04 July 2020

News Flash

औषधाविना उपचार : अन्नं वृत्तीकराणां श्रेष्ठम्

तुम्हा-आम्हाला रोजचा ‘कारोभार’ समर्थपणे चालवायचा असेल तर अन्न हे हवेच. आपणा सर्वाच्या अन्नातील प्रमुख द्रव्य असणाऱ्या धान्यांपैकी गहू या धान्याची नोंद प्राचीन वैदिक ग्रंथात कुठेच

| February 27, 2015 01:24 am

01khadiwaleतुम्हा-आम्हाला रोजचा ‘कारोभार’ समर्थपणे चालवायचा असेल तर अन्न हे हवेच. आपणा सर्वाच्या अन्नातील प्रमुख द्रव्य असणाऱ्या धान्यांपैकी गहू या धान्याची नोंद प्राचीन वैदिक ग्रंथात कुठेच नाही हे किती जणांना माहीत आहे? गहू म्हटले की दणकट ताकदीचे, आडमाप शरीराचे पंजाबी, अफगाण, पठाण किंवा राजस्थान जाट, शीख व मुसलमान डोळय़ांसमोर येतात. दुसऱ्या महायुद्धामुळे महाराष्ट्रात गहू घरोघर आला. त्या अगोदर सणासुदीला गहू असे. तसे पाहिले तर गव्हासारखे श्रेष्ठ अन्न नाही. ताकद देणारे, सिग्ध पोळी किंवा चपाती करावयास सोपे धान्य आहे, तूप, तेल वापरून त्याचे अनेक सोपस्कार करता येतात. जगभर माणसांकरिता व जानावरांकरिताही गहू वापरला जातो तो ताकदीकरिता. गहू हे पूर्णपणे निदरेष अन्न आहे. जे सदाकदाचेच आजारी आहेत, ज्यांचा अग्नी मंद आहे, यकृताचे कार्य बिघडले आहे, त्यांना गहू पेलवत नाही, मानवत नाही, पण सर्वसामान्यांच्या सातही धातूंचे सम्यक पोषण गव्हामुळे होते.

ज्यांना वजन वाढवायचे आहे, शरीर धष्टपुष्ट करावयाचे आहे, शरीर बळकट करावयाचे आहे, हाडे जुळून यावीशी वाटतात, उंची वाढवावी असे ज्यांना वाटते, त्यांना गव्हाशिवाय पर्याय नाही. गहू उष्णही नाही, थंडही नाही. गव्हाची पोळी, भाकर, शिरा, बिस्किटे अशा विविध प्रकारे जगभर गव्हाचा वापर होतो. भारतात काही प्रांतात गव्हाबरोबर अल्प प्रमाणात हरभरा किंवा मका मिसळून पोळी करण्याचा प्रघात आहे.
काश्र्य, दुबळेपणा, हाडांचे विकार, पांडू, थकवा, शोष, क्षय, स्वरभंग अशांसारख्या धातुक्षयामुळे किंवा रसरक्ताच्या कमतरतेमुळे उत्पन्न होणाऱ्या विकारात गव्हाचे सत्त्व फारच उपयुक्त आहे. त्याकरिता चार चमचे गहू रात्रौ भिजत ठेवून सकाळी ते वाटून त्याची चटणी पिळून सत्त्व काढावे. दूध, साखर व पाणी याबरोबर ते सत्त्व उकळून लापशी खावी. वजन निश्चयाने वाढते. नेत्रक्षीणता, त्वचेतील रूक्षपणा, मोडलेली हाडे लवकर सांधण्याकरिता अशा लापशीचा उपयोग होतो.
जेवणानंतर ज्यांना लगेच संडासला लागते, आमांश, शौचाला घाण वास मारतो, मधुमेहात अधिक साखर वाढलेली असल्यास त्यांनी गहू पूर्ण वज्र्य करावा. अग्निवर्धन, अग्नीचे बळ वाढल्याशिवाय गहू खाऊ नये. कृश व्यक्तींनी अग्नी उत्तम असल्यास व्यवस्थित तेल-तूप मिसळून पोळी खावी. अति स्थूल व्यक्तींनी सुकी चपाती किंवा खाकराचा वापर करावा. ज्यांना चालत असेल त्यांनी कणकेमध्ये ओवा, जिरे, आले, सुंठ यांचा चवीपुरता गव्हाबरोबर वापर करावा.
ज्यांना तीव्र मलावरोध आहे व गव्हाच्या चपातीशिवाय चालत नाही त्यांनी एक पोळी कणकेकरिता एक चमचा एरंडेल, या हिशोबाने कणीक कालवावी, मळावी, पोळी उत्तम होते. पोट साफ होते. पोळी खाणाऱ्याला पूर्वकल्पना दिली नाही तर तो ‘आज पोळी फार खुसखुशीत झाली आहे.’ अशी उलट पोचपावती देतो. मधुमेही माणसाला वैद्य लोक उष्मांकाच्या हिशोबात गहू वज्र्य करायला सांगतात. त्याऐवजी एका पोळीच्या कणकेत एक चमचा मेथी चूर्ण मिसळून पोळ्या केल्या तर निश्चयाने मधुमेही, स्थूल व्यक्तींना गहू खाल्ल्याचा पश्चात्ताप होत नाही. अशी पोळी चवीने फार कडूही नसते.
बाह्योपचार म्हणून गव्हाच्या कणकेचा पोटिसाकरिता वापर सर्वत्र प्रसिद्धच आहे. गव्हाच्या पिठाचे पोटीस जास्त काळ उष्णता धरून ठेवते. त्यामुळे मार, मुरगळा, सूज, गळा याकरिता ते उपयुक्त ठरते. चार भाग गव्हाची कणीक व एक भाग टाकणखार असे मिश्रण पाण्यात कालवून, गरम गरम पोटीस करावे, शेकावे.

तांदूळ
सामान्यांपासून श्रीमंतापर्यंत सर्वानाच पोटभर, रुचकर, खावयास सोपे, विविध प्रकारे तयार करता येते, शाकाहारी, मांसाहारी दोनही आहारात फिट बसते असे भात हे उत्तम अन्न आहे. तसेच ते औषधी गुण व दोष दोन्ही देणारे आहे. देशपरत्वे त्याच्या अनेक जाती आहेत. नवा, जुना, हातसडीचा, पॉलिश, उकडा, लाल तांदूळ असे नाना प्रकारचे तांदूळ वापरले जातात.
आयुर्वेदीय शास्त्रकारांनी जुना तांदूळ वापरावा असा आग्रह धरलेला आहे. कारण जुना असूनही त्याचा स्वाद, चव टिकून असते. कारण जुन्या तांदळाचे वरचे आवरण किंवा कोंडा आपोआप कमी होऊन पचायला तो हलका होतो. जुन्या तांदळाचा भात व्हायला पाणी जास्त लागते. नवीन तांदळाला पाणी फार लागत नाही. तांदळावरचे तूस पूर्णपणे काढलेला, खूप पॉलिश केलेला तांदूळ नुसता पोटभरू झाला. ज्यांना बुद्धीचे काम आहे, शारीरिक श्रम फार नाहीत, बैठे काम जास्त आहे, त्यांनी हातसडीचा, कमी पॉलिश केलेला तांदूळ वापरावा. जुना तांदूळ अधिक चांगला. कारण तो पचायला तुलनेने हलका आहे. ज्यांना शारीरिक काबाडकष्ट खूप आहेत, मजुरीचे, श्रमाचे, उघडय़ा हवेत, उन्हातान्हात, खाणीत, शेतात किंवा नदीनाले, समुद्र, भरपूर घाम गाळून काम करावयाचे आहे त्यांनी नवीन तांदूळ वापरावा. त्यातून त्यांना भरपूर पिष्टमय असे मांस, मेदवर्धक द्रव्य मिळते. तांदूळ गुणाने थंड, स्निग्ध, मलवर्धक, कफवर्धक, पित्ताशामक व पोटात वायू उत्पन्न करणारा आहे.
पोटभरू अन्नाव्यतिरिक्त भाताचे औषधी गुण भरपूर आहेत. हातसडीचा किंवा उखळात सडलेला तांदूळ हा डोळ्याच्या, त्वचेच्या, केसांच्या विकारांकरिता फार उपयुक्त आहे. तांदळाच्या कोंडय़ाची बिस्किटे शरीराचा lp30असमतोल वाढ होऊन जेव्हा रोग होतात तेव्हा खावी. विशेषत: भात हे ज्यांचे नहमीचे अन्न आहे त्यांनी अधिक भात खाल्ल्यास, स्थौल्य, रक्तदाब, नेत्रक्षीणता, त्वचा रूक्ष होणे, अंगाला खाज सुटणे, मुंग्या येणे, पायांना जडत्व येणे, दोन्ही पायांना सूज येणे, अकाली केस गळणे, अजीर्ण वारंवार होणे, कोड, अंगावर फिक्कट डाग, दातांचे विकार, जखमा भरावयास वेळ लागणे, सोरायसिस, हाडांचे विकार, महारोग या विकारांना आवर पडत नाही, त्यांचे विकार बळावतात. त्याकरिता त्यांनी हातसडीचा तांदूळ आवर्जून खावा.
आम्लपित्त, अ‍ॅलर्जी, आग होणे, आमांश, श्वेतप्रदर, कावीळ, कृशता, गरमी, परमा, गोवर, कांजिण्या, गंडमाळा, चक्कर येणे, तोंड येणे, दुबळेपणा, निद्रानाश, पित्तविकार, मनोविकार, मुखरोग, मूतखडा, मूळव्याध, क्षय या विकारात सर्वाकरिता भात हे पथ्यकर एवढेच नव्हे तर आवश्यक असे अन्न आहे. याउलट मधुमेह, शय्यामूत्र, कफविकार, खोकला, दमा, कान वाहणे, अग्निमांद्य, अजीर्ण, पोटात गॅस धरणे, मधुमेही जखमा, वायूगोळा, भगंदर, फुप्फुसविकार, लठ्ठपणा, वातविकार, अर्धागवायू, सर्दी, खाज असलेले त्वचाविकार, सर्वागशोध, कफप्रधान हृद्रोग या विकारात भात वज्र्य करावा. शरीरात जेथे फाजील पाणी शरीरात पचनसंस्था पचवू शकत नाही, तिथे भात कुपथ्य समजावा.
ज्यांचे भाताशिवाय अजिबात चालत नाही अशांना मग अशा अवस्थेत तांदूळ भाजल्यामुळे त्यातील जलद्रव्य कमी होते. कृश व्यक्तींच्या व पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी तुपावर परतून भाजलेला, गुलाबी झालेला तांदूळ वापरावा. कफप्रकृती व स्थूल व्यक्तींनी तांदूळ नुसताच कोरडा भाजावा.
आमांश, संडासला चिकट होणे, वारंवार संडासला होणे, जुलाब होणे, या विकारांत तांदळाच्या पिठाची भाकरी हा सर्वोत्तम आहार व औषध होय. सोबत ताक भरपूर प्यावे. ज्यांना फार श्रमाचे काम नाही अशा वृद्ध वर्गाकरिता तांदळाचे बिनतेलाचे धिरडे चांगले. त्यामुळे पोटात वायू धरत नाही. महाराष्ट्रातील तमाम गृहिणींना तांदळाच्या इडली-डोशांबद्दल म्यां पामराने काय सांगावे? तांदुळाची पेज कृश बालके, वृद्ध स्त्री-पुरुष व तापासारख्या कंटाळवाण्या विकारांत तात्काळ एनर्जी देते एवढे अवश्य लक्षात ठेवावे.
आयुर्वेदीय औषधीकरणात विविध धातूंची भस्मे करताना त्या धातूंची प्रथम तेल, ताक, गोमूत्र, कुळिथाचा काढा व कांजीत शुद्धी केली जाते. ही कांजी दोन-तीन दिवसांची आंबवलेली असते. त्यामुळे धातूंचे कण विलग होऊन भस्मप्रक्रिया सोपी होते.

राजगिरा
राजगिरा उपासाव्यतिरिक्त किंवा राजगिरी वडीशिवाय कोणी विशेष वापरत नाही. राजगिरा पित्तशामक आहे. उलटी व आम्लपित्त, पोटदुगी, अल्सर, त्वचाविकार, कफविकार, सर्दी, जेवणानंतरचा खोकला, कावीळ, जलोदर, कंडू, मधुमेह, स्थौल्य इत्यादी विकारांत राजगिरा भाजून केलेल्या लाह्य उत्तम उपाय आहे. एक-दोन मिनिटांत चमचाभर राजगिऱ्याच्या मूठभर लाह्य भाजून होतात. या लाह्या नेहमी ताज्या खाव्या. जुनाट व्रण भरून येण्याकरिता राजगिरा लाह्यंचे लाडू उत्तम टॉनिक आहे. गंडमाळा, टी.बी. ग्लँड्स, खुजी मुले यांच्याकरिता राजगिरा चांगले टॉनिक आहे. राजगिरा पानांची भाजी व लाह्य यावर हे विकार बरे होतात. लघवीची आग, संडासवाटे रक्त पडणे या तक्रारीत राजगिरा पालेभाजी खावी. मधुमेही, मूत्रपिंडग्रस्त रुग्णांना, महाभयंकर क्रॉनिक रिनल फेल्युअर : सी.आर.एफ.या विकारांत राजगिरा लाह्य़ा कोरडय़ा कोरडय़ा खाल्ल्यास रुग्णाला निश्चित आराम मिळतो. जीव बचावतो.

कॅन्सरसाठी गहू!
‘अमृतरस चिकित्सा’ म्हणून गव्हाच्या सात ते पंधरा दिवस वाढलेल्या रोपांची वाटून खीर कॅन्सरकरिता फार उपयुक्त आहे. त्याकरिता रोज चमचा दोन चमचे गहू मातीत पेरावे. रोज पाणी घालावे. रोपे येतात. रोपांना सात ते पंधरा दिवस आपल्या गरजेप्रमाणे वाढू द्यावे. अशी रोज नवीन गव्हाची रोपे पेरण्याकरिता नवनवीन वाटीत रोपांची योजना करावी. पंधरा दिवसांनी वाटून खावीत. सर्व शरीरात या अमृतरस चिकित्सेचा विलक्षण उपयोग होतो. शरीरात नवनिर्माण होते. जोम वाढते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. कॅन्सरमध्ये शरीराची जी झीज झपाटय़ाने होत असते, ती काही प्रमाणात भरून येते.
वैद्य प. य. खडीवाले वैद्य

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2015 1:24 am

Web Title: ayurveda
Next Stories
1 रुचकर : चायनीज पिझ्झा
2 वाचक शेफ : कैरीची तुडतुडी
3 कशासाठी? पोटासाठी! : अ‍ॅसिडिटी म्हणजे नेमके काय?
Just Now!
X