नाही, पण या पदार्थाच्या रोग्यांबाबत काही अनुभवाचे बोल सांगावेसे वाटतात. सुमारे वीस वर्षांपूर्वी एक तहसीलदार गालाच्या आतल्या बाजूस गाठ आली म्हणून माझ्याकडे आले. कॅन्सरची शंका आल्यामुळे त्यांना मुंबईच्या टाटा कॅन्सर रुग्णालयात सविस्तर तपासणीसाठी पाठवले. कॅन्सरची गाठ नाही असा रिपोर्ट आला. या गृहस्थांना रोज पंचवीस ते पन्नास जण भेटायला येत. प्रत्येक जण साहेबांपुढे माइल्ड किंवा स्ट्राँग सिगारेटचे पाकीट ठेवी. साहेब अखंड सिगारेट ओढत. पथ्य सांगूनही त्यांचा मोह सुटेना. पंधरा दिवसांत ती गाठ वाढून लिंबाएवढी झाली. कॅन्सरची गाठ नाही, निदान होत नाही म्हणून तज्ज्ञ मंडळी ती गाठ काढेनात. नाइलाजाने यांचे स्मोकिंग कमी झाले, पण पूर्ण थांबले नाही. दोन महिन्यांत ती गाठ आंब्याच्या कोयीएवढी तर तीन महिन्यांत मोठय़ा चेंडूएवढी होऊन हे गृहस्थ निकोटिनच्या रोगाचे आणि तंबाखूचे बळी ठरले.
दुसरे उदाहरण एका मठातील सेवेकरींचे. या सेवेकरींना विडय़ा, सिगारेट्चा षौक. त्यांच्या जिभेला पहिल्यांदा फोड आला. मी पहिल्या अवस्थेत हा रोग प्रवाळ, कामदुधा, त्रिफळा चूर्ण पोटात घ्यावयास लावून व इरिमेदादी तेल लावावयास देऊन बराचसा सुधारून दिला. त्यांना गिळता येऊ लागले. सहा महिन्यांनी ते माझ्याकडे पुन्हा आले ते वाढलेला रोग घेऊन. तो इतका वाढला की कोणतेही हॉस्पिटल त्यांना प्रवेश देईना. या गृहस्थांची ऑपरेशनची तयारी नव्हती. शेवटचे पंधरा दिवस माशा बसत होत्या. त्यांना फार वाईट अवस्थेत मृत्यू आला; पण माझ्या सल्ल्याने दोन जणांचे प्राण वाचले आहेत. एका प्राध्यापकांच्या गालात व्रण आढळला. त्यांना सिगारेटचे भरपूर व्यसन होते. त्यांना मी कॅन्सरची धास्ती घातली. त्यामुळे त्यांनी सिगारेट सोडली. पुढे तो मधुमेहाचा व्रण निघाला. माझे एक जैन मित्र आहेत. त्यांचे जावई चिक्कार सिगरेट पीत. त्यांना मी विडय़ा ओढायचा सल्ला दिला. त्याबरोबर हळूहळू त्यांचे व्यसन कमी झाले. त्यांना मधुमेह आहे. अधूनमधून तोंडात व्रण येतो. पण तो कॅन्सरसारखा प्राणघातक नाही. रस्तोरस्ती तरुण मुले विडय़ा, सिगारेट ओढताना दिसतात, तेव्हा मी त्यांना सुनवावयास कमी करत नाही. सकाळी रिक्षाची बोहनी झाली की रिक्षावाला प्रथम तंबाखूचा बार भरतो. त्याला सुनावले की तो हातातली चिमूट फेकून देतो. याकरिता सतत लोकशिक्षण, आरडाओरडा हवा.
तपकीर
मी बंगलोरला भारतीय विमानदलात असताना एक बंगाली मित्र सतत तपकीर ओढत असायचा. एकदा त्याचे कोलकात्याहून खास तपकिरीचे किमती पार्सल व्हीपीने आले. ते पार्सल फोडत असताना व्यसन सुटत नसल्याची त्याची तोंडाने बडबड चालली होती. मी त्याचे पार्सल उचलले आणि बाजूच्या गटारात फेकून दिले. १९५४ साली त्याची किंमत ५० रुपये होती. क्षणभर तो माझ्यावर चिडला. त्याला जेव्हा समजावले की तुझी स्पेशल तपकीर फेकल्याशिवाय तुझे व्यसन सुटणार नाही तेव्हा त्याने मानले. तेव्हापासून त्याचे व्यसन सुटले हेही खरे.
पानसुपारी
माझ्याकडे येणाऱ्यांच्या खिशात तंबाखु, पानसुपारीची पुडी असली तर रोगाचे पथ्यापथ्य सांगताना तो सर्व विषार मी जप्त करतो. लोक ऐकतात, त्यासाठी आपण त्यांना जोरात सांगावे लागते. कच्ची सुपारी आणि नुसता चुना खाऊन तोंडात फोड येणारे दोनशे रुग्ण आजपर्यंत माझ्याकडे येऊन बरे होऊन गेले असतील, पण त्यासाठी आधी या लोकांना कॅन्सरची धास्ती घालावी लागते. मगच ही मंडळी सुधारतात. त्याचबरोबर त्यांना पर्याय म्हणून चघळण्यासाठी काही तरी द्यावयास हवे.
सुपारीमुळे गालाच्या आतल्या स्नायूंना फायब्राइडसारखा रोग होऊन तोंड आकसते. तोंड उघडावयास, मोठा आ करावयास त्रास पडतो. अशा रुग्णांना बरे करताना त्यांचे ऑपरेशन टळले की, ते आपोआपच पुढील पदार्थाची सुपारी नसलेली सुपारी खातात. ज्येष्ठमध, धणे डाळ, तीळ, खोबरे, ओवा, शेपा, बडीशेप, कणभर मीठ सर्व भाजून उत्तम सुपारी होते. सर्वात चांगले म्हणजे आवळा वाळवून त्याचे तुकडे चघळावेत. आंब्याची कोय तुकडे करून मीठ पाण्यात भिजत ठेवावी. एका दिवसाने तिचे तुकडे सुकवावे. उत्तम सुपारी होते.
response.lokprabha@expressindia.com

First Published on August 14, 2015 1:13 am

Web Title: ayurved 3
टॅग Ayurved,Medicine
Just Now!
X